Sunday, 19 April 2020

पुलीयोगरे! ....A Story of a Bachelor's American Dream!

"पुलीयोगरे"  - एक दक्षिण भारतीय पूड चटणी!  चिंच भात (टॅमरिंड राईस) बनविण्यासाठी हि रेडिमेड चटणी वापरली जाते. हि पावडर उत्तर भारतीय लोकांना फारशी माहित नसली तरी परदेशातल्या उत्तर भारतीयांना मात्र चांगलीच माहित आहे (उत्तर भारतीय = तामिळनाडू, केरळ, आंध्र, तेलंगणा व कर्नाटक हि राज्ये सोडून वरचा प्रदेश अशी व्याख्या करू!).  कढईत थोडीशी फोडणी करून त्यात पुलियोगरे पावडर घालून वरून साधा भात टाकला आणि हे मिश्रण एकत्र केले कि एक छानसा सुंदर चविष्ट चिंच-मसाला-भात तयार होतो. परदेशात जाताना लोकं ही पावडर आवर्जून घेऊन जातात.  म्हणजे अगदी मॅगी, चितळे बाकरवडी किंवा काजुकतली च्या पेक्षाही जास्त पुड्या या पुलियोगरेच्या घेतल्या जातात. हे एक ओपन सिक्रेट आहे. बाकरवडी आपण काही रोज खाऊ शकत नाही परंतु ही पावडर म्हणजे एक मॅजिक मिश्रण आहे, ते वापरून तुम्ही कधीही आपले साधेच भाताचे जेवण बनवू शकता!

आता ज्याप्रमाणे ही पावडर अमेरिकेतल्या तांदळात बेमालूम मिक्स होऊन जाते व झटपट एक तिखट, आंबट  चविष्ट पदार्थ बनवते परंतु स्वतःचा भारतीय वेगळेपणाही राखते - तद्वत - अमेरिकेत काही काळासाठी गेलेले लोक हे तिथे मिसळूनही जातात आणि आपला वेगळेपणा ही राखतात. म्हणून हे स्वादिष्ट आणि चमचमीत  शब्दांचे बनविलेले पुलियोगरे!  "मोरु" नावाच्या अमेरिकेत गेलेल्या एका अविवाहित तरुणाची ही भविष्य-कालीन कथा आहे -

सुमारे साडेचार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर व अथक प्रयत्नानंतर मोरुला एच् वन-बी  व्हिसा मिळेल. मोरू हा आपला एक सरळमार्गी कथानायक, ठरवून दिलेल्या रस्त्यांवरून चालणारा, उगाचच नवीन पायवाटेच्या  वाटेला न जाणारा असा सालस माणूस!  पासपोर्ट हातात आल्यावर मोरू शहारून जाईल, एक मोट्ठी स्वप्नपूर्ती होण्याची घटिका आता नजीक आली असेल.  मोरूचे पालक जंगी पार्टीचे आयोजन करतील. इकडे त्याच्या गावाकडे भुदरगडला मोरूचा धाकटा काका मोठ्ठया अभिमानाने ही बातमी एका स्थानिक वृत्तपत्रात मोरूच्या फोटोसकट छापून आणेल! मोरू, त्याच्या गावातला परदेशात जाणारा केवळ सातवा मुलगा!   मोरू आता महिन्याभरातच अमेरिकेत रवाना होणार असेल - एक वर्षासाठी.  मोरूच्या परदेशगमन पार्टीला आलेले  लोक त्याचे अभिनंदन करतील, त्याला म्हणतील "बापाचं नाव काढलेस पोरा" आणि हो - "तिकडे गेलास तरी आम्हाला विसरू नको हो!" - शिवाय "बघा त्या गोऱ्या लोकांना पण आपल्यातल्या गणितज्ञांची आणि संगणक तज्ञांची किती गरज लागते ते. हे सर्व आपल्याकडे पूर्वीपासूनच आहे, त्या लोकांना आत्ता त्याचे महत्त्व कळत आहे" इ.इ. आपल्याकडे संगणकच अमेरिकेतून आले असताना पूर्वी संगणक तज्ज्ञ कसे असतील हे प्रश्न मोरूच्या मनात रुंजी घालतील, पण आताचा अभिमानाचा व कौतुकाचा क्षण असल्याने ते प्रश्न तो मनावर घेणार नाही. 

एकदाची विमानाची तिकिटे हातात पडल्यावर मोरू दोन भल्या मोठ्या चेक-इनच्या बॅगा विकत घेऊन येईल. त्या बॅगांमध्ये काय काय भरले जाईल याची विचारणा करू नये - खाद्यपदार्थ, लोणची, पापड, कुकर,कढया,
तवा -  इतर अनेक वस्तू व कपडे हे सर्व गच्च भरून त्या टम्म फुगविल्या जातील.  मग एकेदिवशी सर्वजण म्हणजे मोरू, त्याचे अजून परदेशात न गेलेले वा लवकर लग्ने झालेले मित्र , नातेवाईक, ज्यांना नंतर तो परत येताना त्याच्यामार्फत लॅपटॉप वा गेला बाजार पेन ड्राइव्ह मागवायचा आहे असे ओळखीचे लोक - त्याला मुंबईला एअरपोर्टवर सोडायला जातील.  तीन मोठ्या तवेरा गाड्या करून! मोरू सर्वांना टाटा करून इमिग्रेशन चेक इं सर्व सोपस्कार पार पाडून आत विमानाची प्रतीक्षा करीत बसेल.

मोरूचा हा पहिलाच विमान प्रवास असेल, त्यामुळे एअरपोर्टवर सगळीकडे तो खूप कुतूहलाने पाहत प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करीत असेल. पण आपण त्या वर्णनात जास्त अडकायला नको. विमानात बसून त्याचे उड्डाण झाल्यावर मोरूचा जीव भांड्यात पडेल (त्याच्या कंपनीतील काही लोकांना एअरपोर्टवरूनच परत बोलावणे झाले होते व त्यांची अमेरिकावारी हुकली होती - हि आठवणच त्याची धाकधुक वाढविणारी असेल ना!) मोरू अमेरिकेत मिनेसोटा राज्यातील "मिनिआपोलीस"ला पोहोचेल. तिथे इमिग्रेशनचे ऑफिसर त्याला नाना प्रश्न विचारतील, मोरूला काहीच कळणार नाही - पण एकेका शब्दाची खूण (क्लू) ओळखून तो उत्तरे देईल. हे गेट पार केल्यावर मग कस्टमचे इन्स्पेक्टर "रॅन्डमली" त्याला पकडतील. इमिग्रेशन, कस्टम वा सिक्युरिटी मध्ये कायमच पकडला जाणारा असा "सदा-रँडम पर्सन" म्हणून मोरूचा प्रवास आता सुरु झालेला असेल. कस्टमचे काका त्याच्या टम्म फुगलेल्या बॅगांमधील एक बॅग उघडून आतल्या वस्तू अस्ताव्यस्त करतील, बाहेर काढून ठेवतील. बॅगेचा तळ गाठल्यावर मग काकांना बाकरवडी व लाडवाचे पुडे सापडतील. मोरूला एक बाकरवडीचे पॅकेट काकांना द्यावेसे वाटेल (लाच म्हणून नव्हे, त्यांना चव बघायला म्हणून!). मोरू हा विचार मनात दाबून टाकीत असताना  -काकांचा चेहरा मात्र निर्विकार असेल. मोरूच्या बॅगेच्या आतील कप्प्यात मारुतीचा फोटो बघून काका त्या "मंकी गॉड" ला तसाच निर्विकार सॅल्यूट ठोकतील आणि आपला तपास थांबवतील. मोरूला हायसे वाटेल, त्याला त्याचा मारुती पावला. कस्टमच्या काकांच्या लक्षात येईल की मोरूच्या बॅगेत जास्त काही अक्षेपार्ह मिळण्याची शक्यता नाही व ह्याची तेव्हढी लायकीही दिसत नाही. काका "गो अहेड" म्हणतील. खाली टाकलेले सामान भरता भरता मोरूच्या नाकीनऊ येईल.  तोपर्यंत मागे रांगेत उभे असलेले लोक वाकडी तोंडे करून नापसंतीदर्शक बोलणे सुरु करतील. मग कष्टम ऑफिसरच मोरूला बॅग भरायला मदत करेल आणि त्याला ओशाळे झाल्यासारखे होईल.  बॅगा ट्रॉलीवर टाकून मोरु विजयी मुद्रेने गेटच्या बाहेर येईल. त्या सुंदर स्वप्नभूमीवर त्याचा आता प्रवेश झालेला असेल! अमेरिका - वाह अमेरिका !! 

मोरूला त्याचे ऑफिसचे दोन सहकारी एअरपोर्टवर आणायला आलेले असतील. मोरूने यांच्याबरोबर दोन वर्षे काम केले असले व त्यांचे फोटो बघितले असले, तरी प्रत्यक्ष भेट हि पहिलीच! अजय मल्होत्रा (रा: कानपूर ) आणि ई. रंगाराजू (आता नुसता राजू! रा: कोईम्बतूर) हे दोघे त्याला घेऊन अजयच्या कार मधून घरी पोहोचतील.  अजय मल्होत्राला तेथे येऊन तीन वर्षे झालेली असतील तर राजूला दोन. अजय अविवाहित असेल, पण त्याची एक गर्लफ्रेंड शिकागोला राहत असेल. राजू मात्र विवाहित पण त्याचे कुटुंब (बायको, तीन वर्षांचा मुलगा, आई वडील इ.) हे सगळे कोइम्बतूरलाच राहत असतील. मोरू घरी जाताना विचारेल "मिनिआपोलीस में ज्यादा ठंड नहीं लग रही।", अजय त्याचा उच्चार सुधारेल  "भाई, इधर मिनिआलीस बोलनेका - पोलीस नही. वैसे शिकागो का स्टेट भी इलिनॉय नही सिर्फ इलिनॉय है! इधर मल्टी-प्लेक्स नही बोलना - मल्टाय-प्लेक्स बोलना. वॉशरूम नही रेस्टरूम बोलो. यार तुम देसी लोग कुछ भी ट्रेनिंग लेके नही आते हो यार! केहने केलीये बोल देते है सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग दिया वगैरा।". मोरू काही न बोलता नुसतेच बाहेर बघत बर्फातली सौंदर्यस्थळे शोधेल. शेवटी जॅक्सनव्हिलच्या फॉस्टर ड्राइव्हवरच्या हिल व्ह्यू बिल्डिंग मध्ये - ३ऱ्या मजल्यावरच्या एक बेडरूम अपार्टमेंटमध्ये ते पोहोचतील. घरी आल्यावर आधी बाकरवडीचे व काजूकतलीचे पुडे व बॉक्स फोडले जातील. अजय व राजू कधी नं मिळाल्यासारखे त्यांचा फडशा पडतील. शेवटी मोरू म्हणेल "भाई एक-एक पॅक स्टीव्ह और गुरुराज के लिये तो रख दो !!" अजय साठी आणलेल्या डीव्हीडीज आणि राजूच्या घरून कुरियरने पाठविलेली ठोककू व अवाकाया लोणची, चटणी पोडी मोरू त्यांच्या हाती सुपूर्द करेल. आजची रात्र मोरूने आणलेल्या खाद्यपदार्थांवर काढायचा विचार करून स्वयंपाकास सुट्टी दिली जाईल. त्या दिवशी शनिवार असेल, घरी फोन करून खुशाली कळविल्यावर मोरू जेट-लॅग घालवायला झोपेची आराधना करायला लागेल. तरी बरे दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी मिळाली! विचार करता करता मोरूला लगेच झोप लागणार नाही! 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सर्व आन्हिके आवरल्यावर तिघे आठवडी सामान आणायला सुपर मार्केटला कॉस्टकोमध्ये जातील. अजय व राजू नेहेमीच्या सराईतपणे ठरलेले कांदे, ठरलेले बटाटे, ठरलेले दूध, ठरलेले दही...अश्या सर्व ठरलेल्या ब्रॅण्डच्या वस्तू भराभरा घाऊक उचलून ट्रॉलीत टाकतील. मोरू एखादे चीज पॅक उचलायला लागेल, तेवढ्यात अजय ओरडेल "अरे वोह नही लेनेका, चीज तो माउंटन हाय काही लेते है हम ।". मोरू ते चीज सोडून देऊन  -"का" हा प्रश्न ना विचारता मुकाट्याने माउंटन हाय शोधायला लागेल. तेवढ्यात समोरून कपाळावर एक नाम ओढलेला माणूस येईल व म्हणेल "नमस्कार! मराठी दिसता आपण ?" - भारतीय / देसी वगैरे न म्हणता डायरेक्ट मराठी कसे काय म्हणाला हा असा विचार करून मोरू "हो" म्हणेल. "मी नारायण !" - मोरू आपली स्वतःची ओळख करून देईल. नारायण म्हणेल - "अमेरिकेत आपले स्वागत असो, आनंदी रहा!!". तेवढ्यात राजूची "चला बिलिंग करू" म्हणून हाक येईल आणि मोरू मागे वळेल, आलोच म्हणून नारायणास निरोप द्यायला म्हणून वळेल - तो नारायण गायब झालेला असेल. अरेच्या कमाल आहे हा माणूस, सांगून पण गेला नाही!

अवाढव्य मॉलमधून अवाढव्य सामान कारच्या अवाढव्य बूटमध्ये (अमेरिकेत ट्रन्क!) घालून तिघे घरी येतील. आज बरेच सामान आणल्यामुळे लंचची जंगी तयारी सुरु होईल. राजूचा रस्सम, राईस, अवियल, पोरियल इत्यादी तर अजयचा पनीरची भाजी व रोट्या करण्याचा फक्कड बेत असेल. मोरू काही दिवस सहाय्यक म्हणून काम करेल व आज सर्व भाज्या चिरणे आणि भांडी धुवून डिशवॉशरला लावण्याची जबाबदारी मोरूची असेल. भरपेट जेवणावर ताव मारून व एकमेकांचे कौतुक करून तिघे डीव्हीडी बघता बघता झोपेची आराधना करतील. दुसऱ्या दिवशी मोरूचा ऑफिसमधला पहिला दिवस! संध्याकाळी तो सगळी तयारी करून ठेवेल -कपडे, बूट इ बॅगेतून बाहेर निघतील.  त्याच्या देशी बॉसला गुरूराजला आधी जाऊ भेटावे लागेल आणि मग तो क्लायंटची - स्टीव्हची ओळख करून देईल. दोघांसाठी मोरूने काजुकतली व बाकरवडी घेतलेली असेल. स्टीव्हचे स्पेलिंग Stephen म्हणजे "स्टीफन" असे असताना "स्टीव्ह" असा उच्चार? - मोरू म्हणेल मरूदे, आपल्याला काय! जे काय अजय - राजू म्हणतील तसेच आपण म्हणू. गुरुराज मोरूचे स्वागत करून त्याला पहिल्याच दिवशी कित्ती मोट्ठी जबाबदारी त्याच्यावर आहे व फाटलेल्या प्रोजेक्टला रुळावर आणून स्टीव्हला खूष ठेवायची कामगिरी सोपवेल. मोरू मनात म्हणेल "आयला पण ऑफशोअरच्या मॅनेजरने असलं, एव्हढं काही नव्हतं सांगितलं राव!" असो आता मोरू काय बोलणार - गुरुराज बरोबर तो स्टीव्हला भेटायला जाईल. स्टीव्ह गुरूराजपेक्षाही त्याचे जंगी स्वागत करेल. "भाखर्व्हडी" व "खाजूखथली" बघून तो चेकाळेल. त्याच्या मुलीला व ३ कुत्रे आणि २ मांजरांना ते कसे आवडते व त्यावर ते तुटून कसे पडतील याचे रसभरीत वर्णन स्टीव्ह करेल. मोरूला हाय-फाय अमेरिकन इंग्लिश गळी उतरायला वेळ लागला, तरी मथितार्थ समजेलच.  स्टीव्ह त्यांना कॉफी प्यायला पॅन्ट्रीमध्ये घेऊन जाईल व "कॅप्युचिनो, लाटे, अमेरीकानो, एस्प्रेसो " इ इटालियन भाईबंधांची तोंडओळख मोरूला होईल. 

मोरूचा पहिला आठवडा हा सर्वांची ओळख करून घेणे, मिटींग्स, बँक अकाउंट, बसायला जागा, फोन सेटअप, कॉफी बनवायचे तंत्रशिक्षण यातच कसा गेला ते कळणार नाही. मार्गारेट, माईक, पॉल, सुब्रमणी, जो चँग, सर्जी बुकोवस्की, जॉनीता इंजिनिअर असे विविध नावांचे लोकं त्याला भेटतील. अजय व राजू दुसऱ्या प्रॉजेक्टवर असले तरी - यातले कर्दनकाळ कोण आहेत व मदतगार कोण आहेत याची माहिती मोरूला देतील. "शक्यतो देशी लोकांपासूनच सावध राहा" - हेही वचन ऐकून तो साठवून ठेवेल. अजय म्हणेल "मोरूभाई, ये सुब्रमणि तो एक नंबर का हलकट है! लेकिन जॉनीता ५०% देशी है - उस्का बाप पारसी और मॉं बेल्जीयन है - ये भी कुछ कम नही - संभालकें - trade carefully!" मोरूचा पहिल्या आठवड्यातील घाबरण्याचा कोटा आता संपला असेल. अमेरिकेतील पहिला शुक्रवार येईल! स्टार्ट ऑफ द  विकेंड! अमेरिकन्स दुपारी चार वाजल्यापासूनच ट्रॅफिकचे कारण देऊन निसटायला लागतील. मोरूचे काम झाले तरी अजय व राजूसाठी थांबून निघायला ५:३० होतील. 

घरी जाता जाता अजय त्याच्या इतर मित्रांशी काहीतरी बोलून संध्याकाळी "कुठेतरी" जायचा प्लॅन बनवेल. फॉस्टर ड्राइव्हवर गाडी वळताना तो मोरूला विचारेल "भाई स्ट्रीप क्लब चलेगा क्या आज?" - मोरूला काहीच कळणार नाही आधी, मग तो कळूनही न कळल्यासारखे करेल, मग राजूकडे प्रश्नार्थक नजरेने बघेल. पण राजू नुसतं गालात स्मित करेल. मोरू "नही यार बादमे कभी" असे मोघम उत्तर देऊन टाळायचा प्रयत्न करेल. अजय मात्र फारच भरीस पडेल, पिच्छा सोडणार नाही. मोरू फार कानकोंडला होईल. पूर्वी अप्पा बळवंत चौकात फिरत असताना वाट चुकून बुधवार पेठेत शिरल्यावर दोनदा झालेल्या वेश्यांच्या नजरानजरीच्या प्रसंगाची आण घेऊन मोरू धाडसाने म्हणेल "अरे इससे अच्छा तो मै प्रॉस्टिट्यूट के पास ना जाऊं?" ... यावर अजय थंडपणे म्हणेल "'तेरी मर्जी ! वोह भी ऑप्शन्स है।" मोरूचे प्रयत्न फेल गेल्यावर तो राजूला विचारेल. राजू म्हणेल "मोरू मैं फॅमिली वाला आदमी! वैसे एक बार इधर आतेही जाकर आया, अब मुझे कोई इंटरेस्ट नही !" मोरू शेवटी हिय्या करून अजय बरोबर जाण्यास तयार होईल. तिथून आल्यावर मोरू पुढचे दोन दिवस घरी फोन करायला धजावणार नाही. दुसऱ्या दिवशी अपराधी मनाने मोरू वावरेल. त्याचे वर्तन बघून अजय म्हणेल "चिल यार, क्या इतना सोच रहा है!" मोरू म्हणेल नाही म्हणजे हे माझ्या नैतिकतेत बसणारे नव्हते. अजय म्हणेल "यार व्हेन इन रोम डू ऍज रोमन्स डू! इधरकी नैतिकताकी व्याख्या और अपने देशकी अलग है! यहाँ जैसे लोग करते है वैसे करनेकी आदत डालेगा तो खुशीसे रहेगा! वरना नही, समझा? " मोरू निरुत्तर होईल. पहिल्याच आठवड्यात हे! अजून काय वाढून ठेवले असेल पुढे देव जाणे. 

शनिवारी रात्री अजय व राजू बियरच्या बाटल्या काढतील. पुन्हा मोरूस आग्रह होईल. मोरूने बियर कधीतरी भारतात कंपनीतल्या पार्टीत चाखली असेल. त्यामुळे मोरू जास्त आढेवेढे घेणार नाही. काहीही झाले तरी कालच्या प्रसंगापेक्षा दारू बरीच! शिवाय थोडे विसरायलाही होईल ना. अजयने सिगरेट शिलगावलेली असेल, मोरू आता निर्ढावला असेल पण तो "निदान सिगरेटतरी पुढच्या वीकेंडसाठी ठेवतो रे" अशी अजयला विनंती करेल. तिघेही मनसोक्त पिऊन झाल्यावर मॅगी खाऊन आजची रात्र साजरी करतील. रात्री मोरूला एक स्वप्न पडेल. स्वप्नात तोच "नारायण" नावाचा माणूस येईल व म्हणेल "काय मोरूशेठ अमेरिकेतली चंगळ सुरु केली म्हणा की! "  दुसऱ्या दिवशी रविवारी सगळे इंडियन स्टोअरला जायचा प्लॅन बनवतील व तिथेच एका इंडियन रेस्टॊरंट मध्ये हादडून यायचा विचार करतील. अजय त्याच्या दोन मित्रांनाही बोलावेल. हे पाच जण एका गाडीत बसून इंटरस्टेट हायवे  आय-९० वरती सुसाट जातील, आरवाडा बुलेव्हार्डचा ७६ नंबरचा एग्झिट घेऊन काही आडवळणे घेऊन एका बकालशा भासणाऱ्या एरियात इंडियन स्टोअरच्या समोर येऊन थांबतील. मोरू उतरून बघेल आणि त्याला अमेरिका कुठे हरवली असा प्रश्न पडेल! तिथे बरेच आफ्रिकन, एशियन व इतर प्रकारचे लोकं दिसतील. राजू सांगेल कि हा इथला कॉस्मोपॉलिटन एरिया आहे! मोरू विचार करेल कि भारतातला कॉस्मो एरिया म्हणजे विविध उच्चभ्रू लोकांचा भरणा असलेला व ऊंची - पॉश घरांचा आणि अमेरिकेत तोच एरिया मात्र बकालपणा घेऊन समोर येईल असं वाटलं नव्हतं! आपलं आणि त्यांचं सेम नसतं! इथे अमेरिकन्सनाही होमसिक वाटत असेल! मोरूचे रूममेट पुन्हा अधाशासारखे खाद्यपदार्थ, भाजी, धान्ये वगैरे ट्रॉलीत टाकतील. मोरू नुकताच आलेला असल्याने त्याला काही घेण्यासारखे वाटणार नाही. मग ते सगळे वणक्कम भुवन मध्ये साऊथ इंडियन पदार्थांवर ताव मारायला प्रयाण करतील. त्यातले काही पदार्थ "फॉर हिअर" खाऊन व काही "टू गो" करून घेऊन येतील. मोरूला ह्या "फॉर हिअर ऑर टूगो?" प्रश्नाची सवय करून घ्यावी लागेल. त्यामागचा दुसरा अर्थ मात्र त्याला एव्हढ्यात समजणार नाही!   

पुढचा दुसरा आठवडाही ऑफिसमध्ये बरा जाईल, तरीही थोडे कामाचे प्रेशर व लोकांच्या अपेक्षा वाढायला लागल्याचे मोरूला जाणवू लागेल. कधी एकदा शुक्रवार येतो असे होईल त्याला. पुढच्या सोमवारी सुट्टी आल्याने अमेरिकेत लॉंग विकेंड असेल. अजय शुक्रवारी दुपारी ३ वाजता ऑफिसातूनच बॅग घेऊन एअरपोर्टवर निघेल. तो त्याच्या गर्लफ्रेंडकडे शिकागोला ३ दिवसासाठी जाणार असेल. त्या दिवशी मोरू व राजूला गुरुराज आपल्या गाडीतून घरी सोडेल. बॉसच्या आलिशान ऑडी गाडीत बोसच्या स्पीकरवर गाणी ऐकताना - गुरुराज मोरूला पुन्हा डूज अँड डोंट्सची लिस्ट म्हणून दाखवेल. अरे लेकाच्या हे सोमवारी तरी बोलला असतास, वीकेंडला कशापायी आठवण करून देतो आहेस? मोरू मनात(च) म्हणेल. राजू खिडकीतून बाहेर बघत विचार करत बसेल, ह्या सूचना त्याने अगणित वेळा ऐकल्या असतील - अशाच शुक्रवारच्या संध्याकाळी, गुरूराजच्या गाडीतून येताना, अजयची कार नसताना!

घरी गेल्यावर - स्थिरस्थावर झाल्यावर राजू म्हणेल काय रे एक एक बियर घ्यायची का? मोरू होकार देईल. खरंतर आज त्याने घ्यायची नाही असं ठरवलं होतं. पण बॉसचे बोलणे ऐकून आलेले टेन्शन घालवायला दुसरे गत्यंतर नसेल. मोरू राजूला म्हणेल - आज मै तुम्हे मूंग दालकी खिचडी बनाके खिलाऊंगा. खरंतर मोरूची खिचडी बनवायची आज पहिलीच वेळ असेल, आईकडून रेसिपी शिकून आला असेल ना तो येताना. राजू म्हणेल जैसी 'तेरी मर्जी. मोरू बियरचे घुटके घेता घेता राजूला विचारेल "ये अजय क्या गर्लफ्रेंडके साथ रहता है उधर? " राजू हो म्हणेल. मोरू म्हणेल "और ये सब रंगिली हरकतें? चलता है क्या?" राजू म्हणेल "भाई उधर बतायेगा कौन और क्या पता वोह भी इसमें शामिल हो. ये अमेरिका मे कुचभी पॉसिबल है, लोग खुल्ला छूट जाते है।" आता मोरू जरा राजूची चौकशी करेल, तो कुटुंब सोडून एकटाच इकडे कसा काय राहू शकतो वगैरे? राजू म्हणेल "परिस्थिती बाबा परिस्थिती! मी चांभार जातीतला आहे - गरीब घरचा, माझा बाप बुलडोझर चालवायचा गावात त्यामुळे मिळकत शून्य. बहिणीच्या लग्नासाठी १५ लाखांचे कर्ज घेऊन ठेवलेय ते कोण फेडणार? " मोरू म्हणेल "हुंडा वगैरे का  - तुमच्यात आहे का अजून ?" राजू म्हणेल "अरे रेट ठरलेले आहेत बाबा. मुलगी दिसायला बेतास बात असेल तर हुंड्याचा रेट वाढतो, शिवाय मुलाच्या शिक्षणावरहि आहेच . मी सुद्धा बायकोच्याकडून ५ लाख हुंडा घेतला होता इंजिनिअर झालोय म्हणून. पण बहिणीचे लग्न नंतर झाले तेव्हा रेट वाढला, शिवाय मुलाला एक प्लॉटही द्यावा लागला". मोरू म्हणेल "राजू! म्हणजे तू सुद्धा!!" - त्याच्यासारखा माणूस ह्या हुंड्याच्या भानगडीत पडलेला ऐकून मोरू हवालदील होईल. बियरपान झाल्यावर राजू त्याच्या घरच्यांबरोबर व्हिडिओ कॉलमध्ये बिझी होईल. खिचडी करता करता मोरूचे मन राजूचा व त्याच्या कुटुंबाचा विचार करेल. हुंडा घेणारा राजू व बापाचे कर्ज फेडायला कुटुंबाचा त्याग करून आलेला राजू - एकाच वेळी त्याला राजूबद्दल घृणा आणि कळवळा वाटेल. समोरच्या खिडकीत नारायण येईल - म्हणेल "मोरू हि अमेरिका आहे - एकाच वेळी काही स्वप्न प्रत्यक्षात आणणारी व काही स्वप्नांचा चुराडा करणारी! तुमचं तुम्ही ठरवा कुठली स्वप्न महत्वाची आहेत ते !"  तो पुन्हा अंतर्धान पावेल. मोरूला आज जरा जास्तच होमसिक वाटेल. मोरू घरी भारतात फोन करेल व इतर मित्रांनाही इकडच्या हकीकती सांगेल. 

पुढच्या आठवड्यात मंगळवारी ऑफिस सुरु होईल. आता तोंडावर गोड गोड बोलणारी जॉनीता मोरूच्या कम्युनिकेशन बद्दल स्टीव्हकडे तक्रार करेल. स्टीव्ह गुरूराजकडे - आणि मग तो मोरूला त्याच्या ऑफिसात बोलवून घेईल. गुरुराज पुन्हा त्याच्या सॉफ्ट स्किल्सवरून झाडेल. ऑफशोअर मॅनेजरला एक इमेल लिहील, काय लोक पाठवता तुम्ही राव इकडे - यांना साधं इंग्लिश लिहिता बोलता येत नाही. क्लायन्ट पराचा कावळा करतील, आधीच फाटलेला प्रॉजेक्ट. मोरू कम्युनिकेशन सुधारायचे वचन देईल. गुरुराज अजयला व प्रतीक नावाच्या दुसऱ्या सिनिअरला मोरूचे इंग्लिशचे धडे घ्यायला लावतील. पुढच्या आठवड्यात याचे मॉक प्रेझेंटेशन घ्या वगैरे ऑर्डरी निघतील. मोरू पुन्हा कानकोंडला होईल. आयला आपण काय विचार करून आलो होतो आणि इथे भलतंच चाललंय. प्रतीक त्याला समजावेल - १-२ महिन्यात सगळे ठीक होईल असा विश्वास देईल. मोरूला खात्री पटेल कि आपण जे शिकलोय त्याचा इथे काहीच तसा उपयोग नाहीये, आणि इथे जे लागणार आहे ते खरे खरे कुणी शिकवलेच नाहीये!! मोरूच्या दुर्दैवाचे दशावतार इथेच थांबणार नाहीत. पुढच्या आठवड्यात सुब्रमणि तक्रार करेल. स्टीव्ह पुन्हा गुरूराजकडे व गुरूराजच्या ऑफिसमध्ये मोरू हजर होईल. या खेपेला तक्रार तांत्रिक कामावरून असेल. गुरुराज म्हणेल "मोरू, युअर हनिमून पिरिअड इज नाऊ ओव्हर -बकल-अप ". मोरू त्याची बाजू मांडण्याचा तोकडा प्रयत्न करेल - पण गुरुराज ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसेल. आज बुधवारच्या रात्री शुक्रवारची वाट न बघता मोरू अजयला नवीन बाटली उघडायची विनंती करेल. आज मोरू एकटाच बसेल. अजय व राजू त्यांच्या कामात असताना मोरूच्या शेजारी नारायण येऊन बसेल "मोरू भावा, याची सवय कर आता - म्हणजे दारूची नाही इथल्या लाईफ स्टाईलची. हि कॉर्पोरेट भांडवलशाही आहे, इथे सगळे रूथलेस असतात, आपापले बघणार. गुरुराज स्टीव्हला खूश ठेवायला बघणार आणि तो त्याच्या बॉसला. नुसत्या चांगुलपणावर तुझी कुणी गय करणार नाही बरं! कुणी तुला वॉर्निंगही देणार नाहीत, गुड लक!" नारायणाला काही विचारायच्या आत तो अंतर्धान पावेल. 

पुढच्या वीकेंडला तिघे मेक्सिकन, इटालियन इत्यादी डेलिकसीज खायला जातील. मोरूला सुरुवातीला कोणतेच कॉन्टिनेन्टल फूड आवडणार नाही, पण कालांतराने त्याला सवय होईल. आणि आवडायलाही लागेल. असेच तीन एक महिने निघून जातील. ऑफिसमध्ये मोरू आता अजून सावध पवित्रा घेऊन काम करायला लागेल. अजूनही गुरूराजच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणे अवघडच असेल. पण तो स्टीव्ह, जॉनीता, सुब्रमणि आणि मार्गारेट यांच्याबरोबरचा रॅपो वाढवेल व तक्रारी आपोआप कमी होत जातील. मोरू आता सीझन्ड झाला असेल! भारतातून नवीन आलेल्या कोणत्याही व्यक्तीला मेंटर करण्याचे काम त्याच्याकडे येऊ लागेल. मोरू आता अजय, राजू वा प्रतीक सारखा कामात सेटल होईल. तो आता कुकिंग मध्येही पारंगत झाला असेल - त्याने राजूकडून रस्सम, लिंबू भात इत्यादी आणि अजय कडून पंजाबी भाज्या व पराठे शिकून घेतले असतील. मोरूच्या बँक खात्यात डॉलर खुळखुळत असतील, भारतात हजारेक डॉलर पाठविल्यावर त्याला श्रीमंत झाल्याचा भास होईल. मोरूकडे एव्हाना लॅपटॉप, आय-फोन, १८ मेगा पिक्सेलचा कॅमेरा हे सर्व जमा झालेले असतील. मोरू आता ड्रायव्हिंग लायसन्स काढून कार घ्यायचाही विचार करत असेल. इतर मित्रांबरोबर मोरू लास व्हेगास, न्यूयॉर्क, नायगारा, माउंट रशमोर, रॉकी माउंटन इत्यादी ठरलेल्या परिक्रमा करून येईल. वेगवेगळ्या कार भाड्याने घेऊन सर्व जण मनसोक्त हुंदडतील. मोरू आता थोडा गर्वाने फुगु लागेल.         

नारायण पुन्हा प्रगट होईल व मोरूला दृष्टांत देईल "मोऱ्या एकच सांगतो - तुझे हे पैसे म्हणजे फक्त डॉलर ते रुपड्यातल्या रूपांतरणामुळे आलेली सूज आहे, तुझी कुवत वाढल्याचा पुरावा नव्हे. तुझे बाकीचे भारतातले लोक तेच आणि तेव्हढेच काम करीत आहेत  - तेंव्हा हे नवश्रीमंता! जमिनीवर राहा महाराजा!" मोरू थोडा हिरमुसला होईल पण नारायणाचा त्याला आधारही वाटेल. 

एके दिवशी मिनिआपलीसच्या त्यांच्या क्लायन्ट लोकेशनला मौशुमि नावाची एक बंगसुंदरी दाखल होईल. मोरू आता बाकीच्यांसारखाच व्हेटेरन झालेला असेल. शिवाय तो "विनापाश बॅचलर" असल्याने मौशुमिला मदत करण्याची जबाबदारी मुख्यत्वे त्याच्याकडे येईल. ऑफिसमधले इतर तिच्यावर लाईन मारणे सोडणार नाहीतच.   मिनिआपलिसच्या बर्फाळ प्रदेशात व रुक्ष सहकाऱ्यांमध्ये हि आलेली नवीन हिरवळ. मोरूला मेकॅनिकलचे दिवस आठवतील, अख्या ४० च्या बॅचमध्ये जेमतेम १-२ मुली. त्याही सिनिअर मेकच्या मुलांनी आधीच पटकाविलेल्या. त्यावेळी हॉस्टेलमध्ये तर खोलीत एक मुंगी जरी शिरली तरी "ती केवळ स्त्रीलिंगी आहे" या तथ्यावर ते आपला दिवस भागवून घेत. मोरू खूश होईल, मेकॅनिकला काढलेली हार्डशिप आता तो विसरू शकेल. मौशुमिला घेऊन अजयच्या कारमधून तो इंडियन स्टोअरला घेऊन जाईल. तिला सिनेमाला घेऊन जाईल. एव्हाना त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स दोनदा टेस्ट फेल झाल्यावर तिसऱ्या प्रयत्नात मात्र मिळालेला असेल. अजय शिकागोला गेला की कार मोरूच्याच ताब्यात! राजू हा आता आपला जास्तीत जास्त वेळ घरीच काढेल, तामिळ-तेलुगू सिनेमे बघेल, व्हिडीओ कॉल करेल. तेव्हा मोरूला रान मोकळे. मौशुमि हि पण तिथे चांगली सहा महिने राहणार असेल. मोरूच्या मनात प्रेमाची पालवी फुटेल. ऑफिसमध्ये एका मुलीचे असणे मोरूसाठी खूप उत्साहवर्धक असेल. मोरूचे हे दिवस खूप चांगले जायला लागतील. अमेरिकेत आल्यानंतर भोगलेल्या कष्टांतून बाहेर पडून मोरूची गाडी आता रुळावर आली असेल. जॉनीता व  सुब्रमणीलाही चक्क त्याने खिशात टाकले असेल. बंगसुंदरीला "विचारावे कि न विचारावे" या विचारात मोरू पडेल. हल्ली तर नारायणही फार येत नाही काही सल्ले द्यायला. पुन्हा स्वप्नात वा समोर आला तर त्याला सांगेन "सुख मला भिवविते सांगू कसे तुला " वगैरे काव्यमय भाषेत. तेवढ्यात पुढचा मोठ्ठा लॉन्ग विकेंड जवळ येईल, यावेळी गुरुवार ते रविवार सुट्टी असेल. मोरू कुठंतरी बाहेर ग्रँड कॅनिअन वगैरे जायचा बेत ठरवू लागेल, सर्व मित्रांबरोबरच मौशुमिलाही विचारू असे त्याच्या डोक्यात घोळत असेल. एक दिवस मोरू मौशुमिकडे जाऊन या प्लॅन बद्दल सांगेल. तेव्हा मोरूला पुढचा धक्का बसेल - मौशुमि तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला "एल. ए." ला जाणार असल्याचे त्याला सांगेल. मोरूच्या काळजाचा ठोका चुकेल, त्याला आश्चर्य वाटेल. मौशुमिला खोटे खोटे चिडवत व लटकी नावे ठेवत तो हताशपणे डेस्कवर परत येईल आणि डोके धरून बसेल. तो स्वतःच्या मनाला सांगेल कि असं काही होणारच होतं. अजय पण त्याला घरी आल्यावर घोळात घेईल "भाई इष्क करनेसे पहले पता तो कर लेते।", राजू म्हणेल "मुझे तो उसके लक्षण कुछ ठीक नही दिख रहे थे।" ... वगैरे वगैरे! व्हिस्कीच्या घोटात दुःख बुडवून मोरू म्हणेल "अरे बाबांनो हे मलाही कळतं. ही बंगालन काही माझ्या आयुष्यातली पहिली मुलगी नाहीये. त्यामुळे माझ्या अपेक्षा काही जास्त नाहीतच. मी थोडासा तिच्यात गुंतलो खरा पण तो तेवढ्यापुरताच आणि आमचे दोघांचेही दिवस मजेत गेले. हे तिलाही कळतच असेल, म्हणून तिने हा बॉम्बशेल इतक्या सहजपणे टाकला. " मोरू तरीही लॉन्ग वीकेंडचा प्लॅन रद्द करायला निघेल. बाकीची मुले जबरदस्तीने त्याला घेऊन जातील. ग्रँड कॅनियन ची भव्यता बघून मोरूचे थोडे डिस्ट्रॅक्शन होईलच. परत आल्यावर पुन्हा पहिले रुटीन सुरु. एक-दोन महिन्यात मौशुमिहि भारतात परत निघून जाईल, मोरू तिला एअरपोर्टवर सोडायला आवर्जून जाईल. जरासा कधी प्रेमभंग झाला म्हणून रिश्ते तोडायला मोरू काही कच्च्या दिलाचा नाही!  आता नारायण स्वप्नात येईल, म्हणेल  "मोरया, दुःख सहज रिचवायला शिकलास कि  रे या स्वप्नभूमीत! खुश राहा "

मोरूला आता मिनिआपलिसला येऊन वर्ष होत आलं असेल. एव्हाना अजयचा लग्न करणाच्या निर्णय होऊन दोघांच्या घरातील पटवापटवी झालेली असेल. मोरूला वाटेल अजय आता कायमचा इथेच राहील - ग्रीन कार्ड करून घेईल. पण तो आणि गर्लफ्रेंड दोघेही पुन्हा भारतात जाण्याचा निर्णय घेतील. कर्ज फिटल्यावर परत जाणार म्हणणाऱ्या राजूच्या डोक्यात मात्र ग्रीन कार्डचे विचार घोळू लागतील. आणखी थोडे पैसे जमा करून कुटुंबास बोलवून घ्यावे म्हणून तो दुसऱ्या कंपनीत व दुसऱ्या राज्यात कॉन्ट्रॅक्टवर निघून जाईल. मोरू मग अजयची कार विकत घेईल. त्यांच्या हिल व्ह्यू अपार्टमेंट मध्ये भारतातून अजून नवीन सोबती राहायला येतील. ह्या नवीन सवंगड्यांशी जुळवून घेणे मोरूला जरा कठीणच होईल. त्याच्या कार मधून तो मॉल शॉपिंग, साईट सिईंग वगैरे करायला त्यांना घेऊन जाईल. त्या नवीन पार्ट"नरांना" गॅपचे टी-शर्ट, जीन्स आणि २५ मेगा पिक्सेलचा निकॉनचा कॅमेरा घ्यायचा असेल. कोणी म्हणेल मला हॅन्डीकॅम हवा सोनीचाच! मोरूचा १८ मेगा पिक्सेल कॅमेरा आता खूप जुनाट वाटेल. मोरूला उबग येईल. जीन्सच्या सेल मधून  १०-१० डॉलरला जीन्स एकगठ्ठा उचलरणाऱ्या दोस्तांना बघून त्याला आपला भूतकाळ आठवेल.  वस्तू वस्तू वस्तू - नुसत्या वस्तू! सगळे कसे ठरलेलेच असते इथे. तेच ते आणि तेच ते. ओकारीचा उमाळा दाबून मोरू मॉलच्या रेस्टरूम मध्ये जाईल, स्वच्छ तोंड धुवेल. आरशात बघून स्वतःलाच प्रश्न विचारेल "अजून किती दिवस या चक्रात अडकणारेस मोरू?" मोरूच्या अमेरिकन स्वप्नांना सुरुंग जणू लागलेला असेल. कल्पना आणि वास्तव यांच्यातला विरोधाभास!

राजू आणि अजय दोघेही सोडून गेल्यामुळे मोरूच आता ऑफिसमध्ये सर्वात सिनिअर असेल. गुरूराजची भिस्त त्याच्यावर वाढलेली दिसेल. तो त्याला अजून किमान वर्षभर राहायची गळ घालेल. गुरूराजही हल्ली खूपच चिडचिडा झाला असेल. मोरूला कळेल कि त्याची ग्रीन कार्ड घटिका जवळ आलेली आहे आणि मिळेल तो बिझनेस पदरात पाडून आपले स्वतःचे दिवस लांबविण्याचा त्याचा प्रयत्न असेल. नवीन आलेल्या लोकांचे (कुणाच्या खांद्यावर कुणाचे!) ओझे आणि शिवाय वरून हे प्रेशर अशी मोरूची दोन्ही बाजूंनी पंचाईत होईल. हि नवीन पिढी काही वेगळीच आहे - मोरू म्हणेल. सामान्यतः १० वर्षांनी पिढी बदलते असे म्हंटले जाते, पण आयटीतल्या पिढ्या तर ३-४ वर्षात बदलत आहेत. पुन्हा एक शुक्रवार येईल, पार्टनर्स स्ट्रीप क्लबला गेल्याने मोरू एकटाच स्कॉचची बाटली उघडून बसेल. आज बऱ्याच दिवसांनी नारायण पण संगतीला येईल. नारायण म्हणेल "मोऱ्या काय म्हणतंय तुमचं अमेरिकन ड्रीम? एका तरी अमेरिकनाने घरी जेवावयास बोलावले कारे तुला? जीव लावला कारे? ते असो, गुरुराज फार त्रास देतो म्हणे हल्ली. अरे गुरुराज-स्टीव्ह- त्याचा बॉस रॉस मग व्हर्जिनिया अशी व्हीपी पर्यंत हि साखळी आहे. Chain of Intimidation! बस्स अजून काही नाही. आणि तुही त्या साखळीतला एक मोहरा. असं बघ, तूही तुझ्या ऑफशोअर टीमला दाब देऊन कामे करवून घेतोसच कि !! मग कुणा-कुणाच्या नावानी बोटे मोडशील सख्या. त्यातल्या त्यात डॉलर कमावतोयस ह्यात समाधान!". नारायण अंतर्धान पावेल, मोरूला त्याने कटू सत्य सांगितले तरी पण हायसे वाटतेच वाटते.        

असेच पुन्हा काही महिने निघून जातील - न्यू यॉर्कच्या हडसन नदीचे बरेच पाणी वॊशिंग्टन ब्रिजखालून निघून जाईल. एक दिवस मोरूच्या मातोश्रींचा फोन येईल "अरे मोरू पुढल्या महिन्यात अठ्ठाविसावें लागेल तुला. ४-५ पत्रिका आलेल्या आहेत. मी मुली बघायला सुरुवात करतेय तुझ्यासाठी". आधी नेहेमीच आढेवेढे घेणारा तो आता जास्त विरोध करणार नाही. त्याला साहिरचे (लुधियानवी) वाक्य आठवेल "अगर है तुझमे हिम्मत तो दुनियासे बगावत कर ले, नहीं तो मॉं जहाँ कहती है उस घरमे शादी कर ले। ".  अमेरिकेत "मोजून मापून" बगावत करायला आलेला मध्यमवर्गीय मी आणि आता तर दुनियाच माझ्याशी बगावत करीत आहे! पडत्या फळाची आज्ञा मानून मोरू लग्नाला होकार  देईल व पुन्हा भारतात परतायची तयारी करेल. गुरूराजला पटवायला त्याला फार वेळ लागणार नाही. नवीन आलेल्या मंडळींपैकी काही त्याची जागा घ्यायला एका पायावर तयार असतील. त्यांचेही अमेरिकन ड्रीम सुरु झालेले असेल. मोरू शेवटची खरेदी करेल, विमानाची तिकिटे बुक करेल.    

आज अमेरिकेत येऊन दीड वर्ष होऊन गेले असेल. मोरू हिल व्ह्यू अपार्टमेंट मध्ये भाडेकरू म्हणून असलेले कॉन्ट्रॅक्ट, वीज व फोन कनेक्शन इतरांच्या नावावर करील. एकजण मोरूची कार विकत घेईल (अजय व त्याच्याहिआधीपासून पिढीजात चालत आलेली!). तो सर्व पार्टनरांचा निरोप घेईल. मिनिआपलिसच्या "सेंट पॉल" विमानतळावर तो पोहोचेल. चेकइन काउंटरवर मोरूला बॅगा जड झाल्यामुळे थोडासा मनस्ताप होईल. सिक्युरिटीमध्ये तो नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे रॅन्डमली पकडला जाईल! सिक्युरिटीवाले पण मोरूची गळाभेट घेणे सोडत नाहीत. आणि आता या शेवटच्या भेटीत तर नाहीच नाही!! मोरूला याची सवय तर असेलच, आणि तो आता हे एन्जॉयही करू लागलेला असेल. त्याची पहिली फ्लाईट न्यूयॉर्क पर्यंत असेल. न्यूयॉर्कच्या जॉन एफ केनेडी विमानतळावर मोरू मुंबईच्या फ्लाईट मध्ये जाऊन बसेल. अमेरिकेला टाटा करून ह्या स्वप्नभूमीतून तो आज पुन्हा मायभूकडे प्रयाण करेल. इथे आल्यावर काय कमावलं आणि काय गमावलं याचा हिशेब तो मनातल्या मनात करत असेल. जवळच्या कागद पेनाने एक कविता खरडेल, पण ती जमली नाही म्हणून कागदाचा चोळा मोळा करून खिडकीतून बाहेर टाकायला जाईल. पण विमानाची खिडकी बंद असेल. मग तो तिथेच समोर कोंबून ठेवेल. एअर इंडियाचे विमान आता उड्डाण करेल आणि मुंबईच्या दिशेने त्याचा प्रवास सुरु होईल. थोड्या वेळाने एअर होस्टेस येईल आणि मोरूला विचारेल "मे आय हेल्प यू विथ एनी ड्रिंक?" - "या, अ बिग ग्लास ऑफ रेड वाईन प्लीज!!" - मोरू म्हणेल आणि रेड वाईनचे घुटके घेता घेता डोळे मिटून घेईल...... !!!