Saturday 14 March 2020

दोन काकांची व्यक्तिचित्रे!

वयाच्या सत्तरीच्या सुरवातीलाच चटकन जगातून निघून गेलेल्या दोन जवळच्या काकांवरचे हे छोटेखानी मृत्यूलेख. हे काही त्यांचे सर्व बाजूंनी केलेले अष्टपैलू निरीक्षण नसून - एका आंधळ्यास हत्तीची जी-जी बाजू हातास लागली तितपतच वर्णन त्यात आले आहे. त्यामुळे काही गुण गायचे राहून गेले असल्यास क्षमस्व!  :

बंडू काका वॊज (was) राईट! 
भारतीय बसकण पद्धती ही पाश्चिमात्य कमोड सिस्टिमपेक्षा पोट साफ होण्यास जास्त प्रभावशाली आहे असे बंडू काका म्हणाले त्याला आम्ही (म्हणजे प्रस्तुत लेखकाने) विरोध दर्शविला. जे जे पाश्चात्य ते ते उत्तम अशी आमची धारणा असल्याने बाह्या सरसावून आम्ही उभे राहिलो. ज्या अर्थी इतकी वर्षे ते लोक कमोड वापरीत आहेत त्या अर्थी ते संशोधनपूर्वकच केले असणार असे आम्ही म्हंटले. यथायोग्य प्रेशर येणे ही तुमच्या आरोग्याशी संबंधित गोष्ट आहे, त्याच्याशी बसण्याचा पद्धतीचा काय संबंध? यावर बंडू काकांनी काही कारणे दिली. ती आम्ही तेव्हा पटल्यासारखे दाखवले, केवळ आदरभावामुळे आम्ही मोठ्यांचे पटवून घेतोच घेतो. मात्र अस्मादिकांनी परदेशात विविध प्रकारच्या कमोडचा (सोनेरी/चंदेरी भांड्यांपासून ते टर्कीशचे कव्हर असलेली झाकणे,  कापसासारखे मऊ मुलायम पेपर रोल, पोटात कळ येऊन ढवळेल अशा बातम्या देणारी वर्तमानपत्रे समोर वाचायची सोय,  मोबाईल होल्डर्स, स्वयंचलित कागद  वितरक (डिस्पेन्सर) इत्यादिंचा  !) स्वतः वापर केल्यानंतर मात्र - बंडू काका म्हणाले ते सत्यच होते हे लक्षात आले.

इसवी सन १९८६-८७ चा काळ! आत्याकडे सदाशिव पेठेत असलेल्या ४ दिवसांच्या मुक्कामात हमखास एक तरी रविवार यायचाच. सकाळी सकाळी हिंदुस्थानचे गरम गरम पॅटिस आणि रेकॉर्ड प्लेअरवर लागलेली पाकिझा, अल्बेला वा तुमसा नहीं देखा सिनेमातील गाणी अशा प्रसन्न वातावरणात सुरु झालेला कोकजे बिल्डिंगमधील रविवार कसा उत्तम जात होता. त्यानंतर दुपारी कधी कॅम्पात जाऊन कयानी चा केक / श्रुजबेरीची बिस्किटे आणणे  या बंडू काकांच्या नित्यक्रमात आम्हीही शामिल होत असू.  कधीमधी तिथल्याच एका फॅक्टरीतून कोला वा ऑरेंज ड्रिंकच्या काळ्या / नारंगी बाटल्या भरून आणणे व व्होल्टासच्या फ्रीजमध्ये नीट लावून ठेवणे हेही आम्ही पाहिले. मोठेपणी या पेयांचा सोस कमी झाला तरी, लहान असताना आपल्याला - तू काही घेणार आहेस का अशी विचारणा झाली कि अगदी गदगदून यायचे. ज्यांच्याकडे फ्रिज आहे त्यांच्याकडे या अशा बाटल्या ठेवाव्याच लागतात असा आमचा गोड गैरसमज बंडू काकांमुळे झाला होता. पण कसचं काय, फ्रीजमधल्या त्या खालच्या दोन रांगा आमच्याकडे तो आल्यानंतर रिकाम्याच रहात असत. रात्रीच्या वेळेस झोपताना बंडू काका भीमसेनचे निरनिराळे राग लावत असत आणि मग झोपेतच ती कॅसेट कधीतरी बंद होत असे आपोआप (अच्छा, म्हणून ते यावेळी रेकॉर्ड प्लेयर लावत नसत!). अशा मंत्रमुग्ध वातावरणाची आठवण सतत होत राहते. घड्याळाचे काटे फिरवून पुन्हा कुठल्या काळाकडे जायचा वर मिळाला - तर आम्ही भावंडे हाच काळ मागून घेऊ देवाकडून!! त्या काळातल्या पुणे ट्रिप अविस्मरणीय करण्यात बंडू काकांचा वाटा मोठा आहे.

काकांना भूमिकेत शिरणे फार लवकर जमत होते असे वाटते.  कारण बस वा रेल्वेत गप्पा मारता मारता अचानक समोरच्याशी आपल्या हक्काच्या जागेवरून भांडण करण्याची किमया साधणे  इथपासून ते टिळक टॅंकवरील कुणा उद्योजकाच्या पार्टीत इतर अशाच उद्योजक, प्रथितयश डॉक्टर्स वगैरे बड्या असामींबरोबर खांद्याला खांदा मिळवून शामिल होणे त्यांना सहजी जमायचे. याबाबतीत ते effortless होते, हि नैसर्गिक देणगीच त्यांच्याकडे होती म्हणूया. लहानपणापासून त्यांनी तशा बड्यांना (अगदी भीमसेनजींपासून) जवळून पाहिल्यामुळे असेल कदाचित. याबाबतीत लहान-मोठे भेदाभेद अमंगळ होते त्यांना. हा आत्मविश्वास सर्वांनाच कुठेही यशस्वी होण्यासाठी त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे.

सकाळी लवकर उठून  वर्षानुवर्षे टिळक टॅंकवर पोहायला जाणे, त्यानंतर रुपालीत मित्रमंडळाबरोबर नाश्ता - हे त्यांनी न चुकता सातत्याने, अव्याहतपणे केले. बलोपासना व त्यातून आलेली खेळकर वृत्ती त्यांनी जोपासली. बहुतेक शनिवारी / रविवारी वेताळ टेकडी, गुरुवारी सिंहगड चढणे इत्यादी त्यांनी इमानेइतबारे केले.  यावर अ-वक्तशीरपणाचा छोटा काळा टिळा लागला तरी तो या पुण्याईवर खपून जात असे व केवळ हास्य विनोदातच त्याचा उल्लेख होऊन बऱ्याचदा भागत असे. पण आपल्या रुटीनला  कमीत कमी धक्का लावून घेण्याच्या पुणेरी बाण्याने ते आपली कामे सुरु ठेवू शकत. त्या अर्थाने "कंपार्टमेंट" मध्ये जगायला त्यांनी स्वतःला तयार केले असावे.

मोठे शौकीन खवय्ये तर ते होतेच, विविध खाद्यपदार्थ खाऊन बघून ते स्वतः बनविण्यात त्यांचा हातखंडा होता.  त्याचबरोबर नाविन्यपूर्ण वस्तू आणून त्यांचा पुरेपूर वापर करण्यात कुणी त्यांचा हात धरू शकणार नाही. आज सर्वत्र मुबलक वस्तूंचा "प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी" झाला असला तरी त्यांना तो कधीच झाला नाही व प्रत्येक नवीन वस्तूसाठी जागाही आपसूक तयार होत असे. इंटिरिअर डेकोरेशनच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी जागेत जास्तीत जास्त सामान मावविण्यासाठी त्यांच्या घरी प्रॅक्टिकल टूर द्यायला हवी! बरं यातील बहुतेक वस्तू ह्या खाद्यपदार्थांशी संबंधित असल्याने व पाहुण्यांना त्याचा यथास्थित लाभ झाल्याने (आमची आत्या ओरडली तरी), लोक मात्र दुवा देतच घरी जात असतील - मग तो फूड प्रोसेसर असो, कॉफी डिकॉक्शनचे मशीन असो, पॉट आईस्क्रीम कि ईडली मेकर! जगातल्या कुठल्याच मशीन्सना एवढी मानवी सदिच्छा व उपभोगमूल्य लाभली नसावी. पुण्यात कामासाठी आलेले व देशमुखवाडीत डोकावणारे प्रत्येकजण या गोष्टीचे साक्षीदार आहेत. मी व माझा चुलत भाऊ हर्षद कॉलेजची बहुतेक वर्षे तिकडे पडीक असल्याने असे अनेक रसास्वाद चाखलेले आहेत बंडू काकांच्या हातचे! त्यांच्या हातचे अंड्याचे आम्लेट खाऊन जमाना झाला, पण तसली आम्लेटे पुन्हा कधी हॉटेलात वा घरीही खाल्ली नाहीत. त्यातून त्यावर बारीक कलाकुसरीने चिरलेला (जीव) ओवाळून टाकावा असा कांदा व कोथिंबीर. माझा एक भाचा त्यांना लहानपणी आम्लेट आजोबा म्हणत असे ते उगाच नव्हे (आता तो - रोहन त्याच्या आईप्रमाणे त्यांचाही नकळत गंडाबंद शागीर्द झाला आहे)!  बरं याबाबतीत बंडू काकांचा एकच-एक कुणी गुरु नसून ते स्वयंभू होते असेच म्हणावे लागेल. नुकताच आलेला रंगीत टीव्ही व झीवरील संजीव कपूर हे कदाचित प्रेरणा देणारे ठरले असतील.

कधीही, कुठेही व कितीही वेळ लागणारी झोप हि अजून एक त्यांना मिळालेली दैवी देणगी होती. अर्धे चिंतातूर जग निद्रानाशाच्या शापाने भयग्रस्त असताना हा माणूस कसे काय ते सुख मिळवीत असेल? याचे कारण बहुतेक लोक आपले प्रॉब्लेम्स हे झोपेच्या वेळेत चिंतन करण्यासाठी लांबणीवर टाकतात व त्यामुळे झोप लागता लागत नाही - बंडू काका मात्र प्रॉब्लेम्स जिथल्या तिथे स्वतःपुरते तरी सोडवीत असल्याने - झोपेच्या फर्स्ट क्लास कम्पार्टमेन्टमध्ये शिरायला त्यांना चिंतेचा टीसी आडवा येत नसावा. हि किमया फार कमी लोकांना साधते.

पुण्यात शिकायला येणाऱ्यांचे लोकल गार्डियन होणे हि एक अजून जबाबदारी आमच्यामुळे त्यांच्यावर पडली!  त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोतच. त्यांची इतर भाचरे, सुना व जावई हे सुद्धा बंडू काका या व्यक्तिमत्वाची व त्यांच्या घराची कायम ओढ लागलेलीच होती व आहेत. इतरत्र कधीही न ऐकलेले कोकजे हे आडनाव प्रसिद्धी पावण्यात बंडू काकांचे श्रेय मोठे आहे!

आळस झटकून काम करणे (विशेषतः दीर्घ निद्रेनंतर) हेही एक कौशल्य आहे. त्यांनी ते पुरेपूर वापरले व विविध गोष्टी केल्या. भरपूर हौस म्हणून कार घेतली, शिकली व शिकविलीहि! नात रियासाठी बऱ्याच गोष्टी निगुतीने केल्या - उदाहरणार्थ स्कुटीला पुढे छोटी सीट बसवून घेणे अश्या अनेक सांगता येतील. त्यांना बिझी राहण्याची कला अवगत होती, कष्ट करणाऱ्या माणसांना कामे दिसतात - इतरांना दिसत नाहीत. त्यामुळे मनाला उगाच सैतानाच्या हातात नं देता ते व्यस्त ठेऊ शकत. बायको वा सुनेशी तुफान वादावादी करण्याची त्यांची हातोटी होती, पण त्यांची ती भांडणे "विरक्त" असावीत. म्हणजे ती झाल्यावर - तो रुटीनचा भाग समजून ते आपल्या कामांकडे पुन्हा वळू शकत. व त्याच विषयावर दुसऱ्या दिवशी त्याच "विरक्त त्वेषाने" न कंटाळता भांडूही शकत. आता हि गोष्ट वाद लांबून पाहणाऱ्या मलाचं (म्हणजे चक्क कोकजे बिल्डिंगच्या बाहेर खिडकीपाशी उभे राहून बरका!) दिसू शकते. या वादस्पर्धेनंतर विंगेतून आपण घरात प्रवेश केल्यावर स्त्रीचा जो चेहरा भाव व्यक्त करतो व पुरुषाचा जो चेहरा दिसतो याचे वर्णन हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे! असो. सांगायचा मुद्दा बंडू काका निवांत रिमोट सुरु करून चॅनेलांची आलटा-पालट करीत असताना "काय आज गद्रे काकांच्या मेसला सुट्टी काय ?" हे विचारण्यापर्यंत त्यांचा प्रवास सहज झालेला असे.     

प्रत्येक माणसाचा - त्याच्या आजूबाजूला असण्याचा आपल्यावर काहीना काही परिणाम होतोच. बंडू काका हे आमच्या अजाणतेपण ते जाणतेपण या काळाचे सोबती होते. त्यांनी केलेल्या व जगलेल्या विविध गोष्टींचा कळत नकळत प्रभाव पडतोच व तो दिसतोही. काही वेळेला -"आज मी बंडू काकांसारखा भीमसेन ऐकत झोपणार आहे" असे मी घरी सांगतो.  काही वेळा - बंडू काका असते तर त्यांनी आत्ता असे केले असते हेही उद्गार निघतात! बऱ्याचदा "बंडू काका वॊज राईट" असा वर म्हंटल्याप्रमाणे साक्षात्कारही होतो.
शेवटी  - पृथ्वीतलावर लाभलेल्या भाग्याप्रमाणे आताच्या त्यांच्या चिरनिद्रेतही कोणतेही प्रॉब्लेम्स त्यांना सतावू नयेत व तीही तेवढीच शांतीपूर्ण व्हावी हीच देवाचरणी इच्छा! 
  
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
अनुभवांती परमेश्वर !
अनुभव या शब्दाचा एक अर्थ चमत्कार असाही होतो म्हणे. हा अर्थ रमेश काकांच्या डिक्शनरीतून बाहेर आलेला आहे. "काय एकेक अनुभव" म्हणजे अध्यात्मिक मार्गावरील चमत्कार असे त्यांना ओळखणाऱ्या सर्वांनाच माहित आहे. उज्ज्वल भारतीय कौटुंबिक परंपरेतून आलेली अध्यात्मिकतेची कास धरून ती पुढे घेऊन जायची आहे या निष्ठेने ते जगले व त्यासंबंधी जे जे सोपस्कार करावे लागतात ते ते त्यांनी मावशीसह आयुष्यभर केले. 

ते भक्ती भाव वगैरे ठीकच, पण आमचा विरोध चमत्कारांस. अध्यात्मिक पातळी उच्च करण्यासाठी निघालेल्या माणसांना आकृष्ट करण्यासाठी चमत्काराची काय गरज? उलट त्याने अध्यात्माची उंची कमीच होणार नाही का?  शिवाय विज्ञान जेथे हात टेकते तेथून अध्यात्म (विज्ञानास अगम्य असलेले ते शोधण्यासाठी) सुरु होते - पण त्या विज्ञानाला आधी हात टेकू तर द्या! मग तेथून अध्यात्म सुरु करा. त्यामुळे प्रत्येक अनुभव अर्थात चमत्कारांना शास्त्रकाट्याची कसोटी का लावू नये हा आमचा प्रश्न. अर्थात हा वैज्ञानिक वगैरे दृष्टिकोन हि फक्त सायन्स साईडला गेलेल्यांची फुकाची बडबड ठरते. आपण एका गूढातिगूढ व अचंबित करणाऱ्या, विलक्षण प्रत्ययकारी संस्कृतीचा भाग असल्याने काकांच्या बाबतीत मी शेवटी हार मानली. 

...कारण काकांनी आम्हालाच तो निरुत्तर करणारा अनुभव दिला - मरणात जग जगते तसा मी तो जगलो. संपूर्णपणे वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येणारा मृत्यू हातात असताना - असह्य झालेली डोकेदुखी, त्यात निर्माण झालेली गुंतागुंत, हॉस्पिटल, ऑपरेशन इत्यादी सर्व होऊनहि तिथला मृत्यू त्यांनी टाळला. घरी येऊन काही दिवसांनंतर दुपारी निव्वळ थोड्या सेकंदांच्या अस्वस्थतेनंतर पलंगावर निपचितपणे आलेला शांत संयमित मृत्यू हा त्यांच्याच शब्दातील "एकेक अनुभवा" पेक्षा कमी नव्हता. म्हणजे तो विलक्षण अनुभव ते स्वतःच घेऊन व इतरांना देऊनही गेले.

काका धनू राशीचे. आता या राशीची माणसे निम्मे आयुष्य माणूस म्हणून व निम्मे घोडा बनून काढतात असे ऐकतो आपण (राशीचक्रकार शरद उपाध्यांच्या कृपेने!).  मी पण धनूचा असल्याने हा प्रत्यय घेतोच. माणूस तंद्रीत गेला कि त्याचा घोडा झालाच समजा. आमची मावशी काकांचा घोडा कधी झाला हे अचूक ओळखीत असे व त्याप्रमाणे पुढील बोलाचाली करण्याचे कौशल्य तिला अवगत झाले होते. आता माणूस माणसाला समजून घेईल असे नाही, पण घोडा घोड्याला समजून घेऊ शकतो. व त्यामुळे मला हे समजणे सोपे जात असावे बहुधा. कधी कधी मला असे वाटते कि त्यांचे "एकेक अनुभव" हे या अवस्थेतील असावेत. अंतर्गत अध्यात्मिक अवस्थेला पोहोचणे हि दैवी देणगी कदाचित धनू राशीला घोड्याच्या रूपाने मिळाली असावी. म्हणजे याबाबतीत रमेश काका नशिबवानच म्हणायचे.

आता या अनुभवांचीच री ओढायची तर योगायोगाने ते बदलून गेले ते राजापुरास - पवित्र गंगा अवतरणाऱ्या राजापुरास! हा गंगानुभव इतर नातेवाइकांस व मित्रमंडळींस देण्यात त्यांनी नेहेमीच उत्साह दाखविला. प्रेमळ व स्पष्टवक्ती  कोंकणी माणसे जोडली आणि त्यांच्याबरोबरीने आंब्याशीही असलेला दोस्ताना वाढविला . सांगली / पुण्याकडच्या लोकांना देवगड हापूस खिलवला. त्यासाठीचे अपार कष्ट झेलले, घरच्यांचे शिव्याशाप व प्रचंड मदतही त्यांनी (अक्षरशः) झेलली!! कारण आंब्याएवढे मोहक पण वैताग देणारे फळ दुसरे नसावे. सुंदर, नखरेल, उच्छृंखल प्रेयसीच्या आणाभाका प्रियकर काय घेईल एवढ्या त्या आंब्याच्या घ्याव्या लागतात, त्यातून वेळेला दगा देणार नाही याची खात्री नाही. आंबे विकणारे म्हणून लोकं तुम्हाला श्रीमंत बागाईतदार समजतात ते वेगळेच. तर हा सगळा खटाटोप त्यांनी अंगावर घ्यायचे धाडस केले हेच कौतुकास्पद. या वळण वाटांवर त्यांनी म्हणजे सर्वच कुटुंबाने अनेक नवीन माणसे जोडली व त्यांना जीव लावला.

दुसरी एक गोष्ट ज्यामुळे रमेश काकांनी सर्वांना तोंडात बोटे घालायला लावली ते म्हणजे घरात बनविलेली बाग - भाज्या व फुलझाडे. एखादा सुप्त कलागुण एकदम वरती यावा आणि झळकून निघावा तसे. त्यांच्या बाबतीत हेही घडले ते निवृत्तीनंतर! आणि त्यांनी ते एवढ्या उंचीवर नेऊन ठेवले कि हे ह्यांनी खूप आधी केले असते तर कितीतरी अजून करता आले असते की! अशीही हळहळ वाटत राहिली. माणूस हा त्याने घेतलेल्या निर्णयांमुळे "घडलेला प्राणी" आहे (man is made up of decisions) आणि त्यातूनच आपण खूप शक्याशक्यता निर्माण करीत असतो. आता एखाद्याचा आवाज खूप सुंदर असेल पण त्याने ५० व्या वर्षापर्यंत गाउनच बघितले नाही तर? पण जर तरला काही अर्थ नाही, विशेषतः स्टेट बँकेतील नोकरी असेल तर नाहीच नाही. इथे माणूस त्या शक्यतांना मुकतो व आपल्या संभाव्य गुणांना न्याय देऊ शकत नाही. त्यातल्या त्यात व्ही आर एस मुळे या गोष्टी लवकर शक्य झाल्या असे रमेश काकांच्या बाबतीत म्हणता येईल. त्यांच्या पिढीमध्ये कुठल्यातरी शाळेत "कोंबणे" व नंतर कुठल्यातरी ऑफिसात "चिकटणे" या दोनच क्रियापदात करियरची इतिकर्तव्यता दडली असल्यामुळे - अशा कित्त्येक हिऱ्यांना आपण मुकले असू. 

हल्लीच्या काळात मुले पालकांना वळण लावतात अशी परिस्थिती आली आहे, पण हे रमेश काकांनाही सहन करावे लागे. ते मला काही अनुभव सांगत असताना सुमेधा ताई त्यांना "ओ बाबा! त्याला बोअर करू नका हो!" असे दटावत असे, पण आजकालच्या मुलांप्रमाणे मिश्कीलपणे ते ऐकल्या न ऐकल्यासारखे करून काका आपले सांगणे सात्विक भावाने पुढे सुरु ठेवत. आपला क्रूर समाज संतांवर अघोरी टीका करतोच, पण त्याची पर्वा न करता त्यांना अज्ञानी जनतेच्या प्रबोधनाचे कार्य सुरु ठेवावेच लागते. आता यामुळे माझी मात्र पंचाईत होत असे, कारण आत्तापर्यंत माझा घोडा झालेला असे तो ताईच्या वाक्याने भंग होऊन पुन्हा माणसात येई. व इथून पुढचे बोलणे मला लक्षपूर्वक ऐकावे लागे. पण पुन्हा वर सांगितल्याप्रमाणे घोडा घोड्याला समजून घेई - व काका पुढचे थोडक्यात आवरून "काय पीपीएफ मध्ये किती गुंतवणूक करतोस ?" असा बाउन्सर टाकीत. हा गुंतवणूक सल्ला फार मोलाचा व ऐकण्यासारखा असे. 
काकांना मी कधी कुणावर रागावल्याचे बघितले नाही - ते नेहेमीच विरागी शांतपणे प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टीला समजून घेत असावेत. एवढे दुखणे असतानाही  टिकवून ठेवलेली हि त्यांची अढळ विरागी वृत्ती आपण थोडी तरी घ्यायला हवी. काही संकटांचे शांतपणे निराकरण करण्यासाठी ती उपयोगीच आहे. त्यांचा हा स्वभाव बऱ्याच लोकांना भाळून टाकीत असे, खुद्द माझ्या सासऱ्यांनी मला तसे सांगितले! म्हणजे असे कितीतरी लोक असतील व आहेतच.

आता त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असे म्हणणे फोल आहे, कारण इहलोकीही ती लाभत होतीच की व त्यांच्या हेवा वाटावा अश्या मृत्यूमध्येच ती होती ...  मग तिथे वरती का नाही मिळणार! फक्त आता स्वर्गात त्यांनी देवांनाही आपल्या पृथ्वीतलावरील अनुभवांचा लाभ करून द्यावा व समृद्ध करावे हीच इच्छा!    

--------------------------------------------------------------------------------------------------------------------
इथे सर्व भावनिक उमाळा बाजूला ठेवून "होश-ओ-हवासमें" असे म्हणावेसे वाटते - कि बंडू काका वा रमेश काका हे जात नसतात. आपल्याच नकळत घडणाऱ्या कृतींमधून ते अमूर्तपणे इथेच अस्तित्वात आहेत याची ग्वाही देत असतात. मग विज्ञान कि काय ते हात टेकते असे म्हणावे लागते व आपापले वैयक्तिक अध्यात्म सुरु होते!