"क्विं"टीसेंशीयली ब्रिटीश - राणीच्या भाषेत जबान संभालकें!
सायबाला माघारी जाऊन ७३ वर्षे होऊन गेली. त्यावेळी तो इथे एक इंग्रजी भाषा सोडून गेला पण त्याआधी जवळ जवळ २०० वर्षे तो इथे आला होता. त्यामुळे त्याकाळात आलेल्या विविध सायबांनी त्या त्या वेळी आणलेली भाषा इथे रुजली होतीच. साहेब गेल्याने विलायतेत होणारा भाषेतील बदल इथे आयात होणे बंद झाले आणि मग आपण आपले एक देशी व्हर्जन तयार केले. इंग्लंडास गेल्यावर मात्र तिथली बोली भाषा ऐकून शब्दांचे आणि वाक्प्रचारांचे धक्के बसतात आणि आपण जुनीच इंग्रजी बोलतो कि काय याची खात्री वाटायला लागते.
उदाहरणार्थ साहेब "स्वेटर" हा शब्द वापरत नाही. तुम्ही लंडनच्या स्टेशनवर थंडीत कुडकुडत बसला असाल, स्वेटर-स्वेटर म्हणून बोंबलत बसा कुणीही लक्ष देणार नाही - पण तुम्ही "जंपर - जंपर" (jumper) असे ओरडलात तर तुम्हाला ४ वर्षांपूर्वीच्या एखाद्या ख्रिसमसचा जुना स्वेटर नक्की फुकटात मिळेल. साहेब स्वेटरला जंपर म्हणतो आणि जंपरची चॅरिटीही करतो! या जंपरचा आणि आपल्या झम्परचा कसलाही संबंध नाही.
आता त्याबरोबरच तुमचे बूटही फाटले असतील - तर "बूट्स द्या" म्हणू नका कारण बूट्स (Boots) हे तिथले एक औषधांचे दुकान आहे. किंवा "कॅनव्हासचे बूट" द्या असे मराठीत म्हणू नका. तिथे याला "प्लिमसोल्स" असे वेगळे नाव आहे. स्पोर्ट्स शूजला "ट्रेनर्स" म्हणावे लागते. पावसात फिरत असाल तर दुकानदाराकडे "गमबूट" मागू नका - इंग्लंडमध्ये त्याला "वेलिंग्टन शूज" असे भारदस्त नाव आहे - मुलांच्या नर्सरीमध्ये मात्र त्याला "वेल्लीज" असे शॉर्ट अँड स्वीट रूप दिले आहे. याच मुलांच्या नर्सरी मध्ये शूशूला "वीS वीS" आणि शीशीला "पू पू" असे म्हणतात. आपल्या पोरांना पहिले चार दिवस नर्सरीत शू लागल्याचे सांगता येत नाही! आणि मग आठ दिवसांनी आपण मोठे घरातही शूला न जाता वी-वीला जातो!
आता इतके सारे भारतीय इंग्रजी शब्द वापरल्यावर साहेब "अँग्री" (angry) होईल असे तुम्हाला वाटेल. पण तो तुमच्याशी "क्रॉस" (cross) असतो अँग्री क्वचित! बाहेर जाताना आपण "कॅप" घालून जातो आणि साहेब मात्र "हॅट" घालून जातो. कॅप हा शब्द इथे "स्कलकॅप" म्हणजे डोक्याला पूर्ण चिकटलेले आवरण याअर्थी वापरला जातो, तेंव्हा हॅटच म्हणा - स्टायलिशही वाटते.
इंग्लिश कुत्रा हा कधिही "भू S भू S" असा भूंकत नाही तो कायम "वूफ वूफ" असा आवाज काढतो - आपल्या कानाला कितीही भू-भू वाटले तरी. आता यावर कुत्रा जवळ आला कि "ते बघ भू भू आलं" यासारखं "See woof woof coming" असं वेडगळ भाषांतर करू नये. एक तर तो डॉगी किंवा पपीच असतो. शिवाय "हे बघ" असं लक्ष वेधण्यासाठी इथे लूक (look) असा शब्द वापरतात सी (see) नव्हे. या लूकची जास्त सवय लावून घ्या! Look at that gorgeous puppy!
कावळ्यांना इथे क्रो (crow) क्वचित पण रॅव्हन (raven) जास्त म्हणतात - हे रॅव्हन्स आकारानेही मोठ्ठे असतात. ब्रिटिश गाढव हे खिंकाळताना "वी हॉ - वी हॉ" करते - एकंदरीत दोन्हीकडची गाढवे सारखीच! घोडा नेह -नेह (neigh neigh) आणि डुक्कर ऑइन्क ऑइन्क (oink) असा गोड आवाज करते म्हणे! इथला बेडूक स्वतःला वेगळा समजतो - आपला "डराव डराव" करतो आणि हा मात्र "रिबिट रिबिट" म्हणतो! आपली आणि सायबाची नुसती वाणीच नव्हे तर कानही वेगळे असावेत त्यामुळे त्यांना ऐकू येणारे आवाजही वेगळे!
आपण शाळेत अक्षर शिकवताना "एच ए टी - हॅट - Hat" असे शिकवतो. या "H" ला कुणी "हेच्च" असा म्हणू लागला तर आपण त्याला गावंढळ म्हणू. पण साहेब मात्र असा गावंढळ "Hech-हेच्च" उच्चार करतो. माझा एक बॉस होता - नाव "स्टिव्ह लॅगन" - तो असं हेच्च म्हणायचा. या स्टीव्हच्या आडनावाचे स्पेलिंग "Laggan" असे "लगान" सिनेमासारखे असल्याने कुणी कामात चूक केली आणि स्टीव्ह चिडेल असे वाटले तर आम्ही त्या माणसाला "लग्गान माफ़ कर देगा।" असं म्हणून दिलासा द्यायचो. तर या स्टीव्हने असं गावंढळ बोलून सायबाच्या शुद्ध भाषेबद्दलचा माझा आदर दूर तर केलाच पण तो खरंच "लगान" सिनेमाच्या वेळेस इकडे येऊन हे गावठी शिकून गेलाय कि काय अशीही शंका आली!
तुमच्या कारचे टायर पंक्चर झाले असेल तर स्टेपनी (stepney) मागायला जाऊ नये कारण हा शब्द इकडे वापरला जात नाही. त्याऐवजी स्पेअर टायर (spare tyre) मागावे. हे टायर मग ते लोकं "डिकीमधून" काढून देत नाहीत तर "कारबूट" मधून देतात. अमेरिकेतला "ट्रँक" (trunk) शब्द पण यांना कळणारा नाही. तुम्हाला काही बाहेरची कामे करून यायचे असेल तर ती "एरण्डस" (errands) असतात वर्क नव्हे! सायबाला "टाईमपास" हा शब्द कळणार नाही तो आपण निर्माण केलेला आहे. किंवा पोस्टपोन (post-pone) बरोबर असले तरी "प्री-पोन"(pre-pone) हा शब्द चुकीचा आहे तरी साहेब तो चालवून घेतो - इथे "ब्रिन्ग फॉरवर्ड" (bring forward) वापरणे जास्त इष्ट. तसा विचार केल्यास आपण मोबाईलसाठी वापरत असलेला "पोस्ट-पेड" (post paid) हा पण चुकीचा प्रचलित शब्द आहे - जी गोष्ट पेड (paid) म्हणजे भूतकाळातील असेल ती पोस्ट म्हणजे भविष्यातील कशी होऊ शकते?
आता इथल्या राजघराण्याबद्दल - राजकन्या डायनाचा उच्चार (लेडी) "डायाSना" असा होतो, त्यामुळे आपण डायना म्हणून मानभंग करू नये. एकदा नील म्हणाला - "भारतात तेवढा एक ताजमहाल आणि त्यासमोरील लेडी डायाना बसलेली सीट बघायची आहे". डायना एकटीच ताज समोर बसलेली असतानाचा तिचा फोटो नंतर रॉयल घटस्फोटाचे प्रतीक झाला! आता ही नीलची कळकळ "लंडनला जाताय तर तेवढा कोहिनूर पाहून या हो!" या छापाची ब्रिटीश आवृत्ती आहे!
काही म्हणी आणि वाक्प्रचारांबद्दल थोडक्यात! ईमेल लिहिताना "प्लिज डू द नीडफूल" असं शेवटी कधीही लिहू नये. देशी भाषेला सरावलेला एखादा इंग्रज ते सोडून देईलही, पण इतर कुणी नवखा काहीही अर्थ काढू शकेल. "व्हॉट इज युवर गुडनेम?" असे कदापि विचारू नका त्यामुळे आपल्याकडे "बॅड नेम" ठेवायची पण पद्धत आहे असे त्याला वाटेल (खरंच असली म्हणून काय झालं!).
काही काही भारतीय शब्द मात्र इथे इतक्या वेळेला म्हणतात कि तोंडात बोटे घालायची वेळ येते - उदाहरणार्थ पंडित (Pundit), गुरु (Guru), मंत्रा (mantra), निर्वाणा (nirvana), पजामा (pyjama) किंवा इन्स्टंट कर्मा (instant karma)! इथल्या पंजाब्यांनी तर आपल्या हिंदीतील "है ना?" या शब्दाच्या "isn't it?" या रूपाचे "innit?" असे करून तो शब्द सायबाच्या तोंडात रुळवला. एव्हढेच नव्हे साहेबाच्या व्होकॅब्युलरीत आता "चड्डी" हा शब्द पण या चढ्ढा लोकांनी घुसवला आहे. आपल्या "पुलाव" सारख्या शब्दांचे मात्र "पिलाऊ" असे रूप करून सायबाने मातेरे केले.
असो, हे सर्व "tip of the iceberg" आहे. लंडनच्या ट्यूब अंडरग्राउंड रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर "माईंड द गॅप" असे लिहिलेले असते - पाळले नाहीत तर ट्रेनमध्ये चढताना खड्ड्यात पडाल! तसे इंग्लंडच्या विमानात बसताना हि भाषेची ७३ वर्षांची गॅप तेवढी माईंड करा आणि मग साहेबाला समजणे सोपे जाईल. जाता जाता - ईस्ट इंडिया कंपनी (म्हणजे तिचे ब्रँड नेम) आता एका मेहता नावाच्या भारतीय उद्योगपतीने लंडनमध्ये विकत घेतली आहे व त्याद्वारे तो लक्झरी उत्पादने विकतो. म्हणजे अजून शंभरेक वर्षांनी साहेबच देशी इंग्लिश बोलू लागलेला असेल!!
@हरि पुत्तर