Saturday, 14 March 2020

दोन काकांची व्यक्तिचित्रे!

वयाच्या सत्तरीच्या सुरवातीलाच चटकन जगातून निघून गेलेल्या दोन जवळच्या काकांवरचे हे छोटेखानी मृत्यूलेख. हे काही त्यांचे सर्व बाजूंनी केलेले अष्टपैलू निरीक्षण नसून - एका आंधळ्यास हत्तीची जी-जी बाजू हातास लागली तितपतच वर्णन त्यात आले आहे. त्यामुळे काही गुण गायचे राहून गेले असल्यास क्षमस्व!  :

बंडू काका वॊज (was) राईट! 
भारतीय बसकण पद्धती ही पाश्चिमात्य कमोड सिस्टिमपेक्षा पोट साफ होण्यास जास्त प्रभावशाली आहे असे बंडू काका म्हणाले त्याला आम्ही (म्हणजे प्रस्तुत लेखकाने) विरोध दर्शविला. जे जे पाश्चात्य ते ते उत्तम अशी आमची धारणा असल्याने बाह्या सरसावून आम्ही उभे राहिलो. ज्या अर्थी इतकी वर्षे ते लोक कमोड वापरीत आहेत त्या अर्थी ते संशोधनपूर्वकच केले असणार असे आम्ही म्हंटले. यथायोग्य प्रेशर येणे ही तुमच्या आरोग्याशी संबंधित गोष्ट आहे, त्याच्याशी बसण्याचा पद्धतीचा काय संबंध? यावर बंडू काकांनी काही कारणे दिली. ती आम्ही तेव्हा पटल्यासारखे दाखवले, केवळ आदरभावामुळे आम्ही मोठ्यांचे पटवून घेतोच घेतो. मात्र अस्मादिकांनी परदेशात विविध प्रकारच्या कमोडचा (सोनेरी/चंदेरी भांड्यांपासून ते टर्कीशचे कव्हर असलेली झाकणे,  कापसासारखे मऊ मुलायम पेपर रोल, पोटात कळ येऊन ढवळेल अशा बातम्या देणारी वर्तमानपत्रे समोर वाचायची सोय,  मोबाईल होल्डर्स, स्वयंचलित कागद  वितरक (डिस्पेन्सर) इत्यादिंचा  !) स्वतः वापर केल्यानंतर मात्र - बंडू काका म्हणाले ते सत्यच होते हे लक्षात आले.

इसवी सन १९८६-८७ चा काळ! आत्याकडे सदाशिव पेठेत असलेल्या ४ दिवसांच्या मुक्कामात हमखास एक तरी रविवार यायचाच. सकाळी सकाळी हिंदुस्थानचे गरम गरम पॅटिस आणि रेकॉर्ड प्लेअरवर लागलेली पाकिझा, अल्बेला वा तुमसा नहीं देखा सिनेमातील गाणी अशा प्रसन्न वातावरणात सुरु झालेला कोकजे बिल्डिंगमधील रविवार कसा उत्तम जात होता. त्यानंतर दुपारी कधी कॅम्पात जाऊन कयानी चा केक / श्रुजबेरीची बिस्किटे आणणे  या बंडू काकांच्या नित्यक्रमात आम्हीही शामिल होत असू.  कधीमधी तिथल्याच एका फॅक्टरीतून कोला वा ऑरेंज ड्रिंकच्या काळ्या / नारंगी बाटल्या भरून आणणे व व्होल्टासच्या फ्रीजमध्ये नीट लावून ठेवणे हेही आम्ही पाहिले. मोठेपणी या पेयांचा सोस कमी झाला तरी, लहान असताना आपल्याला - तू काही घेणार आहेस का अशी विचारणा झाली कि अगदी गदगदून यायचे. ज्यांच्याकडे फ्रिज आहे त्यांच्याकडे या अशा बाटल्या ठेवाव्याच लागतात असा आमचा गोड गैरसमज बंडू काकांमुळे झाला होता. पण कसचं काय, फ्रीजमधल्या त्या खालच्या दोन रांगा आमच्याकडे तो आल्यानंतर रिकाम्याच रहात असत. रात्रीच्या वेळेस झोपताना बंडू काका भीमसेनचे निरनिराळे राग लावत असत आणि मग झोपेतच ती कॅसेट कधीतरी बंद होत असे आपोआप (अच्छा, म्हणून ते यावेळी रेकॉर्ड प्लेयर लावत नसत!). अशा मंत्रमुग्ध वातावरणाची आठवण सतत होत राहते. घड्याळाचे काटे फिरवून पुन्हा कुठल्या काळाकडे जायचा वर मिळाला - तर आम्ही भावंडे हाच काळ मागून घेऊ देवाकडून!! त्या काळातल्या पुणे ट्रिप अविस्मरणीय करण्यात बंडू काकांचा वाटा मोठा आहे.

काकांना भूमिकेत शिरणे फार लवकर जमत होते असे वाटते.  कारण बस वा रेल्वेत गप्पा मारता मारता अचानक समोरच्याशी आपल्या हक्काच्या जागेवरून भांडण करण्याची किमया साधणे  इथपासून ते टिळक टॅंकवरील कुणा उद्योजकाच्या पार्टीत इतर अशाच उद्योजक, प्रथितयश डॉक्टर्स वगैरे बड्या असामींबरोबर खांद्याला खांदा मिळवून शामिल होणे त्यांना सहजी जमायचे. याबाबतीत ते effortless होते, हि नैसर्गिक देणगीच त्यांच्याकडे होती म्हणूया. लहानपणापासून त्यांनी तशा बड्यांना (अगदी भीमसेनजींपासून) जवळून पाहिल्यामुळे असेल कदाचित. याबाबतीत लहान-मोठे भेदाभेद अमंगळ होते त्यांना. हा आत्मविश्वास सर्वांनाच कुठेही यशस्वी होण्यासाठी त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे.

सकाळी लवकर उठून  वर्षानुवर्षे टिळक टॅंकवर पोहायला जाणे, त्यानंतर रुपालीत मित्रमंडळाबरोबर नाश्ता - हे त्यांनी न चुकता सातत्याने, अव्याहतपणे केले. बलोपासना व त्यातून आलेली खेळकर वृत्ती त्यांनी जोपासली. बहुतेक शनिवारी / रविवारी वेताळ टेकडी, गुरुवारी सिंहगड चढणे इत्यादी त्यांनी इमानेइतबारे केले.  यावर अ-वक्तशीरपणाचा छोटा काळा टिळा लागला तरी तो या पुण्याईवर खपून जात असे व केवळ हास्य विनोदातच त्याचा उल्लेख होऊन बऱ्याचदा भागत असे. पण आपल्या रुटीनला  कमीत कमी धक्का लावून घेण्याच्या पुणेरी बाण्याने ते आपली कामे सुरु ठेवू शकत. त्या अर्थाने "कंपार्टमेंट" मध्ये जगायला त्यांनी स्वतःला तयार केले असावे.

मोठे शौकीन खवय्ये तर ते होतेच, विविध खाद्यपदार्थ खाऊन बघून ते स्वतः बनविण्यात त्यांचा हातखंडा होता.  त्याचबरोबर नाविन्यपूर्ण वस्तू आणून त्यांचा पुरेपूर वापर करण्यात कुणी त्यांचा हात धरू शकणार नाही. आज सर्वत्र मुबलक वस्तूंचा "प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी" झाला असला तरी त्यांना तो कधीच झाला नाही व प्रत्येक नवीन वस्तूसाठी जागाही आपसूक तयार होत असे. इंटिरिअर डेकोरेशनच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी जागेत जास्तीत जास्त सामान मावविण्यासाठी त्यांच्या घरी प्रॅक्टिकल टूर द्यायला हवी! बरं यातील बहुतेक वस्तू ह्या खाद्यपदार्थांशी संबंधित असल्याने व पाहुण्यांना त्याचा यथास्थित लाभ झाल्याने (आमची आत्या ओरडली तरी), लोक मात्र दुवा देतच घरी जात असतील - मग तो फूड प्रोसेसर असो, कॉफी डिकॉक्शनचे मशीन असो, पॉट आईस्क्रीम कि ईडली मेकर! जगातल्या कुठल्याच मशीन्सना एवढी मानवी सदिच्छा व उपभोगमूल्य लाभली नसावी. पुण्यात कामासाठी आलेले व देशमुखवाडीत डोकावणारे प्रत्येकजण या गोष्टीचे साक्षीदार आहेत. मी व माझा चुलत भाऊ हर्षद कॉलेजची बहुतेक वर्षे तिकडे पडीक असल्याने असे अनेक रसास्वाद चाखलेले आहेत बंडू काकांच्या हातचे! त्यांच्या हातचे अंड्याचे आम्लेट खाऊन जमाना झाला, पण तसली आम्लेटे पुन्हा कधी हॉटेलात वा घरीही खाल्ली नाहीत. त्यातून त्यावर बारीक कलाकुसरीने चिरलेला (जीव) ओवाळून टाकावा असा कांदा व कोथिंबीर. माझा एक भाचा त्यांना लहानपणी आम्लेट आजोबा म्हणत असे ते उगाच नव्हे (आता तो - रोहन त्याच्या आईप्रमाणे त्यांचाही नकळत गंडाबंद शागीर्द झाला आहे)!  बरं याबाबतीत बंडू काकांचा एकच-एक कुणी गुरु नसून ते स्वयंभू होते असेच म्हणावे लागेल. नुकताच आलेला रंगीत टीव्ही व झीवरील संजीव कपूर हे कदाचित प्रेरणा देणारे ठरले असतील.

कधीही, कुठेही व कितीही वेळ लागणारी झोप हि अजून एक त्यांना मिळालेली दैवी देणगी होती. अर्धे चिंतातूर जग निद्रानाशाच्या शापाने भयग्रस्त असताना हा माणूस कसे काय ते सुख मिळवीत असेल? याचे कारण बहुतेक लोक आपले प्रॉब्लेम्स हे झोपेच्या वेळेत चिंतन करण्यासाठी लांबणीवर टाकतात व त्यामुळे झोप लागता लागत नाही - बंडू काका मात्र प्रॉब्लेम्स जिथल्या तिथे स्वतःपुरते तरी सोडवीत असल्याने - झोपेच्या फर्स्ट क्लास कम्पार्टमेन्टमध्ये शिरायला त्यांना चिंतेचा टीसी आडवा येत नसावा. हि किमया फार कमी लोकांना साधते.

पुण्यात शिकायला येणाऱ्यांचे लोकल गार्डियन होणे हि एक अजून जबाबदारी आमच्यामुळे त्यांच्यावर पडली!  त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोतच. त्यांची इतर भाचरे, सुना व जावई हे सुद्धा बंडू काका या व्यक्तिमत्वाची व त्यांच्या घराची कायम ओढ लागलेलीच होती व आहेत. इतरत्र कधीही न ऐकलेले कोकजे हे आडनाव प्रसिद्धी पावण्यात बंडू काकांचे श्रेय मोठे आहे!

आळस झटकून काम करणे (विशेषतः दीर्घ निद्रेनंतर) हेही एक कौशल्य आहे. त्यांनी ते पुरेपूर वापरले व विविध गोष्टी केल्या. भरपूर हौस म्हणून कार घेतली, शिकली व शिकविलीहि! नात रियासाठी बऱ्याच गोष्टी निगुतीने केल्या - उदाहरणार्थ स्कुटीला पुढे छोटी सीट बसवून घेणे अश्या अनेक सांगता येतील. त्यांना बिझी राहण्याची कला अवगत होती, कष्ट करणाऱ्या माणसांना कामे दिसतात - इतरांना दिसत नाहीत. त्यामुळे मनाला उगाच सैतानाच्या हातात नं देता ते व्यस्त ठेऊ शकत. बायको वा सुनेशी तुफान वादावादी करण्याची त्यांची हातोटी होती, पण त्यांची ती भांडणे "विरक्त" असावीत. म्हणजे ती झाल्यावर - तो रुटीनचा भाग समजून ते आपल्या कामांकडे पुन्हा वळू शकत. व त्याच विषयावर दुसऱ्या दिवशी त्याच "विरक्त त्वेषाने" न कंटाळता भांडूही शकत. आता हि गोष्ट वाद लांबून पाहणाऱ्या मलाचं (म्हणजे चक्क कोकजे बिल्डिंगच्या बाहेर खिडकीपाशी उभे राहून बरका!) दिसू शकते. या वादस्पर्धेनंतर विंगेतून आपण घरात प्रवेश केल्यावर स्त्रीचा जो चेहरा भाव व्यक्त करतो व पुरुषाचा जो चेहरा दिसतो याचे वर्णन हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे! असो. सांगायचा मुद्दा बंडू काका निवांत रिमोट सुरु करून चॅनेलांची आलटा-पालट करीत असताना "काय आज गद्रे काकांच्या मेसला सुट्टी काय ?" हे विचारण्यापर्यंत त्यांचा प्रवास सहज झालेला असे.     

प्रत्येक माणसाचा - त्याच्या आजूबाजूला असण्याचा आपल्यावर काहीना काही परिणाम होतोच. बंडू काका हे आमच्या अजाणतेपण ते जाणतेपण या काळाचे सोबती होते. त्यांनी केलेल्या व जगलेल्या विविध गोष्टींचा कळत नकळत प्रभाव पडतोच व तो दिसतोही. काही वेळेला -"आज मी बंडू काकांसारखा भीमसेन ऐकत झोपणार आहे" असे मी घरी सांगतो.  काही वेळा - बंडू काका असते तर त्यांनी आत्ता असे केले असते हेही उद्गार निघतात! बऱ्याचदा "बंडू काका वॊज राईट" असा वर म्हंटल्याप्रमाणे साक्षात्कारही होतो.
शेवटी  - पृथ्वीतलावर लाभलेल्या भाग्याप्रमाणे आताच्या त्यांच्या चिरनिद्रेतही कोणतेही प्रॉब्लेम्स त्यांना सतावू नयेत व तीही तेवढीच शांतीपूर्ण व्हावी हीच देवाचरणी इच्छा! 
  
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
अनुभवांती परमेश्वर !
अनुभव या शब्दाचा एक अर्थ चमत्कार असाही होतो म्हणे. हा अर्थ रमेश काकांच्या डिक्शनरीतून बाहेर आलेला आहे. "काय एकेक अनुभव" म्हणजे अध्यात्मिक मार्गावरील चमत्कार असे त्यांना ओळखणाऱ्या सर्वांनाच माहित आहे. उज्ज्वल भारतीय कौटुंबिक परंपरेतून आलेली अध्यात्मिकतेची कास धरून ती पुढे घेऊन जायची आहे या निष्ठेने ते जगले व त्यासंबंधी जे जे सोपस्कार करावे लागतात ते ते त्यांनी मावशीसह आयुष्यभर केले. 

ते भक्ती भाव वगैरे ठीकच, पण आमचा विरोध चमत्कारांस. अध्यात्मिक पातळी उच्च करण्यासाठी निघालेल्या माणसांना आकृष्ट करण्यासाठी चमत्काराची काय गरज? उलट त्याने अध्यात्माची उंची कमीच होणार नाही का?  शिवाय विज्ञान जेथे हात टेकते तेथून अध्यात्म (विज्ञानास अगम्य असलेले ते शोधण्यासाठी) सुरु होते - पण त्या विज्ञानाला आधी हात टेकू तर द्या! मग तेथून अध्यात्म सुरु करा. त्यामुळे प्रत्येक अनुभव अर्थात चमत्कारांना शास्त्रकाट्याची कसोटी का लावू नये हा आमचा प्रश्न. अर्थात हा वैज्ञानिक वगैरे दृष्टिकोन हि फक्त सायन्स साईडला गेलेल्यांची फुकाची बडबड ठरते. आपण एका गूढातिगूढ व अचंबित करणाऱ्या, विलक्षण प्रत्ययकारी संस्कृतीचा भाग असल्याने काकांच्या बाबतीत मी शेवटी हार मानली. 

...कारण काकांनी आम्हालाच तो निरुत्तर करणारा अनुभव दिला - मरणात जग जगते तसा मी तो जगलो. संपूर्णपणे वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येणारा मृत्यू हातात असताना - असह्य झालेली डोकेदुखी, त्यात निर्माण झालेली गुंतागुंत, हॉस्पिटल, ऑपरेशन इत्यादी सर्व होऊनहि तिथला मृत्यू त्यांनी टाळला. घरी येऊन काही दिवसांनंतर दुपारी निव्वळ थोड्या सेकंदांच्या अस्वस्थतेनंतर पलंगावर निपचितपणे आलेला शांत संयमित मृत्यू हा त्यांच्याच शब्दातील "एकेक अनुभवा" पेक्षा कमी नव्हता. म्हणजे तो विलक्षण अनुभव ते स्वतःच घेऊन व इतरांना देऊनही गेले.

काका धनू राशीचे. आता या राशीची माणसे निम्मे आयुष्य माणूस म्हणून व निम्मे घोडा बनून काढतात असे ऐकतो आपण (राशीचक्रकार शरद उपाध्यांच्या कृपेने!).  मी पण धनूचा असल्याने हा प्रत्यय घेतोच. माणूस तंद्रीत गेला कि त्याचा घोडा झालाच समजा. आमची मावशी काकांचा घोडा कधी झाला हे अचूक ओळखीत असे व त्याप्रमाणे पुढील बोलाचाली करण्याचे कौशल्य तिला अवगत झाले होते. आता माणूस माणसाला समजून घेईल असे नाही, पण घोडा घोड्याला समजून घेऊ शकतो. व त्यामुळे मला हे समजणे सोपे जात असावे बहुधा. कधी कधी मला असे वाटते कि त्यांचे "एकेक अनुभव" हे या अवस्थेतील असावेत. अंतर्गत अध्यात्मिक अवस्थेला पोहोचणे हि दैवी देणगी कदाचित धनू राशीला घोड्याच्या रूपाने मिळाली असावी. म्हणजे याबाबतीत रमेश काका नशिबवानच म्हणायचे.

आता या अनुभवांचीच री ओढायची तर योगायोगाने ते बदलून गेले ते राजापुरास - पवित्र गंगा अवतरणाऱ्या राजापुरास! हा गंगानुभव इतर नातेवाइकांस व मित्रमंडळींस देण्यात त्यांनी नेहेमीच उत्साह दाखविला. प्रेमळ व स्पष्टवक्ती  कोंकणी माणसे जोडली आणि त्यांच्याबरोबरीने आंब्याशीही असलेला दोस्ताना वाढविला . सांगली / पुण्याकडच्या लोकांना देवगड हापूस खिलवला. त्यासाठीचे अपार कष्ट झेलले, घरच्यांचे शिव्याशाप व प्रचंड मदतही त्यांनी (अक्षरशः) झेलली!! कारण आंब्याएवढे मोहक पण वैताग देणारे फळ दुसरे नसावे. सुंदर, नखरेल, उच्छृंखल प्रेयसीच्या आणाभाका प्रियकर काय घेईल एवढ्या त्या आंब्याच्या घ्याव्या लागतात, त्यातून वेळेला दगा देणार नाही याची खात्री नाही. आंबे विकणारे म्हणून लोकं तुम्हाला श्रीमंत बागाईतदार समजतात ते वेगळेच. तर हा सगळा खटाटोप त्यांनी अंगावर घ्यायचे धाडस केले हेच कौतुकास्पद. या वळण वाटांवर त्यांनी म्हणजे सर्वच कुटुंबाने अनेक नवीन माणसे जोडली व त्यांना जीव लावला.

दुसरी एक गोष्ट ज्यामुळे रमेश काकांनी सर्वांना तोंडात बोटे घालायला लावली ते म्हणजे घरात बनविलेली बाग - भाज्या व फुलझाडे. एखादा सुप्त कलागुण एकदम वरती यावा आणि झळकून निघावा तसे. त्यांच्या बाबतीत हेही घडले ते निवृत्तीनंतर! आणि त्यांनी ते एवढ्या उंचीवर नेऊन ठेवले कि हे ह्यांनी खूप आधी केले असते तर कितीतरी अजून करता आले असते की! अशीही हळहळ वाटत राहिली. माणूस हा त्याने घेतलेल्या निर्णयांमुळे "घडलेला प्राणी" आहे (man is made up of decisions) आणि त्यातूनच आपण खूप शक्याशक्यता निर्माण करीत असतो. आता एखाद्याचा आवाज खूप सुंदर असेल पण त्याने ५० व्या वर्षापर्यंत गाउनच बघितले नाही तर? पण जर तरला काही अर्थ नाही, विशेषतः स्टेट बँकेतील नोकरी असेल तर नाहीच नाही. इथे माणूस त्या शक्यतांना मुकतो व आपल्या संभाव्य गुणांना न्याय देऊ शकत नाही. त्यातल्या त्यात व्ही आर एस मुळे या गोष्टी लवकर शक्य झाल्या असे रमेश काकांच्या बाबतीत म्हणता येईल. त्यांच्या पिढीमध्ये कुठल्यातरी शाळेत "कोंबणे" व नंतर कुठल्यातरी ऑफिसात "चिकटणे" या दोनच क्रियापदात करियरची इतिकर्तव्यता दडली असल्यामुळे - अशा कित्त्येक हिऱ्यांना आपण मुकले असू. 

हल्लीच्या काळात मुले पालकांना वळण लावतात अशी परिस्थिती आली आहे, पण हे रमेश काकांनाही सहन करावे लागे. ते मला काही अनुभव सांगत असताना सुमेधा ताई त्यांना "ओ बाबा! त्याला बोअर करू नका हो!" असे दटावत असे, पण आजकालच्या मुलांप्रमाणे मिश्कीलपणे ते ऐकल्या न ऐकल्यासारखे करून काका आपले सांगणे सात्विक भावाने पुढे सुरु ठेवत. आपला क्रूर समाज संतांवर अघोरी टीका करतोच, पण त्याची पर्वा न करता त्यांना अज्ञानी जनतेच्या प्रबोधनाचे कार्य सुरु ठेवावेच लागते. आता यामुळे माझी मात्र पंचाईत होत असे, कारण आत्तापर्यंत माझा घोडा झालेला असे तो ताईच्या वाक्याने भंग होऊन पुन्हा माणसात येई. व इथून पुढचे बोलणे मला लक्षपूर्वक ऐकावे लागे. पण पुन्हा वर सांगितल्याप्रमाणे घोडा घोड्याला समजून घेई - व काका पुढचे थोडक्यात आवरून "काय पीपीएफ मध्ये किती गुंतवणूक करतोस ?" असा बाउन्सर टाकीत. हा गुंतवणूक सल्ला फार मोलाचा व ऐकण्यासारखा असे. 
काकांना मी कधी कुणावर रागावल्याचे बघितले नाही - ते नेहेमीच विरागी शांतपणे प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टीला समजून घेत असावेत. एवढे दुखणे असतानाही  टिकवून ठेवलेली हि त्यांची अढळ विरागी वृत्ती आपण थोडी तरी घ्यायला हवी. काही संकटांचे शांतपणे निराकरण करण्यासाठी ती उपयोगीच आहे. त्यांचा हा स्वभाव बऱ्याच लोकांना भाळून टाकीत असे, खुद्द माझ्या सासऱ्यांनी मला तसे सांगितले! म्हणजे असे कितीतरी लोक असतील व आहेतच.

आता त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असे म्हणणे फोल आहे, कारण इहलोकीही ती लाभत होतीच की व त्यांच्या हेवा वाटावा अश्या मृत्यूमध्येच ती होती ...  मग तिथे वरती का नाही मिळणार! फक्त आता स्वर्गात त्यांनी देवांनाही आपल्या पृथ्वीतलावरील अनुभवांचा लाभ करून द्यावा व समृद्ध करावे हीच इच्छा!    

--------------------------------------------------------------------------------------------------------------------
इथे सर्व भावनिक उमाळा बाजूला ठेवून "होश-ओ-हवासमें" असे म्हणावेसे वाटते - कि बंडू काका वा रमेश काका हे जात नसतात. आपल्याच नकळत घडणाऱ्या कृतींमधून ते अमूर्तपणे इथेच अस्तित्वात आहेत याची ग्वाही देत असतात. मग विज्ञान कि काय ते हात टेकते असे म्हणावे लागते व आपापले वैयक्तिक अध्यात्म सुरु होते!

Friday, 18 November 2016

[लंडन ब्रीजवरून] - देअर इज नो प्लॅन "बी"

बीबीसीच्या निक रॉबिन्सन नावाच्या राजकीय संपादकाने 2015 च्या सार्वजनिक निवडणुकीपूर्वी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरूनना प्रश्न केला. आपण हे जे काही युरोपिअन युनियनवर सार्वमत घ्यायचे वचन देत आहात ते विरोधात गेले तर? डेव्हिडनी उत्तर देण्यात टाळाटाळ केली, अशी शक्यताच फेटाळून लावली. निकने नेटाने विचारले - नाही तरीपण प्लॅन-बी काय आहे? डेव्हिड कानकोंडले झाले..... देअर वॉज नो प्लॅन-बी!!!

डेव्हिड कॅमेरून हे जरी हुशार, डिप्लोमॅटिक आणि जाणते नेते असले तरी ते आपल्याच टोरी पक्षातील मागील बाकांवरील खासदारांना खूष ठेवण्यात कमी पडले. युरोपचा वर्षानुवर्षे भिजत पडलेला प्रश्न अजूनच चिघळत होता. युके ७० च्या दशकात युरोपिअन युनिअन मध्ये सामील झाल्यापासून युनिअन विरोधी विचार अस्तित्वात होते.  सुमारे 10/12 वर्षांपूर्वी पोलंड आणि रुमेनिया युनियन मध्ये सामील झाल्या नंतर लोकांचे लोंढे युकेमध्ये आले. याचा व्हायचा तो परीणाम येथील आरोग्य व इतर व्यवस्थांवर झाला. लोक बेनेफिट्स घेऊन आपल्या पोलंडमधील फॅमिलीस पैसे पाठवू लागले. युरोपिअन युनियन ब्रिटिश लोकांच्या मनातून आणखीनच उतरली. याचा सर्वाधिक परीणाम मध्य इंग्लंडमधील जनतेवर झाला. युनायटेड किंगडम इंडिपेंडन्स पार्टी (युकीप) ला पाठिंबा वाढू लागला, त्यांचे लोक युरोपिअन पार्लमेंटमध्ये निवडून येवू लागले. ही पार्टी मुळात युनियनला विरोध करण्यासाठीच स्थापन झाली होती.  युनिअन मधून बाहेर पडावे हि मागणी युकिप व काँझर्व्हेटिव्ह पार्टीमध्येही जोर धरू लागली. कॅमेरूनना रेफरॅण्डम/सार्वमत घेण्याशिवाय पर्याय नव्हता. स्वतःच्या हाताने त्यानी आपली कबर खोदायची ठरविली व दिवस ठरला 23 जून 2016!!

बोरीस व डेव्हिड - तू तू -मैं मै  
विरोधी लेबर/मजूर पार्टी हि युरोपियन युनियनच्या बाजूने होती. मुख्य विरोध हा हुजूर पक्षात होता. हि संधी चालून आल्यावर बहुतांश युरोसेप्टिक म्हणजे युरोप ची ऍलर्जी असणारे लोक फुटले. इअन डँकन स्मिथ नावाचे जुने मंत्री व पार्टी अध्यक्ष, त्यांच्याबरोबर प्रीती पटेल नावाच्या मंत्री हे दोघे बाहेर पडले. डेव्हिड कॅमेरून यांचे एक जुने (नंबर १० मधील) सल्लागार स्टीव्ह हिल्टन ब्रेक्झिट कॅम्पमध्ये गेले होते, तेव्हापासून डेव्हिडचे आणि त्यांचे बोलणे बंद झाले. कॅमेरुनचे एक जवळचे सहकारी, मित्र, शिक्षणमंत्री  मायकेल गॉव्ह यांचे वेगळे होणे हा सर्वात मोठा धक्का होता. याशिवाय इतर काही बॅकबेंचर्सच्या मोहिमा सुरूच होत्या. लंडनचे त्यावेळचे महापौर डेव्हिड जॉन्सन हे एक हरहुन्नरी, सदाबहार आणि बोलघेवडे व्यक्तिमत्व. आपल्या ऑफिसमध्ये सायकलवर येणारे बोरिस त्यांनी सुरु केलेल्या "बोरिस बाईक" उपक्रमामुळे व लंडनमधील ट्रॅफिक कंजेशन चार्जमुळे खूप लोकप्रिय होते. 2015 ची निवडणूक टोरी पक्षास जिंकून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. अर्थमंत्री जॉर्ज ऑसबोर्न व गृहमंत्री टेरेसा मे नंतर पुढील पंतप्रधान पदावर त्यांचाच दावा असणार होता. त्यांचा निर्णय - म्हणजे ब्रेक्झिटची बाजू कि रिमेनची बाजू घ्यायची - अजून व्हायचा होता. मायकेल गोव्हनी त्यांना खेचण्याचा परोपरी प्रयत्न केला. शेवटी काही दिवस सर्व राजकीय समीकरणांचा विचार करून बोरिस ब्रेक्झिट कॅम्पमध्ये दाखल झाले!!! तेही आपले ईटन शाळा  व ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील परममित्र डेव्हिड कॅमेरुनना केवळ एक मेसेज करून. राजकीय ठिणगी उडाली. इथून पुढे जोरदार वाकयुद्ध होणार होते. दोन्ही बाजूंकडे तुल्यबळ भाषापटू होते. युकीप पार्टीचे नायजेल फराज तर पुढे होतेच. पण बोरिस आल्याने त्या कॅम्पला एक नवीन परिमाण मिळाले. बस्स, आता पुढचे तीन महिने नुसता धुमाकूळ होणार होता. रिमेन कॅम्पवाल्यांनी आपली अर्थव्यवस्था कशी प्रबळ आहे व ती युरोपावर अवलंबून आहे याचे दाखले दिले. ब्रेक्झिटवाल्यानी बेबंद इमिग्रेशन व नॅशनल हेल्थ सर्व्हिसवर होणारा अमाप खर्च, युरोपियन युनियनला दर आठवड्याला जाणारे 300 मिलियन पौंड इत्यादी मुद्दे लावून धरले. रेफ्रेण्डमचा उत्साह शिगेला पोहोचला. दोन्ही बाजूंकडून तुल्यबळ लढतीं झाल्या, वादविवाद झाले. डेव्हिड कॅमेरूननी तर बराक ओबामांना बोलावून त्यांच्याद्वारे लोकांना एक हळुवार धमकी देऊन पाहिली!  बोरिस जॉन्सनना खरेतर ब्रेक्झिट नको होते. पण आपण थोड्याफार  फरकाने हरलॊ तरी आपल्याला राजकीय गुण मिळतील व पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पुढचा नंबर मिळेल या गणितावर त्यांनी तो एक जुगार खेळला होता अशा बातम्या नंतर आल्या. सध्याच्या पंतप्रधान टेरेसा मे या न्यूट्रल होत्या,  त्यामुळे डेव्हिड कॅमेरून त्यांना चिडून बोलले व मग त्यांनी रिमेन कॅम्पेनला पाठिंबा जाहीर केला असेही नंतर कळले. तीन माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, जॉन मेजर आणि गॉर्डन ब्राऊन यांनी एकत्र येऊन एका मंचावर रिमेनसाठी भाषणे दिली. या लढाईत शत्रू मित्र झाले आणि मित्र शत्रू! 

...  आणि तो दिवस उजाडला. २३ जूनला दिवसभर मतदानासाठी लोकांची रीघ लागली. रात्रीच मतमोजणी सुरु झाली. जिब्राल्टर या ब्रिटन च्या ताब्यातील स्पेनजवळील बेटावरून  पहिला निकाल आला तो रिमेनच्या बाजूने - अगदी भरघोस मतांनी. यापुढील काही निकालही तसेच होते. त्यामुळे  रिमेन कॅम्पेन अगदी आरामात जिंकेल आणि ब्रेक्झिट होणार नाही असेच वाटू लागले.  उत्तररात्रीनंतर चित्र बदलले. बहुतेक निकाल हे विरोधात जाऊ लागले. युकीपच्या नायजेल फराज यांनी आधीच हार  घोषित केली होती!  पण त्यांनी आपला पवित्रा बदलला. पहाट होऊ लागली तशी ब्रेक्झिट कॅम्पमध्ये जल्लोषाची तयारी होऊ लागली. रिमेनवाल्यांचा विरस होऊ लागला. शेवटी एकदा पहाटे ६ वाजता ब्रिटन युरोपातून बाहेर पडणार यावर शिक्कामोर्तब झाले आणि विविध वाहिन्यांवर त्याच्या विश्लेषणाची सुरुवात झाली. ५२ टक्के आणि ४८ टक्के असा दोन्ही गटांतील मतांत फरक होता.

नायजेल फराज - विजयोन्माद 
१० डाउनिंग स्ट्रीट मधील घरात पंतप्रधान कॅमेरून आपल्या सल्लागार मंडळ व इतर निकटवर्तीयांबरोबर निकालावर नजर ठेऊन  होते. रात्री सर्वांनाच असे वाटले होते कि आपली रिमेनची बाजू आरामात जिंकेल. डेव्हिड कॅमेरुननी युरोपात जाऊन वाटाघाटी करून ब्रिटन साठी एक सौदा कबूल करवून आणला होता. पण तो पुरेसा नव्हता. लोकांनी त्याविरोधातच मतदान केले. पहाटे पहाटे सगळी चक्रे हलली. सकाळी ८ वाजता पंतप्रधान डाउनिंग स्ट्रीटवर आपले स्टेटमेंट देतील असे जाहीर झाले. एव्हाना त्यांनी सर्वांबरोबर चर्चा करून राजीनामा द्यायचा निर्णय नक्की केलाच होता. आता ब्रेक्झिटच्या वाटाघाटींचा भार मी आपल्यावर का घेऊ, हे अवघड काम त्यांनी करावे ज्यांना ब्रेक्झिट हवे आहे. असे ते खाजगीत म्हणाले. इकडे त्यांचे परममित्र मायकेल गॉव्ह रात्री 10 वाजता एखाद्या शाळकरी मुलाप्रमाणे घरी झोपून गेले. त्यांनीही जिंकण्याच्या फारश्या आशा ठेवल्या नव्हत्या. पहाटे साडेपाचला - डेली मेल वृत्तपत्रात पत्रकार असणाऱ्या त्यांच्या बायकोने त्यांना हलवून उठवले. मायकेलनी उठतांच चष्मा लावत तोंडात बोटे घातली. आता प्रतिक्रियांसाठी पत्रकार गर्दी करतील त्यामुळे लवकर तयार व्हावे लागेल. तिकडे बोरीस जॉन्सन आपल्या मित्रमंडळासोबत टी.व्ही.वर निकाल बघत होते. त्यांच्यादृष्टीने अनपेक्षित व नकोसा निकाल लागला होता. आत्तापर्यंत ते ब्रेक्झिटकॅम्पचे हिरो झाले होते व रिमेनर्ससाठी व्हिलन. युकीप पक्षाचे अध्यक्ष नायजेल फराज हे आता वेस्टमिनिस्टरजवळ विजयोत्सव साजरा करत होते, टीव्ही चॅनेल्सना मुलाखती देत होते. 23 जून हा ब्रिटनचा स्वातंत्र्यदिन आहे असे त्यांनी घोषित केले.  स्टीव्ह हिल्टन (कॅमेरुनचे जुने सल्लागार ) रात्रभर टीव्ही चॅनेल्सना इंटरव्ह्यूज देऊन पहाटे एका मित्राच्या घरी परतले होते.  हा मित्र म्हणजे - रोहन सिल्व्हा - अजून एक रिमेंनर व कॅमेरुनचा जुना सल्लागार.


राजीनामा देताना, अश्रुपूर्ण पत्नी 
ठीक 8 वाजता डेव्हिड कॅमेरून डाऊनिंगस्ट्रीट मधील आपल्या घरातून बाहेर आले. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी समंथाना पाहून स्टिव्हच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, डेव्हिड राजीनामा देणार हे त्यांच्या लक्षात आले. ते जरी ब्रेक्झिट कॅम्पचे होते तरी आपल्या मित्राचे पंतप्रधानपद जाईल हा विचार त्यांनी केला नव्हता. त्यांनी काय कुणीच नाही. पडत्या फळाची आज्ञा घेऊन डेव्हिडनी राजीनामा दिला व जाहीर केले कि 3 महिने ते हे पद सांभाळतील पण सप्टेंबर मध्ये होणाऱ्या काँझरव्हेटिव्ह पार्टीच्या कॉन्फरन्समध्ये नवीन पक्षाध्यक्ष निवडला जाईल. अवघ्या काही मिनिटांच्या आत सकाळी सुरु झालेला शेअर बाजार पडला. 101 रु प्रति गेलेला पौंड स्टर्लिंग एकदम 86 रुपयांवर आला, 15 टक्के खाली!! 30 वर्षातील निच्चान्क! याबरोबर जगातील इतर शेअर बाजारही पडले. काय घडलंय हे कुणालाच कळत नव्हतं. ब्रिटनची जगातील किंमतच एकदम कमी झाली आहे असा भास होत होता. युरोपियन युनियन, फ्रांस, जर्मनीमधून कुत्सित प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. लोक हतबल झाले, ज्यांनी ब्रेक्झिटसाठी थोड्या माहितीवर आधारित मतदान केले होते ते पश्चात्ताप करू लागले.  11 वाजता ब्रेक्झिट कॅम्पने पत्रकार परिषद आयोजित केली होती. बोरिस जॉन्सन यासाठी घरातून बाहेर पडत असताना लोकांनी विरोधात घोषणा दिल्या. मायकेल गॉव्ह, बोरिस यांनी पत्रकार परिषदेत भाषणे केली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी विजयोन्माद दिसू दिला नाही व दोन्ही बाजूंचा विचार करूनच ब्रेक्झिट पुढे सरकेल अशी वाच्यता केली. शेवटी 48% रिमेनर्सच्या भावनांना साद घालणे आवश्यक होते. इकडे लेबर पार्टीतही वाकयुद्ध सुरु होते. मूळात युनियनच्या बाजूने असणाऱ्या या मजूर पक्षाने  जास्ती प्रचार करणे आवश्यक होते. पण त्यांचे अध्यक्ष डाव्या विचारसरणीचे  कॉर्बिन यांनी उत्साह दाखविला नाही अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली. लंडनचे नवनियुक्त लेबर मेयर (पाकिस्तानी वंशाचे) सादिक खान यांनीही नंतर हल्ला चढविला व लंडनला काही प्रमाणात स्वायत्तता द्यायची मागणी केली (उदाहरणार्थ लंडनसाठी स्वतंत्र व्हिसा वगैरे). 

मायकेल व बोरीस - ब्रुटस व ज्युलिअस सीझर
पुढील काही दिवसात काँझरव्हेटिव्ह (टोरी) पार्टीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु झाली. अर्थमंत्री (चॅन्सेलर) जॉर्ज ऑसबोर्न हे रिमेनर होते, हे कारण सांगून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. गृहमंत्री टेरेसा मे या जरा न्यूट्रल होत्या, त्यांनी लगेच आपली उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर लोकांच्या नजरा बोरिस जॉन्सनवर खिळल्या होत्या. ते मात्र आपल्या टीमला एकत्र आणण्याचा ऐवजी ऑक्सफर्ड मध्ये क्रिकेट खेळत बसले आणि पार्ट्या अटेंड करीत राहिले. त्यांच्याकडे ठोस मंत्रिपदाचे वचन मागणाऱ्या वरिष्ठ नेत्या अँड्रिया लीडसम यांनी बोरीसकडून चालढकल होते आहे असे समजून स्वतंत्र उमेदवारी जाहीर केली. यामध्ये काहीतरी कम्युनिकेशन गॅप होती. अँड्रियाना पाठवलेले पत्र त्यांना वेळेत मिळालेच नाही. बोरीसची कॅम्पेन मॅनेज करणाऱ्या मायकेल गोव्हना उत्तम मंत्रिपद मिळणार हे नक्की होते. सारा व्हाईन या त्यांच्या पत्नीने त्यांना सल्ला दिला कि बोरीसकडून सगळे पदरात पाडून घ्या. 'Be at your stubborn best' असे नवऱ्याला लिहिलेली त्यांची ईमेल फुटली. याप्रकाराने थोडी चलबिचल झाली. टेरेसा व अँड्रियाशिवाय अजून दोन व्यक्तींनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. अर्ज भरण्याच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी बोरिस जॉन्सन आपला अर्ज भरणार होते. आदल्या रात्री त्यांचे एक कॅम्पेन सहकारी यांना मायकेल गोवकडून फोन आला व ते कॅम्पेन ऑफिसमधून तडक त्यांच्या घरी गेले. रात्रीत चक्रे हलली आणि सकाळी 9 वाजता गोव्हनी बोरीसचे प्रसिद्ध कॅम्पेन मॅनेजर सर लिंटन  क्रॉस्बी यांना फोन  करून सांगितले "हाय लिंटन, इट्स मायकेल गॉव्ह हिअर...आय एम रनिंग!"... "रनिंग व्हॉट?"
टेरेसा मे व जॉर्ज ओसबॉर्न - पंतप्रधानपदाचे
 दोन दावेदार 
..."... लीडरशिप इलेक्शन मायसेल्फ!"... आणि आपलाच स्वतःचा अर्ज भरला! हा प्रचंड मोठा विश्वासघात होता बोरिस जॉन्सनबरोबर. त्यांना या धक्क्यातून सावरणे कठीण होते. लिंटननी त्यांना बातमी दिली आणि माघार घेण्याचा सल्ला दिला. 12 वाजता मुदत संपण्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली व आपण अध्यपदासाठी इच्छुक नसल्याचे जाहीर केले आणि आपला पाठिंबा अँड्रिया लिडसमना असल्याचे सांगितले. बीबीसीने दुपारी मायकेल गॉव्हची मुलाखत घेतली व या धक्कयाचे कारण विचारले. तेव्हा ते म्हणाले गेल्या 2 आठवड्यातील बोरीसची वर्तणूक गंभीर नव्हती, हि तयारी त्यांनी अगदीच कॅज्युअली घेतली होती. ते पंतप्रधानपद सांभाळू शकतील याचा मला विश्वास राहिला नाही. पण हि गोष्ट त्यांना आधीच समजायाला हवी होती. "तूच का तो बृटस" वगैरे मथळे टाकून प्रसारमाध्यमांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडविली. या प्रकाराने बोरीसना मात्र खूप सहानुभूती मिळाली. अत्यंत पोरकट विश्वासघात करून मायकेलनी आपले जिंकण्याचे चॅन्सेसहि घालवले. यानंतर बोरिस जॉन्सन वॉज "ब्रेक्झिक्युटेड!" असा नवीन वाक्प्रचार पडला. कॅमेरुननी बोरीसना मेसेज केला "यु शुड हॅव्ह स्टक विथ मी मेट !! ".

 मायकेल व इतर दोघे प्राथमिक एलिमीनेशन राउंड मधूनच गळाले.  राहिल्या त्या दोन स्त्रिया अँड्रिया लीडसम आणि टेरेसा मे. बरेच वर्षांनी ब्रिटनला एक स्त्री पंतप्रधान मिळणार होती. टेरेसा यांचा अनुभव व मिळणारा पाठिंबा जास्त असल्याने त्याच जिंकण्याची शक्यता होती. अँड्रिया या माजी इन्व्हेस्टमेंट बँकर असून त्यांना लंडनच्या फायनॅन्शियल मार्केट्सचा चांगला अनुभव होता.  दोन मुले व पतीबरोबर त्या राहतात. टेरेसांना मात्र मूलबाळ नसून त्या प्रथमपासूनच राजकारणात सहभागी आहेत. एके रविवारी टाइम्स मधील इंटरव्हयूमध्ये अँड्रियांनी असे विधान केले कि "मला मुले असल्याने या देशाच्या भवितव्यात माझा खराखुरा सहभाग आहे"... हे विधान टेरेसांच्या विरोधात केल्याची शक्यता होती. त्यामुळे खूपच गदारोळ झाला आणि त्यांनीही निवडणुकीतून माघार घेतली!टेरेसांचा मार्ग मोकळा झाला.

दुसऱ्या दिवशी लगेचच डेव्हिड कॅमेरुननी राजीनामा देऊन १० डाउनिंग स्ट्रीट सोडण्याचा निर्णय जाहीर केला. व एक-दोन दिवसात टेरेसांनी पदाची शपथ घेतली सुद्धा. कॅमेरुनच्या एका स्वप्नकहाणीचा असा झटक्यात शेवट झाला. ११ वर्षे पक्षाध्यक्षपद आणि ६ वर्षे पंतप्रधानपद भूषवून एक दिवशी अचानक ते पायउतार झाले. १० डाउनिंग स्ट्रीट सोडून ते वेस्ट लंडनमधील एका मित्राच्या घरी राहावयास आले कारण त्यांचे स्वतःचे घर भाड्याने दिले होते! पदावर आल्या आल्या टेरेसांनी आपली काटछाट सुरु केली. कॅमेरुनच्या मर्जीतील काही मंत्र्यांना नारळ दिला. जॉर्ज ओसबॉर्न हे पंतप्रधान पदाचे एक दावेदार, अर्थमंत्री - त्यांना काढून टाकले. लंडनमधील नॉटिंग हिल भागात राहणाऱ्या या एलिट क्लासचा पत्ता कापला गेला. बोरिस जॉन्सनना मात्र टेरेसांनी बोलावून परराष्ट्र मंत्री केले आणि इतर दोन ब्रेक्झिट वाल्यांना मंत्रीपदे दिली. डेव्हिड डेव्हिस, लायम फॉक्स व बोरीसना "थ्री ब्रेकझिटिअर्स " असे नाव पडले. आपल्याच हाताने पायावर धोंडा मारून घेतलेले मायकेल गॉव्ह - नंतर एका पुस्तकाच्या दुकानात नवीन वाचनीय साहित्य शोधताना सापडले.

केवळ तीन आठवड्यात या गोष्टी इतक्या भराभर घडल्या होत्या. काही स्वप्नाचा चक्काचूर झाला आणि काही नवीन स्वप्ने निर्माण झाली. ब्रिटनमध्ये वैचारिक फूट पडली. स्कॉटलंडच्या मंत्री निकोला स्टर्जन पुन्हा वेगळे व्हायची भाषा करू लागल्या कारण तिथला निकाल रिमेनच्या बाजूने लागला होता. नॉर्दन आयर्लंडचा निकालही फारसा वेगळा नव्हता. आयर्लंड राष्ट्र युरोपियन युनिअन मध्ये असल्याने तेथील इमिग्रेशनला भाव आला. एकंदरीत या रेफेरेंडममुळे ब्रिटन अस्थिरतेच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला. डेव्हिड कॅमेरूनची "लेगसि " बाकी सर्व गोष्टी पुसून या एका गोष्टीने लिहिली गेली. आपण बॅकबेंचर खासदार राहू असे त्यांनी जाहीर केले होते. काही दिवसांनी मात्र टेरेसा आपल्या पॉलिसीज व आपले लोकहि बदलत आहेत हे पाहून त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. आता ते आपल्या स्मृतींवर  पुस्तक लिहिण्याच्या कामी मग्न झाले आहेत. 

ब्रेक्झिट होईल हा अंदाजच न आल्याने - त्यासाठी कोणताही सरकारी प्लॅन नसणे  - हि त्यांची मोट्ठी चूक होती. तीच त्यांना भोवली - नो प्लॅन "बी "....

.... पण आता अमेरिकेतही ब्रेक्झिटचे वारे लागून ट्रम्प निवडून आल्याने ब्रिटनमध्ये थोडा उत्साह आला आहे...अमेरिकेकडून नवीन व्यापारी करार होण्याचा!


Sunday, 7 December 2014

तुम्ही म्हणालात म्हणून….

तुम्ही म्हणालात आम्हाला काही कळत नाही….आम्ही होय म्हंटले.
तुम्ही म्हणालात पुरुषसुक्त, अथर्वशीर्ष, रामरक्षा म्हण. अर्थ विचारू नकोस. आम्ही विचारला नाही - कारण तुम्हालाच तो माहित नव्हता.
तुम्ही म्हणालात  देवाला नमस्कार कर, आम्ही केला. देव सगळीकडे आहे हे एका तोंडाने सांगून पन्नास मंदिरात तुम्हीच घेऊन गेलात.
तुम्ही म्हणालात संस्कृत घे १०० मार्कांचे… सगळे घेतात… अरे आपली परंपरा आहे… आम्ही घेतले.
तुम्ही म्हणालात परीक्षेत चांगले मार्क पाड, आम्ही पाडले. सायन्स घे - घेतले.
तुम्ही म्हणालात प्रेमात बिमात पडलास कि नाही… आम्ही प्रेमात पडलो.
तुम्ही म्हणालात हे प्रेम नव्हे, तुमचे प्रेम ते खरे प्रेम - आमचे केवळ इंफ्याच्युएशन… आम्ही गप्प बसलो.
तुम्ही म्हणालात आय. टीत. जा, आम्ही आय. टीत. गेलो.
तुम्ही म्हणालात अमेरिकेला जा, इंग्लंडला जा. सगळेच जातात म्हणून आम्ही गेलो.
तुम्ही म्हणालात पैसा छाप, कार घे, घर घे…. आम्ही घेतले.
तुम्ही म्हणालात प्रेम बीम जमत नाही तर लग्न कर. पोरी बघ - नव्हे स्थळे बघ… आम्ही बघितली. लग्न केले.
तुम्ही म्हणालात तुला काही कळत नाही… आम्ही होय म्हंटले.
तुम्ही म्हणालात पोरे - कधी पैदा करणार… आम्ही केली तीही केली.
तुम्ही म्हणालात जरा बरे कपडे घाल, स्मार्ट दिसा आता. आम्ही स्मार्ट दिसलो.
तुम्ही म्हणालात ऑफिस मध्ये - हे करा आणि ते करू नका, हे बोला आणि ते बोलू नका… आम्ही बोललो / न-बोललो.
तुम्ही म्हणालात अरे काय इंग्लिशरे तुमचे? सुधारा जरा… साहेब कसा बोलतो बघा… आम्ही सायबाकडे बघत बसलो.
तुम्ही म्हणालात हा टीव्ही घे, तो फोन घे, सूट घे, बूट घे. आम्ही न घेऊन कोणाला सांगतो.
तुम्ही म्हणालात नीट संसार करा, आपला आपण करा. आम्ही होय म्हंटले.
तुम्ही म्हणालात आपले आपण निर्णय घ्यावेत… कुणाचे ऐकून नव्हे. काय समजला का? आम्ही होय म्हंटले.

तुम्ही म्हणालात तुला काही कळत नाही… आम्ही होय म्हंटले.
तुम्ही म्हणालात अरे शेवटी मोरू झालाच कि रे तुझा …. आम्ही नाही म्हणून सांगतो कुणाला??

Monday, 1 December 2014

राजा (नावाचा) माणूस

राजा मोठा नशीबवान - अगदी नावाप्रमाणेच! त्याला लंडनमधील सेंट जॉर्जेस नावाच्या प्रसिद्ध न्युरॉलोजिकल हॉस्पिटल मध्ये मृत्यू आला. जगातील उत्तम डॉक्टर्सच्या देखरेखीत. त्याच्यावर जिथे अन्त्यसंस्कार केले गेले त्या लंडनमधील सर्वात पहिल्या गोल्डर्स ग्रीन नावाच्या क्रीमेटोरीअममध्ये कुचबिहारचे महाराजा, सर रुड्यार्ड किप्लिंग, एमी वाईनहाउस यांसह अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे अन्त्यसंस्कार झाले होते. अवघे ३२ वर्षांचे आयुष्य जगलेला राजा गणेश मणीवसगम नावाचा चेन्नईचा एक साधा कष्टाळू इसम ३-४ आठवड्यांच्या टीबीच्या आजारानंतर सप्टेंबर २०१४ मध्ये हे जग सोडून गेला. मागे बायको आणि दीड वर्षांची मुलगी सोडून.

या जाण्याला काही जस्टीफ़िकेशन नाही! दोन वर्षापूर्वी तो इंग्लंड मध्ये पोहोचला, नंतर लग्न करून आला. थोड्या दिवसाने तान्ह्या मुलीला घेऊन आला. ७-८ महिन्यांच्या सुखी संसारानंतर डोके दुखायचे निमित्त होऊन राजा आजारी पडला. तसा तो हडकुळाच, दिसायला अशक्त. जुजबी औषधे देऊन त्याला परत पाठविले गेले. पण डोकेदुखी थांबेना, मग ताप. शेवटी एक शेजारी त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला. तिथे त्याचा आजार वाढत गेला. आधी टीबी मग ब्रेन ट्युमर इत्यादी अनेक निदाने झाली. एक दिवस तो वेड्यासारखा वागायला लागला. हातापायाच्या नळ्या काढून टाकल्या त्याने, चप्पल चावू लागला. मग मात्र त्याला मेंदूच्या उपचारासाठी सेंट जॉर्जेस ला नेण्यात आले.

तेथे २० दिवस त्याच्यावर उपचार चालू होते. प्रेमळ नर्सेस होत्या, तज्ञ डॉक्टर्स लक्ष ठेऊन होते. पण त्याची प्रकृती खालावत गेली. त्याच्या मेंदूतील आणि पाठीतील इन्फेक्शन वाढत होते. आज हात, उद्या पाय हलवणे बंद झाले, मग श्वासाचा त्रास. अशा परिस्थितीत त्याला व्हेन्टीलेटर वर ठेवले गेले. त्याची बायको सतत ३ आठवडे रोज taxi करून हॉस्पिटल मध्ये मुलीला घेऊन जात असे. त्याचा बॉस दररोज दिमतीला हजर होता. एक डॉक्टर म्हणाले "पुअर चाप, हि इज इन ट्रबल, इजंट हि?". राजा खरोखरच संकटात होता. त्याच्या आई-वडिलांना चेन्नईहून बोलावले गेले. डॉक्टरांनी आशा सोडलेली होती. त्यांनी समजावून सांगितले कि आता तो वाचणे अशक्य आहे.  

आई वडील आल्या नंतर डॉक्टरांनी सर्वांचे कौन्सेलिंग केले. तांत्रिकदृष्ट्या त्याचा मेंदू बंद झाला होता. फक्त आता त्याला अक्राळ विक्राळ नळ्यान्च्या आणि मॉनीटर्सच्या  जन्जाळातून मुक्त करायचे होते. काही लोकांनी शेवटचे प्रयत्न म्हणून त्याला दुसरीकडे हलवायची, चेन्नईला नेण्याची विनंती केली. पण डॉक्टरांनी ती मानली नाही. आता उशीर झाला होता असे म्हणणेहि राजाच्या बाबतीत कठीण होते, कारण त्याने खूप कमी वेळ दिला….  सर्वांची मानसिक तयारी झाल्यावर गुरुवारी रात्री डॉक्टरांनी तो गेल्याचे घोषित केले. डेड बॉडी मॉर्ग मध्ये ४ दिवस ठेऊन पोस्ट मोर्टेम करावयाचे होते.  सर्वांना विकेंडला विश्रांती मिळेल या हेतूने डॉक्टर दोन दिवस थांबले. चार दिवसांनी त्याचे डेथ सर्टिफिकेट मिळाल्यावर इंग्लंडमधील पध्दती प्रमाणे फ़्युनरल डायरेक्टरला शव घेऊन जाण्याची परवानगी मिळाली.

त्यांनी त्याचे कपडे वगैरे साहित्य घरून मागवून घेतले. अंत्यविधीच्या दिवशी गोल्डर्स ग्रीनच्या चर्च मध्ये सर्व जमले. राजाचा देह कॉफीन मध्ये चांगले कपडे घालून, मेक-अप करून सजवून ठेवला होता. सर्वांनी राजाचे अन्त्य दर्शन घेतले. त्याची मुलगी शोकाकुल आईच्या कडेवर बसून बाबाला न्याहाळत होती. इतके दिवस ती बाबाला असाच झोपलेला पाहत होती. आज तो प्रसन्न दिसत होता. चेहऱ्यावर एक प्रकारची शांतता दिसत होती. मद्रासी भटजी सर्व साहित्य घेऊन आले होते. कॉफिन भोवती फिरून त्यांनी काही मंत्र म्हंटले. नंतर कॉफिन खाली ठेऊन त्याभोवती आपल्या स्मशानात करतात ते सर्व हिंदू संस्कार तिथे केले गेले. त्याचे वडील स्वतः बसून मंत्र म्हणत होते. चर्चमधील गोरे लोकही सराईतपणे मदत करीत होते. आमच्या ऑफिसमधील काही गोरे लोक कुतूहलाने बघत होते.    

साधारण तासाभरानंतर राजाचा देह कॉफिन मधून इलेक्ट्रिक क्रिमेशनसाठी नेण्यात आला. एक पर्व संपले होते. काल-परवा पर्यंत आमच्यात असणारा एक सहकारी आता अचानक जग सोडून गेला होता.  साधी राहणी, शांत वृत्तीचा आणि कष्टाळू असलेला राजा. आपल्या बायकोसाठी आपली नोकरी ठेऊन गेला!
लंडनमध्ये मृत्यू येऊन इतर बड्या आसामिं बरोबर आज तो चिरनिद्रा घेत आहे. महिनाभर आपल्याशी न-बोलणाऱ्या बाबाकडे काहीही तक्रार न करता  कुतूहलाने पाहणारी त्याची मुलगी, तिच्या निरागसतेमुळे एवढ्या मोठ्या दुःखापासून अनभिज्ञ राहिलेली ती.… तिच्या स्मृतीपटलावरील बाबाच्या आठवणी पुढेमागे जाग्या होतील? अज्ञानात सुख असतं…पण काही दुःखांची जाणीव द्यावीच लागते ना?

Tuesday, 15 October 2013

मॅकबेथ - एक अनुभव!

त्या दिवशी ऑफिस मधून जरा लवकरच निघालो होतो. ट्रेनने वॉटर्लू ला पोहोचलो. पाताळात जाऊन ज्युबिली लाइनने लंडन ब्रिज स्टेशन गाठले. ग्लोब थिएटर शोधायला थोडा वेळच लागला. तरीही ७:१५ वाजता नाटकाचे तिकीट दाखवून मी आत प्रवेशता झालो होतो. आता स्थानापन्न असे म्हणत नाही कारण माझे तिकीट खुर्चीचे नसून यार्डाचे होते. यार्ड म्हणजे स्टेज समोरील मोकळी जागा. येथे लोक उभे राहून नाटके बघतात. बाजूला सर्कस सारख्या galleries आहेत. त्या मध्ये बाके ठेवलेली आहेत. प्रत्येक बाराकावरील व्ह्यूप्रमाणे तिकीट ठरलेले आहे! यार्डाचे तिकीट ५ पौंड तर तेथील २० ते २५ पर्यंत! बाहेर gallery मधील लोकांसाठी blankets आणि उशा (बसायला) भाड्याने मिळतात.

हे ग्लोब थिएटर शेक्सपिअरने १५९९ मध्ये बांधले, त्यानंतर १६१३ मधील आगी नंतर त्याचे १६१४ मध्ये पुनर्निर्माण केले. पण हेही थिएटर १६४४ मध्ये पडून टाकले. आत्ताचे थिएटर हे त्याचे मूळ स्वरूप कायम ठेऊन नवीन बांधण्यात आले आहे. पण अर्थात शेक्सपिअरच्या काळात नाटक बघण्याचा फील मात्र ते देते नक्कीच. यार्डमध्ये उत्साही नाटक वेड्यांची गर्दी झालेली होती. सर्वजण स्टेजजवळील मोक्याची जागा पकडण्याच्या मागे होते. बरेच लोक ग्रुपने आलेले होते. नाट्यशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थीही बरेच दिसले. काही ज्येष्ठ, वृद्ध लोक - कदाचित येथील लाइफ़ मेम्बर्सहि असतील असे सर्व खुर्च्यांवर बसले होते. येथेही तीन घंटा झाल्या. मात्र कोणतीही अनाउन्स्मेन्ट वगैरे झाली नाही. आणि अचानक नाटक सुरु झाले.

आता थोडे मॅकबेथविषयी. सवाई गंधर्व फेस्टिवलला रागांपेक्षा रागीणींना न्याहाळायला आलेल्या आणि थालीपीठ, बटाटे वडा खाऊन फॅशन म्हणून रात्र जागवणाऱ्या मंडळीपैकी मी एक. आपला कोणत्याही विषयाचा अभ्यास नसला तरी "याविषयी जरा तुमच्याशी चर्चा करायची आहे" - या वर्गातला मी!  मॅकबेथला जाणे म्हणजे बालवाडीतील मुलाने कॉलेजमध्ये जाऊन बसण्यासारखे. पण म्हंटले जाऊन बघू, तिकिट ज्ञान पाहून देत नाहीत ना… जमेल तेवढे ग्रहण करू.

तर मॅकबेथची गोष्ट - ज्यांनी शेक्सपिअर कोळून प्यायलेला आहे त्यांना मी काय सांगणार. पण माझ्यासारख्या अर्धज्ञानी पामरांसाठी थोडक्यात : मॅकबेथ हा एक स्कॉटिश सरदार असतो. तो काही युद्धे जिंकून स्कॉटलंडचा राजा डंकन याला खुश करतो. त्यामुळे राजा त्याला अजून जहागिऱ्या आणि सरदारक्या देतो. ज्या दिवशी तो एका दगाबाज सरदाराला हरवून राजाला भेटायला येतो, तेव्हा वाटेत जंगलात त्याला तीन चेटक्या भेटतात. त्याच्याबरोबर दुसरा साथीदार जनरल बँको हाही असतो. त्या चेटक्या एक भविष्य सांगतात -मॅकबेथ हा कॉडोर प्रांताचा सरदार होईल, तसेच स्कॉटलंडचा राजा होईल. हे ऐकून मॅकबेथ विश्वास ठेवत नाही . बँको स्वतःचेही भविष्य विचारतो. चेटकीणी त्याला सांगतात तू नाही तरी तुझे वंशज स्कॉटलंडवर राज्य करतील. ते दोघेही परत येत असताना एक दूत येउन सांगतो कि राजाने त्याला कॉडोर प्रांताची सरदारकी दिली आहे. चेटक्यांचे एक भविष्य खरे ठरते. ते खुशीने राजाकडे जातात. राजा त्याला मिठी मारतो आणि त्याच्या वाड्यावर एक रात्र काढायला येण्याचा प्रस्ताव ठेवतो. इकडे राजा आपल्या वाड्यावर येणार म्हणून सगळे आनंदून जातात. लेडी मॅकबेथला जेव्हा हि भविष्यवाणी कळते तेव्हा ती वेगळेच कुभांड रचू लागते. आता तुला राजा होण्यापासून कोणी अडवू शकत नाही असे म्हणून ती मॅकबेथला राजाचा खून करण्यास तयार करते. राजा रात्री झोपलेला असताना त्याच्या सेवकांना दारू पाजून - मॅकबेथ राजाला मारून टाकतो. आपल्या राजाला झोपेत मारून भ्याड कृत्य केल्याचा पश्चात्ताप त्याला होऊ लागतो. पण लेडी मॅकबेथ त्याला धीर देते आणि मन घट्ट करण्यास सांगते. सकाळी एक सरदार मॅकडफ राजाला भेटण्याकरता येतो. मॅकबेथ त्याला काहीच घडले नाहीये अशा अविर्भावात राजाच्या दालनात घेऊन जातो.

मॅकडफ पुढे जातो आणि राजाचा खून झाल्याचे पाहताच आरडा ओरडा करू लागतो. इकडे मॅकबेथ पळत पळत तिथे जातो आणि राजाचे अंगरक्षक तिथे पडलेले पाहून - यांनीच दारू पिउन नशेच्या भरात राजाला मारले असा देखावा करून त्यांना मारून टाकतो. यामुळे कोणताही पुरावा मागे रहात नाही. राजाच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याचे मुलगे माल्कम आणि डोनाल्बेन हे तिथून पळून इंग्लंडमध्ये जातात. राजाला कोणी व का मारले हे कोणालाच समाजात नाही. बँकोला हि बातमी समजते. चेटकिणीच्या भविष्यामुळे त्याला खरे / खोटे काय याचा अंदाज लावता येत नाही. नंतर राजपुत्र पळून गेल्याने सर्वजण मॅकबेथलाच राजा होण्याची गळ घालतात आणि मग त्याचा राज्याभिषेक होतो. यानंतर लेडी मॅकबेथ त्याला अजूनच भडकाविते आणि मग तो वाटेत येईल त्याचा नाश करीत सुटतो. बँकोला तो राजवाड्यावर बोलवितो. तो आणि त्याचा मुलगा घोडेस्वारीसाठी गेले असताना सैनिक पाठवून बँकोला मारून टाकतो, पण त्याचा मुलगा फ़्लिअन्स पळून जातो. इकडे राजा सर्व सरदारांना पार्टीला बोलवितो. या पार्टीत बँकोचे भूत येते आणि ते एका खुर्चीत बसते. ते फक्त मॅकबेथलाच दिसत असते. तो चीड-चीड करतो, घाबरतो. राणी त्याला सांभाळायचा प्रयत्न करते. सगळे सरदार घाबरून जायला बघतात. राणी त्यांना थांबवते. पण पुन्हा थोड्या वेळाने त्याला भूत दिसते आणि तो पुन्हा पिसाळतो! यावेळी मात्र त्याचा तमाशा बघून राणी सर्वांना जायला सांगते. अशा रीतीने मॅकबेथ आणि राणी दोघेही पश्चात्तापाच्या आगीत होरपळू लागतात. विषण्ण होऊन मॅकबेथ पुन्हा जंगलात जातो आणि चेटकीणिना भविष्य विचारतो. त्या त्याला एका शत्रूचा मुकुट दाखवतात, त्यावरून मॅकडफ कडे त्यांचा इशारा असतो. त्या पुढे असेही म्हणतात किं स्त्रीपासून जन्माला आलेल्या कोणापासूनही तुझा मृत्यू नाही. तसेच बर्न्हाम येथील जंगल जेव्हा स्कॉटलंड मध्ये येईल तेव्हा तुझ्या राज्याला धोका आहे. या दोन्ही गोष्टी अशक्य असल्याने तो निर्धास्त होतो.

इकडे परत आल्यावर त्याला कळते कि मॅकडफ पळून इंग्लंड मध्ये गेला आहे. हे ऐकून मॅकबेथ त्याच्या किल्ल्यावर हल्ला करून त्याच्या बायका मुलांना, नोकरांना मारून टाकतो. किल्ला ताब्यात घेतो. एक सरदार इकडे येउन इंग्लंड मध्ये मॅकडफला हे सांगतो. तो कोसळतो. मॅकडफ आता डंकन चा राजपुत्र माल्कमला जाउन मिळालेला असतो. माल्कम त्याला बदल घेण्यासाठी भडकावतो. त्याला १०,००० इंग्लिश सैन्य येउन मिळालेले असते. हे घेऊन सर्वजण स्कॉटलंडवर स्वारी करायला निघतात. वाटेत ते बर्न्हम वूड (जंगल) मध्ये थांबतात. माल्कम सुचवतो कि, कुणाला कळू नये म्हणून तिथल्या झाडाच्या फांद्या अंगावर घेऊन सैनिकांनी पुढे जावे. ते तसे करतात, इकडे मॅकबेथला कळते कि बर्न्हाम वूड मधून सैन्य असे येते आहे. एक भविष्यवाणी खरी ठरते. पण दुसरी अशक्य असते म्हणून तो काळजी करीत नाही. इकडे लेडी मॅकबेथला वेड लागलेले असते. पूर्ण पश्चात्तापाने ती आत्महत्या करते. मॅकबेथ कोसळतो. इंग्लिश सैन्य चाल करून येते, मॅकबेथ प्रतिकार करतो. शेवटी तो मॅकडफला समोर येतो. त्याला भविष्य वाणी सांगतो कि स्त्री-पासून जन्माला आलेला कोणीच त्याला मारू शकत नाही. मॅकडफ त्याला सांगतो कि तो प्रि-माच्युअर बेबी आहे - म्हणजे त्याचा जन्म आईचे पोट फाडून सिझेरिअन पद्द्थतीने झालेला आहे. त्यामुळे तो लौकिकार्थाने स्त्री-पासून झालेला नाही. हे ऐकून मॅकबेथ शास्त्र टाकून देतो. या शक्यतेचा कोणी विचारच केलेला नसतो. मॅकडफ त्याला मारून टाकतो आणि माल्कमला राज्याभिषेक करतो. अशा रीतीने मॅकबेथच्या खुनशी राजवटीचा दुर्दैवी अंत होतो.

आता थोडे नाटकाविषयी. बोजड शेक्सपिअरकालीन इंग्रजी भाषेमुळे आपल्याला नाटक कळणार नाही हि खूणगाठ बांधूनच मी तिथे यार्डात उभा होतो. बरीचशी तरुण मंडळी आजूबाजूला उभी होती. नाट्य शास्त्राचा अभ्यास करणारी काही असावीत. एक-दोन जण तर स्टेजवरती वही ठेऊन नोट्स काढीत होते. एकदा मला वाटले तो स्टेजच्या कडेला आलेला मॅकबेथ तलवारीने नव्हे पण याच्या वहीवर पाय पडून नक्की आडवा होईल. काही अगदीच शाळकरी मुले आलेली होती. या नाटकात (गंभीर असले तरी) काही विनोदाच्या जागा आहेत तेथे मंडळी योग्य ठिकाणी हसत होती. हि शाळकरी मुले मात्र ख्या-ख्या करून कुठेही हसत होती. यावरून यांचे आणि आपले इंग्रजी एकाच लेव्हलचे आहे हे माझ्या लक्षात आले. अर्थात मी कुठेच हसत नव्हतो, कारण खरे विनोद कळणे  पण दुरापास्तच होते. पण तरीही काही काही कळलेच. मी सर्व गोष्ट आणि काही संवाद आपल्या विकीपेडिया वरून वाचून गेलो होतो! त्यामुळे हे संवाद ऐकू आले कि मला लिंक लावता येत असे.

नाटकाला नेपथ्य अजिबात नव्हते. एक-दोन पडदे होते. मध्येच एकदा एक टेबल आणि काही खुर्च्या आणून ठेवल्या जातात तेवढेच नेपथ्य. स्टेजच्या मागे वरती सर्कस मध्ये असते तशी बँड पथकाला जागा होती! फरक एवढाच कि येथे स्कॉटिश वाद्ये (bagpiper/ड्रम) होती. पूर्ण थिएटरच्या रचनेचा सुरेख वापर करून घेतला होता. म्हणजे मुळात यार्डातील लोक स्टेजच्या एवढे जवळ उभे असतात कि ते नाटकाचाच भाग होऊन जातात. इथे विंग वगैरे प्रकार नव्हता. म्हणजे तो सर्कस सारखाच - प्राणी मागून येतात तसा मागेच असलेला पडदा - झाली विंग. त्यामुळे बऱ्याच पात्रांच्या एन्ट्रीज या प्रेक्षकांमधून होतात. स्टेजच्या जिन्याजवळ यासाठी जागा सोडावी लागत होती. एक-दोनदा तर एक जाड्या काळा नट मला धक्काच मारून गेला.  काही वेळेला हेच नट वरती बसलेल्या प्रेक्षकात जाऊन तिथूनही संवाद म्हणत होते. मॅकबेथचा राज्याभिषेक होताना तर यांनी तिथून कागदी फुलांच्या पाकळ्या टाकल्या. त्यामुळे यार्डातल्या सर्व प्रेक्षकांवर अभिषेक जाहला! या सर्व ट्रिक्स मुळे आपण नाटकातलेच एक पात्र / प्रजा होऊन गेलो आहोत असा भास निर्माण होत होता.

नाटक सुरु होताना सर्वजण स्टेज वर येउन ड्रम / bagpiper इत्यादी स्कॉटिश वाद्ये वाजवितात अगदी आपल्या नांदी सारखी. त्यानंतर तीन चेटक्यांच्या प्रवेशाने नाटक सुरु होते. मग मॅकबेथचा युद्ध जिंकल्याचा / राजाचा प्रसंग. भविष्यवाणी इत्यादी… सर्व प्रसंगांची मांडणी अगदी ओरिजिनल नाटकाप्रमाणेच होती. मला वाटते मूळ नाटकाचा गाभा, प्रसंग, संवाद, पात्रे आणि वस्त्रे कायम ठेऊन हा प्रयोग केला आहे. मॅकबेथ सर्व भाषांमध्ये गेल्या नंतर त्याची वेगवेगळी स्थानिक रूपे झाली म्हणून ते ओरिजिनल स्वरुपात पाहणे बहुतेक दुर्मिळ असावे!!!

आता थोडे अभिनयाविषयी. स्टेजवरच्या पूर्ण गोलाकार जागेचा यथेच्छ वापर प्रत्येक अभिनेत्याने/अभिनेत्रीने करून घेतला. यात खुद्द  मॅकबेथची भूमिका करणारा नट तर फारच माहीर होता. तो चौफेर फिरत होता. लेडी मॅकबेथपण तशीच. काही अभिनेत्यांनी अगदी संयत अभिनय केला - उदाहरणार्थ राजा डंकनची तसेच बँकोची भूमिका करणारे नट. यांनी कुठेही आक्रस्ताळेपण न करता उत्तम अभिनय केला. खुद्द मॅकबेथ झालेला नट उत्तम शब्दफेक असूनही थोडा अब्सेंट माइंडेड वाटला. तो पहिल्यापासूनच खुनशी असल्या सारखा वागत होता. माझ्यामते मॅकबेथ मध्ये घडलेला हळूहळू बदल तो दाखवू शकला नाही. सुरुवातीपासूनच तो खूप इम्पल्सिव्ह वाटला. लेडी मॅकबेथचेहि तसेच. आरडा-ओरड जर जास्त होती - मुळात हे नट/नटी उत्तम आहेत हे सांगायची गरज नाही.

बाकी सर्वच अभिनेत्यांनी आपापली कामे चोख केली - अगदी डंकन आणि बँकोचा मुलगा झालेल्या पोरसवदा अभिनेत्यानेही. त्याच्या चेहऱ्यावरचे सशाचे भाव त्याने उत्तम दाखविले. खुद्द मॅकबेथनी जरी निराशा केली तरी या सर्व पात्रांनी मात्र प्रयोग एका उंचीवर नेऊन ठेवला. संवाद कळत नसूनही अडीच तास कधीही कंटाळा आला नाही - आता हे कधी संपणार असे वाटले नाही हे विशेष. न म्हणायला शेवटी डंकनचा मुलगा माल्कम हा मॅकडफला भडकावून युद्धाला तयार करतो तेव्हाचा प्रसंग थोडा लांबलाच. या स्टेजवर खांब खूप आहेत, पण ते प्रेक्षकांच्या आड न येत त्यांचा वापर करून घेणे फारच कौशल्याचे आहे. ते फार चांगले साधले होते. मॅकबेथला बँकोचे भूत दिसते तो प्रसंग जरा जास्त विदुषकी झाला.

जेव्हा बर्न्हाम जंगलामधील फांद्या सैनिक डोक्यावर घेऊन येतात, तेव्हा अक्षरशः सर्व पात्रे प्रेक्षकामधून खऱ्या फांद्या घेऊन स्टेजवर जातात. तेव्हा नाटक पूर्ण climax ला पोहोचलेले असते. येथून पुढे मॅकबेथ हतबल होतो आणि शेवटचे रहस्य कळेपर्यंत मॅकडफ बरोबर द्वन्द्व खेळतो.  मॅकडफ त्याला रहस्य सांगतो आणि मग त्याला मारून टाकतो. येथे नाटक संपते आणि मग सर्व पात्रे शेवटचे स्कॉटिश नृत्य करतात. तेही लाजवाब.

या सर्वात खुपलेली मुख्य गोष्ट म्हणजे लेडी मॅकबेथ आणि स्वतः मॅकबेथचा आक्रस्ताळा अभिनय. मला वाटते या दोघांनी अजून  संयत अभिनय केला असता तर फार मजा आली असती. सर्व पात्रांची संवादफेक मात्र कमालीची होती आणि यासाठी त्यांना किती व्यायाम करावा लागत असेल याची कल्पनाच नाही. सर्वात जास्त एनर्जीतर मॅकबेथलाच लावावी लागत होती आणि ती त्याच्याकडे अफाट भरली होती. मला वाटते एवढी एनर्जी ठेऊन प्रत्येक प्रयोग करणे हि फार अवघड गोष्ट आहे. या एनर्जिसाठी मात्र सर्वांना दाद द्यावीच लागेल आणि मॅकबेथला स्पेशल!

असो. अशीही सुंदर अनुभूती घेऊन मी थेम्सच्या काठी आलो. समोर सेंट पॉल कॅथेड्रलचे सौंदर्य न्याहाळत लंडन ब्रिजच्या दिशेने चालू लागलो. आता लंडनच्या नाईट लाइफ़ची चाहूल लागली होती. रात्रीच्या लंडनची नशा तयार होऊ लागली होती. माझी पाऊले झपाझप स्टेशनच्या दिशेने पडू लागली.



Sunday, 13 October 2013

तमिळ तेरीयादी ...एन तमिळ रोंबा मोसम!

२५ मे २०१२ -
मद्र देशावरील वायुमार्ग स्वारीसाठी अस्मादिक पुणे विमानतळावर पोहोचले तेव्हा रात्रीचे साडेनऊ वाजले होते. चेक-इन करताना दारातच एका सुमारे दहा लोकांच्या लुंगी ग्यांगने माझे स्वागत केले, मध्ये पाच मोठे गजरे आणि तीन लहान वेण्याही होत्या. या लोकांच्या मागे मी जवळ जवळ दहा  मिनिटे अडकून पडलो. कारण कुणाचे तिकीट सापडत नव्हते तर कुणाच्या पोरासोरांचा हिशेब लागत नव्हता. सरतेशेवटी एका छोट्या फटीमधून मी आत घुसलो. सिक्युरिटीकडे चालत असता "गल्फमध्ये जाताना खस-खस नेऊ नये" अशी एक मराठीत पाटी आहे. ती पाहून माझ्या मनात जरा खस-खस पिकली एवढेच. गल्फला जात असतो तर कदाचित मेटल डिटेक्टरमध्ये पकडला गेलो असतो!

थोडी घुसाघुशी करून वेटिंग एरीआत स्थानापन्न होतोय तोवर पुन्हा त्या लुंग्या व गजरे, वेण्या इत्यादी हजर झाले. त्यांनी आपले डबे उघडून सांबर-डोश्यावर ताव मारावयास सुरुवात केली. यामुळे तिथे एक सामुदायिक मसालेदार सुगंध दरवळू लागला. यात एका शीटवर सांबर सांडल्यानंतर "ए पलीकडे जाऊन खा बघू तू " अशा अर्थाच्या सूचना मिळाल्या.  यानंतर बरेच लोक ते सामुदायिक भोजन होण्याची वाट बघत बसले. सरतेशेवटी विमानात बसण्याची सूचना झाली व आम्ही निघालो. मधली सीट मिळाल्याने हालचाल करणे अशक्य होते व झोप घेणेही. थोडा टाइमपास म्हणून मग मी एक चहा घेतला. अर्थात तो फुकट न्हवता. ३० रु. मध्ये मला फुल कप चहा मिळाला! दीड तासाच्या कंटाळवाण्या फ्लाईट नंतर आणि ब्याग येण्यात अर्धा तास गेल्यानंतर दीड वाजता मी बाहेर पडलो.

तोपर्यंत राज ट्रव्हलच्या राजकुमार नावाच्या एका राजबिंड्या चालकाने मला तीनदा फोन केला होता.
त्याचे इंग्लिश चांगले होते हे नशीब! कारण तो कुठल्या खांबापाशी उभा आहे हे त्याने फक्त तिसऱ्या  वेळेस मला सांगितले तेव्हा समजले. यानंतर शोलीन्गानाल्लूर असे लम्बेचवडे नाव असलेल्या भागातील लांकोर नावाच्या गेस्ट हाउस च्या पार्किंग मध्ये त्याने मला आणून सोडले. या प्रचंड सोसायटीमध्ये दोन तीनदा जिने चढल्यावर मी योग्य घरात पोहोचलो. गौतम नावाच्या नेपाळी कूकने मला माझी खोली दाखवली.

सकाळी उशीरा  उठलो. कमल नावाचा अजून एक नेपाली मुलगा इथे राहत होता, त्याने मला ब्रेंड बटर चहा असा नाश्ता आणून दिला. त्यावर ताव मारून, आवरा  आवर करून मी मेन रोड वर आलो. इथून मला सिरुसेरी नावाच्या ऑफिस मध्ये जायचे होते. नशिबाने एक हिंदी जाणणारा माणूस भेटला, त्याच्याबरोबर मी शेअर्ड ऑटो मध्ये बसून सिरुसेरी ला पोहोचलो. या ऑटो मध्ये ८ लोक बसतात. ४ मागे सीट वर आणि ४ त्यांच्या पायात. ४ कन्यांच्या पायाशी बसून, एक पाय बाहेर सोडून चेन्नई दर्शन करत शेवटी ऑफिस आले. रिक्षा वाल्याने काही तमिळ शब्द उद्गारले, मी ५० ची नोट हातात ठेवली. त्याने २० रु परत दिले, त्यावरून तो ३० द्या असे म्हणाला असावा. पुढचे तीन दिवस मात्र मी taxi लावली आणि काही शब्द त्या चालकांकडून शिकून घेतले. थोडेसे शब्द येऊ लागल्यानंतर मग ऑफिसची बसच लावली!! भाषा येत नसेल तर इथे कामे करून घेणे अवघड. वही, पेन घ्यायला मी ऑफिस स्टेशनरी स्टोर मध्ये गेलो, पण काही सेकंदातच बाहेर आलो. ते काय बोलत आहेत ते मला कळत न्हवते आणि त्यांना इंग्लिश येत न्हवते. "तमिळ तेरीयादी" - म्हणजे तमिळ येत  नाही एवढे शिकून घेऊन मात्र मला खूप उपयोग झाला.

चेन्नई मध्ये काही केलाम्बाक्कम, सेम्बक्कम, मीनाम्बाक्कम अशी काही "क्कम"कारान्त नावे फेकली कि राहणे / फिरणे अवघड नाही. बसचे नंबर पाठ करणे सोपे आहे. २१H, ८१B हे १४४ किवा २८१ लक्षात ठेवण्यापेक्षा सोपे आहे. शिवाय येत असणारे काही तमिळ आणि इंग्लिश शब्द मध्ये मध्ये पकडून वाक्यांचा अर्थ लावणेहि जमायला लागते. बस कंडक्टरशी बोलणे मला सर्वात अवघड गेले. तिकिटाचे पैसे मी तो योग्य ते परत करेल या आशेवरच देत असे. एका रिक्शावाल्याने मात्र भाषा येत नसल्याचा गैरफायदा घेऊन मला गंडा लावला होता.

चेन्नईत थोडे दिवस राहायला लागल्यावर आपल्याला ते शहर आवडायला लागते. इडली-डोसा तर आपला जीव कि प्राण असतोच. तिथली माणसे आणि त्यांचे स्वभाव एकदा समजले कि मग इकडे तिकडे फिरायचा उत्साह येतो. मी ज्या गेस्ट हाउस वर होतो तिथे अजय शर्मा नावाचा एक नेपाळी कूक आला. तो पोंडीचेरीला राहिला असल्याने उत्तम तमिळ बोलत असे. मी त्याच्याबरोबर पोंडीचेरी व मरिना बीचवर जाउन आलो. रोज  सकाळ संध्याकाळ भरपेट जेवण, नाश्ता, चहा इत्यादी सर्व मिळत होते.

अजय शर्मा  लाघवी माणूस होता. तो मला पोंडी दाखवायला घेऊन गेला. तिथे गेल्यावर अरविंद आश्रमात जायच्या आधी मला एका बीअर बार मध्ये त्याने ओढून नेले. तिथे दोन ग्लास मारल्यावर आम्ही डुलतच योगी ओरोबिन्दो आश्रमात पोहोचलो. आम्ही दारू घेऊन आलो आहोत असा कुणाला संशय आला नाही. आश्रम बंद व्हायची वेळ झाली होती म्हणून फक्त अरविंदांच्या समाधीचे दर्शन घेतले. तिथे रांगेत उभे असताना हा शाबजी बडबड करू लागला. मला वाटले आता दोघांना बाहेर काढतात वाटते! कसेबसे तिथे आवरते घेऊन आम्ही बीच वर आलो. पोंडी गाव सुंदर आहे, फ्रेंच प्रभाव अजूनही जाणवतो. घरांची बांधकामे फ्रेंच आर्किटेक्चरचे उत्तम नमुने आहेत.

आम्ही चेन्नईहून १ वाजता निघून ३:३० ला तिथे पोहोचलो होतो. ९ वाजता पुन्हा निघायचे असल्याने  ४-५ तासात जमेल तेवढे बघून घ्यायचे होते. बीच वरून जरा फेरफटका मारून जेवायला गेलो. तिथे पण साहेबांनी ३/४ बीअरच्या बाटल्या मागवल्या. तो मला पैसे देऊ देत नव्हता - पण मी त्याला रोखले. आता जायची वेळ झाली म्हणून आम्ही बस स्टेंडकडे जाऊ लागलो. तर पुन्हा याला बीअर मारायची हुक्की आली! सर जरा ठंडा पिके आता हू असे म्हणून हा पुन्हा जाऊ लागल्यावर मी त्याच्यावर रागावलो. मग घाबरून तो परत फिरला. इकडे गेस्ट हाउसवर इन्स्पेक्शन ला कोणी आले असते तर आम्हा दोघांना हाकलले असते!

ऑफिसमध्ये सर्वानन भवनची कॅण्टीन होती. प्रचंड महाग.  सकाळचा नाश्ता  रु.३० ला मिळते असे, हाच पुणे ऑफिस ला १-२ मध्ये. क्वालिटी चांगली असली तरी एवढे पैसे नाश्त्याला द्यायला लोक वैतागले होते. त्यामुळे तिथे एक चळवळ चालू झाली, अर्थात त्याला फारसे यश आले नाही.  दुसरा एक व्हेंडर स्वस्त देत असे म्हणून जर बरे!

अशा रीतीने महिना घालवल्यानंतर एक दिवस जायची वेळ झाली. माझे सोबती अजय शर्मा आणि कमल यांना टाटा करून टक्सी बोलाविली. तर पुन्हा  तोच  राजकुमार मला सोडावयास आला होता! अशा रीतीने आमची चेन्नई स्वारी पूर्ण होऊन पुन्हा आपल्या पुण्यास यावयास निघालो…




Saturday, 9 March 2013

ऑ पाले दे आन्द, ब्रसेल्स

ऑ  पाले दे आन्द ब्रसेल्स … या नावाच्या भारतीय (खाना असलेल्या) हॉटेलसमोर आम्ही २/३ मिनिटे उभे होतो. तो ब्रसेल्स मधला आमचा पहिलाच दिवस होता. इतर हॉटेलसारखे इथे बाहेर मेन्यु कार्ड लावले नव्हते. पण लंच बुफे चा रेट ३० युरो (आक्खे २१०० रुपये) असा होता. लंडन मध्ये याच्या निम्म्याहून कमी किमतीत बुफे मिळतो. आम्ही तोंड वाकडे करून पुढे चालू लागलो. दोन दिवस ब्रेड, सांडविच व केळयान्वर काढल्यावर तिसऱ्या दिवशी फक्त पार्सल आणण्यासाठी आम्ही पुन्हा "ऑ पाले दे आन्द" (म्हणजे भारतीय राजमहाल!) समोर जाऊन ठाकलो. ते हॉटेल दुपारी २ ते ६ बंद असते. तेव्हा ५ वाजले होते, म्हणून पुन्हा तासाभराने आत प्रवेशते झालो.

दरवाजा उघडून आत गेलो तेव्हा समोर एक शाही बैठक होती, बरीच पितळी तबके ठेवली होती. हा वेटिंग एरिया. आत झिरमिळ्याचे पडदे होते. राज कपूरच्या सिनेमाचे एक पोस्टर बाहेर लावले होते. भिंतीवर सतार,नगारा अशी वाद्ये लावली होती एकंदरीत सगळा थाट व सजावट हैद्राबादी निजामाच्या दरबारात असल्यासारखी. भोजनकक्षाबाहेर जय-विजय सारखे दोन पुतळे होते - निजामाचे गुलाम.  पडद्यांच्या आत बरीचशी  टेबले सजवून ठेवली होती. त्यावर उंची मद्ये पिण्यासाठी ग्लासेस. बराचसा अंधार होता. प्रकाशाची सारी जबाबदारी काही मेणबत्यान्वर!!
डाव्या हाताला कौंटरच्या मागे एक गोरी शिष्ट बेल्जिअन बाई बसली होती. तिला मी नम्रपणे "इंग्लिश येते का ?" असे विचारले. माझ्याकडे बघूनच बाईने हे लो-बजेटवाले आहेत हे ओळखले होते, त्यामुळे ती जमेल तेवढा तुच्छपणा दाखवीत होती. मी टेक -अवे (पार्सल)ची विचारणा करून मेन्यु कार्ड बघू लागलो.

तेवढ्यात एक साधारण साठीचा फ्रेंच म्हातारा कोट / मफलर घालून आत आला. हि बाई सारखी फोन वरच बोलत होती. बहुधा पार्सल ऑर्डर / बुकिंग घेत असावी. म्हाताऱ्याला बघून तिने फोन खाली ठेवला. त्याने तिच्या दोन्ही गालांवर चुंबन घेतले. हे मलापण आधी का सुचले नाही? पण मागे अमिता बसली होती. म्हातारा हॉटेलचा मालक असावा असे वाटले. मोठा टेचात होता. आपल्याला बेल्जिअन रीतीरिवाज माहित नसल्याने मीही आपले गाल पुढे केले. पण तो तसाच पुढे निघून गेला माझ्या अंगावरून. मागे अमिता बसली असल्याने त्या दिशेने गेला नाही ना याची मी खात्री करून घेतली.

म्हातारा जय-विजयच्या मधून भोजनकक्षाकडे निघून गेला. मी त्याकडे पाहत असतानाच बाईने ऑर्डरची विचारणा केली. तिथे "व्हेज बिर्याणी - १४ युरो" एव्हढा एकच पदार्थ आम्हाला घेण्यासारखा होता. मी तो ऑर्डर केला. दिवसभराच्या ब्रसेल्स भ्रमंतीमुळे आम्हा दोघांचे डोके दुखत होते. म्हणून चार दिवस न मिळालेल्या चहाची विचारणा करण्याचे धाडस केले. कारण मेन्यु कार्ड मध्ये काहीच नव्हते. पण चहा होता, ३ युरोला होता. मी एकाच ऑर्डर केला. आम्ही बाहेरच तबकांजवळ बसलो. टेबलवर बसण्याची विनंती झाली नाही. कुहु ग्लास फोडेल म्हणून मीही विचारले नाही. मला वाटले चहा पार्सल देतात कि काय.
कुहु तबकांवर ठाण ठाण हात मारीत होती. ते तबक कुठल्याशा निजामाचे हात लागून पावन झाले होते. ओरखडे आले असते तर - जयविजय पैकी एकाला रिटायर करून मला तिथे उभे केले असते. मी या विचारात असतानाच तो म्हातारा आतून आला. त्याच्या हातात ट्रे होता. त्याने त्यातील किटली व कप तबकात ठेवला. म्हणजे हा मालक नसून वेटर होता तर. वेटर असून चुंबन घेत होता म्हणजे मालक असता तर….

… हा विचार पूर्ण होण्याआधीच "चा …चा … " असा कुहुचा चहात्कार ऐकू आला. मी किटलीताला चहा कपात ओतला. अमिता, कुहूस थोडा दिला. त्यातील बिस्कीट कुहूस दिले. त्या किटलीमध्ये चहाचा आक्खा खडा मसाला घातला होता (दालचिनी, वेलदोडे इ.) चहा दुधट पण बरा होता. जवळ जवळ तीन कप निघाला त्या कीटलीमधून. म्हातारा चांगला माणूस निघाला. त्याने कुहूस लॉलीपॉप दिला. आम्ही चहा घेत असताना एक चीनी (दिसणारी) मुलगी व तिचा फ्रेंच (दिसणारा) बॉयफ्रेंड आते आले आणि भीत-भीतच आम्हाला "बोन्जूर" म्हणून आत गेले. म्हातारा बाकीच्या मेणबत्त्या लावण्यासाठी निघून गेला.

आम्ही चहा संपवला. ती बाई एप्रन घालून आमची बिर्याणी घेऊन आली. म्हणजे हीही वेट्रेस होती तर. म्हणजे म्हाताऱ्याचे आणि हिचे काही? … असा चावट विचार मनात आला तेव्हा जय-विजय दोघेही माझ्याकडे अधीरतेने बघत होते. त्या बाईच्या चेहऱ्यावर "आता निघा" असेच भाव होते. मी कुहूचे बूट घालेपर्यन्त देखील तिथे थांबलो नाही. बाहेर आलो. अमिता मला ओरडतच बाहेर पडली. ऑ पाले दे आन्द नावाच्या त्या हॉटेलपासून आम्ही दूर चालू लागलो ते पुन्हा कधीच न येण्यासाठी.…

…. जय-विजय मात्र आपली रिप्लेसमेंट कधी मिळतेय या विचारात आजूनही तिथे उभे असतील. प्रत्येक गिऱ्हाईकाकडे कुतूहलाने पाहत असतील. म्हातारा रोज नेमाने ब्रसेल्स मधील रस्त्यांवरून खडखडत जाणाऱ्या ट्राम मध्ये बसून ठीकसंध्याकाळी ६ वाजता तेथे येत असेल. बाईचे चुंबन घेत असेल. मेणबत्त्या लावीत असेल. बाई भारतीय सोडून सर्वांना "बोन्जूर" म्हणत असेल. एप्रन घालून म्हाताऱ्याबरोबर पदार्थ सर्व्ह करीत असेल. तिथल्या पोस्टरमधल्या राजकपूरचे डोळेही भारतीय माणूस दिसल्यावर विस्फारत असतील. तिथली तबके थरथरत असतील, वाद्ये झंकारत असतील. रात्र झाल्यावर, नशेतले बेल्जिअन पुन्हा घरी गेल्यावर ती बाई कोट घालून गल्ला मोजत असेल. पोस्टरमधील नर्गिसच्या डोळ्यात आलेल्या अश्रुंवर म्हातारा फडके मारीत असेल. आणि त्यानंतर यांत्रिकपणे त्या खडखंडात करणाऱ्या ट्राम मध्ये बसून ते दोघे आपापल्या घरी जात असतील…

अमिता, कुहु, जय-विजय आणि ऑ पाले दे आन्द