Thursday 8 April 2010

“फार्मव्हील वरचे आम्ही शेतकरी...”

“माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं” च्या चालीवर...

कुणाच्या गोठ्यामंदी शंभर गाई चरती, सत्तर बकरेSS नांदती शेतावरती.
राहती डुक्करे गोडीSगुलाबीनेS, राखणीला उभा घोडाSS कुंपणा वरती!

रुजवे फुले कोणी, पेरणी भाताची. करती पैदासSS बक्कळ प्राण्यांची.
मिळती आम्हालाS भेटी या सर्वांच्याS, करतो मग आम्हीS जोशात कापणी.

उगवले रान माझे चिंता हि लागली! नेतील तोडूSन गुरे, नासाडी पिकांची.
कोवळे हात अमुचेS शेतात राबती, हायरे शत्रू कितीS बुरी नजर त्यांची.

विश्वाच्या जालावरतीS किती हो रमती, शेतात गुंतूनS संसार सोडती.
पहावे जिथे तिथेS अपडेट असती, किती हो लगबगS फेसबुकावरती.

करावी बचतS थोडी हो वेळेची, कशाला करावीSS? शेती हि फुकाची.
खूळ हे जालाचेS असते जालीम, जातो आहारी जो जो वाट हो लागे त्याची.

द्या कि सोडून रावजीS झाले हे आता अति, बघते वाट तुमचीS देशाची काळी माती.
शिकवा कि तुमच्या युक्त्या आपल्या किसाना, घाम गाळून तो जोमाने करेल शेती.

||  इति ||