Friday 17 March 2023

किरकिरे काका

किरकिरे काका 


किरकिरे काकांवरचा लेख त्यांच्या हयातीतच लिहावयचा होता आणि तो त्यांना नेऊन वाचूनही दाखवायचा होता. काका आपल्याला अचानक सोडून गेल्यावर तो असा लिहावा लागणे फार वेदनादायी आहे. वाईतील त्यांची पहिली भेट अजूनही आठवते. साधारण १९८७ सालचा जून महिना असावा. शाळा सुरु होऊन काही दिवस झाले होते. आमचे तिसरीचे वर्ग महिला मंडळाच्या नेहेमीच्या जागेत न भरता काही कारणामुळे समोरील बालक मंदिरात भरत होते. तिसरीत आमच्या वर्गात आलेल्या काही नवीन मुलांमध्ये मंगेश पण होता. पावसाळी महिने असल्याने लवकर अंधार पडल्यासारखे आकाश काळवंडून जायचे आणि क्वचितच लागणारे वर्गातले दिवेही सुरु करावे लागत. अशाच एका संध्याकाळी मंगेशला आणायला त्याचे बाबा जरा लवकरच वर्गात आले होते. त्यांचे कुलकर्णी बाईंशी काही बोलणे झाले आणि मग सर्व मुले घरी निघत असताना ते आमच्यातील काहींना म्हणाले कि - बाबांनो, हा नवीन मुलगा मंगेश आला आहे तुमच्या वर्गात, त्याला लागेल ती मदत करा - आधीचे झालेले धडे भरून काढायला वह्या वगैरे द्या! आम्ही "हो, देतो" म्हणून निघालो. खरं सांगायचं तर मला काका तेंव्हा एक गंभीर व्यक्ती वाटले आणि ते गंभीर वाटणे तसे शेवटचेच ठरणार होते! 

काही दिवसांनी कळाले कि शंतनु साने नावाचा आमचा वर्गमित्र पुण्यात बदली होऊन गेला त्याच्याच जागेत हे किरकिरे कुटुंब राहावयास आले आहे. त्याचवेळी सान्यांच्या खालती तळ मजल्यावर राहणारे मोघेही जाऊन अयाचित आले होते. हा एकदमच झालेला "दुमजली चाराक्षरी" बदल कसा काय झेपेल या चिंतेंत मी होतो.  पण हि चिंता लवकरच मिटली आणि आमच्या बहुतेकांची मंगेशशी दोस्ती झाली. या दोस्तीत त्याच्या बाबांचा हातभार लागलेला आहेच.  बहुतेक मुलांच्या आयाच शाळेत आणायला येत असताना मंगेशचे बाबा आधी काही काळ जास्त येत राहिले आणि त्यांच्या खूप ओळखी वाढल्या. हेमंत किरकिरे हे काय व्यक्तिमत्व आहे याचा पूर्ण वाई गावात गवगवा होण्यास या बायका आणि त्यांनी मुलांच्या बाबांकडे केलेली काकांची तारीफ कारणीभूत ठरली. कुणालाही न दुखावता, न बोचकारता, निर्मळ विनोद करणारे आणि लोकांना खळखळून हसायला लावणारे ते आमच्या गावचे चालते बोलते पु. ल. देशपांडेच होते! वाऱ्यावरची वरात मध्ये काम करणारे पुलंचे बंधू रमाकांत देशपांडे आणि काकांच्या चेहऱ्यात योगायोगाचे साम्य होते असे मला वाटून जायचे! सतत हसतमुख, फुल ऑफ लाईफ असा हा मनुष्य विरळाच! 

बहुतेकदा बायका हास्य-विनोदात लवकर सामील होऊ शकतात पण पुरुष आढ्यताखोर असतात आणि विनोद गळी उतरवून घ्यायला वेळ लावतात. या नियमाने आधी बायका फॅन झाल्यानंतर मग एक एक पुरुषरुपी बुरुजही ह्या ताडमाड विनोदमुर्तींपुढे ढासळले असे म्हणायला हरकत नाही. काका ज्या घरी चहा-पाण्याला गेले असतील तेथून हास्याचे खळखळाट ऐकू येणे ठरलेले असे. एखादा माणूस बाहेरून चालला असेल तर ते ऐकून "इथे किरकिरे आले आहेत काय?" असा प्रश्न वाड्यातल्या किंवा सोसायटीतल्या माणसांना विचारला जाई आणि त्याचे उत्तर "म्हणजे, हे काय विचारणे झाले?" या वाक्यात त्या मनुष्यास मिळत असे. पूर्वी जुन्या काळात सिनेमाचे तिकीट न परवडणारे लोकं थिएटर बाहेर उभे राहून गाणी ऐकत असत, तसे ओळख -पाळख नसताना बाहेर उभे राहून विनोद ऐकणारे कित्येक चाहते काकांनी निर्माण केले होते. मग ह्या बाहेरच्या श्रोत्यांचा हळूहळू या मैफिलीत चंचू प्रवेश होत असे. मात्र एकदा प्रवेश झाला कि कुणी बाहेर पडणार नाही याची चोख व्यवस्था काकांच्या स्वभावाने केलेली होती. 

वाईतील द्रविड हायस्कुल, महिला मंडळ शाळेतल्या आणि नंतर साताऱ्यातील कॉलेज व इतरत्र भेटलेल्या मंगेशच्या कुणाही मित्र वा मैत्रिणींना विचारा - तुम्हाला कुठल्या मित्र/मैत्रिणीचे बाबा आवडतात? ते किरकिरे काकांचेच नाव घेणार. शिवाय त्यांचे बोलणे ऐकायला मंग्याच्या घरी हजेरी लावणार. काही मुले तर घरी फोन केल्यावर "काकू मंग्या आहे का?" असे न विचारता "काकू, काका आहेत ना घरी?" एवढ्या प्रश्नाच्या होकारावर पडीक राहायला दत्त म्हणून येत असतील. अशी आपल्या बाबांची कीर्ती पसरत असताना मंगेशलाही हेवा वाटत असेल. त्याच्या आईचा सौम्य, मिश्किल स्वभाव आणि मृदू बोलणे यामुळे काकांच्या बोलण्याला पूरक असे वातावरण तयार होत असे. हास्याच्या फारच उंच उडणाऱ्या फवाऱ्यांना मधून मधून जमिनीचा स्पर्श देण्याचा तो उतारा होता! मंगेशने पण हा मिश्किल स्वभाव घेतल्याने आपल्याच वडिलांच्या विनोदावर तिरकस शैलीत भाष्य करणे हे त्याला जमून गेले होते. आपल्या मुलाने चारचौघांत चांगले बोलावे, उत्तम वागावे, लोकांसमोर जास्त वायफळ बोलू नये या काळजीत इतर सर्व बाप असताना, आपले वडील आता काय नवीन विनोद वा बढाई मारणार, मित्रांना कोणता फुकटचा सल्ला देणार आणि त्यावर नियंत्रण कसे आणावे या विचारात बापाचीच काळजी असलेला मुलगा मी पहिल्यांदाच बघितला असेल. त्याअर्थाने इथे "चाईल्ड इज दि फादर ऑफ द मॅन" या म्हणीचीच प्रचिती येत असे. म्हणजे काही वेळा तर "बाबा जास्त बोलले तर त्यांना आवरण्याकरिता" म्हणून आई मुलालाही बरोबर धाडत असण्याची शक्यता आहे.  यावरून "मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश - माझ्यामागे हेर तिचा ऐकतो आहे!" असा काही विडंबनात्मक विनोद त्यांनी केल्याचे ऐकिवात नाही. पण मागे उभा असला तरी विनोद-नियंत्रक मंगेश काकांपेक्षाही ऊंच झाल्याने त्यांच्या डोक्यावरून दिसतही असे! खरं म्हणजे मंगेशच्या संयमाचेही कौतुक करावे तेवढे थोडेच. आवडलेल्या विनोदांनाही समोरचे लोकं निखळ हसत असताना आपण दाद न देता, त्यावर कुत्सित बोलणे त्याला भाग पडत असे! 

आपल्या स्वभावामुळे त्यांनी वास्तव्य केलेल्या सर्वच ठिकाणी काका जगप्रसिद्ध झाले होते. अमेरीकेतही त्यांनी आपल्या विनोदाचा झेंडा लावून घरोबे केले असल्याने त्यांना वर्ल्ड फेमस म्हणायला हरकत नाही! अशा रितीने ते आख्ख्या साताऱ्यात वर्ल्ड फेमस, आख्ख्या वाईत वर्ल्ड फेमस आणि आख्ख्या पुण्यातही वर्ल्ड फेमसच होते. आपला पोरगा दूरगावी असताना त्याच्याच मित्रांकडे आणि मैत्रिणींकडेही जाऊन "त्या बच्या, मन्या, गोड्या, शिरू, स्नेहल, मीनल किंवा हश्याला" फोन लाव रे/लाव गं जरा असे म्हणण्याची शामत कुठला बाप करू धजेल?  पण काका ते सहजतेने करू शकत आणि मग ती मुलंही आनंदाने तो फोन जोडून देत. त्या जोडलेल्या फोनवरून बोलणाऱ्या पलीकडच्या माणसाचा दिवस पण मग चांगला जाई! 

वाईत गणपती आळीतल्या घरात असताना सायकलमध्ये हवा भरायच्या पम्पासदृश तीन नळ्या जोडून, साखळी लावून त्याच्या स्टम्प त्यांनी तयार केल्या होत्या. किचनचे दार लावून त्याच्या मागच्या बाजूला या इंटरनॅशनल स्टम्प्स लटकावून आम्ही त्या छोट्या हॉल मध्ये जाड प्लॅस्टिक बॉल घेऊन क्रिकेट खेळत असू. यात काकांचे काम बहुधा फिल्डरचेच असे. त्या तसल्या भरभक्कम स्टंपा आयुष्यात नंतर मी कधीही पाहिलेल्या नाहीत!! कारण बॅट बॉल आधी येतात यष्ट्या असल्या-नसल्या तरी चालतात! पुढील क्रिकेट प्रेमाची बीजे त्या लोखंडी यष्ट्यांनी आणि प्लॅस्टिक चेंडूने रोवली होती एवढे निश्चित! गंगापुरीतल्या अभ्यंकर वाड्यात ते शिफ्ट झाल्यानंतर तर मग पुढच्या विश्वकोषाचे "होल वावर इज (फॉर) आवर (क्रिकेट)" असे झाले होते. विश्वकोषातले लोकं संध्याकाळी आपापल्या घरी गेले कि मग इथे शेजारी-पाजारी बाप-मुले यांचा क्रिकेटचा फड जमत असे. कदाचित आतमध्ये तर्कतीर्थ, मेपु रेगे वगैरे विद्वान मंडळींच्या गहन तात्विक चर्चा झाल्यानंतर बाहेर हलक्या फुलक्या विनोदात एक टप्पा आऊटचे सामने होत असल्याने विश्वकोषाच्या इमारतीवरील ज्योतीलाही सुखद गारवा मिळत असावा! तो धगधगता ज्ञानकुंड काही काळासाठी शांत होत असे!

हा अभ्यंकर वाडा पण वाईतील अनेक वाड्यांसारखा विशेष किमयागार होता. त्यात प्रवेश केल्यानंतर तिथली झाडे आणि एकंदर वातावरणामुळे काळाचे भान राहत नसे. म्हणजे तिथे आत तुम्हाला सांगितले असते कि "प्रताप गडाकडे कूच करण्यापूर्वी अफझल खानाचा वाईत मुक्काम आहे आणि त्याचे सैनिक व घोडे बाहेर फिरताहेत" किंवा "नाना फडणवीसांचा मेणा मेणवलीला जाताना समोरील मशिदीच्या आवारात थांबला आहे" किंवा गेला बाजार "इंग्रज साहेबाचे राज्य सुरु असून त्यांनी प्राज्ञपाठ शाळेच्या कारभारावर नजर ठेवण्याकरता दोन अधिकारी आत्ताच गंगापुरीत पाठविले आहेत"  - यांपैकी कशावरही विश्वास ठेवून आपण एकविसाव्या शतकातही ते खरे मानले असते असा तो वाडा होता. या अद्भुत वाड्याच्या मागीलबाजूस एक जीना असून तो डायरेक्ट मधल्या आळीच्या घाटावर उतरतो. या सिक्रेट वाटेवरून मग काका, मंगेश आणि वाड्यातील/आजूबाजूचे नदीवर पोहायला जात असत. तिथल्या छोटयाश्या मारुतीच्या देवळात काका मोठ्या उत्साहाने हनुमान-जयंती साजरी करीत असत आणि कधी कधी आम्हा बाहेरच्यांनाहि शामिल करून घेत असत. असा तो सर्वांगीण बहराचा काळ होता आणि काकांनी पण त्याचे सोने केले! 

काका पायाला भिंगरी लागल्या सारखे सर्वत्र फिरतही असत. त्यांच्या नोकरीतील मुशाफिरीतून आलेले अनुभव, त्यांचे वैद्यक आणि शेतीचे ज्ञान याभोवतीही त्यांनी जमवलेले गप्पांचे फड आणि चर्चा रंगत असत. विविध गोष्टींची आवड असल्याने कुणामध्येही मिसळण्यात त्यांना अवघड जात नसे. विनोदाचा धागा संवादास उपयुक्त ठरत असेच. काकांना स्वयंपाकाची प्रचंड आवड होती आणि ते आपल्या स्वतःच्या हाताने बनवून लोकांना विविध डिश खाऊ घालीत असत. मला त्यांचा लाभलेला एकंदर सहवास हा एकाच गावातील दोन वर्षे आणि नंतरच्या दहा एक गाठी-भेटी एवढाच होता, पण त्या माफक सहवासातूनही त्यांच्याबद्दल लिहावयास एवढा ऐवज त्यांनी दिला आहे. त्यांच्याबरोबर अनेक वर्षे घालवणाऱ्या लोकांकडे या ऐवजाचे टोक सोडून असलेला हिमनगच असणार आहे!      

अजून एक गम्मत म्हणजे काकांची उपस्थिती सर्वव्यापी होती. ते हजर असलेल्या ठिकाणीच गप्पांचे फड रंगत असे नाही, तर ते नसताना देखील दुसऱ्याच एखाद्या बदलीच्या गावात भेटलेली दोन कुटुंबे "किरकिरे" विषयावर घसरून मनमुराद हसून हि मैफल सुरु ठेवायचे काम करीत.  "अरे काय लेका तू ", अशा वाक्यांनी सुरुवात करून "मी सांगतो तसे कर, इंजिनिअरिंग सोडून सरळ मेडिकलला जा, भलं होईल बघ तुझं" अशा प्रकारचे फक्त तपशीलात वेगळे असलेले सल्ले काकांकडून ऐकून घ्यायला मजा यायची. नवीन मुलांना वाटे कि च्यामारी आपण इंजिनिअरिंगला जाऊन घोडचूक केली वाटते! मग एकदा गंमत लक्षात आल्यावर ते पण असे अचाट सल्ले ऐकायला हजेरी लावत. काकांनी दिलेल्या सर्व सल्ल्यांना गोळा करून वेगळा विश्वसल्लाकोष निघू शकेल. आमच्या इथे गल्लीत ताई आणि भाऊ नावानेच ओळखली जाणारी बहिण भाऊ जोडी होती. त्यांचे खरे नाव घरचे लोकं सोडून बाकीच्यांना माहिती नसायचे. पुरुष ऑफिसला जात असल्याने आयाच जास्त भेटत, त्यामुळे "भाऊची आई" म्हणणे सर्वांना वळणाचे पडले होते. पण त्याच्या बाबांचा विषय निघाल्यावर भाऊचे बाबा असे सरळ न म्हणता "भाऊच्या आईचे मिश्टर" असे म्हणण्याची पद्धत फक्त किरकिरे काकाच आणू जाणत. हे एक उदाहरण झाले, अशी पुष्कळ आहेत. पूर्वी कापरेकर नावाच्या मराठी गणितींनी जशी एक विशेष संख्या शोधून काढली व त्याला "कापरेकर स्थिरांक" असे नाव दिले गेले, तद्वत किरकिरे काकांच्या विनोद पद्धतीस "किरकिरे हास्यशास्त्र पद्धती" असे काहितरी द्यायला हरकत नाही. यातून स्टॅन्ड-अप कॉमेडी सारखे "बैठ्या हास्य मैफिलीचे प्रयोग" होऊ शकतात. 

सार्वत्रिक संवाद हरवलेल्या आताच्या काळात आपल्या खुलेपणामुळे हा सत्तर वर्षांचा तरुण आपल्या अठ्ठ्याणव वर्षांच्या जास्तच चिर तरुण आणि पुढारलेल्या बापाबरोबर शेवटपर्यंत घट्ट संवाद ठेवून होता. एक-दिवसाआड जन्मतारीख असलेल्या या बाप लेकांनी जगाचा निरोप घेतानाही एक-दिवसाआडच तारीख निवडावी आणि तो संवाद पुढे स्वर्गातही सुरूच ठेवावा अशीच नियतीची इच्छा असावी! सुमारे एकशे सत्तर वर्षांच्या एकत्रित इतिहासाची, अनुभवाची, अस्तित्वाची मोठी पोकळी मात्र नियतीने सर्वांसाठी बनवून ठेवली आहे!

काकूंना देवाघरी जाऊनही जवळ जवळ वीस वर्षे होत आली, ते दुःख भोगणे कमी पडले म्हणून की काय अलीकडचे कॅन्सरचे आजारपण - हे सर्व काकांनी समर्थपणे नुसते झेललेच नाही तर सकारात्मक राहून मुलाचे/सून/नातवंडांचे जे-जे चांगले होते आहे त्याकडेही लक्ष दिले, आपल्या परीने सर्वतोपरी हातभार लावून कर्तव्ये निभावली! आता मंग्याबरोबर आम्ही असंख्य मित्र-मैत्रिणी, त्यांची भाचरे, पुतणे सर्वचजण पोरके झालो आहोत. कारण बाप एकच असला तरी अशी बापमाणसे मात्र कळत-नकळत सर्वांच्या नाजूक भावविश्वाचा आणि संस्कारांचा भाग बनून जातात. इतके लिहूनही काय गमावले त्याचे वर्णन करणे काकांबाबत शक्यच नाही. मनातला तो एक हळहळणारा कोपरा आम्ही कायमचाच त्यांना बहाल केलेला आहे. 

तो नाजूक कोपरा जपत आपण फक्त त्यांच्या आत्म्यास शांती लाभो एवढी प्रार्थनाच करू शकतो!

~ गोड्या