Saturday 22 June 2024

परलोक सीधा-रे! मंडळ

परलोक सीधा-रे! 

स्थळ: परलोक सीधा-रे! संस्थेचे ऑफिस. टेबलवरील फोन खणखणतो, मॅनेजर बळवंतराव फोन उचलतात आणि रिसिव्हर कानाला लावून उचकलेल्या स्वरात म्हणतात कोण बोलतंय? पलीकडचा माणूस काहितरी विचारत असतो  - सारख्या येणाऱ्या फोन्सना वैतागून बळवंतराव म्हणतात - प्रत्यक्ष ऑफिसमध्ये येऊन भेटा मग अगदी डिटेल माहिती देतो, आता रोज शंभर फोन यायला लागलेत. तेवढ्यात गोपाळराव आत येतात आणि टेबलच्या दुसऱ्या बाजूकडील खुर्चीवर बसण्याची खूण बाळासाहेब त्यांना करतात.

गोपाळराव: परलोक सीधा-रे! या संस्थेचे ऑफिस हेच ना? जरा चौकशी करायची होती 

बळवंतराव: हो हेच ते ऑफिस. बोला काय माहिती हवी आहे.   

गोपाळराव: तुमच्याकडे कोणत्याही हत्या, आत्महत्या वगैरे कायद्याच्या कचाट्यात न पडता सुलभ मृत्यूची सोय केली जाईल असे वाचले. हे खरे आहे का?

बळवंतराव: हो हे खरे आहे, शिवाय इन्शुरन्स नसला तरी तुमच्या वारसांना नुकसान भरपाईचे पैसे सरकारकडून पण मिळतील. बोला तुम्हाला मृत्यू हवा आहे का? आमच्याकडे मरणाच्या विविध पद्धती अव्हेलेबल आहेत. प्रत्येक पद्धतीनुसार आणि अर्जन्सी प्रमाणे आम्ही चार्जेस घेतो.  

गोपाळराव: अरे वा चांगलंय कि. हो मलाच मेल्याला मरायचंय - अं म्हणजे मृत्यू हवा आहे. पण काय काय पद्धती उपलब्ध आहेत ते तरी सांगा. 

बळवंतराव: हो जरूर - हा पहा आमचा कॅटलॉग:

१) होर्डिंग पडून त्याचे खाली चेंगरून मृत्यू  - रु १०,०००

२) एकदम भारी, लॅव्हिश कारने चिरडून/उडवून मृत्यू - रु १५,०००. हि बेस प्राईस देशी गाड्यांसाठी आहे. गाडीच्या ब्रँड नुसार किंमत बदलते. परदेशी गाड्यांना रेट जास्त लागेल. 

३) हॉलमध्ये आग लागून मृत्यू - रु २०,०००

४) वादळी पावसात ओढ्यामध्ये वाहून जाऊन मृत्यू - रु २५,०००

५) खड्ड्यात गाडी पडून मृत्यू - रु ५,०००   - हे स्वस्त आहे कारण आम्हाला फार कष्ट पडत नाहीत

६) पूल कोसळून मृत्यू - रु २५,०००

७) बेकायदा इमारत कोसळून मृत्यू  - रु १५,०००

८) युद्धजन्य भूमीवर हौतात्म्य  - रु १,५०,००० (युक्रेन, गाझा इत्यादी ठिकाणी जायचा व्हिसा व प्रवास खर्चासह - शिवाय हुतात्मा म्हणून मरणोत्तर स्मारक उभारले जाईल)

अजूनही बरेच प्रकार आहेत व नव-नवीन मेथड्सचे शोधही लागत आहेत. अधिक माहितीसाठी हे पॅम्प्लेट घ्या.  

गोपाळराव: बरेच प्रकार दिसतायत पण हे तुम्ही कसे काय साध्य करता? उदाहरणार्थ होर्डिंग खाली पडून मृत्यू?

बळवंतराव: त्याचं काय आहे कि आम्ही प्रत्येक गोष्टी साठी रिसर्च करतो. उदाहरणार्थ आपल्या शहरात किती होर्डिंग आहेत, कोणती बेकायदा असून कमकुवत आहेत आणि कधी पडू शकतात. हा सर्व डेटा आमच्याकडे असतो. नावनोंदणी झाल्यावर फुल चार्जेस ऍडव्हान्स मध्ये घेऊन - दिवस, वार बघून आम्ही लोकांना त्या लोकेशन ला पाठवतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान वापरून आम्ही सर्व शक्यता आजमावतो आणि मगच खात्रीशीर जागी लोकांना पाठवतो. कुठे उभारले असता झटकन मृत्यू येईल याचा आराखडा आम्ही बनवतो. उदाहरणार्थ परवा एका मोठ्या होर्डिंग खाली सुमारे वीसेक लोकं मेले ना? त्यातले तीन आपल्याकडे नोंदणी केलेले होते. आता सरकारी मदतही त्यांच्या वारसांना लवकरच मिळेल. मध्ये त्या चित्रपटगृहात आग लागली त्यात पण पन्नासातले सहा आपले गिऱ्हाईक होते. त्या थेटरमधल्या आगरोधक यंत्रणेचा आम्ही पुरता अभ्यास केला आणि शॉर्ट सर्किट कधी होईल वगैरे याचे त्रैराशिक मांडले. तसेच पुलाचेही - जितका पूल नवीन तितकी पडण्याची शक्यता जास्त! नवीन पूल बांधल्याची जाहिरात आली कि आम्ही लगेच तो पूल आमच्या लिस्ट मध्ये ऍड करतो. 

गोपाळराव: छान पण समजा ते होर्डिंग / पूल वगैरे त्या वेळेला पडलेच नाही तर? बरं तुम्हाला ते पडणार हे माहित असताना तुम्ही सरकारी यंत्रणांना आगाऊ सूचना देऊन बाकीचे मृत्यू का वाचवीत नाही? तसा तुमच्यावर दबाव नाही का?

बळवंतराव: तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे असे फार क्वचित होते. आमचा अल्गोरिदम खूप पर्फेक्ट काम करतो, तरीपण असे झालेच तर तीन ट्रायल नंतर आम्ही पैसे परत करतो. होर्डिंग फॉल न होता फेल झाल्यास दुसरा एखादा मार्ग उदाहरणार्थ पूल कोसळून मृत्यू फुकट ऑफर करतो. तेथे पुलावर नेऊन पोहोचवण्याचा खर्चही आमचा. आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे सरकारी यंत्रणांना पण ते पूल/होर्डिंग वगैरे पडणार हे आधीच माहित असते त्यामुळे त्यांना आम्ही नव्याने काय सांगणार. हां फक्त अचूक प्रेडिक्शन मात्र आम्हीच करू शकतो. उद्या तेही "ए आय" वापरायला लागले तर आमचा धंदा बसवतील आणि वेगळी डिपार्टमेंट बनवतील. पण तेवढी अक्कल नसल्याने आमचा धंदा चालतो. 

गोपाळराव: बरं प्रत्येक कॅटेगरी साठी तुमचा रेट वेगवेगळा का आहे?

बळवंतराव: लॉजिस्टिक्स साहेब - लॉजिस्टिक्स! प्रत्येक मेथड साठी वेगळी यंत्रणा आणि रिसर्च लागतो. शिवाय वारसांना मिळणारी सरकारी मदतही वेगळी असते. उदाहरणार्थ तुम्ही खड्ड्यात गाडी पडून मेलात तर रेट कमी असतो पण तेच होर्डिंग किंवा कारने उडवल्यावर रेट वाढतो कारण नुसती सरकारी नव्हे तर होर्डिंग मालक आणि कारचालकाचा बाप यांचेकडून नातेवाईकांना वेगळी भरघोस भरपाई मिळते. हाय रिस्क - हाय गेन.  

गोपाळराव: ग्रुप डिस्काउंट सारखी स्कीम आहे का? 

बळवंतराव: अजून तरी तशी डिमांड आली नाही म्हणून सुरु नाही केली, पण लवकरच येईलसे वाटते. अजून एक सांगायचं म्हणजे तुमचा मृतदेह कोणत्या स्थितीत हवा आहे त्यावर पण काही रेट ठरतात. उदाहरणार्थ पूल कोसळून पाण्यात पडल्यावर शरीराला फार इजा होत नाही, माणूस पाण्यात श्वास कोंडून मारतो. त्यावेळी माणसाची बॉडी बऱ्यापैकी इन्टॅक्ट राहत असल्याने या मेथडला रेट पण जास्त लागतो. तुम्हाला कशी हवी आहे तुमची बॉडी?

गोपाळराव: आता मेल्यावर काय फरक पडणारे आपल्याला? बॉडी कशी का दिसेना! नको पण नातेवाईकांना जरा दर्शनाचे समाधान वाटावे म्हणून पाण्याची आयडिया बरी आहे. बरं अजून एक म्हणजे न मरता नुसतेच जायबंदी झाल्यास काय करायचे? मग हॉस्पिटलमध्ये खितपत पडावे लागेल.     

बळवंतराव: आमच्या सर्व्हिसचा सक्सेस रेट ९९.९६ टक्के आहे -सिक्स सिग्मा प्रमाणे पर्फेक्ट. तरीपण मरता मरता काही अपघात होऊन मरण न आल्यास आम्ही हॉस्पिटलचा सर्व खर्च उचलतो. शिवाय ज्या हॉस्पिटलमध्ये वीज गेली असता व्हेंटिलेटर बंद पडतील असेच हॉस्पिटल निवडतो. त्याचे वेगळे चार्जेस लावत नाही. हि पद्धत जे आधीच हॉस्पिटलमध्ये खितपत आहेत त्यांच्यावर वापरून योग्य त्या हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करतो. 

गोपाळराव: जबरदस्त! आता मला खात्री पटली कि मी योग्य जागी मरायला आलोय. 

बळवंतराव: अगदी बरोबर, हा शंभर रुपयाचा फॉर्म भरून नावनोंदणी करा बरं आधी. फुल ऍडव्हान्स भरल्यावर मगच अंतिम दिनाचे प्लॅनिंग करण्यात येईल.   

गोपाळराव: चालेल - हा घ्या फॉर्म. नदीवरचा पूल पडून होणाऱ्या पद्धती साठी मी अप्लिकेशन देत आहे. मरण स्वस्त झालंय म्हणतात तरी तुम्ही त्यासाठी पंचवीस हजार रुपये घेतात ते जरा जास्तच आहेत. पण वन टाईम खात्रीशीर मरण असल्याने हरकत नाही. 

बळवंतराव: शिवाय नो हिडन चार्जेस! धन्यवाद!! या आपण आता - बाकीचे फोनवर ठरवू. नेक्स्ट प्लिज ....   


No comments:

Post a Comment