Friday, 18 November 2016

[लंडन ब्रीजवरून] - देअर इज नो प्लॅन "बी"

बीबीसीच्या निक रॉबिन्सन नावाच्या राजकीय संपादकाने 2015 च्या सार्वजनिक निवडणुकीपूर्वी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरूनना प्रश्न केला. आपण हे जे काही युरोपिअन युनियनवर सार्वमत घ्यायचे वचन देत आहात ते विरोधात गेले तर? डेव्हिडनी उत्तर देण्यात टाळाटाळ केली, अशी शक्यताच फेटाळून लावली. निकने नेटाने विचारले - नाही तरीपण प्लॅन-बी काय आहे? डेव्हिड कानकोंडले झाले..... देअर वॉज नो प्लॅन-बी!!!

डेव्हिड कॅमेरून हे जरी हुशार, डिप्लोमॅटिक आणि जाणते नेते असले तरी ते आपल्याच टोरी पक्षातील मागील बाकांवरील खासदारांना खूष ठेवण्यात कमी पडले. युरोपचा वर्षानुवर्षे भिजत पडलेला प्रश्न अजूनच चिघळत होता. युके ७० च्या दशकात युरोपिअन युनिअन मध्ये सामील झाल्यापासून युनिअन विरोधी विचार अस्तित्वात होते.  सुमारे 10/12 वर्षांपूर्वी पोलंड आणि रुमेनिया युनियन मध्ये सामील झाल्या नंतर लोकांचे लोंढे युकेमध्ये आले. याचा व्हायचा तो परीणाम येथील आरोग्य व इतर व्यवस्थांवर झाला. लोक बेनेफिट्स घेऊन आपल्या पोलंडमधील फॅमिलीस पैसे पाठवू लागले. युरोपिअन युनियन ब्रिटिश लोकांच्या मनातून आणखीनच उतरली. याचा सर्वाधिक परीणाम मध्य इंग्लंडमधील जनतेवर झाला. युनायटेड किंगडम इंडिपेंडन्स पार्टी (युकीप) ला पाठिंबा वाढू लागला, त्यांचे लोक युरोपिअन पार्लमेंटमध्ये निवडून येवू लागले. ही पार्टी मुळात युनियनला विरोध करण्यासाठीच स्थापन झाली होती.  युनिअन मधून बाहेर पडावे हि मागणी युकिप व काँझर्व्हेटिव्ह पार्टीमध्येही जोर धरू लागली. कॅमेरूनना रेफरॅण्डम/सार्वमत घेण्याशिवाय पर्याय नव्हता. स्वतःच्या हाताने त्यानी आपली कबर खोदायची ठरविली व दिवस ठरला 23 जून 2016!!

बोरीस व डेव्हिड - तू तू -मैं मै  
विरोधी लेबर/मजूर पार्टी हि युरोपियन युनियनच्या बाजूने होती. मुख्य विरोध हा हुजूर पक्षात होता. हि संधी चालून आल्यावर बहुतांश युरोसेप्टिक म्हणजे युरोप ची ऍलर्जी असणारे लोक फुटले. इअन डँकन स्मिथ नावाचे जुने मंत्री व पार्टी अध्यक्ष, त्यांच्याबरोबर प्रीती पटेल नावाच्या मंत्री हे दोघे बाहेर पडले. डेव्हिड कॅमेरून यांचे एक जुने (नंबर १० मधील) सल्लागार स्टीव्ह हिल्टन ब्रेक्झिट कॅम्पमध्ये गेले होते, तेव्हापासून डेव्हिडचे आणि त्यांचे बोलणे बंद झाले. कॅमेरुनचे एक जवळचे सहकारी, मित्र, शिक्षणमंत्री  मायकेल गॉव्ह यांचे वेगळे होणे हा सर्वात मोठा धक्का होता. याशिवाय इतर काही बॅकबेंचर्सच्या मोहिमा सुरूच होत्या. लंडनचे त्यावेळचे महापौर डेव्हिड जॉन्सन हे एक हरहुन्नरी, सदाबहार आणि बोलघेवडे व्यक्तिमत्व. आपल्या ऑफिसमध्ये सायकलवर येणारे बोरिस त्यांनी सुरु केलेल्या "बोरिस बाईक" उपक्रमामुळे व लंडनमधील ट्रॅफिक कंजेशन चार्जमुळे खूप लोकप्रिय होते. 2015 ची निवडणूक टोरी पक्षास जिंकून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. अर्थमंत्री जॉर्ज ऑसबोर्न व गृहमंत्री टेरेसा मे नंतर पुढील पंतप्रधान पदावर त्यांचाच दावा असणार होता. त्यांचा निर्णय - म्हणजे ब्रेक्झिटची बाजू कि रिमेनची बाजू घ्यायची - अजून व्हायचा होता. मायकेल गोव्हनी त्यांना खेचण्याचा परोपरी प्रयत्न केला. शेवटी काही दिवस सर्व राजकीय समीकरणांचा विचार करून बोरिस ब्रेक्झिट कॅम्पमध्ये दाखल झाले!!! तेही आपले ईटन शाळा  व ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील परममित्र डेव्हिड कॅमेरुनना केवळ एक मेसेज करून. राजकीय ठिणगी उडाली. इथून पुढे जोरदार वाकयुद्ध होणार होते. दोन्ही बाजूंकडे तुल्यबळ भाषापटू होते. युकीप पार्टीचे नायजेल फराज तर पुढे होतेच. पण बोरिस आल्याने त्या कॅम्पला एक नवीन परिमाण मिळाले. बस्स, आता पुढचे तीन महिने नुसता धुमाकूळ होणार होता. रिमेन कॅम्पवाल्यांनी आपली अर्थव्यवस्था कशी प्रबळ आहे व ती युरोपावर अवलंबून आहे याचे दाखले दिले. ब्रेक्झिटवाल्यानी बेबंद इमिग्रेशन व नॅशनल हेल्थ सर्व्हिसवर होणारा अमाप खर्च, युरोपियन युनियनला दर आठवड्याला जाणारे 300 मिलियन पौंड इत्यादी मुद्दे लावून धरले. रेफ्रेण्डमचा उत्साह शिगेला पोहोचला. दोन्ही बाजूंकडून तुल्यबळ लढतीं झाल्या, वादविवाद झाले. डेव्हिड कॅमेरूननी तर बराक ओबामांना बोलावून त्यांच्याद्वारे लोकांना एक हळुवार धमकी देऊन पाहिली!  बोरिस जॉन्सनना खरेतर ब्रेक्झिट नको होते. पण आपण थोड्याफार  फरकाने हरलॊ तरी आपल्याला राजकीय गुण मिळतील व पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पुढचा नंबर मिळेल या गणितावर त्यांनी तो एक जुगार खेळला होता अशा बातम्या नंतर आल्या. सध्याच्या पंतप्रधान टेरेसा मे या न्यूट्रल होत्या,  त्यामुळे डेव्हिड कॅमेरून त्यांना चिडून बोलले व मग त्यांनी रिमेन कॅम्पेनला पाठिंबा जाहीर केला असेही नंतर कळले. तीन माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, जॉन मेजर आणि गॉर्डन ब्राऊन यांनी एकत्र येऊन एका मंचावर रिमेनसाठी भाषणे दिली. या लढाईत शत्रू मित्र झाले आणि मित्र शत्रू! 

...  आणि तो दिवस उजाडला. २३ जूनला दिवसभर मतदानासाठी लोकांची रीघ लागली. रात्रीच मतमोजणी सुरु झाली. जिब्राल्टर या ब्रिटन च्या ताब्यातील स्पेनजवळील बेटावरून  पहिला निकाल आला तो रिमेनच्या बाजूने - अगदी भरघोस मतांनी. यापुढील काही निकालही तसेच होते. त्यामुळे  रिमेन कॅम्पेन अगदी आरामात जिंकेल आणि ब्रेक्झिट होणार नाही असेच वाटू लागले.  उत्तररात्रीनंतर चित्र बदलले. बहुतेक निकाल हे विरोधात जाऊ लागले. युकीपच्या नायजेल फराज यांनी आधीच हार  घोषित केली होती!  पण त्यांनी आपला पवित्रा बदलला. पहाट होऊ लागली तशी ब्रेक्झिट कॅम्पमध्ये जल्लोषाची तयारी होऊ लागली. रिमेनवाल्यांचा विरस होऊ लागला. शेवटी एकदा पहाटे ६ वाजता ब्रिटन युरोपातून बाहेर पडणार यावर शिक्कामोर्तब झाले आणि विविध वाहिन्यांवर त्याच्या विश्लेषणाची सुरुवात झाली. ५२ टक्के आणि ४८ टक्के असा दोन्ही गटांतील मतांत फरक होता.

नायजेल फराज - विजयोन्माद 
१० डाउनिंग स्ट्रीट मधील घरात पंतप्रधान कॅमेरून आपल्या सल्लागार मंडळ व इतर निकटवर्तीयांबरोबर निकालावर नजर ठेऊन  होते. रात्री सर्वांनाच असे वाटले होते कि आपली रिमेनची बाजू आरामात जिंकेल. डेव्हिड कॅमेरुननी युरोपात जाऊन वाटाघाटी करून ब्रिटन साठी एक सौदा कबूल करवून आणला होता. पण तो पुरेसा नव्हता. लोकांनी त्याविरोधातच मतदान केले. पहाटे पहाटे सगळी चक्रे हलली. सकाळी ८ वाजता पंतप्रधान डाउनिंग स्ट्रीटवर आपले स्टेटमेंट देतील असे जाहीर झाले. एव्हाना त्यांनी सर्वांबरोबर चर्चा करून राजीनामा द्यायचा निर्णय नक्की केलाच होता. आता ब्रेक्झिटच्या वाटाघाटींचा भार मी आपल्यावर का घेऊ, हे अवघड काम त्यांनी करावे ज्यांना ब्रेक्झिट हवे आहे. असे ते खाजगीत म्हणाले. इकडे त्यांचे परममित्र मायकेल गॉव्ह रात्री 10 वाजता एखाद्या शाळकरी मुलाप्रमाणे घरी झोपून गेले. त्यांनीही जिंकण्याच्या फारश्या आशा ठेवल्या नव्हत्या. पहाटे साडेपाचला - डेली मेल वृत्तपत्रात पत्रकार असणाऱ्या त्यांच्या बायकोने त्यांना हलवून उठवले. मायकेलनी उठतांच चष्मा लावत तोंडात बोटे घातली. आता प्रतिक्रियांसाठी पत्रकार गर्दी करतील त्यामुळे लवकर तयार व्हावे लागेल. तिकडे बोरीस जॉन्सन आपल्या मित्रमंडळासोबत टी.व्ही.वर निकाल बघत होते. त्यांच्यादृष्टीने अनपेक्षित व नकोसा निकाल लागला होता. आत्तापर्यंत ते ब्रेक्झिटकॅम्पचे हिरो झाले होते व रिमेनर्ससाठी व्हिलन. युकीप पक्षाचे अध्यक्ष नायजेल फराज हे आता वेस्टमिनिस्टरजवळ विजयोत्सव साजरा करत होते, टीव्ही चॅनेल्सना मुलाखती देत होते. 23 जून हा ब्रिटनचा स्वातंत्र्यदिन आहे असे त्यांनी घोषित केले.  स्टीव्ह हिल्टन (कॅमेरुनचे जुने सल्लागार ) रात्रभर टीव्ही चॅनेल्सना इंटरव्ह्यूज देऊन पहाटे एका मित्राच्या घरी परतले होते.  हा मित्र म्हणजे - रोहन सिल्व्हा - अजून एक रिमेंनर व कॅमेरुनचा जुना सल्लागार.


राजीनामा देताना, अश्रुपूर्ण पत्नी 
ठीक 8 वाजता डेव्हिड कॅमेरून डाऊनिंगस्ट्रीट मधील आपल्या घरातून बाहेर आले. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी समंथाना पाहून स्टिव्हच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, डेव्हिड राजीनामा देणार हे त्यांच्या लक्षात आले. ते जरी ब्रेक्झिट कॅम्पचे होते तरी आपल्या मित्राचे पंतप्रधानपद जाईल हा विचार त्यांनी केला नव्हता. त्यांनी काय कुणीच नाही. पडत्या फळाची आज्ञा घेऊन डेव्हिडनी राजीनामा दिला व जाहीर केले कि 3 महिने ते हे पद सांभाळतील पण सप्टेंबर मध्ये होणाऱ्या काँझरव्हेटिव्ह पार्टीच्या कॉन्फरन्समध्ये नवीन पक्षाध्यक्ष निवडला जाईल. अवघ्या काही मिनिटांच्या आत सकाळी सुरु झालेला शेअर बाजार पडला. 101 रु प्रति गेलेला पौंड स्टर्लिंग एकदम 86 रुपयांवर आला, 15 टक्के खाली!! 30 वर्षातील निच्चान्क! याबरोबर जगातील इतर शेअर बाजारही पडले. काय घडलंय हे कुणालाच कळत नव्हतं. ब्रिटनची जगातील किंमतच एकदम कमी झाली आहे असा भास होत होता. युरोपियन युनियन, फ्रांस, जर्मनीमधून कुत्सित प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. लोक हतबल झाले, ज्यांनी ब्रेक्झिटसाठी थोड्या माहितीवर आधारित मतदान केले होते ते पश्चात्ताप करू लागले.  11 वाजता ब्रेक्झिट कॅम्पने पत्रकार परिषद आयोजित केली होती. बोरिस जॉन्सन यासाठी घरातून बाहेर पडत असताना लोकांनी विरोधात घोषणा दिल्या. मायकेल गॉव्ह, बोरिस यांनी पत्रकार परिषदेत भाषणे केली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी विजयोन्माद दिसू दिला नाही व दोन्ही बाजूंचा विचार करूनच ब्रेक्झिट पुढे सरकेल अशी वाच्यता केली. शेवटी 48% रिमेनर्सच्या भावनांना साद घालणे आवश्यक होते. इकडे लेबर पार्टीतही वाकयुद्ध सुरु होते. मूळात युनियनच्या बाजूने असणाऱ्या या मजूर पक्षाने  जास्ती प्रचार करणे आवश्यक होते. पण त्यांचे अध्यक्ष डाव्या विचारसरणीचे  कॉर्बिन यांनी उत्साह दाखविला नाही अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली. लंडनचे नवनियुक्त लेबर मेयर (पाकिस्तानी वंशाचे) सादिक खान यांनीही नंतर हल्ला चढविला व लंडनला काही प्रमाणात स्वायत्तता द्यायची मागणी केली (उदाहरणार्थ लंडनसाठी स्वतंत्र व्हिसा वगैरे). 

मायकेल व बोरीस - ब्रुटस व ज्युलिअस सीझर
पुढील काही दिवसात काँझरव्हेटिव्ह (टोरी) पार्टीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु झाली. अर्थमंत्री (चॅन्सेलर) जॉर्ज ऑसबोर्न हे रिमेनर होते, हे कारण सांगून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. गृहमंत्री टेरेसा मे या जरा न्यूट्रल होत्या, त्यांनी लगेच आपली उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर लोकांच्या नजरा बोरिस जॉन्सनवर खिळल्या होत्या. ते मात्र आपल्या टीमला एकत्र आणण्याचा ऐवजी ऑक्सफर्ड मध्ये क्रिकेट खेळत बसले आणि पार्ट्या अटेंड करीत राहिले. त्यांच्याकडे ठोस मंत्रिपदाचे वचन मागणाऱ्या वरिष्ठ नेत्या अँड्रिया लीडसम यांनी बोरीसकडून चालढकल होते आहे असे समजून स्वतंत्र उमेदवारी जाहीर केली. यामध्ये काहीतरी कम्युनिकेशन गॅप होती. अँड्रियाना पाठवलेले पत्र त्यांना वेळेत मिळालेच नाही. बोरीसची कॅम्पेन मॅनेज करणाऱ्या मायकेल गोव्हना उत्तम मंत्रिपद मिळणार हे नक्की होते. सारा व्हाईन या त्यांच्या पत्नीने त्यांना सल्ला दिला कि बोरीसकडून सगळे पदरात पाडून घ्या. 'Be at your stubborn best' असे नवऱ्याला लिहिलेली त्यांची ईमेल फुटली. याप्रकाराने थोडी चलबिचल झाली. टेरेसा व अँड्रियाशिवाय अजून दोन व्यक्तींनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. अर्ज भरण्याच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी बोरिस जॉन्सन आपला अर्ज भरणार होते. आदल्या रात्री त्यांचे एक कॅम्पेन सहकारी यांना मायकेल गोवकडून फोन आला व ते कॅम्पेन ऑफिसमधून तडक त्यांच्या घरी गेले. रात्रीत चक्रे हलली आणि सकाळी 9 वाजता गोव्हनी बोरीसचे प्रसिद्ध कॅम्पेन मॅनेजर सर लिंटन  क्रॉस्बी यांना फोन  करून सांगितले "हाय लिंटन, इट्स मायकेल गॉव्ह हिअर...आय एम रनिंग!"... "रनिंग व्हॉट?"
टेरेसा मे व जॉर्ज ओसबॉर्न - पंतप्रधानपदाचे
 दोन दावेदार 
..."... लीडरशिप इलेक्शन मायसेल्फ!"... आणि आपलाच स्वतःचा अर्ज भरला! हा प्रचंड मोठा विश्वासघात होता बोरिस जॉन्सनबरोबर. त्यांना या धक्क्यातून सावरणे कठीण होते. लिंटननी त्यांना बातमी दिली आणि माघार घेण्याचा सल्ला दिला. 12 वाजता मुदत संपण्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली व आपण अध्यपदासाठी इच्छुक नसल्याचे जाहीर केले आणि आपला पाठिंबा अँड्रिया लिडसमना असल्याचे सांगितले. बीबीसीने दुपारी मायकेल गॉव्हची मुलाखत घेतली व या धक्कयाचे कारण विचारले. तेव्हा ते म्हणाले गेल्या 2 आठवड्यातील बोरीसची वर्तणूक गंभीर नव्हती, हि तयारी त्यांनी अगदीच कॅज्युअली घेतली होती. ते पंतप्रधानपद सांभाळू शकतील याचा मला विश्वास राहिला नाही. पण हि गोष्ट त्यांना आधीच समजायाला हवी होती. "तूच का तो बृटस" वगैरे मथळे टाकून प्रसारमाध्यमांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडविली. या प्रकाराने बोरीसना मात्र खूप सहानुभूती मिळाली. अत्यंत पोरकट विश्वासघात करून मायकेलनी आपले जिंकण्याचे चॅन्सेसहि घालवले. यानंतर बोरिस जॉन्सन वॉज "ब्रेक्झिक्युटेड!" असा नवीन वाक्प्रचार पडला. कॅमेरुननी बोरीसना मेसेज केला "यु शुड हॅव्ह स्टक विथ मी मेट !! ".

 मायकेल व इतर दोघे प्राथमिक एलिमीनेशन राउंड मधूनच गळाले.  राहिल्या त्या दोन स्त्रिया अँड्रिया लीडसम आणि टेरेसा मे. बरेच वर्षांनी ब्रिटनला एक स्त्री पंतप्रधान मिळणार होती. टेरेसा यांचा अनुभव व मिळणारा पाठिंबा जास्त असल्याने त्याच जिंकण्याची शक्यता होती. अँड्रिया या माजी इन्व्हेस्टमेंट बँकर असून त्यांना लंडनच्या फायनॅन्शियल मार्केट्सचा चांगला अनुभव होता.  दोन मुले व पतीबरोबर त्या राहतात. टेरेसांना मात्र मूलबाळ नसून त्या प्रथमपासूनच राजकारणात सहभागी आहेत. एके रविवारी टाइम्स मधील इंटरव्हयूमध्ये अँड्रियांनी असे विधान केले कि "मला मुले असल्याने या देशाच्या भवितव्यात माझा खराखुरा सहभाग आहे"... हे विधान टेरेसांच्या विरोधात केल्याची शक्यता होती. त्यामुळे खूपच गदारोळ झाला आणि त्यांनीही निवडणुकीतून माघार घेतली!टेरेसांचा मार्ग मोकळा झाला.

दुसऱ्या दिवशी लगेचच डेव्हिड कॅमेरुननी राजीनामा देऊन १० डाउनिंग स्ट्रीट सोडण्याचा निर्णय जाहीर केला. व एक-दोन दिवसात टेरेसांनी पदाची शपथ घेतली सुद्धा. कॅमेरुनच्या एका स्वप्नकहाणीचा असा झटक्यात शेवट झाला. ११ वर्षे पक्षाध्यक्षपद आणि ६ वर्षे पंतप्रधानपद भूषवून एक दिवशी अचानक ते पायउतार झाले. १० डाउनिंग स्ट्रीट सोडून ते वेस्ट लंडनमधील एका मित्राच्या घरी राहावयास आले कारण त्यांचे स्वतःचे घर भाड्याने दिले होते! पदावर आल्या आल्या टेरेसांनी आपली काटछाट सुरु केली. कॅमेरुनच्या मर्जीतील काही मंत्र्यांना नारळ दिला. जॉर्ज ओसबॉर्न हे पंतप्रधान पदाचे एक दावेदार, अर्थमंत्री - त्यांना काढून टाकले. लंडनमधील नॉटिंग हिल भागात राहणाऱ्या या एलिट क्लासचा पत्ता कापला गेला. बोरिस जॉन्सनना मात्र टेरेसांनी बोलावून परराष्ट्र मंत्री केले आणि इतर दोन ब्रेक्झिट वाल्यांना मंत्रीपदे दिली. डेव्हिड डेव्हिस, लायम फॉक्स व बोरीसना "थ्री ब्रेकझिटिअर्स " असे नाव पडले. आपल्याच हाताने पायावर धोंडा मारून घेतलेले मायकेल गॉव्ह - नंतर एका पुस्तकाच्या दुकानात नवीन वाचनीय साहित्य शोधताना सापडले.

केवळ तीन आठवड्यात या गोष्टी इतक्या भराभर घडल्या होत्या. काही स्वप्नाचा चक्काचूर झाला आणि काही नवीन स्वप्ने निर्माण झाली. ब्रिटनमध्ये वैचारिक फूट पडली. स्कॉटलंडच्या मंत्री निकोला स्टर्जन पुन्हा वेगळे व्हायची भाषा करू लागल्या कारण तिथला निकाल रिमेनच्या बाजूने लागला होता. नॉर्दन आयर्लंडचा निकालही फारसा वेगळा नव्हता. आयर्लंड राष्ट्र युरोपियन युनिअन मध्ये असल्याने तेथील इमिग्रेशनला भाव आला. एकंदरीत या रेफेरेंडममुळे ब्रिटन अस्थिरतेच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला. डेव्हिड कॅमेरूनची "लेगसि " बाकी सर्व गोष्टी पुसून या एका गोष्टीने लिहिली गेली. आपण बॅकबेंचर खासदार राहू असे त्यांनी जाहीर केले होते. काही दिवसांनी मात्र टेरेसा आपल्या पॉलिसीज व आपले लोकहि बदलत आहेत हे पाहून त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. आता ते आपल्या स्मृतींवर  पुस्तक लिहिण्याच्या कामी मग्न झाले आहेत. 

ब्रेक्झिट होईल हा अंदाजच न आल्याने - त्यासाठी कोणताही सरकारी प्लॅन नसणे  - हि त्यांची मोट्ठी चूक होती. तीच त्यांना भोवली - नो प्लॅन "बी "....

.... पण आता अमेरिकेतही ब्रेक्झिटचे वारे लागून ट्रम्प निवडून आल्याने ब्रिटनमध्ये थोडा उत्साह आला आहे...अमेरिकेकडून नवीन व्यापारी करार होण्याचा!