Saturday 22 June 2024

परलोक सीधा-रे! मंडळ

परलोक सीधा-रे! 

स्थळ: परलोक सीधा-रे! संस्थेचे ऑफिस. टेबलवरील फोन खणखणतो, मॅनेजर बळवंतराव फोन उचलतात आणि रिसिव्हर कानाला लावून उचकलेल्या स्वरात म्हणतात कोण बोलतंय? पलीकडचा माणूस काहितरी विचारत असतो  - सारख्या येणाऱ्या फोन्सना वैतागून बळवंतराव म्हणतात - प्रत्यक्ष ऑफिसमध्ये येऊन भेटा मग अगदी डिटेल माहिती देतो, आता रोज शंभर फोन यायला लागलेत. तेवढ्यात गोपाळराव आत येतात आणि टेबलच्या दुसऱ्या बाजूकडील खुर्चीवर बसण्याची खूण बाळासाहेब त्यांना करतात.

गोपाळराव: परलोक सीधा-रे! या संस्थेचे ऑफिस हेच ना? जरा चौकशी करायची होती 

बळवंतराव: हो हेच ते ऑफिस. बोला काय माहिती हवी आहे.   

गोपाळराव: तुमच्याकडे कोणत्याही हत्या, आत्महत्या वगैरे कायद्याच्या कचाट्यात न पडता सुलभ मृत्यूची सोय केली जाईल असे वाचले. हे खरे आहे का?

बळवंतराव: हो हे खरे आहे, शिवाय इन्शुरन्स नसला तरी तुमच्या वारसांना नुकसान भरपाईचे पैसे सरकारकडून पण मिळतील. बोला तुम्हाला मृत्यू हवा आहे का? आमच्याकडे मरणाच्या विविध पद्धती अव्हेलेबल आहेत. प्रत्येक पद्धतीनुसार आणि अर्जन्सी प्रमाणे आम्ही चार्जेस घेतो.  

गोपाळराव: अरे वा चांगलंय कि. हो मलाच मेल्याला मरायचंय - अं म्हणजे मृत्यू हवा आहे. पण काय काय पद्धती उपलब्ध आहेत ते तरी सांगा. 

बळवंतराव: हो जरूर - हा पहा आमचा कॅटलॉग:

१) होर्डिंग पडून त्याचे खाली चेंगरून मृत्यू  - रु १०,०००

२) एकदम भारी, लॅव्हिश कारने चिरडून/उडवून मृत्यू - रु १५,०००. हि बेस प्राईस देशी गाड्यांसाठी आहे. गाडीच्या ब्रँड नुसार किंमत बदलते. परदेशी गाड्यांना रेट जास्त लागेल. 

३) हॉलमध्ये आग लागून मृत्यू - रु २०,०००

४) वादळी पावसात ओढ्यामध्ये वाहून जाऊन मृत्यू - रु २५,०००

५) खड्ड्यात गाडी पडून मृत्यू - रु ५,०००   - हे स्वस्त आहे कारण आम्हाला फार कष्ट पडत नाहीत

६) पूल कोसळून मृत्यू - रु २५,०००

७) बेकायदा इमारत कोसळून मृत्यू  - रु १५,०००

८) युद्धजन्य भूमीवर हौतात्म्य  - रु १,५०,००० (युक्रेन, गाझा इत्यादी ठिकाणी जायचा व्हिसा व प्रवास खर्चासह - शिवाय हुतात्मा म्हणून मरणोत्तर स्मारक उभारले जाईल)

अजूनही बरेच प्रकार आहेत व नव-नवीन मेथड्सचे शोधही लागत आहेत. अधिक माहितीसाठी हे पॅम्प्लेट घ्या.  

गोपाळराव: बरेच प्रकार दिसतायत पण हे तुम्ही कसे काय साध्य करता? उदाहरणार्थ होर्डिंग खाली पडून मृत्यू?

बळवंतराव: त्याचं काय आहे कि आम्ही प्रत्येक गोष्टी साठी रिसर्च करतो. उदाहरणार्थ आपल्या शहरात किती होर्डिंग आहेत, कोणती बेकायदा असून कमकुवत आहेत आणि कधी पडू शकतात. हा सर्व डेटा आमच्याकडे असतो. नावनोंदणी झाल्यावर फुल चार्जेस ऍडव्हान्स मध्ये घेऊन - दिवस, वार बघून आम्ही लोकांना त्या लोकेशन ला पाठवतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान वापरून आम्ही सर्व शक्यता आजमावतो आणि मगच खात्रीशीर जागी लोकांना पाठवतो. कुठे उभारले असता झटकन मृत्यू येईल याचा आराखडा आम्ही बनवतो. उदाहरणार्थ परवा एका मोठ्या होर्डिंग खाली सुमारे वीसेक लोकं मेले ना? त्यातले तीन आपल्याकडे नोंदणी केलेले होते. आता सरकारी मदतही त्यांच्या वारसांना लवकरच मिळेल. मध्ये त्या चित्रपटगृहात आग लागली त्यात पण पन्नासातले सहा आपले गिऱ्हाईक होते. त्या थेटरमधल्या आगरोधक यंत्रणेचा आम्ही पुरता अभ्यास केला आणि शॉर्ट सर्किट कधी होईल वगैरे याचे त्रैराशिक मांडले. तसेच पुलाचेही - जितका पूल नवीन तितकी पडण्याची शक्यता जास्त! नवीन पूल बांधल्याची जाहिरात आली कि आम्ही लगेच तो पूल आमच्या लिस्ट मध्ये ऍड करतो. 

गोपाळराव: छान पण समजा ते होर्डिंग / पूल वगैरे त्या वेळेला पडलेच नाही तर? बरं तुम्हाला ते पडणार हे माहित असताना तुम्ही सरकारी यंत्रणांना आगाऊ सूचना देऊन बाकीचे मृत्यू का वाचवीत नाही? तसा तुमच्यावर दबाव नाही का?

बळवंतराव: तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे असे फार क्वचित होते. आमचा अल्गोरिदम खूप पर्फेक्ट काम करतो, तरीपण असे झालेच तर तीन ट्रायल नंतर आम्ही पैसे परत करतो. होर्डिंग फॉल न होता फेल झाल्यास दुसरा एखादा मार्ग उदाहरणार्थ पूल कोसळून मृत्यू फुकट ऑफर करतो. तेथे पुलावर नेऊन पोहोचवण्याचा खर्चही आमचा. आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे सरकारी यंत्रणांना पण ते पूल/होर्डिंग वगैरे पडणार हे आधीच माहित असते त्यामुळे त्यांना आम्ही नव्याने काय सांगणार. हां फक्त अचूक प्रेडिक्शन मात्र आम्हीच करू शकतो. उद्या तेही "ए आय" वापरायला लागले तर आमचा धंदा बसवतील आणि वेगळी डिपार्टमेंट बनवतील. पण तेवढी अक्कल नसल्याने आमचा धंदा चालतो. 

गोपाळराव: बरं प्रत्येक कॅटेगरी साठी तुमचा रेट वेगवेगळा का आहे?

बळवंतराव: लॉजिस्टिक्स साहेब - लॉजिस्टिक्स! प्रत्येक मेथड साठी वेगळी यंत्रणा आणि रिसर्च लागतो. शिवाय वारसांना मिळणारी सरकारी मदतही वेगळी असते. उदाहरणार्थ तुम्ही खड्ड्यात गाडी पडून मेलात तर रेट कमी असतो पण तेच होर्डिंग किंवा कारने उडवल्यावर रेट वाढतो कारण नुसती सरकारी नव्हे तर होर्डिंग मालक आणि कारचालकाचा बाप यांचेकडून नातेवाईकांना वेगळी भरघोस भरपाई मिळते. हाय रिस्क - हाय गेन.  

गोपाळराव: ग्रुप डिस्काउंट सारखी स्कीम आहे का? 

बळवंतराव: अजून तरी तशी डिमांड आली नाही म्हणून सुरु नाही केली, पण लवकरच येईलसे वाटते. अजून एक सांगायचं म्हणजे तुमचा मृतदेह कोणत्या स्थितीत हवा आहे त्यावर पण काही रेट ठरतात. उदाहरणार्थ पूल कोसळून पाण्यात पडल्यावर शरीराला फार इजा होत नाही, माणूस पाण्यात श्वास कोंडून मारतो. त्यावेळी माणसाची बॉडी बऱ्यापैकी इन्टॅक्ट राहत असल्याने या मेथडला रेट पण जास्त लागतो. तुम्हाला कशी हवी आहे तुमची बॉडी?

गोपाळराव: आता मेल्यावर काय फरक पडणारे आपल्याला? बॉडी कशी का दिसेना! नको पण नातेवाईकांना जरा दर्शनाचे समाधान वाटावे म्हणून पाण्याची आयडिया बरी आहे. बरं अजून एक म्हणजे न मरता नुसतेच जायबंदी झाल्यास काय करायचे? मग हॉस्पिटलमध्ये खितपत पडावे लागेल.     

बळवंतराव: आमच्या सर्व्हिसचा सक्सेस रेट ९९.९६ टक्के आहे -सिक्स सिग्मा प्रमाणे पर्फेक्ट. तरीपण मरता मरता काही अपघात होऊन मरण न आल्यास आम्ही हॉस्पिटलचा सर्व खर्च उचलतो. शिवाय ज्या हॉस्पिटलमध्ये वीज गेली असता व्हेंटिलेटर बंद पडतील असेच हॉस्पिटल निवडतो. त्याचे वेगळे चार्जेस लावत नाही. हि पद्धत जे आधीच हॉस्पिटलमध्ये खितपत आहेत त्यांच्यावर वापरून योग्य त्या हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करतो. 

गोपाळराव: जबरदस्त! आता मला खात्री पटली कि मी योग्य जागी मरायला आलोय. 

बळवंतराव: अगदी बरोबर, हा शंभर रुपयाचा फॉर्म भरून नावनोंदणी करा बरं आधी. फुल ऍडव्हान्स भरल्यावर मगच अंतिम दिनाचे प्लॅनिंग करण्यात येईल.   

गोपाळराव: चालेल - हा घ्या फॉर्म. नदीवरचा पूल पडून होणाऱ्या पद्धती साठी मी अप्लिकेशन देत आहे. मरण स्वस्त झालंय म्हणतात तरी तुम्ही त्यासाठी पंचवीस हजार रुपये घेतात ते जरा जास्तच आहेत. पण वन टाईम खात्रीशीर मरण असल्याने हरकत नाही. 

बळवंतराव: शिवाय नो हिडन चार्जेस! धन्यवाद!! या आपण आता - बाकीचे फोनवर ठरवू. नेक्स्ट प्लिज ....   


Friday 17 March 2023

किरकिरे काका

किरकिरे काका 


किरकिरे काकांवरचा लेख त्यांच्या हयातीतच लिहावयचा होता आणि तो त्यांना नेऊन वाचूनही दाखवायचा होता. काका आपल्याला अचानक सोडून गेल्यावर तो असा लिहावा लागणे फार वेदनादायी आहे. वाईतील त्यांची पहिली भेट अजूनही आठवते. साधारण १९८७ सालचा जून महिना असावा. शाळा सुरु होऊन काही दिवस झाले होते. आमचे तिसरीचे वर्ग महिला मंडळाच्या नेहेमीच्या जागेत न भरता काही कारणामुळे समोरील बालक मंदिरात भरत होते. तिसरीत आमच्या वर्गात आलेल्या काही नवीन मुलांमध्ये मंगेश पण होता. पावसाळी महिने असल्याने लवकर अंधार पडल्यासारखे आकाश काळवंडून जायचे आणि क्वचितच लागणारे वर्गातले दिवेही सुरु करावे लागत. अशाच एका संध्याकाळी मंगेशला आणायला त्याचे बाबा जरा लवकरच वर्गात आले होते. त्यांचे कुलकर्णी बाईंशी काही बोलणे झाले आणि मग सर्व मुले घरी निघत असताना ते आमच्यातील काहींना म्हणाले कि - बाबांनो, हा नवीन मुलगा मंगेश आला आहे तुमच्या वर्गात, त्याला लागेल ती मदत करा - आधीचे झालेले धडे भरून काढायला वह्या वगैरे द्या! आम्ही "हो, देतो" म्हणून निघालो. खरं सांगायचं तर मला काका तेंव्हा एक गंभीर व्यक्ती वाटले आणि ते गंभीर वाटणे तसे शेवटचेच ठरणार होते! 

काही दिवसांनी कळाले कि शंतनु साने नावाचा आमचा वर्गमित्र पुण्यात बदली होऊन गेला त्याच्याच जागेत हे किरकिरे कुटुंब राहावयास आले आहे. त्याचवेळी सान्यांच्या खालती तळ मजल्यावर राहणारे मोघेही जाऊन अयाचित आले होते. हा एकदमच झालेला "दुमजली चाराक्षरी" बदल कसा काय झेपेल या चिंतेंत मी होतो.  पण हि चिंता लवकरच मिटली आणि आमच्या बहुतेकांची मंगेशशी दोस्ती झाली. या दोस्तीत त्याच्या बाबांचा हातभार लागलेला आहेच.  बहुतेक मुलांच्या आयाच शाळेत आणायला येत असताना मंगेशचे बाबा आधी काही काळ जास्त येत राहिले आणि त्यांच्या खूप ओळखी वाढल्या. हेमंत किरकिरे हे काय व्यक्तिमत्व आहे याचा पूर्ण वाई गावात गवगवा होण्यास या बायका आणि त्यांनी मुलांच्या बाबांकडे केलेली काकांची तारीफ कारणीभूत ठरली. कुणालाही न दुखावता, न बोचकारता, निर्मळ विनोद करणारे आणि लोकांना खळखळून हसायला लावणारे ते आमच्या गावचे चालते बोलते पु. ल. देशपांडेच होते! वाऱ्यावरची वरात मध्ये काम करणारे पुलंचे बंधू रमाकांत देशपांडे आणि काकांच्या चेहऱ्यात योगायोगाचे साम्य होते असे मला वाटून जायचे! सतत हसतमुख, फुल ऑफ लाईफ असा हा मनुष्य विरळाच! 

बहुतेकदा बायका हास्य-विनोदात लवकर सामील होऊ शकतात पण पुरुष आढ्यताखोर असतात आणि विनोद गळी उतरवून घ्यायला वेळ लावतात. या नियमाने आधी बायका फॅन झाल्यानंतर मग एक एक पुरुषरुपी बुरुजही ह्या ताडमाड विनोदमुर्तींपुढे ढासळले असे म्हणायला हरकत नाही. काका ज्या घरी चहा-पाण्याला गेले असतील तेथून हास्याचे खळखळाट ऐकू येणे ठरलेले असे. एखादा माणूस बाहेरून चालला असेल तर ते ऐकून "इथे किरकिरे आले आहेत काय?" असा प्रश्न वाड्यातल्या किंवा सोसायटीतल्या माणसांना विचारला जाई आणि त्याचे उत्तर "म्हणजे, हे काय विचारणे झाले?" या वाक्यात त्या मनुष्यास मिळत असे. पूर्वी जुन्या काळात सिनेमाचे तिकीट न परवडणारे लोकं थिएटर बाहेर उभे राहून गाणी ऐकत असत, तसे ओळख -पाळख नसताना बाहेर उभे राहून विनोद ऐकणारे कित्येक चाहते काकांनी निर्माण केले होते. मग ह्या बाहेरच्या श्रोत्यांचा हळूहळू या मैफिलीत चंचू प्रवेश होत असे. मात्र एकदा प्रवेश झाला कि कुणी बाहेर पडणार नाही याची चोख व्यवस्था काकांच्या स्वभावाने केलेली होती. 

वाईतील द्रविड हायस्कुल, महिला मंडळ शाळेतल्या आणि नंतर साताऱ्यातील कॉलेज व इतरत्र भेटलेल्या मंगेशच्या कुणाही मित्र वा मैत्रिणींना विचारा - तुम्हाला कुठल्या मित्र/मैत्रिणीचे बाबा आवडतात? ते किरकिरे काकांचेच नाव घेणार. शिवाय त्यांचे बोलणे ऐकायला मंग्याच्या घरी हजेरी लावणार. काही मुले तर घरी फोन केल्यावर "काकू मंग्या आहे का?" असे न विचारता "काकू, काका आहेत ना घरी?" एवढ्या प्रश्नाच्या होकारावर पडीक राहायला दत्त म्हणून येत असतील. अशी आपल्या बाबांची कीर्ती पसरत असताना मंगेशलाही हेवा वाटत असेल. त्याच्या आईचा सौम्य, मिश्किल स्वभाव आणि मृदू बोलणे यामुळे काकांच्या बोलण्याला पूरक असे वातावरण तयार होत असे. हास्याच्या फारच उंच उडणाऱ्या फवाऱ्यांना मधून मधून जमिनीचा स्पर्श देण्याचा तो उतारा होता! मंगेशने पण हा मिश्किल स्वभाव घेतल्याने आपल्याच वडिलांच्या विनोदावर तिरकस शैलीत भाष्य करणे हे त्याला जमून गेले होते. आपल्या मुलाने चारचौघांत चांगले बोलावे, उत्तम वागावे, लोकांसमोर जास्त वायफळ बोलू नये या काळजीत इतर सर्व बाप असताना, आपले वडील आता काय नवीन विनोद वा बढाई मारणार, मित्रांना कोणता फुकटचा सल्ला देणार आणि त्यावर नियंत्रण कसे आणावे या विचारात बापाचीच काळजी असलेला मुलगा मी पहिल्यांदाच बघितला असेल. त्याअर्थाने इथे "चाईल्ड इज दि फादर ऑफ द मॅन" या म्हणीचीच प्रचिती येत असे. म्हणजे काही वेळा तर "बाबा जास्त बोलले तर त्यांना आवरण्याकरिता" म्हणून आई मुलालाही बरोबर धाडत असण्याची शक्यता आहे.  यावरून "मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश - माझ्यामागे हेर तिचा ऐकतो आहे!" असा काही विडंबनात्मक विनोद त्यांनी केल्याचे ऐकिवात नाही. पण मागे उभा असला तरी विनोद-नियंत्रक मंगेश काकांपेक्षाही ऊंच झाल्याने त्यांच्या डोक्यावरून दिसतही असे! खरं म्हणजे मंगेशच्या संयमाचेही कौतुक करावे तेवढे थोडेच. आवडलेल्या विनोदांनाही समोरचे लोकं निखळ हसत असताना आपण दाद न देता, त्यावर कुत्सित बोलणे त्याला भाग पडत असे! 

आपल्या स्वभावामुळे त्यांनी वास्तव्य केलेल्या सर्वच ठिकाणी काका जगप्रसिद्ध झाले होते. अमेरीकेतही त्यांनी आपल्या विनोदाचा झेंडा लावून घरोबे केले असल्याने त्यांना वर्ल्ड फेमस म्हणायला हरकत नाही! अशा रितीने ते आख्ख्या साताऱ्यात वर्ल्ड फेमस, आख्ख्या वाईत वर्ल्ड फेमस आणि आख्ख्या पुण्यातही वर्ल्ड फेमसच होते. आपला पोरगा दूरगावी असताना त्याच्याच मित्रांकडे आणि मैत्रिणींकडेही जाऊन "त्या बच्या, मन्या, गोड्या, शिरू, स्नेहल, मीनल किंवा हश्याला" फोन लाव रे/लाव गं जरा असे म्हणण्याची शामत कुठला बाप करू धजेल?  पण काका ते सहजतेने करू शकत आणि मग ती मुलंही आनंदाने तो फोन जोडून देत. त्या जोडलेल्या फोनवरून बोलणाऱ्या पलीकडच्या माणसाचा दिवस पण मग चांगला जाई! 

वाईत गणपती आळीतल्या घरात असताना सायकलमध्ये हवा भरायच्या पम्पासदृश तीन नळ्या जोडून, साखळी लावून त्याच्या स्टम्प त्यांनी तयार केल्या होत्या. किचनचे दार लावून त्याच्या मागच्या बाजूला या इंटरनॅशनल स्टम्प्स लटकावून आम्ही त्या छोट्या हॉल मध्ये जाड प्लॅस्टिक बॉल घेऊन क्रिकेट खेळत असू. यात काकांचे काम बहुधा फिल्डरचेच असे. त्या तसल्या भरभक्कम स्टंपा आयुष्यात नंतर मी कधीही पाहिलेल्या नाहीत!! कारण बॅट बॉल आधी येतात यष्ट्या असल्या-नसल्या तरी चालतात! पुढील क्रिकेट प्रेमाची बीजे त्या लोखंडी यष्ट्यांनी आणि प्लॅस्टिक चेंडूने रोवली होती एवढे निश्चित! गंगापुरीतल्या अभ्यंकर वाड्यात ते शिफ्ट झाल्यानंतर तर मग पुढच्या विश्वकोषाचे "होल वावर इज (फॉर) आवर (क्रिकेट)" असे झाले होते. विश्वकोषातले लोकं संध्याकाळी आपापल्या घरी गेले कि मग इथे शेजारी-पाजारी बाप-मुले यांचा क्रिकेटचा फड जमत असे. कदाचित आतमध्ये तर्कतीर्थ, मेपु रेगे वगैरे विद्वान मंडळींच्या गहन तात्विक चर्चा झाल्यानंतर बाहेर हलक्या फुलक्या विनोदात एक टप्पा आऊटचे सामने होत असल्याने विश्वकोषाच्या इमारतीवरील ज्योतीलाही सुखद गारवा मिळत असावा! तो धगधगता ज्ञानकुंड काही काळासाठी शांत होत असे!

हा अभ्यंकर वाडा पण वाईतील अनेक वाड्यांसारखा विशेष किमयागार होता. त्यात प्रवेश केल्यानंतर तिथली झाडे आणि एकंदर वातावरणामुळे काळाचे भान राहत नसे. म्हणजे तिथे आत तुम्हाला सांगितले असते कि "प्रताप गडाकडे कूच करण्यापूर्वी अफझल खानाचा वाईत मुक्काम आहे आणि त्याचे सैनिक व घोडे बाहेर फिरताहेत" किंवा "नाना फडणवीसांचा मेणा मेणवलीला जाताना समोरील मशिदीच्या आवारात थांबला आहे" किंवा गेला बाजार "इंग्रज साहेबाचे राज्य सुरु असून त्यांनी प्राज्ञपाठ शाळेच्या कारभारावर नजर ठेवण्याकरता दोन अधिकारी आत्ताच गंगापुरीत पाठविले आहेत"  - यांपैकी कशावरही विश्वास ठेवून आपण एकविसाव्या शतकातही ते खरे मानले असते असा तो वाडा होता. या अद्भुत वाड्याच्या मागीलबाजूस एक जीना असून तो डायरेक्ट मधल्या आळीच्या घाटावर उतरतो. या सिक्रेट वाटेवरून मग काका, मंगेश आणि वाड्यातील/आजूबाजूचे नदीवर पोहायला जात असत. तिथल्या छोटयाश्या मारुतीच्या देवळात काका मोठ्या उत्साहाने हनुमान-जयंती साजरी करीत असत आणि कधी कधी आम्हा बाहेरच्यांनाहि शामिल करून घेत असत. असा तो सर्वांगीण बहराचा काळ होता आणि काकांनी पण त्याचे सोने केले! 

काका पायाला भिंगरी लागल्या सारखे सर्वत्र फिरतही असत. त्यांच्या नोकरीतील मुशाफिरीतून आलेले अनुभव, त्यांचे वैद्यक आणि शेतीचे ज्ञान याभोवतीही त्यांनी जमवलेले गप्पांचे फड आणि चर्चा रंगत असत. विविध गोष्टींची आवड असल्याने कुणामध्येही मिसळण्यात त्यांना अवघड जात नसे. विनोदाचा धागा संवादास उपयुक्त ठरत असेच. काकांना स्वयंपाकाची प्रचंड आवड होती आणि ते आपल्या स्वतःच्या हाताने बनवून लोकांना विविध डिश खाऊ घालीत असत. मला त्यांचा लाभलेला एकंदर सहवास हा एकाच गावातील दोन वर्षे आणि नंतरच्या दहा एक गाठी-भेटी एवढाच होता, पण त्या माफक सहवासातूनही त्यांच्याबद्दल लिहावयास एवढा ऐवज त्यांनी दिला आहे. त्यांच्याबरोबर अनेक वर्षे घालवणाऱ्या लोकांकडे या ऐवजाचे टोक सोडून असलेला हिमनगच असणार आहे!      

अजून एक गम्मत म्हणजे काकांची उपस्थिती सर्वव्यापी होती. ते हजर असलेल्या ठिकाणीच गप्पांचे फड रंगत असे नाही, तर ते नसताना देखील दुसऱ्याच एखाद्या बदलीच्या गावात भेटलेली दोन कुटुंबे "किरकिरे" विषयावर घसरून मनमुराद हसून हि मैफल सुरु ठेवायचे काम करीत.  "अरे काय लेका तू ", अशा वाक्यांनी सुरुवात करून "मी सांगतो तसे कर, इंजिनिअरिंग सोडून सरळ मेडिकलला जा, भलं होईल बघ तुझं" अशा प्रकारचे फक्त तपशीलात वेगळे असलेले सल्ले काकांकडून ऐकून घ्यायला मजा यायची. नवीन मुलांना वाटे कि च्यामारी आपण इंजिनिअरिंगला जाऊन घोडचूक केली वाटते! मग एकदा गंमत लक्षात आल्यावर ते पण असे अचाट सल्ले ऐकायला हजेरी लावत. काकांनी दिलेल्या सर्व सल्ल्यांना गोळा करून वेगळा विश्वसल्लाकोष निघू शकेल. आमच्या इथे गल्लीत ताई आणि भाऊ नावानेच ओळखली जाणारी बहिण भाऊ जोडी होती. त्यांचे खरे नाव घरचे लोकं सोडून बाकीच्यांना माहिती नसायचे. पुरुष ऑफिसला जात असल्याने आयाच जास्त भेटत, त्यामुळे "भाऊची आई" म्हणणे सर्वांना वळणाचे पडले होते. पण त्याच्या बाबांचा विषय निघाल्यावर भाऊचे बाबा असे सरळ न म्हणता "भाऊच्या आईचे मिश्टर" असे म्हणण्याची पद्धत फक्त किरकिरे काकाच आणू जाणत. हे एक उदाहरण झाले, अशी पुष्कळ आहेत. पूर्वी कापरेकर नावाच्या मराठी गणितींनी जशी एक विशेष संख्या शोधून काढली व त्याला "कापरेकर स्थिरांक" असे नाव दिले गेले, तद्वत किरकिरे काकांच्या विनोद पद्धतीस "किरकिरे हास्यशास्त्र पद्धती" असे काहितरी द्यायला हरकत नाही. यातून स्टॅन्ड-अप कॉमेडी सारखे "बैठ्या हास्य मैफिलीचे प्रयोग" होऊ शकतात. 

सार्वत्रिक संवाद हरवलेल्या आताच्या काळात आपल्या खुलेपणामुळे हा सत्तर वर्षांचा तरुण आपल्या अठ्ठ्याणव वर्षांच्या जास्तच चिर तरुण आणि पुढारलेल्या बापाबरोबर शेवटपर्यंत घट्ट संवाद ठेवून होता. एक-दिवसाआड जन्मतारीख असलेल्या या बाप लेकांनी जगाचा निरोप घेतानाही एक-दिवसाआडच तारीख निवडावी आणि तो संवाद पुढे स्वर्गातही सुरूच ठेवावा अशीच नियतीची इच्छा असावी! सुमारे एकशे सत्तर वर्षांच्या एकत्रित इतिहासाची, अनुभवाची, अस्तित्वाची मोठी पोकळी मात्र नियतीने सर्वांसाठी बनवून ठेवली आहे!

काकूंना देवाघरी जाऊनही जवळ जवळ वीस वर्षे होत आली, ते दुःख भोगणे कमी पडले म्हणून की काय अलीकडचे कॅन्सरचे आजारपण - हे सर्व काकांनी समर्थपणे नुसते झेललेच नाही तर सकारात्मक राहून मुलाचे/सून/नातवंडांचे जे-जे चांगले होते आहे त्याकडेही लक्ष दिले, आपल्या परीने सर्वतोपरी हातभार लावून कर्तव्ये निभावली! आता मंग्याबरोबर आम्ही असंख्य मित्र-मैत्रिणी, त्यांची भाचरे, पुतणे सर्वचजण पोरके झालो आहोत. कारण बाप एकच असला तरी अशी बापमाणसे मात्र कळत-नकळत सर्वांच्या नाजूक भावविश्वाचा आणि संस्कारांचा भाग बनून जातात. इतके लिहूनही काय गमावले त्याचे वर्णन करणे काकांबाबत शक्यच नाही. मनातला तो एक हळहळणारा कोपरा आम्ही कायमचाच त्यांना बहाल केलेला आहे. 

तो नाजूक कोपरा जपत आपण फक्त त्यांच्या आत्म्यास शांती लाभो एवढी प्रार्थनाच करू शकतो!

~ गोड्या 

Monday 12 September 2022

एलिझाबेथ द्वादशी - एक उपाहासाची कहाणी! !

ग्रेट ब्रिटनची राणी एलिझाबेथ (दुसरी) वयाच्या शाहाण्णव्याव्या वर्षी वारली. तिच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील शेवटच्या - म्हणजे पंधराव्या पंतप्रधानांची पहिली भेट भाद्रपद एकादशीस घेऊन द्वादशीस तिने प्राण सोडला. मुहुर्त बघायची आपली पद्धत विलायतेस स्वीकारली गेली आहे याचा यापेक्षा अजून काय पुरावा हवा? आता यापुढील गणेशोत्सवातील द्वादशी हि एलिझाबेथच्या नावाने ओळखली जाईल. यानिमित्ते बकिंगहॅम पॅलेसमध्ये बसविला जाणाऱ्या गणपतीची प्रथा सुतकामुळे कायमची रद्द करण्यात आली आहे. याची विलायतेतील भारतीयांनी (इंडियन डायस्पोरा!) कृपया नोंद घ्यावी.  

आधीच स्वर्गवासी झालेल्या तिच्या ज्येष्ठ सुनेस भेटावयास राणी गेली असेल असे वाटत नाही. हयात असताना दोन्ही बायकांमधून विस्तव जात नसे. राणीने चित्रगुप्तास (का सेंट पीटर्स गेटवरील द्वारपालास) "ह्या सटवीचे तोंड रोज बघण्यापरीस नरक बरा" असे म्हंटले असेल किंवा काय याची माहिती तिचा तेरावा-चौदावा घालून आत्मा मुक्त झाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. 

तोपर्यंत इहलोकी तिची सून जरी नसली तरी नवीन पंतप्रधान "बाईचा" पायगुणच कसा वाईट! असे म्हणून आपण समाधान मानून घेऊ. ती जरी आपली राणी नव्हती तरी तिची पणजी व्हिक्टोरिया आपली राणी (मानो या ना मानो!) होती. पणजीचा ६३ वर्षे राज्यकारभाराचा विक्रम कधीच मोडून तिने नुकती ७० वर्षांची प्लॅटिनम ज्युबिली साजरी केली होती. 

ब्रिटनला राणी असेल तर राजा नसतो. राणीच्या नवऱ्यास प्रिन्स (फिलिप) - राजपुत्र असेच म्हंटले जाते. तो तिचा नवरा कायम तिच्या मागूनच चालत असे. हा काय खुळेपणा आहे? आपल्याकडे राणीस (काही नियम सिद्ध करणारे सन्मान्य अपवाद वगळता) राजा असतो. किंबहुना राणी हि राजाचीच असावी लागते, स्वयंभू नव्हें. आता कॅमिलापासून तरी हा पायंडा बदलेल अशी आशा करूया. पुढील पिढयामंध्ये मुलगी गादीचा पहिला वारस असेल तर, तिच्या नवऱ्यास राजा बनवले जावे हि सुधारणा आपल्या भारतीय वंशाच्या काही खासदारांनी लवकरच ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आणावी - सून(क) रहे हो ना प्रीती से ये बात? .

राणी गेल्यावर तिचा मुलगा चार्ल्स (तिसरा) राजा झाला. पहिल्या दोन चार्ल्सची कारकीर्द काही वाखाणण्यासारखी नव्हती. एकमेकांचे बाप-लेक असलेल्या या दोघांपैकी पहिल्या चार्ल्सची त्याच्याच कूकर्मातून हत्या झाली आणि दुसरा बरीच वर्षे अज्ञातवासात होता. असल्या नतद्रष्ट राजांची नावे मूळात आपल्या बाळास द्यावीत का? अर्थात एलिझाबेथ (दुसरी) ला कॉरोनेशनच्या आधीच दोन मुले झाली असल्याने - ती राजेपद मिळवू शकतात याची तिला कल्पना नसावी. याबाबतीत राजपुत्र विल्यम याने मात्र वेळीच शहाणपणा दाखवला - आपल्या थोरल्याचे नाव जॉर्ज ठेवून त्याची राजा बनायची शक्यता वाढवली (आधीचे सहा जॉर्ज राजे झाले, हा सातवा असेल). आपल्याकडे देवांची नावे मुबलक असल्याने नामचीन गुंडांनाही गजानन, नारायण अशी बालपणी दिलेली नावे असू शकतात. इंग्रजांनी निम्मे जग लुटले, तरी नावांचे दारिद्रय काही इंग्रजांना मिटवता आले नाही. मग तीच तीच भ्रष्ट नावे ठेवावी लागतात!

राहता राहिला प्रश्न कोहिनूरचा. राणीच्या एका मुगुटात घालून ठेवलेला हा हिरा आता राजाला काय करायचाय? तसले हिरे बायकांसाठी असतात. पायजे असल्यास आपल्या राणीस चार्ल्सने दुसरा विकत घेऊन द्यावा. आमच्या इथल्या कित्त्येक म्युझिअम्सची पायधूळ त्याची वाट पाहत आहे! प्रस्तुत लेखकाने कोहिनूर पाहिला पण त्याला तो दिसला असे ठामपणे म्हणू शकत नाही. टॉवर ऑफ लंडन मध्ये तीनदा चकरा मारूनही त्या पांढऱ्या फटक हिऱ्यातले सौन्दर्य काही दिसेना. तेंव्हा तो हिरा आपल्या भारतीय म्युझिअममधील धुळीच्या कोंदणातच चांगला दिसू शकतो याचा साक्षात्कार झाला. ह्याच लेखकाने जेंव्हा "कोहिनूरच पायजे" असा हट्ट आपल्या भावी सासऱ्यांकडे धरला, तेंव्हा त्या चतुर गृहस्थाने मुलीचे लग्न चक्क कर्वे रोडवरील कोहिनूर कार्यालयात लावून जावयाची इच्छा पुरविली. असा तो कोहिनूर आपल्या देशवासियांना कायम हुलकावणी देत आला आहे. 

आपण भारतीय वासाहतिक मनस्थितीमधून हळूहळू मधून बाहेर येताना इंग्रजांनी मात्र भारतीय संस्कृतीचे अनुकरण सुरु केले आहे असे चाणाक्ष लोक सांगतात. याचा पुरावा म्हणजे राणीने प्रतिकांचे महत्व फार ओळखले होते. आपला मुगुट घातलेला फोटो तिने रॉयल पोष्टाच्या ष्टाम्पवरून कधीच हटवू दिला नाही. तिचे चित्र जनांमध्ये कायम दिसत राहावे याची चोख व्यवस्था राणीने करून ठेवली होती. एव्हढेच नव्हें हिच्या आजोबांनी जर्मन वंशाशी संबंध दाखवायला नको म्हणून स्टुअर्ट हे आपले आडनाव बदलून विंडसर असे स्व-देशी ठेवले होते पहिल्या महायुद्धात. ह्या सगळ्या आयडिया पण यांनी आमचेकडून चोरल्या होत्या हे आता पटते. राणीच्या काहीच दिवस आधी गेलेल्या - जगातील तात्कालिक दुसरी महासत्ता असलेल्या रशियाचे पूर्व अध्यक्ष गोर्बाचेव्ह - यांनी वैराग्य धारण करून जनतेची वाटच लावली ना? मग त्यापेक्षा सर्व उपभोगून आणि आपल्या कुटुंबाची व्यवस्था करून देश गाळात जाणार नाही हे राणीने बघितले. लोकशाहीचा उत्तम उपयोग तिने राजेशाही टिकवण्यासाठी केला. यापेक्षा वेगळा धडा ते आपल्याकडून काय घेणार होते? अजूनही काही लोकं जगात राजेशाही नको अशा बोंबा ठोकतात याला काय म्हणावे? लोकांनी मतपेटीतून दिलेले मत हे राजेशाही साठी असते हे ह्यांना कधी कळणार?

जाता जाता एक गोष्ट मात्र खटकली. राणीचा अंत्यसंस्कार करायच्या आधीच चार्ल्सने राजपदाची सूत्रे स्वीकारली. हे काही बरोबर नाही. सुतकात उठसूठ हा माणूस बाहेर लोकांना कसा भेटतो, लाडक्या ममाचा पार्थिव देह शवागारात असताना राजा म्हणून कसा मिरवतो ? राजाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणे हे आपले कर्तव्य आहे. आपण कसे आता ड्युटीवर लागलो आहोत. आता कोणतीच गोष्ट ड्युटी-फ्री राहिली नाही, तद्वत चार्ल्सला याची जाणीव करून देणे आपले कर्तव्य आहे. त्याने पुढील वेळेस राजा म्हणून मुंबईच्या डबेवाल्यांची भेट घेण्यापूर्वी तरी नक्कीच!

असो! राणीच्या आत्म्यास लवकर शांती लाभो! फार वेळ ठेऊ नका रे आता बाबांनो, हॅरी-मेगन पण पोचलेत!

~हरि पुत्तर 

Thursday 13 May 2021

ऑर्वेलच्या मांडीवर नीरो बसला, गोबेल्सकडे बघून गालात हसला!

हि फारा वर्षांपूर्वीची काल्पनिक गोष्ट आहे आणि फारा वर्षांनंतरची पण काल्पनिक गोष्ट आहे. शेवटी इतिहास हा त्यातून शिकल्याने पुन्हा पुन्हा घडतच असतो आणि अघटित असं काही राहत नाहीअजबस्तान नावाच्या राज्यात अचाटगुप्त नावाचा लोकांमधून निवडून गेलेला लोक-राज्यकर्ता होऊन गेला आणि होणारही आहे. त्याची हि गोष्टअजबस्तान राज्यात लोकशाही व राजेशाहीचे अनोखे मिश्रण होते. म्हणजे एकदा राजा लोकांमधून निवडून गेला कि तो आणि त्याचे मंत्री लोकांना हिंग लावून विचारत नसत.

आज रोजच्याप्रमाणे पहाटे वाजता अचाटगुप्त उठला. सकाळचा शिरस्ता - आन्हिके उरकल्यावर मग ऑर्वेलचा पुढचा पाठ वाचणे! आजचा शब्द होताDoublethinkthe act of simultaneously accepting two mutually contradictory beliefs as correct. तो एकदम चपापला, आज दोन कार्यक्रम होते - सकाळी एका धार्मिक स्थळी आणि संध्याकाळी विज्ञान भवनात. मागच्याच आठवड्यात सरकारने शेळीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले होते. सकाळी शेळीच्या मुताचे शेणाचे १० उपयोग यावर भाषण, इतर देशांच्या अनैसर्गिक धोरणांचा समाचार आणि संध्याकाळी एक डोळा कॉर्पोरेट्स वर ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोन कसा वाढवावा यावर प्रवचनअचाटगुप्त स्वतःशीच खुश झाला, गोंधळ निर्माण करायला त्याला फार आवडायचं. एव्हाना झुंजूमुंजू व्हायला लागले होते. अचाटगुप्त आपल्या सद्य प्रासादाच्या गच्च्चीवरून समोरच बनत असलेल्या शतकातील अतिभव्य महालाची पाहणी करीत होता. तीन वर्षात हे काम पूर्ण करायचा घाट त्याने घातला होता. त्या परदेशी बनावटीच्या दुर्बिणीमधून बघताना त्याला आठवले - राजधानीपासून ५०० किलोमीटरवरील पर्यटननगरीतील आपला भव्य पुतळा बघता यावा म्हणून आपण दिलेल्या पॉवरफुल दुर्बिणीच्या ऑर्डरचे काय झाले? त्या देशात दुर्बिणीची डिलिव्हरी घ्यायला आता स्वतः दौरा काढला पाहिजे! या विचारांतून बाहेर येताना त्याला दुर्बिणीत गरीब खपणारे रोगट बांधकाम कामगार दिसले, अचाटगुप्त द्रवला नाहीIgnorance is Strength!   


अचाटगुप्त, नंबर २ आणि त्याचा राज्यकारभार 

तो आता खाली आपल्या कार्यालयीन कक्षात जीना उतरून येणार तोच नंबर तीन तिथे आधीच हजर होता. आज सकाळीच काय काम ? अचाटगुप्तने विचारले. नंबर तीन म्हणाला: सरदार, त्या सबगोलम प्रांतात मुखिया नेमायचा आहे, कुणाला करावे? एवढ्यात नंबर दोन तिथे हजर झाला. असला प्रश्न अचाटगुप्तला डायरेक्ट विचारल्याने तो नंबर तीन वर डाफरला. त्याला म्हणाला मी ठरवतोसोप्पे आहे - सर्वात मुर्खासारखी, आचरट, द्वेषमूलक व बाष्कळ विधाने कोण करीत आहे

नंबर तीनने नाव सांगितले  - "बाबाजीबा डांगजी! कालच तो म्हणाला कि हलकट, द्रोही लोक वाढल्याने पाऊस पडेनासा झालाय." दोन नंबर म्हणाला "बास एवढंच? अजून काही".  अजून तो असं म्हणाला होता कि हे अकडम आणि बकडम जमातीचे लोक रोगराई फार वाढवतात, त्यांचा बंदोबस्त करायला हवा म्हणून त्याने टोळी बनविली आहेबस्स! दोन नंबर खुश झाला. बाबाजीबा डांगजी उद्यापासून प्रांत-प्रमुख! आदेश काढा. अचाटगुप्तने मूकपणे नंबर दोनच्या निवडीवर मनातच स्वतःची पाठ थोपटून केलेले स्मित त्याच्या अर्धा फूट वाढविलेल्या मिशीतच विरले.

आजचे शेळीवरील भाषण  विज्ञान भवन प्रवचन फार छान पार पडले. अचाटगुप्तला लक्षात आले कि आता नवीन प्रश्न हाती घ्यायला हवेत. प्रांता-प्रांतात लोक वेगळ्या भाषा बोलत आहेत हे मोठे पाप आहे. सर्वांनी एकच भाषा सरळ सोपी "धिगमार्धआ" बोलायला हवी त्याशिवाय राज्यकारभार सुरळीत होणार नाही. त्याने दोन नंबर  आपल्या सेक्रेटरीला बोलावले आणि धिगमार्धआ ह्या सोप्या भाषेत नवीन स्लोगन तयार करून घेतले. नंबर ला सांगून अभ्यासक्रमातून स्थानिक भाषा काढण्याचा आदेश दिला. सेक्रेटरीने तोंडात बोटे घातली. अचाटगुप्त त्याला आतल्या खोलीत घेऊन गेला, तिथे हार घातलेला ऑर्वेलचा फोटो होता. अचाटगुप्तने सेक्रेटरीला त्यास नमस्कार करायला लावला आणि Newspeak म्हणजे काय ते समजावले

"लोकं फार बोलू लागले आहेत, मारून टाका ते शब्द. धिगमार्धआ मधले पण अनावश्यक नकारात्मक शब्द काढून टाकायचा हुकूम दिलाआपण फेकू तेच शब्द बोलायची परवानगी द्या, डिक्शनऱ्या छापा नवीन. शब्दांची संख्या लाखावरून लाखावर आणायचे टार्गेट द्या भाषा मंडळासफक्त सकारात्मक शब्द ठेवा, टीका करणारे शब्द काढून टाका." सेक्रेटरी सर्व आदेश घेऊन ऑर्वेल बद्दल बाहेर एक अवाक्षर काढण्याची ताकीद घेऊन निघाला!

तिथेच असलेल्या दोन नंबरने बॅगेतून गोबेल्सनीतीचे पुस्तक काढले. आज काढलेल्या नवीन कल्पना अचाटगुप्तला वाचून दाखवल्याPick out one special "enemy" for special vilification! 

धिगमार्धआ भाषेला काही लोक उगाच विरोध करू लागले. दोन नंबरने आदेश दिला - अमुक लोकांना तुरुंगात टाका. ढमुक यांच्या घरची तपासणी करा. यांची सर्व पुस्तके जाळून टाका. धिगमार्धआ शिकवणाऱ्या काही विद्यापीठाना द्रोही घोषित कराधिगमार्धआला विरोध म्हणजे आपल्या राज्याला विरोध. पोलीस जोमाने कामाला लागले. जनता पण भडकलीआपल्या संस्कृतीला विरोध? टाका यांना तुरुंगात, जनतेनेच मोर्चे काढलेअचाटगुप्तच्या प्रतिमेचे मोठे मोठे फलक लावून. अकडम आणि बकडम जमाती बोलत असलेल्या भाषांना दुय्यम दर्जा दिला गेला. दोन नंबरने प्रत्येक प्रश्नासाठी वेगवेगळे खलनायक तयार केले. आपल्या माहिती प्रसारण चीफला बोलावून प्रत्येक "खल"प्रकारातील लोकांना बदनाम करण्याचा पद्धतशीर प्लॅन त्याने हातात ठेवला

Propaganda must be planned and executed by only one authority!     

आता अचाटगुप्ताला राज्यातील विविध संस्थांचे मुख्य नेमायचे होते. आधीचे सर्व लोक त्याने काढून टाकले आणि आदेश दिला कि फक्त "ळथउ" आणि "बायहो" या दोन जातींचे लोक शोधून आणा आणि त्यांनाच त्या जागांवर बसवा. काहीनी उलटा प्रश्न विचारल्यास त्यांना काढून टाकाकायमच नवीन नवीन ळथउ बायहो लोकांच्या शोधात राहा! बाकी "विजीद्धीबु" "नद्वावि" जातीचे लोक आढळले तर त्यांना दुय्यम स्थान द्या, झालंच तर संस्थेतून हद्दपार करा असे काही अलिखित नियम केले गेले. शिवाय गप्प बसणारे विजीद्धीबु  नद्वावि हे लोक "खलनायकीकरणाच्या लिस्ट" मध्ये टाका आणि त्यांचा कप्पा ठरवा. कप्पे आणि लोकांची हि लिस्ट माहिती प्रसारण अधिकाऱ्याला देऊन पुढील प्रचार कार्यवाही करायला सांगाया खलनायक लोकांनी काहीही मत नोंदवले तरी त्याचा कोणताही साधकबाधक विचार करता त्यावर गिधाडासारखे तुटून पडा उदा: "अमुक झाले तेंव्हा तुम्ही कोठे गेला होतात? या नद्वावि जमातीचे लोकं देशाचे शत्रूच आहेत". याउप्परही त्यांना पाठिंबा देणारे आढळल्यास त्यांचा बुद्धिभेद करा

Propaganda must label events and people with distinctive phrases or slogans.


मंत्र्यांची बौद्धिके  

एकदा काय झाले १३ नंबरचा नंबरकडे भेटायला गेला होता पण त्याने वेळ दिली नाही. मग तो आणि नंबरकडे गेला. त्यांनी त्याला नंबरकडे पाठवले. त्यांच्यात झालेला हा संवाद:

१३ नंबर: आपल्या अचाटगुप्त राजे साहेबांना परदेशी पुरस्कार मिळाला होता व त्यांचे कौतुक झाले तेंव्हा आपण परदेशी माध्यमांच्या बातम्या कौतुकाने दाखवल्या व पाठ थोपटून घेतली. पण आता हे बाहेरचे टीका करायला लागले आहेत, आपली काही मानांकने घसरली आहेत. मग आपण म्हणतोय कि आम्ही कसलेही परदेशी मापदंड मानत नाही?

नंबर: हे बघा आपल्या राज्याला नावे ठेवणारा कुणीही वाईटच, आपली संस्कृती जगात सर्वात जुनी आहे. त्यात चूक असण्याची कोणतीही शक्यता नाही. ती काळ्या दगडावरची रेघ आहे. 

१३ नंबर: पण प्रॉब्लेम असा झालाय कि काही लोक भूमिका बदलली म्हणून तक्रार करीत आहेत

Propagandists must have access to intelligence concerning events and public opinion.

नंबर: यासाठी आपल्या नंबर साहेबांनी विविध स्तरावर स्कीम्स बनविल्या आहेत.१ ली स्कीम: बातम्या कुणापर्यंत पोहोचतात त्याचे नियंत्रण करणे महत्वाचे आहे. ज्या बातम्यांनी आपल्याला लोकांना भडकवायचे आहे त्याच बातम्या पुढे जाऊ द्यायच्या, आपल्यावरच भडका उडवणाऱ्या बातम्या रोखायच्या. हि झाली पहिली पायरी. आता यातूनही काही बातम्या लोकांपर्यंत जातीलच. यासाठी नंबर साहेबांची २ नंबरची बुद्धिभेद स्कीम कामी येते. "दोन वेगळ्या घटना / वाक्ये / बातम्या इत्यादींची तुलना करून त्यांची एकत्र सारासार संगती लावण्याची लोकांची क्षमता नष्ट करा". हि स्कीम आपल्या शालेय शिक्षणापासूनच अंमलात आणली जातेय. उदाहरणार्थ मुलांची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता नष्ट करणे, उलटे प्रश्न विचारणे बंद करणे, संस्कृतीचा धाक दाखवून वर्गात गुंड-सदृश मुले तयार करणे जेणेकरून "विजीद्धीबु" "नद्वावि" जातीची मुले तयार होणार नाहीत. हे असे साचे तयार करून  त्यातून लोकांना गाळायची प्रक्रिया पार पडली कि आपोआप हे प्रश्न मिटतील. थोडेफार जे लोकं डराव डराव करतील त्यांना गांभीर्याने घेणारे कुणी राहिले नसेल.  

(सरकारने राज्याच्या आणि लोकांच्या कल्याणासाठी आणि शाश्वत विकासासाठी नुकतीच नवीन शिक्षण पद्धती सुरु केली होती!) 

Memory hole: Anything that needed to be wiped from the public record (embarrassing documents, photographs, transcripts) would be sent into the memory hole 

Unpersonsomeone whose existence has been excised from the public and private memory.

नंबर: पण साहेब यातूनही काही शिरजोर नतद्रष्ट विरोध करणारे राहतीलच त्यांचे काय करायचे?  

१३ नंबर: काळजी नसावी, यासाठी आपल्या हुशार नंबर साहेबांनी नंबरची स्कीम बनवली आहे. याला "विस्मरण-भूयार" असे म्हणू. हे जास्त डोईजड लोकं तुरुंगात वा नजरकैदेत जाऊन पूर्णपणे समाजाच्या एकत्रित स्मरणातून कायम हद्दपार होतील अशी व्यवस्था. त्यांनी बोललेली वाक्ये, लिहिलेले लेख सगळेच त्या मेमरी होल मध्ये जाईल!! 

नंबर: वा साहेब चतुरच म्हणायचे, हि हुशारी, बुद्धिमत्ता हाच आपल्या लोकांचा यू.एस.पी - सर्वोच्च्च गूण म्हणायचा!

१३ नंबर: उगाच भ्रमात राहू नका नंबर! आपले दोनच गुण सर्वोच्च्च आहेत आणि ते म्हणजे अहंकार आणि द्वेष! इतर कुणाहीपेक्षा आपण शहाणे आहोत आणि कुणाला काहीच अक्कल नाही हा गंड कायम चालू ठेवणे हेच आपले बलस्थान! आपण आहोत नैतिकतेचा महामेरूज्या दिवशी आपण अहंकार द्वेष सोडू त्या दिवशी आपले अनुयायी आपल्याला सोडतील हे लक्षात ठेवा. हा अहंकार म्हणजे त्यांच्यासाठी राष्ट्रा-अभिमान, द्वेष म्हणजे त्यांची ऊर्जा - ते सोडून चालणार नाही. आपले राजेसाहेब बघ कसे नेहेमी आपल्या लोकांच्या भावनांना हात घालतात! त्यांची स्वतःची प्रत्येक वस्तू परदेशी बनावटीची असली तरी ते जेव्हा स्वदेशीची सोयिस्कर हाक देतात तेंव्हा कुणीही उलटा प्रश्न विचारत नाही. आपण पद्धतशीरपणे त्यांची प्रतिमा समाजात सगळीकडे रेखाटत असतो, त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या प्रतिकांना उद्धृत करत राहतो - जेणेकरून लोकांना त्यांचे आपल्याकडे लक्ष आहे याची जाणीव राहील. आपली संस्कृती कितीही महान अध्यात्मिक वगैरे असली तरी आपली अजाण जनता मात्र बाह्यदेखाव्यालाच भुलते हे लक्षात घ्या. म्हणून आपण राजांचा वेष, त्यांचे दागिने आणि इतर प्रतीकात्मक गोष्टींवर जास्त भर देतो. आपले जे काही कर्तृत्व आहे ते या उदात्त संस्कृतीच्या टेकूला धरून उभे आहे, यात आपले स्वतःचे काही नाही.

तेवढ्यात ६ नंबरच्या ऑफिसच्या बाहेरून चाललेल्या २ नंबरने हि बौद्धिके चोरून ऐकली. चोरून संवाद ऐकायची त्याला सवयच होती व त्यासाठीची पूर्ण प्रशासकीय व्यवस्था त्याने राबविली होती. २ नंबरचा ऊर भरून आला आणि त्याने ६ नंबरच्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवले. त्याला बघून ते दोघेही ६ व १३ नंबर चपापून उभे राहिले. यानंतर २ नंबर ने केलेले भाषण: 

२ नंबर: हे बघ १३ नंबर हे जे सर्व ऐकलेस ते बरोबरच आहे. याशिवाय आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ बघ आपण लोकांना आपापल्या जाती-जमाती प्रमाणे एकत्र यायची हाक देतो. त्यांच्यावर शतकानुशतके अन्याय झाला आहे असे सांगतो, कुठल्याही माणसाला आपल्यावर अन्याय झाला नाही असे वाटत नाहीच! मग या जाती-जमाती एकत्र येतात. Some are more equal than others  वास्तविक असे "वेगवेगळे" एकत्र येण्याने समाजातील "दुही" वाढतेच! हि नकारात्मक गोष्ट आपण सकारात्मक आहे असे दाखवतो. या एकत्रित गटांचा आपल्याला चांगला उपयोग करून घेता येतो. जे वेगळा विचार करणारे - नाविन्याचा शोध वगैरे घेणारे लोक असतात ते एकटे पडत जातात. गट झाले की आपण त्यांना कॉमन टास्क देऊ शकतो, त्यांना राज्याभिमानाने चेतवू शकतो, झुंडीचा वापर आपसूक दहशतीसाठी होतो . आपला माहिती प्रसारण मुख्य फार चलाख आहे. तो जल्पक गटांना संदेश पाठवतो आणि ते सर्व त्याप्रमाणे निषेध, कौतुक, श्रद्धांजली इ. पार पाडतात.  विविधतेत एकता या नुसत्या बोलायच्या गोष्टी आहेत, आपला मंत्र सर्वांना एक-सारखे बनवणे मग तो आचार असो, आहार असो, विचार असो, भाषा असो वा पोषाख! त्याशिवाय लोकांची मने नियंत्रित करणे अशक्य.  स्वतंत्र विचार करणारे आपोआप काठावर ढकलले जातात वा कडेलोट करवून घेतात.  (१३ नंबर कौतुकाने बघत असतो). 

अजून एक गोष्ट म्हणजे आपण कधी मुद्देसूद वैचारिक वाद घालीत नाही, वाद निघाल्यास आपण पहिला वैयक्तिक हल्ला करतो. समोरच्या माणसाच्या जीवनातील अवघड(लेले) क्षण /चुका सापडतातच. त्या गोष्टींची इत्थंभूत माहिती तुला माहिती प्रसारण अधिकारी देईल. आपले माहिती प्रसारण अधिकारी जेवढी माहिती प्रसृत करतात त्याच्या दुप्पट दडवून ठेवतात.  आपण त्याला सत्य-मंत्रालय  department of truth म्हणू. त्यांच्याकडे सत्याचे असत्य आणि असत्याचे सत्य करण्याची यंत्रणा तयार असते. मूळ मांडलेला मुद्दा सोडून त्या मनुष्याच्या दुसऱ्याच बाबींवर आपण संदर्भ सोडून लोकांचे लक्ष वेधू शकतो. शिवाय आपल्याकडचे टोळभैरव कायम बहुसंख्येत असतात. त्यामुळे विजय कायम आपलाच! सत्याचा विजय शेवटी होतो म्हणतात पण ते सत्यही आपणच ठरवतो. अशी मुद्द्याला धरून नसलेली भांडणे वाढत जातात आणि आपल्याला हवे ते ध्रुवीकरण घडवून आणता येते. इंग्रजी भाषेत याला Whataboutery (उच्चार: व्हॉटअबाउटरी) असा शब्द आहे, पण याला धिगमार्धआमध्ये प्रतिशब्द आणायचा विचारही करायचा नाही!! 

विरोधकांनाही आपण कसे नामोहरम करतो तुला माहित आहेच! "भय" नावाच्या वाघाला मी पट्टा बांधून ताब्यात ठेवले आहे, पाहिजे तेव्हा तो वाघ कुणावरही सोडता येतो. आपले काही लोकनाट्य कलावंत आणि खेळाडू कसे आपल्या एका इशाऱ्यावर पाहिजे ते बोलू शकतात. शिवाय सेलिब्रिटी धर्ममार्तंडही आपलीच री ओढतात. त्यांच्याकडे पाहून मग बाकीचे एका अनामिक दडपणाखाली गप्प बसतात.  चला! उशीर झाला.    

२ नंबरच्या पुढच्या मीटिंगची वेळ झाल्याने तो तडक तिथून निघून गेला. ६ आणि १३ नंबर नमस्कार करून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसले. 


लोकांवरील प्रभाव   

To be perceived, propaganda must evoke the interest of an audience and must be transmitted through an attention-getting medium

अचाटगुप्त लोकांना भावनेच्या तालावर झुलवण्यात चांगलाच पारंगत झाला होता. दोन नंबरसह तयारी करताना गोबेल्सचे Avoid abstract ideas - appeal to the emotions हे वाक्य त्याच्या कानात सतत गुंजत असे. त्याच त्याच कल्पना वेगळ्या वेष्टनात घालून त्यांना देता येत असत.  Constantly repeat just a few ideas. Use stereotyped phrases. अचाटगुप्तने काही छोटे आणि सोपे स्लोगन्स पाडून घेतले होते. आपल्या मद्दड आणि निर्बुद्ध जनतेला ते द्यायला बरे पडतात. त्यातून संक्षिप्त-शॉर्टफॉर्म्स असतील तर दुधात साखर.  स्लोगन वापरले की खोलात जायला लागत नाहीजनतेचा आळस घालवायला काही टास्क द्यायची सवयही त्याने लावून दिली. अचाटगुप्त सांगेल त्या ठिकाणी, सांगेल त्यावेळी, सांगेल ते काम करायला आख्खी जनता तय्यार. कुणी चेष्टा केल्यास, प्रश्न विचारल्यास भरारी पथक (अर्थात गिधाडांचे) तयार असे लचके तोडायला. वस्तुनिष्ठ मूल्यमापन कुणी करू गेल्यास ते मार्ग पूर्ण बंद करणे आणि सर्व निर्णय हे भावनांवर आधारित घेणे याची पूर्ण खबरदारी घेतली जात होती

Give only one side of the argument and continuously criticize your opponents!

अचाटगुप्तच्या पक्षाने पुराणकालीन नेते विचारवंतांचा सोयिस्कर वापर सुरु केला. आपल्या अजेंडाला सोयीचे असेल ते आणि तेवढेच संदर्भ सोडून आणि गाळून घ्यायची आणि त्याचे रूपांतरण करायची व्यवस्था त्यांनी रूढ केली. याचा वापर करून आपल्या अफाट अनुयायांना घेऊन त्यांनी विरोधकांना चोपायला सुरुवात केली. विरोधकांतील काही दिवंगत महान नेते त्यांनी चक्क जप्त केले आणि त्यांच्यावर आपला हक्क सांगितलाDoublethink  अचाटगुप्त परदेश दौऱ्यावर गेल्यावर तेथे या विचारवंत नेत्यांचे कौतुक करीत असे आणि अजबस्तान मध्ये मात्र त्यांची यथेच्छ टिंगल करायची व्यवस्था बनविली गेली होती.    

काही भ्रष्ट विरोधी नेते आपल्यात घेऊन त्यांना पावन करून घेतले गेलेआपल्या केडर मधील २ नंबर पासून २० नंबर पर्यंत सर्वांच्या पुढच्या पिढीला सत्तेत, व्यापारात, खेळमंडळात वरच्या जागा दिल्या आणि विरोधकांवर घराणेशाहीचा आणि वशिलेबाजीचा आरोप करायला सुरुवात केली.

Blame the other side for which you are guilty!


अजबस्तानचे अर्थचक्र, समाज आणि शत्रू 

अचाटगुप्ताचे अर्थज्ञान अगाध होते आणि त्याचा तो आपल्या फायदासाठी वापर करून घेत असे. लोकांनी प्रेमाखातर या ज्ञानास "अर्थाचाटशास्त्र" असे नाव दिले.  एके दिवशी अचानक अचाटगुप्ताने फर्मान काढले कि - रयतेकडे असलेल्या सोन्याच्या मोहरा या खरंतर पितळ्याच्या आहेत. त्यामुळे सर्व जनतेने आपल्याकडील सोन्याच्या (म्हणजे पितळेच्या) मोहरा सरकार दरबारी जमा कराव्यात. सरकार कडून खऱ्या सोन्याच्या मोहरा बदल्यात दिल्या जातील. सर्व गोरगरीब जनतेने तहान-भूक विसरून रांगेत उभे राहून मोहरा बदलून घेतल्या. दूर खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांना मोहरांसाठी मोठ्या गावात यावे लागले. अचाटगुप्ताने जमा झालेल्या मोहोरा परदेशात विकून टाकल्या आणि काही मोठ्या व्यापाऱ्यांना दिल्या. दोन व्यापारी त्याचे जास्त लाडके - आडटेमची आणि काडटेमची. आपल्या राज्यातील सर्व कंत्राटे या व्यापाऱ्यांना दिली जात. बाकी राज्यकारभारात एकच भाषा, एकच निवडणूक वगैरे समता आणली तरी अचाटगुप्तास सामाजिक विषमता फार प्रिय होती. त्याच्या राज्यात ऑलीगार्ष नावाचा अति-श्रीमंत लोकांचा एक गट तयार झाला. हा गट त्यांच्या यंत्रणेच्या सर्व खर्चाची जबाबदारी घेई - त्याभोवतीच पूर्ण अर्थचक्र तयार करण्यात आले. त्यानंतर मग कर भरणारा पण ग्लानीत राहणारा मध्यमवर्ग आणि पूर्ण गाळात गेलेला कनिष्ठ वर्ग. यांच्यातील दरी वाढवणे अचाटगुप्ताच्या उद्दिष्टांसाठी सोयीचे होते. मध्यम वर्गाची पूर्वी त्यांच्यात असलेली नैतिक-अनैतिक ठरवण्याची सद्सद्विवेकबुद्धी पूर्णपणे नष्ट झाली. अचाटगुप्ताचे ते ते सर्व नैतिक, विरोधकांनी केलेले अनैतिक - अशी ढोबळ व्याख्या त्यांच्या गळी उतरवण्यात राज्यसंस्था यशस्वी झाली होती. अचाटगुप्त हा घेतलेल्या तुघलकी निर्णयांचे कोणतेही उत्तरदायित्व म्हणजे जबाबदारी घेत नसे. त्याच्या परिणामांचे मूल्यमापन करण्याचे सर्व मार्ग त्याने बंद करून ठेवले होते.  अगदीच अंगाशी आल्यास विरोधकांचे कारनामे आहेत, टोळभैरव अंगावर सोडणे आणि सरते शेवटी आपणच बळी असल्याचा बहाणा म्हणजे व्हिक्टीम कार्ड खेळणे हे त्याचे सुटकेचे मार्ग होते!  असा धुराळा उडवून दिला कि गोंधळून जाऊन मग कुणाला काहीच कळत नसे.

अचाटगुप्तने सत्तेवर येताना राज्यातील भ्रष्टाचार पूर्ण नष्ट करणार असे वचन दिले. एक दोन ठिकाणी स्वतः लक्ष घालून व त्याची प्रसिद्धी करून त्याने चमकदार कामगिरी केल्याचा समज निर्माण केला. भ्रष्टाचार हा असा वरून खाली (टॉप-डाऊन) दबावाने कमी होतो असा एक भंपक आणि बालिश समज त्याने विशेषतः मध्यमवर्गीयांचा करून दिला होता.

अजबस्तान राज्याची दोन मुख्य शत्रू राज्ये होती. एक होता छोटा, अशक्त टिकोझिया आणि दुसरा होता प्रचंड बलाढ्य चिंकोझिया. आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी अचाटगुप्त टिकोझियाचा उपयॊग करून घेत असे, राज्याभिमान चेतावण्यासाठी काही ना काही समस्या उकरून काढत असे. सर्व रयत त्याला पाठिंबा देई. पण चिंकोझिया बलाढ्य होता, त्याने काही आगळीक केलीच तर अचाटगुप्ताची कढी पातळ होई. पण या गोष्टीचे एवढे वैषम्य नव्हते. कारण २ नंबरने आपल्या नस्ताकुफेच्या ००७ स्पेशल गुप्त अधिकाऱ्या बरोबर केलेल्या योजनेनुसार इथेही जिंकल्याच्याच बातम्या जनतेत पोहोचत. काही सत्य बाहेर आलेच तर ते बदलायचे आणि मेमरी होल म्हणजे विस्मरण भुयारात टाकायची यंत्रणा पूर्ण जोमाने काम करत असे. शिवाय चिंकोझियाचा द्वेष करणारे देशही याकामी मदत करीत असत.

फक्त प्रतिमा संवर्धनात लक्ष घातल्याने आणि दोनच लोकांनी निर्णय घेण्याचे धोरण असल्याने बाकीच्या ३,४,५,६..  इत्यादि नंबरची निर्णयक्षमता घटली. अचाटगुप्ताने काही जाहीर केले कि २ नंबर पासून पुढे क्रमाने ३, ४, ५, ६ त्याला अनुमोदन देत. सारी कामे ठप्प झाली. जनताही आपल्या राजाच्या प्रतिमा व भाषणे पाहण्यात दंगल्याने तिचीही कार्यक्षमता कमी होऊन राज्याचा कर-सारा घटला. एके वर्षी उणे २० टक्के  झालेला अर्थव्यवस्था वाढीचा वेग पुढील वर्षी अधिक ५ टक्के होणार - म्हणून अधिक २५% वाढीने दाखवला जाऊ लागला. 


अजबस्तानवरील महागंभीर संकट  

आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याने काही दिवसांनी अजबस्तान राज्यात खूप रोगराई वाढली. एका विचित्र असाध्य रोगाने लोक मरू लागलेयामध्ये टिकोझियाचा दोष नव्हता आणि चिंकोझियाचा असूनही त्यांना तो देता येत नव्हता! दोष द्यायला कुणी न सापडल्याने अचाटगुप्तने दुर्लक्ष केले. Ignorance is Strength! अचाटगुप्तने जेवढे जास्त दुर्लक्ष केले तेवढी त्याची ताकद वाढू लागली. जनतेने त्याच्या धीरगंभीरतेचे, स्थितप्रज्ञतेचे कौतुक केले. १८-१८ तास जीवतोड काम करण्याच्या त्याच्या सवयीची प्रसिद्धी झालीकाही टवाळ लोकांनी अचाटगुप्तने कामाचे तास कमी करावे, म्हणजे लोक कमी मरतील असे घरातच खाजगीत बोलून पाहिलेपण अचाटगुप्तने आणि नंबर दोनने आधीच विचारव्यभिचार गुन्ह्यांवर लक्ष ठेवायला विचारमर्दन रक्षकांची नेमणूक केली होतीThought Crime and Thought Police कुणी राज्यविरोधी विचार केला कि ते लोक पकडले जातील अशी व्यवस्था! आता घराघरांत दुभंग असल्याने विचार व्यभिचारी लोकांना पकडणे सोप्पे झाले होते! 

लोकांनी घरी बसून उपाशी राहावे असा त्याने हुकूम सोडलालोक उपाशी मरू लागले नाहीतर आजाराने मरू लागले. अचाटगुप्तने पुन्हा ऑर्वेलचा धावा केला Freedom is Slavery! लोकांना पटवून दिले की तुम्ही सुखात आहात. हे भोग म्हणजेच खरे सुख! 

Propaganda must facilitate the displacement of aggression by specifying the targets for hatred.

एव्हाना बाबाजीबा डांगजीच्या प्रांतात पण रोगराई वाढली. बाबाजीबाने जाहीर केले अकडम आणि बकडम जमातीने केलेल्या पापांचा भार फार झाला! त्याने रोगराई वाढली. त्याने दिसेल त्या अकडम बकडम जमातीच्या लोकांना तुरुंगात टाकले. हे लोक फक्त २०% होते लोकसंख्येच्या, पण बाकी ८०% कसे धोक्यात आहेत हे पटवून द्यायला त्याने दोन नंबरची मदत घेतली. एक दोन वाईट किश्श्यांवर संपूर्ण जमातीला कसे वाळीत टाकायचे याच्या पद्धती त्याने विकसित केल्या होत्या. आरोग्य सुविधा मिळाली नाही म्हणून तक्रार करणाऱ्यांवरही त्याने खटले भरले. बाबाजीबा डांगजी नेहेमी जांभळ्या रंगाचे कपडे घालत असे, लोकभावनेला हात घालायला पूर्वापार चालत आलेला हा रंग बरा पडत असे. जांभळा रंग बघितला कि अजबस्तान राज्यातील लोकांना चेकाळून येत असे. जांभळा म्हणजे पवित्र, जांभळा म्हणजे सच्चा-सज्जन.  लोक म्हणू लागले बाबाजीबा आता नंबर होणार, नाहीतर नंबरच? बाबाजीबा आता नैतिकतेची एकेक पायरी उतरत अत्युच्च्य खालच्या पातळीवर पोहोचला होता आणि म्हणून केडरमध्ये वरती सरकायला सर्वात लायक असा माणूस होता


War is peace!  

खूप दिवस गेले तरी रोगराई हटेना, लोक मरतच होते. नाईलाजाने अचाटगुप्तला काही औषधे बाहेरून मागवावी लागली. त्याने जाहीर केले हा उत्सव आहे रोग्यांचा-औषधांचा - साजरा करा, एकमेकांना औषध द्या! रोगावरचा लढा म्हणजे उत्सव, उत्सव केला म्हणजे शांती येईलअजबस्तान राज्यातल्या बहुतांश लोकांनी फ्रेंच राणी मारी आंत्वानेतची "भाकरी-ब्रेड मिळत नसेल तर केक खा"ची गोष्ट ऐकली नव्हती. ज्यांनी ऐकली होती त्या लोकांची या दोन घटनांची सारासार संगती लावायची क्षमता आता अर्थातच नष्ट झाली होती. त्यामुळे राजाच्या सकारात्मक विचारांचा त्यांनी गौरव केला.

औषधांसाठी तडफडून लोकांनी रांगेत वा इस्पितळात प्राण सोडले. अचाटगुप्तने धिगमार्धआ मध्ये जाहीर केले - उत्सव यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन. धिगमार्धआमध्ये आता दुःख व्यक्त करायला शब्द राहिले नव्हते. त्यामुळे सगळेजण पॉझिटिव्हली - सकारात्मक विचार करायला लागले. दोन नंबरने सर्व वाईट, टीकात्मक शब्द memory hole मध्ये गाडून टाकले होते. कुणालाच आता ते शब्द आठवत नव्हते! लोकं सगळीकडे पॉझिटिव्हिटी पसरवायला लागले. परदेशी लोकं त्यांच्या भाषेत टीका करत होते, बातम्या छापतंच होते. फक्त धिगमार्धआ येत असल्याने लोकांना त्या बाहेरच्या भाषा समजेनाश्याच झाल्या.  अशा रितीने अचाटगुप्ताने आपली ताकद अजून वाढविली, त्याचे अनुयायी हि वाढले. हे अनुयायी आता स्वेच्छेने वा सत्तेच्या भयातूनहि तयार झालेले नव्हते! अचाटगुप्ताने बनविलेल्या शिक्षण पद्धतीतून बाहेर पडलेले लोक आता चिपाड बुद्धीने अनुयायी बनत.


चांगले दिवस परत आले (अचाटगुप्ताचे)  

लाखो लोक मेल्यावर रोगराई आपोआपच कमी झाली आणि अचाटगुप्त, नंबर २ आणि माहिती प्रसारण मुख्य यांनी प्रतिमा संवर्धनाची नवीन मोहीम काढून सर्वकाही पूर्वीसारखे सुरळीत केले. इतके कि काही लोकांना रोगाची साथ आली होती हेच खोटे वाटायला लागले! शिवाय रोगसाथीतील अपयशाबद्दल कुणी बोलायला लागलेच तर जल्पकांची नवीन पिढी तुटून पडायला तयार होती.  तीन वर्षांनंतर अचाटगुप्ताचा भव्य प्रासाद तयार झाला. उदघाटनाला सर्व ऑलीगार्ष मंडळी तसेच २ नंबर, ३, ४, ५, ते २० नंबर (किंवा २५ हि असतील संख्या महत्त्वाची नाही) आणि त्यांचे सर्व कुटुंबीय हजर होते.  सामान्य जनतेने आपल्या घरात लावलेल्या अचाटगुप्ताच्या प्रतिमेची आरती करून हा प्रसंग साजरा केला! अचाटगुप्ताचे साम्राज्य त्रिखंडात गाजो अशी त्यांनी प्रार्थना केली. 


आता हे लिहीत असताना मला विचार-रक्षकांकडून निरोप आला. म्हणजे थॉट पोलीस! ते या अमर्याद काळाच्या सीमा भेदून अजबस्तान मधून इथेच दाखल झाले आहेत. 

माझा लेख लिहीत असतानाच हे -ब्द त्यांच्या कडे गेS अरे माझे -ब्द  गळ- आ-त का-बा कळ- नाS अर्रर्र गिळ- -ब्द  

त त प प, त त प प

त त प प, त त प प 

आता सर्व छान आहे, सगळीकडे आनंदी आनंद आहे, सर्व लोक सुखात राहत आहेत. अचाटगुप्ताला नावे ठेवणारे लोक राज्यद्रोही आहेत! हे एवढेच लक्षात ठेवा फक्त! बाकी सर्व आलबेल! 


(संदर्भ: जॉर्ज ऑर्वेलचे १९८४ आणि गोबेल्सची प्रोपागंडा नीती -> त्यांचे आभारी - मी,  अचाटगुप्त आणि नंबर २!!)