Thursday 3 June 2010

सायबाच्या देशातला चोवीस तासांचा थरार!



लंडनच्या बिगबेन मध्ये संध्याकाळचे पाऊणे सात वाजले होते. त्याच वेळी आमच्या व्हर्जिन अटलांटिक फ्लाईटचे पाय नुकतेच हीथ्रोच्या धावपट्टीला लागत होते. विमान आपल्या गेटकडे taxi करीत असताना पुढे काय वाढून ठेवले आहे याची मला पुसटशीही कल्पना न्हवती. मी आणि माझा सहप्रवासी गुहन विमानातून आपले समान घेऊन उतरलो आणि इमिग्रेशनच्या दिशेने चालायला लागलो. इमिग्रेशनचा फॉर्म विमानातच भरला होता. विविध वर्णाच्या, देशाच्या लोकांमधून वाट काढत आम्ही कौंटरच्या जवळ पोहोचलो. गुहनचा नंबर आधी लागला आणि इमिग्रेशन पूर्ण करून तो पलीकडे माझी वाट बघत बसला. आता तो लंडनमध्ये होता आणि मी.. ना लंडनमध्ये होतो ना भारतात! एवढ्यात माझा नंबर आला......

या सगळ्याची सुरुवात सुमारे महिन्यापूर्वी झाली. मी माझ्या कंपनीच्या इंग्लंडमधील एका क्लायंटसाठी काम करत होतो. तेथील एका नवीन प्रोजेक्टचे प्रपोजल तयार करण्यासाठी मी आमच्या युके आणि चेन्नई टीम बरोबर अनालिसिस करू लागलो. काही दिवसांनी सात-आठ रिव्ह्यूज झाल्यावर ते प्रपोजल आम्ही कस्टमरला पाठविले. त्यानंतर दहा-बारा दिवसांनी कस्टमरने आम्हाला तेच प्रपोजल मीटिंगमध्ये प्रेझेंट करायला सांगितले. प्रथम मला वाटले कि आमच्या इंग्लंडमधील लोकांपैकी कोणीतरी ते प्रेझेन्टेशन देईल. पण मग चेन्नैहून आमचा एक वरिष्ठ म्यानेजर त्यासाठी जाणार असे ठरले. तो जायच्या ४/५ दिवस आधी मात्र माझ्या म्यानेजरने कदाचित मलाही जावे लागेल याची कल्पना दिली. एक दिवस उलटसुलट चर्चा झाल्यावर मी जायचे नक्की झाले. आणि मी परदेशगमनासाठीचे सोपस्कार पूर्ण करायच्या मागे लागलो. बरेच मागे लागल्यानंतर आमच्या इमिग्रेशनवाल्यांनी जायच्या एक दिवस आधी माझे ऑफिशिअल लेटर दिले. तो म्यानेजर चेन्नैहून निघून रविवारी १७ ऑगस्टला सकाळी लंडनला पोहोचणार होता आणि मी संध्याकाळी. केवळ एकच दिवस तेथे राहून, २ तासांचे प्रेझेन्टेशन देऊन मी १८ तारखेला रात्रीच्या फ्लाईटने मुंबईला परतणार होतो! एका दिवसाच्या ट्रीपचे हे थ्रिल मी प्रथमच अनुभवणार होतो. योगायोगाने त्याच दिवशी माझ्या टीममधला गुहन पहिल्यांदा इंग्लंडला चार महिन्यांसाठी जाणार होता. आम्ही दोघे मुंबई एअरपोर्टवर भेटलो. माझे समान कमी असल्याने त्याची एक ब्याग मी "चेक-इन" केली. आणि दुपारी दीडच्या फ्लाईटने आम्ही मुंबईहून उड्डाण केले....

... हिथ्रोवर इमिग्रेशन डेस्कवर असलेल्या सोफिया नावाच्या बाईने माझा पासपोर्ट / व्हिसा आणि फॉर्म चेक केला. तिच्या असे लक्षात आले कि मी पूर्वी एकदा युके मध्ये येऊन गेलो आहे, माझ्याकडे अधिकृत "वर्क परमिट" होते - पण मी आत्ता एक दिवसासाठी म्हणजे "बिझनेस" साठी आलो आहे. तिने मला सांगितले कि तू एकदा येऊन गेला आहेस, म्हणजे हा व्हिसा वापरला आहेस तेव्हा तुला पुन्हा देशात एन्ट्री देता येणार नाही. त्यातून तू एक दिवसासाठी आला आहेस म्हणजे तुला कंपनी इकडे पगार पण देणार नाही - जे की नियमाच्या विरुद्ध आहे. वर्क परमिट असलेल्यांना या देशात पगार मिळतो (दिवसाचा भत्ता न्हवे!). एक आधार म्हणून मी तिला माझ्या कंपनीने दिलेले पत्र दाखवले, पण ते माझ्या (कम)नशिबाने चुकीचे निघाले. वर्क परमिटच्या ऐवजी मी बिझनेसवालेच लेटर घेऊन आलो होतो! घाईघाईत निघण्याचा परिणाम! त्यामुळे सोफियाला आयतेच कोलीत मिळाले. तिने मला समोरच बाकावर बसवले आणि तिच्या म्यानेजरकडे हे सर्व दाखवून पुन्हा खात्री करून घेतली. मी डेस्कच्या पलीकडे युके मध्ये प्रवेश केलेल्या गुहनकडे हताशपणे पाहत होतो. त्याला हे काय चाललेय काहीच काळात न्हवते.

सिनिअर ऑफिसरने तिचीच री ओढली आणि माझी शेवटची आशाही संपली. आता तिने माझ्याकडून १/२ फॉर्म्स भरून घेतले आणि मला सांगितले कि "आम्ही तुला लंडन मध्ये प्रवेश देऊ शकत नाही. तुला इथेच हीथ्रोवर डिटेंशन रूम मध्ये राहावे लागेल अथवा जागा मिळाल्यास आमचे सिक्युरिटी गार्डस तुला एका दुसऱ्या डिटेंशन एरियात नेतील - तिथे तुला एक दिवस राहता येईल. तुझ्या नशिबाने तुझे परतीचे तिकीट उद्याचेच आहे तेव्हा तुला पुन्हा एयरपोर्टवर आणून सोडतील. तुझा पासपोर्ट आमच्याकडे राहील आणि आम्ही तो तुला जातानाच परत देऊ. डिटेंशन एरियात खायला प्यायला मिळेल, झोपायला बेड असेल. बाकी बाहेर पडता येणार नाही. उद्या तुला येथून डिपोर्ट केले जाईल." एव्हाना गुहनला काहीतरी गंभीर चालले असल्याची कल्पना आलीच होती. तो तिच्याजवळ आला. मी सोफियाची परवानगी घेऊन त्याच्याशी हिंदीतून बोललो. घडला प्रकार म्यानेजरला लगेच फोन करून कळवण्यास सांगितले. तिथल्या लोकल म्यानेजमेंटकडून काही प्रयत्न करण्याची विनंती केली. सोफियाने त्याला आता "आपल्या रस्त्याने" जाण्यास सांगितले. एवढ्यात आमच्या लक्षात आले कि त्याची एक ब्याग तर मीच चेक-इन केली होती! ती बेल्ट वरून घेण्यासाठी मलाही जाणे आवश्यक होते. मी चाचरत हि गोष्ट सोफियाला सांगितली. दुसऱ्याची ब्याग चेक-इन करणे हा हवाई-सुरक्षेत अपराधच आहे. याबद्दल मला वेगळी बोलणी खावी लागली. पण त्याचे दु:ख करत बसायाच्याही पलीकडे मी गेलो होतो. बेल्टवरून ब्याग शोधून ती गुहनकडे दिली आणि माझी ब्याग घेऊन मी सोफियाच्या मागे चालायला लागलो. गुहनसाठी बाहेर जसपाल taxi वाला वाट बघत उभा होता.

आम्ही दोघे हिथ्रोवरच्या दुसऱ्या मजल्यावरील एका कक्षात गेलो. हा भाग तरी आपल्याला कधी बघायला मिळणार?! तेथे एका छोट्या खोलीत तिने मला माझी ब्याग ठेवायला सांगितली. आणि पुढील एका खोलीत आम्ही गेलो. मला येथे माझे संपूर्ण "फिंगर प्रिंट्स" द्यावे लागणार होते. ५ मिनिटानंतर एक पंजाबी माणूस माझे ठसे घ्यायला आला. हा जन्मापासून इथे राहिलेला होता, त्यामुळे उच्चार सायबासारखे होते. त्याला आपण "जसमीत" म्हणू. हा जसमीत काही वेळा भारतात येऊन गेलेला होता. त्याला माझ्याबद्दल सहानुभूती वाटली. तुला उगाचच पकडले आहे असे तो म्हणाला. शिवाय सोडूनही देतील काळजी करू नकोस असे चार धीराचे शब्द त्याने ऐकवले. जसमितने माझ्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. माझ्या दोन्ही हातांची दहाही बोटे वेगवेगळ्या पद्धतीने एका मशीन वर फिरवून त्याने सर्व ठसे घेतले. अगदी गुन्हेगाराचे घेतात तसे. स्क्रीनवर बघून समाधान नाही झाले तर पुन्हा माझी बोटे तो पिरगाळत होता. मी मुकाट्याने ते सर्व करून घेत होतो. जसमितने राज ठाकरेच्या आंदोलनाबद्दल बरेच ऐकले होते. आणि त्यावर तो बरीच टीका करीत होता, शिव्या घालत होता. मी त्याच्या होला-हो मिळवत होतो फक्त. एवढ्यात सोफिया पुन्हा आली.

यानंतर ती मला डिटेंशन रूममध्ये घेऊन गेली. येथे एक काळा निग्रो माणूस एका टेबल वर बसला होता. मला काचेतून पलीकडे - पकडलेले लोक दिसत होते. त्याच्याकडे रजिस्टर होते त्यात तो सर्व "डीटेनी" लोकांची नावे लिहून घेत होता. तिथे आलेल्या एका आशियायी माणसावर तो वस्सकन ओरडला. मी जरा घाबरलो. बेकायदेशीर इमिग्रंट्सना अशीच वागणूक देतात कि काय? पण माझ्याशी जरा बरा बोलला. त्याच्या रजिस्टरमध्ये एन्ट्री झाल्यावर सोफियाने मला चहा/कॉफी काही हवे आहे का विचारले. त्याही परिस्थितीत मी तिला चहा हवा आहे म्हणून सांगितले. तिथल्या व्हेंडिंग मशीन मधून पांचट काळा चहा आणि वर दुध पावडर घालून तिने मला दिला. कोरडा पडलेला घसा ओला करायला याचा फार उपयोग झाला. ती मला एका डिस्कशन रूम मध्ये घेऊन गेली. पलीकडेच अजून एक ऑफिसर दुसऱ्या एका बांगलादेशी मुलीची चौकशी करीत होता. त्यांची बरीच वादावादी चालू होती. आता सोफियाने माझे "interrogation" चालू केले. तिने पुन्हा एक प्रश्नावली असलेला फॉर्म आणला. त्यावर पुन्हा तेच प्रश्न मला विचारले आणि खोदून खोदून उत्तरे काढून घेतली. मी शक्य तेवढी माफक आणि खरी माहिती दिली. कारण आमच्या म्यानेजरचा फोन आल्याचे तिने सांगितले होते त्यामुळे त्याच्या आणि माझ्या बोलण्यात काही विसंगती आढळली असती तर माझी कम्बक्ती आली असती! सुमारे अर्धातास चौकशी केल्यावर तिला काहीतरी फरक सापडलाच! त्यावर बोट ठेऊन तिने माझी डिटेंशन रूम मधेच रवानगी होणार असल्याचे सांगितले. हे करताना तिने वर असेही सांगितले कि "तुला या देशात सोडल्यावर आमच्या देशाला काहीही धोका नाही याची मला खात्री आहे, पण मी तसे करू शकत नाही".

आता तिने मला काही खायला हवे आहे का म्हणून विचारले. मी लगेच हो म्हणून टाकले - शक्यतो व्हेजच काहीतरी. तेथील एका फ्रीझमधील थंडगार चीज सांडविच मला दिले गेले. अत्यंत गारठलेले ते सांडविच घेऊन मी तिच्या मागे चालू लागलो. डिटेंशन रूम चा दरवाजा उघडला गेला. त्याला एक मोठ्ठी काच होती - आकाशवाणीच्या रेकॉर्डिंग रूम मध्ये असते तशी. आतील माणसांचा बाहेरच्या खोलीशी एवढाच काय तो दृश्य संबंध! जाताना त्या निग्रो माणसाला सांगून तिने मला आत सोडले. माझी ब्याग मात्र बाहेरच ठेवली होती. त्यातील काही सामान घेण्याची परवानगी घेऊन मी काही डॉक्युमेंट्स घेऊन आलो. सोफियाने मला काही लागल्यास काचेतून इशारा करण्यास सांगितले. तसेच वेगळ्या एरियात जागा मिळाल्यास तिकडे एस्कॉर्टस घेऊन जातील असे सांगितले. एवढे करून ती निघून गेली. माझ्या मागे खोलीचा दरवाजा बंद झाला तेव्हा रात्रीचे साडे नऊ वाजत आले होते!

त्या खोलीत ७/८ सोफे टाकले होते. स्त्री-पुरुषांसाठी वेगळी बाथरूम होती. एका टेबलवर खूपशी पुस्तके होती (बरीचशी न वाचण्यासारखी). काही हिंदी पुस्तकेही होती. एका कोपऱ्यात टीव्ही लावला होता. बाजूला एक फोनचे खोके होते. मी गेलो तेव्हा त्या खोलीत सुमारे ८/९ लोक होते. त्यातील एका निग्रो बाईने सोफ्यावर ताणून दिली होती. पलीकडे अजून एक काळा माणूस झोपायचा प्रयत्न करीत होता. चेहऱ्यावरून बांगलादेशी वाटणारे काही लोक नुसतेच बसून होते. एक साउथ युरोपिअन माणूस टीव्ही बघत बसला होता. हा मोठ्ठा गमत्या होता, त्याला विशेष काहीच वाटत न्हवते. आपण सगळे व्हिएतनाम युद्धातले कैदी आहोत असेही काहीसे तो म्हणाला. मीहि एका सोफ्यावर जागा अडवली. माझ्या पलीकडे एक युरोपिअन मुलगी १६/१७ वर्षांची बिचारी रडत बसली होती. त्या सुंदर ललनेला धीर द्यावा कि न द्यावा या विचारात मी पडलो होतो. ती एकटीच लंडनला आली होती आणि काहीतरी व्हिसा इशू झाला असावा. माझ्याबरोबर चौकशी झालेली ती बांगला मुलगी पण तिथे आली होती. थोडे सेटल झाल्यावर मी फोन फिरवला आणि माझ्या काही कलीग्जना फोन करून काय घडलेय याची कल्पना दिली. काळजी नको म्हणून घरी फोन केला नाही, एवीतेवी एक दिवसांनी पुण्याला परत जायचे होतेच.

आता त्या फोनवर बरेचसे फोन कॅ|ल्स येऊ लागले. मी जवळच असल्याने अटेंडटचे काम करीत होतो. इंग्लंडमधील नातेवाईक आपापल्या लोकांना फोन करून विचारपूस करीत होते. त्या बांगलादेशी मुलीचे इतके फोन आले कि मीच कंटाळलो. शेवटी तिला कोणीतरी सोडवून घेऊनही गेले. मी सोफ्यावर बसलो होतो, साडे दहा वाजले होते. मी सांडविच काढले आणि कसेबसे पोटात ढकलले, ते गारठलेले सांडविच खाणे केवळ अशक्य होते. तिथले एक पुस्तक घेऊन वाचत वाचत बेडवर आडवे होऊन झोपायाचाही प्रयत्न केला. पण दोन्ही जमले नाही. एव्हाना माझ्या समोर अजून एक दांडगा तरुण येऊन बसला होता. पस्तिशीत असावा. मला म्हणाला पाकिस्तानचा आहेस का? मी म्हंटले नाही बाबा, भारतातला आहे. हा माणूस स्टुडन्ट होता. पाकिस्तानातून सुट्टीवरून परत येताना त्याच्या स्टुडन्ट व्हिसाचा काहीतरी घोळ झाला होता. बहुधा तो आउटडेटेड झाला असावा. हा तसाच पुन्हा घुसत होता. अशा लोकांच्या कहाण्या ऐकता ऐकता ११:३० होऊन गेले. मीही आता थोडा निगरगट्ट झालो होतो! तिथे असलेली काही ब्ल्यान्केट्स इतर लोकांनी पळवून नेली होती, त्यामुळे झोप येण्यासाठी उपायच न्हवता. त्या खोलीचे दार अधूनमधून उघडत होते आणि नवीन माणसे आत येत होती, काहीना पुन्हा चौकशीसाठी बाहेर बोलावत होते. बारा वाजत आले तेव्हा मला दुसऱ्या डिटेंशन एरियात जागा मिळण्याची शक्यताही मावळली होती. बहुधा त्या दिवशी बऱ्याच लोकांना पकडले असावे. आजची रात्र आणि उद्याचा आख्खा दिवस या खोलीत काढण्याची मानसिक तयारी मी करू लागलो. तेसुद्धा माझ्या पाकिस्तानी, बांगलादेशी, नायजेरियन, युरोपिअन इत्यादी मित्रांसोबत आणि केवळ सांडविच खाऊन! अडकल्याचे काही नाही पण एवढ्या दूर येऊन प्रेझेन्टेशन न देताच जावे लागेल याचे जास्त वाईट वाटत होते. एक दिवसाची फुकट लंडन ट्रीप!

....सव्वा बारा झाले असतील - माझा डोळा अजून लागत होता एवढ्यात सोफिया परत आली. म्हणजे अजूनही ती ड्युटीवर होती तर! ती मला बाहेर घेऊन गेली आणि म्हणाली कि आमच्या कंपनीच्या इमिग्रेशन ऑफिसरचा फोन आला होता. तिने सर्व गोष्टी समजावल्यानंतर हिच्या म्यानेजरने मला युके मध्ये सोडायची परवानगी दिली होती. मी कुठल्या गावात जाणार, कुठल्या हॉटेलात राहणार याची सर्व माहिती घेऊन तिने मला काही फॉर्म्स दिले. पासपोर्ट तर माझा काढून घेतलाच होता, त्यामुळे कोणी काही विचारल्यास हे फॉर्म दाखव असे सांगितले. दुसऱ्या दिवशी रात्री १० ला माझी फ्लाईट होती त्यामुळे तिने ७ वाजताच येऊन एयरलाईनच्या माणसांना भेटायला सांगितले. तेच चेक-इन करून तुला पासपोर्ट मिळण्यासाठी आमच्या ऑफिसर पर्यंत घेऊन येतील असे म्हणाली. माझा व्हिसा मात्र रद्द होणार होता. त्यानंतर तीने मला हिथ्रोच्या बाहेर आणून सोडून दिले! माझ्या नशिबाने तिथे एक taxi थांबलेली होती, गोरा taxi वाला आत बसला होता. त्याला मी स्टेन्सला चालण्याची विनंती केली आणि गाडीत बसलो. १५/२० मिनिटांच्या प्रवासानंतर स्टेन्स दिसू लागले. हॉटेलच्या पत्त्यावरून अंदाज लावत रस्ता शोधू लागलो आणि शेवटी हॉटेल वर येऊन पोहोचलो. ५० पौंडाचे बिल देऊन हॉटेल मध्ये प्रवेश केला तर रिसेप्शनवर कुणीच दिसेना. काही मिनिटांनंतर एक रीसेप्शनीस्ट आला. त्याने सर्व फॉर्मालीटीज पूर्ण करून मला रूम मध्ये आणून सोडले.

थेम्स नदीच्या काठावर असलेल्या या हॉटेलचे नावही "थेम्स लॉज" होते. माझी खोली पण छान आरामदायक होती, त्यात एक छोटा फ्रीज होता. त्यात फळे आणि ज्यूस, ड्रिंक्स इत्यादी ठेवले होते. मी एक ज्युसची बाटली पिऊन झोपायची तयारी केली. सकाळी ७ चा गजर लावून झोपेची आराधना करायला लागलो. रात्रीचा १:३० वाजून गेला होता. झोप काही केल्या येत नव्हती. काही वेळाने झोप लागली, पहाटे ५ ला एकदम जाग आली. भारतात ९ वाजले असतील म्हणून घरी फोन केला आणि काय काय घडले ते सांगितले. आता काळजीचे कारण न्हवते! पुन्हा झोपलो आणि सातला उठलो. माझ्या म्यानेजरला लगेच फोन केला, तो दुसऱ्या हॉटेलवर उतरला होता. त्याला मी आलोय कि नाही हेच माहित न्हवते ना! त्याने मला ९ वाजता त्याच्या हॉटेलवर येण्यास सांगितले. मी भराभरा आवरून खाली ब्रेकफास्टला गेलो. ती फारच रम्य सकाळ होती, रेस्टोरंटमध्ये म्हातारी ब्रिटीश जोडपी न्याहारी करीत होती. एका बाजूला पूर्ण काचेचे आवरण होते आणि बाहेर संथ वाहणाऱ्या थेम्सचे पात्र दिसत होते आणि त्यातून जाणाऱ्या बोटी. काट्या-चमच्यांचे, प्लेटचे टण टण आवाज येत होते. पण हे सर्व एन्जॉय करायलाही मला सवड नव्हती. भराभर ब्रेकफास्ट उरकून मी रूममध्ये गेलो. जामानिमा केला आणि म्यानेजरच्या हॉटेलकडे निघालो. बाहेर भुरूभुरू पाऊस पडत होता. थोडासा भिजतच मी त्या "Anne Boleyn" नावाच्या हॉटेल मध्ये पोहोचलो. जवळ जवळ ३ तास तयारी केल्यावर आम्ही सगळे १२ वाजता विंडसरच्या ऑफिसला जायला निघालो. १ वाजता प्रेझेन्टेशन चालू होणार होते. आमच्याबरोबर २ सिनिअर म्यानेजर्स, १ डायरेक्टर आणि १ म्यानेजर एवढे लोक होते. दोन तास ती मीटिंग चालली आणि उत्तम पार पडली. आम्ही सर्व जवळच्याच एका पब मध्ये खायला गेलो. साडेचार वाजले होते आणि मला सात वाजता एअरपोर्टवर पोहोचायचे होते! एका म्यानेजरला विनंती करून मला हॉटेल वर सोडायला सांगितले. पुन्हा खोलीत येऊन मी सामान आवरले. गेल्या चोवीस तासातले फक्त ७ तास मी त्या खोलीत काढले होते! लगेच फोन करून जसपालला बोलावले. चेक-आउट करून पावसात त्याची वाट बघत उभा राहिलो. पावणे सातला जसपाल अवतरला आणि सव्वासातला त्याने मला हीथ्रोच्या टर्मिनलवर सोडले....

माझ्याकडे पासपोर्ट नव्हता, फक्त एक इ-तिकिटाचा प्रिंट. आदल्या दिवशी सोफियाने दिलेले काही पेपर्स होते. ते सर्व घेऊन मी व्हर्जिन अटलांटिकच्या डेस्कवर गेलो. विदाउट पासपोर्ट मला वेड्यातच काढतील असे वाटत होते! पण त्यांनी सर्व समजून घेऊन एका दणकट सिक्युरिटी गार्डला बोलावले. त्याच्याकडे मला सोपवून माझी पूर्ण चौकशी केली, ते फॉर्म्स इत्यादी बघून घेतले. तो मला म्हणाला "काही काळजी करू नकोस तुला पुन्हा युके मध्ये येता येईल!" असे म्हणून त्याने एअरलाईनवाल्यांना "गो अहेड" दिला. माझा बोर्डिंग पास बनवून ती एअरलाईनची बाई माझ्याबरोबर वरती आली. यावेळी सिक्युरिटीला मला रांगेत थांबायला लागले नाही. तिने मला BRT मधून नेले! ती बरोबर असल्याने कोणीही अडवले नाही. पुढे आल्यावर तिने मला थांबायला सांगितले आणि ती इमिग्रेशन ऑफिसर कडे जाऊन माझा पासपोर्ट घेऊन आली. त्यावरचा व्हिसा आता कॅन्सल झाला होता. मी एक "डीपोर्टी" होतो तरीही तिने माझी बरीच विचारपूस केली. मला शुभयात्रा देऊन ती गर्दीतून दिसेनाशी झाली. आता मी स्वतंत्र होतो! ड्युटीफ्री मधून काही खरेदी करून बोर्डिंगला गेलो. पुन्हा एकदा लंडनला टाटा करून मी आकाशात उडालो.

१९ ऑगस्ट, सकाळचे साडे अकरा. कधी नव्हे ते यावेळी मुंबईत उतरल्यावर मला हायसे वाटत होते. मी पुन्हा इमिग्रेशनच्या रांगेत उभा होतो. माझा नंबर आला, कौंटरवर जाऊन माझा पासपोर्ट दिला. डेस्कवरील ऑफिसरच्या मागे अजून एक माणूस उभा होता. माझा पासपोर्ट बघून डेस्कवरचा माणूस त्याला म्हणाला "साहेब, रोहित गोडबोले आलेले आहेत..". मी एक डीपोर्टी होतो. व्हर्जिन अटलांटिकने हे आधीच मुंबई इमिग्रेशनला रिपोर्ट केले होते! मी मुकाट्याने त्या साहेबाच्या मागे चालू लागलो. इमिग्रेशन ऑफिस मध्ये मला नेले गेले. आपल्या पोलीस स्टेशन मधल्याप्रमाणे इथे माझा बराच वेळ घेतला गेला, १ तास नुसतेच बसवून ठेवले होते. यावेळी इतर डीपोर्ट झालेल्या लोकांच्या कहाण्या मी ऐकत होतो. कुणी मुलगा सौदीला जाऊन अटकेत पडला! नंतर तिकडून कसाबसा सुटून डीपोर्ट केला गेला. एक जण दुबईला जाऊन तसाच उलट विमानाने परत आला होता त्यामुळे त्याच्या पासपोर्टवर दुबई इमिग्रेशनचा शिक्काच नव्हता! हे कसे काय शक्य झाले माहित नाही. अशा अनेक कहाण्या. एअरलाईन आणि इमिग्रेशन ऑफिसर्स मध्ये असलेले भांडण कळले. एखाद्या डीपोर्टीची माहिती एअरलाईनने न दिल्यास त्यांच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले जाते. नशिबाने माझी माहिती आधीच असल्याने मी जरा लवकर सुटलो. एका कर्मचाऱ्याने मला घेऊन जाऊन माझी ब्याग बेल्ट वरून काढून दिली. दोन पानी मोठ्ठा रिपोर्ट लिहिल्यावर आणि सर्व वैयक्तिक चौकशी केल्यावर मला सोडून देण्यात आले. बाहेर येऊन दुपारी दोन वाजता केके ट्राव्हल्सच्या गाडीत बसलो तोपर्यंत मी त्या एक दिवसात बरेच धडे घेतले होते! पुण्याला घरी पोहोचून शांतपणे विचार करत बसलो तेव्हा त्या काळरात्रीच्या आठवणी जाता जात नव्हत्या....


२१ सप्टेंबर... या घटनेला एक महिना होऊन गेला होता. आमच्या युके मधील म्यानेजरची इमेल आली. "ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास!" तो प्रोजेक्ट क्लायंटने आम्हाला बहाल केला होता. त्या एका दु:स्वप्नाचे सार्थक झाल्याचे मला समाधान वाटले!!