पूना बोर्डिंग - एक विरासत!
पूना बोर्डिंग ...पुण्याच्या सदाशिव पेठेतील पेरुगेटाजवळचं एका जुनाट वाड्यासारख्याच बिल्डिंगमधले पूर्वापार चालत आलेले हॉटेल. अगदी पूर्वी हि एक मासिक खाणावळ होती आणि नंतर त्याचे भोजनालयात रूपांतर झाले. इथे अत्यंत रुचकर व सात्त्विक असे चौरस जेवण गेली ७० एक वर्षे अव्याहतपणे मिळत आहे. या पूना बोर्डिंगचे प्रेमी असलेले लोक कित्येक वर्षे इथल्या जेवणाचा आस्वाद घेत आहेत.
संध्याकाळी पावणे आठाला पहिलं गिऱ्हाईक आत शिरतं आणि कूपन घेऊन कोपऱ्यातल्या टेबलाच्या अति-कोपऱ्यातल्या एका "टेहेळणी बुरुज" छाप खुर्चीवर विराजमान होतं. या जागेवरुन पूर्ण हॉटेलकडे नजर ठेवता येते. नवीन आलेले कोण कुठे बसतायत, त्यांना कोणती चटणी वाढली जातेय, कोण स्वीट डिश घेतंय इत्यादी गोष्टींवर बारीक लक्ष देणे सोपे होते. वाढप्याकडून कूपन घेऊन समोर ताटात मलईचा पदर असलेलं दही आणि भाजका पापड ठेवले जातात. नेहेमीचं गिऱ्हाईक असेल तर दही परत करून ताक मागतं अथवा दह्यातच साखर. यानंतर डाव्या बाजूला काकडीच्या मोठ्या रानटी कापांची, कधी टोमॅटो घातलेली, भरपूर साखरपेरणी झालेली - दाणकुटाची कोशिंबीर आणि छोट्या वाटीत गोड-गूळमट पण चविष्ट आमटी येते. पोळीवाला मध्येच येऊन पोळ्या वाढून जातो. मग ते अधीर गिऱ्हाईक पहिला घास कोशिंबिरीचा घेतं - काकडीच्या कापांएवढ्याच रानटीपणे. आणि वरून आमटीचा घोट-भुरका. हा पहिला घास मुखामध्ये चर्वित झाल्यानंतर दिवसभराचा शिणवटा एकदम निघून जातो. एव्हाना बिरड्याची उसळ उजवीकडे आणि डाळमेथी वाटीमध्ये पडलेली असते. मध्येच एक वेटर समोरच्या ताटात मूठभर कांद्याच्या फोडी, लिंबं आणि दाण्याची तिखट चटणी भरून जातो. कांदा महाग असेल तर तो फारसा ठेवला जात नाही. पलीकडच्या टेबलवर एक-दोन जण "वाढ"लेले असतात. ते कूपन घेऊन येताना ह्याच्याकडे बघत बघत येतात त्यामुळे गिऱ्हाईकाला वाटतं, एवढी टेबलं पडलेली असताना इकडे कशाला येतायत (बसायला!). या भीतीतून कांद्याच्या चार फोडी व बचकभर चटणी आपल्या पानात सरकवली जाते. पुन्हा मिळेल न मिळेल!
हळूहळू एकेक टेबल भरू लागते. गिऱ्हाईक नेहेमीचं असेल तर सगळे वाढपी ओळखीचे असतात. हे तिथे सुमारे पाचशे वर्ष काम करीत आहेत. आणि ह्यांची ओळखच अडीचशे वर्षांपूर्वी - जेव्हा हे गिऱ्हाईक यायला सुरु झालं तेंव्हापासून आहे. पानिपतावरून सदाशिवराव भाऊंचा तोतया आणि हे गिऱ्हाईक एकाच वेळी पुण्यात आल्यामुळे त्या लढाईच्या वर्णनापासून ते आजच्या चीनच्या आगळिकीपर्यंत सर्व इत्थंभूत माहिती त्याच्याकडून मिळू शकते. इथल्या वाढप्यांच्या निष्ठा बोर्डिंगला पूर्णपणे वाहिलेल्या असतात. जशी हि वाढप्यांची परंपरा तशीच आचारी आणि त्यांच्या पदार्थांचीही! त्यातून पांढऱ्या शुभ्र वाफाळत्या भाताच्या ढीगाचे ताट घेऊन येणारे काका हे हिमालयात तपश्चर्या करणाऱ्या ऋषिंपेक्षा जास्त वर्षे तिथे आहेत - ऋषींना मोक्ष मिळतो - यांना मिळत नाही! हे गिऱ्हाईकाला मात्र मोक्ष मिळवून देतात. पूर्ण ताट वाढल्यावर पाचव्या मिनिटाला मैफल रंगलेली असते आणि गिऱ्हाईक समाधीच्या दिशेने वाटचाल करू लागते.
गर्दी वाढेल तशी - नायकेचे बूट घालून फिरणारे नायक - अर्थात मालक उडपीकर यांच्या आत-बाहेर येरझाऱ्याही वाढायला लागतात. काउंटरवर बसलेल्या मदतनिसाकडून (घरच्या व ओळखीच्याही) पार्सल ऑर्डर घेणे, प्रतीक्षा यादीत नावे लिहून लोकांना बाल्कनीमध्ये उभे करणे, कुणी कुठे बसावे हे ठरवणे यात ते गढून जातात. "चला पाटीSल ३ पाने - इथे बसून घ्या, गोडांबे - १ इथे उरलेल्या ताटावर बसा, बागुल तुमचे ५ लोक आहेत जरा १५ मिनिटे थांबावे लागेल - वगैरे". साधारण सव्वा नऊला बिरड्याची उसळ संपलेली असते! मग नवीन भाजी - बटाट्याच्या काचऱ्या - तयार होऊन येतात. काही वेळा आधी बटाटयाच्या काचऱ्या असतील तर पुढची भाजी बिरड्याची उसळ पण असू शकते. तेवढी त्यांची कपॅसिटी आहे! नेहेमीचे (अर्थात चाणाक्ष!) गिऱ्हाईक हे नऊ वाजता ताटावर बसायच्या बेताने येतात म्हणजे त्यांना दोन-दोन भाज्या मिळतात.
यानंतर लक्ष्मी रोड वरती लग्नाचा बस्ता खरेदी करून आणि ड्रायव्हरला गाडीत बसवून (अथवा गोपी नॉनव्हेजला पाठवून) ६-७ लोकांचे कुटुंब येते. यात किमान ५ बायका व २ पुरुष असतात. दिवसभर फक्त बिल देण्यापुरते अस्तित्व असलेल्या त्या पुरुषांना आता इथे क्षुधाशांती मिळणार असते! मालक उडपीकर त्यांना अरुंद अशा फॅमिली रूम मध्ये पाठवतात. पूना बोर्डिंगचे वैशिष्ठ्य असे कि इथे खरी प्रायव्हसी ही फॅमिली रूम पेक्षा बाहेरच्या विभागातच जास्त मिळते! आत बसलेल्या दोन फॅमिल्यांमुळे व जरा अधिकच फिरकणाऱ्या वाढप्यांमुळे प्रायव्हसीचा काही संबंध येत नाही! या घोळात एक-दोन कार्टी असलेली कुटुंबेही येतात आणि बाहेरच्या टेबलांवर सामावली जातात. वाट पाहत तिष्ठणाऱ्या लोकांबरोबरच पार्सल न्यायला आलेलेही बरेच लोक येतात आणि जाताना काउंटरवरच्या भाजक्या बडीशेपेवर हात मारून जातात.
फॉरेस्ट गम्प सिनेमात जसे टॉम हँक्सच्या बाजूला बस स्टॊपवर बसलेले लोक बदलत असतात पण त्याचे गोष्ट कथन सुरु असते - तसे त्या कोपऱ्यातल्या खुर्चीवरचे पहिले गिऱ्हाईक जाऊन किमान ४-५ जण अजून जेवून गेलेले असतात पण पूना बोर्डिंगच्या त्या टेहेळणी बुरुजवजा वास्तुपुरुषाला कहाणी सांगायचे काम तो अव्याहत राबता आणि गोतावळा करीत असतो! शेजारच्या खुर्चीवर समोरासमोर बसलेले दोघे गावाकडून कोर्टाच्या कामाला शिवाजीनगरला जाऊन आलेले - पुढच्या तारखेच्या चिंतेंत असतात, जेवण झाल्यावर इथून डायरेक्ट स्वारगेट गाठायचे पण त्याआधी पानांवर विचारांची देवाणघेवाण व प्लॅनिंग आवश्यक असते. समोरच्या खुर्चीवरचा बाब्या उद्याच्या इंजिनीअरिंग मॅथ्सच्या पेपरच्या चिंतेत गढून गेलेला असतो. पलीकडे एकजण कानाला हेडफोन लावूनच आलेला असतो आणि त्या धुंदीतच जेवत असतो. मैत्रिणींना घेऊन आलेले काही इतरांना हि आपली बहीण असल्याचे वाटावे यासाठी आटापिटा करीत असतात. इथे सिक्रेट बोलणे काही शक्य नसते त्यामुळे जनरल विषयांवरच चर्चा होते. पलीकडे आई गावाला गेल्याने आलेले बापलेक हितगुज करीत असतात. भटारखान्यातून अगणित खेपा मारणारे आमटी, कोशिंबीर, कोरडी भाजी, उसळ, पोळ्या घेऊन येत असतात. त्यांचे त्यांचे ताट व वाढायचे चविष्ट पदार्थ ठरलेले असतात. साडे नऊला सर्वोच्च गर्दी होऊन साधारण दहा नंतर ती ओसरू लागते. या मधल्या काळात उडपीकर आणि कर्मचाऱ्यांची कसोटी लागते. ते बेभान होऊन मुरारबाजी सारखे लढत असतात.
गुरुवारी रात्रीच्या कढी-खिचडी साठी खास गर्दी होते. विशेषतः पूर्वी गुरुवारच्या इंडस्ट्रियल सुट्टीमुळे रात्री जास्त गर्दी होत असावी. रविवारी सकाळीही फीस्ट - अर्थात मसाले भात, स्वीट डिशसह जेवण असल्याने वेगळा क्राउड असतो. त्या दिवशी संध्याकाळी पळून जाऊन लग्न करणारे जोडपेही सकाळी आपले लग्नाचे जेवण असल्यासारखे ते साजरे करून जातात. शुक्रवारी - आडवारी हॉटेल बंद असल्याने बरेचदा तेथे चुकून गेल्यावर दुर्मुख होऊन परत यावे लागते. यावेळी सगळे वाढपी आणि आचारी पलीकडच्या वाड्यात ठेवलेल्या गहू-तांदळाच्या पोत्यांवर विश्रांती घेत असावेत. दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरु होणाऱ्या धबडग्याची मानसिक तयारी!
सराईत लोकं आमटी टाळून शेवटी वरण मागतात. या लोकांसाठी वेगळे वरण काढूनठेवलेले असते. शेवटचा भात-वरण / आमटीचा वा खिचडी नंतरच्या कढीचा भुरका झाल्यानंतर जेवणारा दह्याकडे वळतो आणि वाटीतील घट्ट दही कधी नुसतेच तर कधी साखरेसह ढवळून फस्त करतो. आता इथे नाईलाजाने त्याला खुर्चीतून उठून भोजन-समाधी भंग करावी लागते. मग तो माणूस हात धुवून बाहेर बडीशोप खाईस्तोवर त्याचे टेबल साफ झालेले असते. एकटेच आलेले गोडांबे मालक उडपीकरांच्या आज्ञेने त्या माणसाच्या खुर्चीत स्थानापन्न झालेले असतात. मग वाढपी पापड व दही ठेवून जातो आणि पुढचा कोशिंबीर, आमटी इत्यादी. कोशिंबिरीत आधी ७० टक्के-३० टक्के असलेले अनुक्रमे काकडी व टोमॅटोचे प्रमाण आता या खेपेस मात्र ३० टक्के काकडी-७० टक्के टोमॅटो असे उलटे झालेले असते. सातारहून दुपारीच पुण्यास आलेले गोडांबे काका मुलीच्या शनवारातल्या सासरी चाललेली भांडणे-वादावाद्या कश्याबश्या मिटवल्यानंतर तडक इथे आलेले असतात. आज ते मुलीच्या सासरी जेवायला थांबत नाहीत. आपली सातारची परतीची एष्टी स्वारगेटला जाऊन गाठायच्या आधी इथे क्षुधा-शांति साठी येतात. रात्री सव्वा दहाला गोडांबे देवाचे नाव घेऊन कोशिंबिरीचा पहिला घास घेतात. आता थोडी सामसूमही झालेली असते. उडुपीकरही आता आपले ताट घेऊन पलीकडच्या टेबलावर जेवायला बसतात. गोडांबे काका नुकत्याच वाढलेल्या उकळत्या आमटीचा भुरका मारतात आणि एका अद्वितीय समाधीकडे मार्गस्थ होतात! ...
~रोहित गोडबोले,
सिंहगड रोड पुणे
मो: ९७६४२६६५४८