Monday 12 September 2022

एलिझाबेथ द्वादशी - एक उपाहासाची कहाणी! !

ग्रेट ब्रिटनची राणी एलिझाबेथ (दुसरी) वयाच्या शाहाण्णव्याव्या वर्षी वारली. तिच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील शेवटच्या - म्हणजे पंधराव्या पंतप्रधानांची पहिली भेट भाद्रपद एकादशीस घेऊन द्वादशीस तिने प्राण सोडला. मुहुर्त बघायची आपली पद्धत विलायतेस स्वीकारली गेली आहे याचा यापेक्षा अजून काय पुरावा हवा? आता यापुढील गणेशोत्सवातील द्वादशी हि एलिझाबेथच्या नावाने ओळखली जाईल. यानिमित्ते बकिंगहॅम पॅलेसमध्ये बसविला जाणाऱ्या गणपतीची प्रथा सुतकामुळे कायमची रद्द करण्यात आली आहे. याची विलायतेतील भारतीयांनी (इंडियन डायस्पोरा!) कृपया नोंद घ्यावी.  

आधीच स्वर्गवासी झालेल्या तिच्या ज्येष्ठ सुनेस भेटावयास राणी गेली असेल असे वाटत नाही. हयात असताना दोन्ही बायकांमधून विस्तव जात नसे. राणीने चित्रगुप्तास (का सेंट पीटर्स गेटवरील द्वारपालास) "ह्या सटवीचे तोंड रोज बघण्यापरीस नरक बरा" असे म्हंटले असेल किंवा काय याची माहिती तिचा तेरावा-चौदावा घालून आत्मा मुक्त झाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. 

तोपर्यंत इहलोकी तिची सून जरी नसली तरी नवीन पंतप्रधान "बाईचा" पायगुणच कसा वाईट! असे म्हणून आपण समाधान मानून घेऊ. ती जरी आपली राणी नव्हती तरी तिची पणजी व्हिक्टोरिया आपली राणी (मानो या ना मानो!) होती. पणजीचा ६३ वर्षे राज्यकारभाराचा विक्रम कधीच मोडून तिने नुकती ७० वर्षांची प्लॅटिनम ज्युबिली साजरी केली होती. 

ब्रिटनला राणी असेल तर राजा नसतो. राणीच्या नवऱ्यास प्रिन्स (फिलिप) - राजपुत्र असेच म्हंटले जाते. तो तिचा नवरा कायम तिच्या मागूनच चालत असे. हा काय खुळेपणा आहे? आपल्याकडे राणीस (काही नियम सिद्ध करणारे सन्मान्य अपवाद वगळता) राजा असतो. किंबहुना राणी हि राजाचीच असावी लागते, स्वयंभू नव्हें. आता कॅमिलापासून तरी हा पायंडा बदलेल अशी आशा करूया. पुढील पिढयामंध्ये मुलगी गादीचा पहिला वारस असेल तर, तिच्या नवऱ्यास राजा बनवले जावे हि सुधारणा आपल्या भारतीय वंशाच्या काही खासदारांनी लवकरच ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आणावी - सून(क) रहे हो ना प्रीती से ये बात? .

राणी गेल्यावर तिचा मुलगा चार्ल्स (तिसरा) राजा झाला. पहिल्या दोन चार्ल्सची कारकीर्द काही वाखाणण्यासारखी नव्हती. एकमेकांचे बाप-लेक असलेल्या या दोघांपैकी पहिल्या चार्ल्सची त्याच्याच कूकर्मातून हत्या झाली आणि दुसरा बरीच वर्षे अज्ञातवासात होता. असल्या नतद्रष्ट राजांची नावे मूळात आपल्या बाळास द्यावीत का? अर्थात एलिझाबेथ (दुसरी) ला कॉरोनेशनच्या आधीच दोन मुले झाली असल्याने - ती राजेपद मिळवू शकतात याची तिला कल्पना नसावी. याबाबतीत राजपुत्र विल्यम याने मात्र वेळीच शहाणपणा दाखवला - आपल्या थोरल्याचे नाव जॉर्ज ठेवून त्याची राजा बनायची शक्यता वाढवली (आधीचे सहा जॉर्ज राजे झाले, हा सातवा असेल). आपल्याकडे देवांची नावे मुबलक असल्याने नामचीन गुंडांनाही गजानन, नारायण अशी बालपणी दिलेली नावे असू शकतात. इंग्रजांनी निम्मे जग लुटले, तरी नावांचे दारिद्रय काही इंग्रजांना मिटवता आले नाही. मग तीच तीच भ्रष्ट नावे ठेवावी लागतात!

राहता राहिला प्रश्न कोहिनूरचा. राणीच्या एका मुगुटात घालून ठेवलेला हा हिरा आता राजाला काय करायचाय? तसले हिरे बायकांसाठी असतात. पायजे असल्यास आपल्या राणीस चार्ल्सने दुसरा विकत घेऊन द्यावा. आमच्या इथल्या कित्त्येक म्युझिअम्सची पायधूळ त्याची वाट पाहत आहे! प्रस्तुत लेखकाने कोहिनूर पाहिला पण त्याला तो दिसला असे ठामपणे म्हणू शकत नाही. टॉवर ऑफ लंडन मध्ये तीनदा चकरा मारूनही त्या पांढऱ्या फटक हिऱ्यातले सौन्दर्य काही दिसेना. तेंव्हा तो हिरा आपल्या भारतीय म्युझिअममधील धुळीच्या कोंदणातच चांगला दिसू शकतो याचा साक्षात्कार झाला. ह्याच लेखकाने जेंव्हा "कोहिनूरच पायजे" असा हट्ट आपल्या भावी सासऱ्यांकडे धरला, तेंव्हा त्या चतुर गृहस्थाने मुलीचे लग्न चक्क कर्वे रोडवरील कोहिनूर कार्यालयात लावून जावयाची इच्छा पुरविली. असा तो कोहिनूर आपल्या देशवासियांना कायम हुलकावणी देत आला आहे. 

आपण भारतीय वासाहतिक मनस्थितीमधून हळूहळू मधून बाहेर येताना इंग्रजांनी मात्र भारतीय संस्कृतीचे अनुकरण सुरु केले आहे असे चाणाक्ष लोक सांगतात. याचा पुरावा म्हणजे राणीने प्रतिकांचे महत्व फार ओळखले होते. आपला मुगुट घातलेला फोटो तिने रॉयल पोष्टाच्या ष्टाम्पवरून कधीच हटवू दिला नाही. तिचे चित्र जनांमध्ये कायम दिसत राहावे याची चोख व्यवस्था राणीने करून ठेवली होती. एव्हढेच नव्हें हिच्या आजोबांनी जर्मन वंशाशी संबंध दाखवायला नको म्हणून स्टुअर्ट हे आपले आडनाव बदलून विंडसर असे स्व-देशी ठेवले होते पहिल्या महायुद्धात. ह्या सगळ्या आयडिया पण यांनी आमचेकडून चोरल्या होत्या हे आता पटते. राणीच्या काहीच दिवस आधी गेलेल्या - जगातील तात्कालिक दुसरी महासत्ता असलेल्या रशियाचे पूर्व अध्यक्ष गोर्बाचेव्ह - यांनी वैराग्य धारण करून जनतेची वाटच लावली ना? मग त्यापेक्षा सर्व उपभोगून आणि आपल्या कुटुंबाची व्यवस्था करून देश गाळात जाणार नाही हे राणीने बघितले. लोकशाहीचा उत्तम उपयोग तिने राजेशाही टिकवण्यासाठी केला. यापेक्षा वेगळा धडा ते आपल्याकडून काय घेणार होते? अजूनही काही लोकं जगात राजेशाही नको अशा बोंबा ठोकतात याला काय म्हणावे? लोकांनी मतपेटीतून दिलेले मत हे राजेशाही साठी असते हे ह्यांना कधी कळणार?

जाता जाता एक गोष्ट मात्र खटकली. राणीचा अंत्यसंस्कार करायच्या आधीच चार्ल्सने राजपदाची सूत्रे स्वीकारली. हे काही बरोबर नाही. सुतकात उठसूठ हा माणूस बाहेर लोकांना कसा भेटतो, लाडक्या ममाचा पार्थिव देह शवागारात असताना राजा म्हणून कसा मिरवतो ? राजाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणे हे आपले कर्तव्य आहे. आपण कसे आता ड्युटीवर लागलो आहोत. आता कोणतीच गोष्ट ड्युटी-फ्री राहिली नाही, तद्वत चार्ल्सला याची जाणीव करून देणे आपले कर्तव्य आहे. त्याने पुढील वेळेस राजा म्हणून मुंबईच्या डबेवाल्यांची भेट घेण्यापूर्वी तरी नक्कीच!

असो! राणीच्या आत्म्यास लवकर शांती लाभो! फार वेळ ठेऊ नका रे आता बाबांनो, हॅरी-मेगन पण पोचलेत!

~हरि पुत्तर