एके दिवशी ऑफिस वरून येताना विंडसरच्या स्टेशनवर ट्रेन पकडण्यासाठी उभा होतो. आजूबाजूला न्याहाळत असताना एक जाहिरात दिसली. "Pygmalion " या नाटकाची ती जाहिरात होती. विंडसरच्या रॉयल थियेटरमध्ये हे नाटक लागले होते. Pygmalion म्हणजे पुलंनी ज्याच्यापासून "ती फुलराणी" लिहिले ते मूळ नाटक. नाव वाचताच एकदम पाहायला जाण्याची इच्छा झाली. पण त्यावेळेला मी थोडा नवखा असल्याने थोडी वाट पाहण्याचे ठरवले. एक दोन महिने मी नुसत्या त्या स्टेशनवर नाटकाच्या जाहिराती पाहत होतो. त्या नंतर कुठलेहि माहितीतले नाटक लागले नाही. काही देसी कुटुंबांवर आधारलेली नाटकेही लागली! पुन्हा "pygmalion " ची जाहिरात मात्र काही दिसली नाही. मी सतत थियेटरच्या वेबसाईटवर जाऊन पाहत होतो : Theater Royal Windsor Website.
शेवटी एकदाचे मिळेल ते आणि लागेल ते नाटक पाहायचे ठरवले! नाटकाची वेळ रात्री ८:०० ते ११:०० ची असल्यामुळे ऑफिस झाल्यावर विंडसरमधेच थांबणे भाग होते. शिवाय रात्री शेवटची ट्रेन ११:२० ला सुटत असे तीही गाठायला हवी वेळेत! नाहीच मिळाली तर विंडसरहून स्टेन्स ला taxi करून जावे लागले असते. माझा रूम-मेट दिनेश चिन्नास्वामी हा तमिळ होता, त्याला विचारले येतोस का नाटकाला? त्याला नाटक बिटक हा प्रकार नवीन होता, तरीसुद्धा काय असते ते बघायला त्याने होकार दिला. मग मी लगेच तिकिटे काढली. २२ पौंडाचे एक तिकीट. तारीख ठरली होती ४ ऑक्टोबर २००७. नाटकाचे नाव होते "रोम्यांटिक कॉमेडी".
ठरल्या प्रमाणे त्यादिवशी ऑफिस मधून बाहेर पडल्यावर आम्ही विंडसर मधेच फिरत होतो. रॉयल विंडसर थियेटर हे "विंडसर कॅसल" च्या अगदी समोर आहे. पूर्वी इथे राणी / राजा सुद्धा नाटक पाहायला येत असत म्हणे. त्यांच्या साठी नाट्यगृहात वेगळे सज्जे केलेले आहेत. पाऊणे आठ वाजता आम्ही नाट्यगृहात प्रवेश केला. अगदी चौथ्या रांगेतले तिकीट असल्याने नाटक जवळून पाहता येणार होते. Tom Conti नावाचा एक मुख्य अभिनेता या नाटकात होता. त्याला कुठल्याश्या सिनेमा साठी ऑस्कर नोमिनेशनही मिळाले होते म्हणे.
आम्ही स्थानापन्न झालो आणि बरोब्बर ८:०५ ला पडदा वर गेला. आम्ही दोघे काळे सोडल्यास बाकी सगळेच लोक गोरे होते तिथे. आणि मुख्य म्हणजे सगळेच साठीच्या पुढचे वाटत होते. तरुण लोक जास्ती नाटकांना येत नसावेत. त्यांनाही आश्चर्य वाटत असेल कि हे दोन देसी तरुण इकडे काय करताहेत? नाटकाची गोष्ट साधारण अशी होती - एका प्रसिद्ध लेखकाच्या लग्नाच्या दिवशीच त्याला त्याची एक तरुण चाहती भेटते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. नंतर ती त्याची पीए म्हणून काम करते. आणि मग त्याच्या संसारातील गमती जमती, त्याचा "अरसिक" बायकोशी घटस्फोट, पीए बरोबर भांडण आणि पुन्हा लग्न अशा वळणाने हा प्रवास पुढे जातो. कथा साधीच असली तरी मुख्य दोन कलाकारांचा अभिनय उच्च होता. स्टेजवरचा सेट हा त्या लेखकाच्या घराचा लावला होता आणि तो खूपच ल्याव्हीश होता. त्यांचे कॉशच्यूम्सहि बरेच खर्चिक होते. एकंदरीत सर्व श्रीमंती होती. त्यांचे काही विशिष्ठ संवाद सोडल्यास पूर्ण नाटक समजायला काहीच अडचण आली नाही!
बाकी माहोल मात्र आपल्या बालगंधर्व सारखा होता. ९:१५ वाजता मध्यंतर झाला तेव्हा आम्ही बाहेर आलो. थियेटरमधेच एक बाई आईस क्रीम विकत होती. २ पौंडाला एक कप! आम्ही दोघांनी आईसक्रीम खाल्ले. इतर सर्व म्हाताऱ्या लोकांनी सुद्धा आपापल्या बायकांबरोबर त्याचा आस्वाद घेतला. मध्यंतरानंतर पुन्हा आत गेलो आणि त्याच उत्साहात उरलेले नाटक पाहिले.
तसेच नाट्यगृह, तसेच लोक, तसेच अभिनेते - सगळे तसेच - अगदी बालगंधर्व मध्ये नाटक पाहतोय असाच भास होत होता! ब्रिटनच्या राजघराण्यातील लोक जिथे बसून नाटक पाहत होते त्या नाट्यगृहात नाटक पाहिल्याचे एक समाधान घेऊन आणि एक प्रसन्न अनुभव घेऊन आम्ही बाहेर पडलो. पुन्हा नेहेमीप्रमाणे स्टेशन वर आलो. शेवटची ट्रेन लागलेलीच होती, ती पकडून स्टेन्स कडे जायची प्रतीक्षा करू लागलो.
Thursday, 14 January 2010
Monday, 11 January 2010
आम्ही साले भिकारचोट!
रस्त्यावरून जाताना अवचित एक जुना मित्र भेटतो. तो अजूनही तसाच आहे, धडाडीचा - पण फारसे यश न मिळालेला. मी यशस्वी. माझ्या खिशात हजार रुपये खुळखुळत असतात, त्याच्या खिशात असते एकच दहाची नोट. गप्पा मारत आम्ही एका टपरीवर पोहोचतो. काय घ्यावे याचा दोनतीनदा विचार करून मी पाच रुपयाचा वडापाव घेतो, दहा रुपयांचा इडली सांबार सोडून. तो मात्र इडली सांबारच घेतो. दहाची नोट उडवून टाकतो. खाता खाता मला सांगतो कि, आता थोडा पगार वाढला तर तो नायकेचे बूट घेणार आहे आणि दोन वर्षात एखादी रेसिंग बाईक! त्याच्या खिशात आता शून्य रुपये आहेत आणि माझ्या खिशात नऊशे पंचाण्णव!
खरा दरिद्री कोण? खिशात शून्य रुपये असताना मोठ्ठ्या स्वप्नांचे इमले बांधणारा तो माझा मित्र कि हजार रुपये असताना पाच रुपये वाचविण्यासाठी विचारांची कुरतड करत वडापाव खाणारा मी? माझ्या वृत्तीवर चार शिव्या हासडून तो चालू लागतो, त्याच्या स्वप्नांचे कौतुक करावे कि काय या विचारात मी शब्द गिळतो.....
खरा दरिद्री कोण? खिशात शून्य रुपये असताना मोठ्ठ्या स्वप्नांचे इमले बांधणारा तो माझा मित्र कि हजार रुपये असताना पाच रुपये वाचविण्यासाठी विचारांची कुरतड करत वडापाव खाणारा मी? माझ्या वृत्तीवर चार शिव्या हासडून तो चालू लागतो, त्याच्या स्वप्नांचे कौतुक करावे कि काय या विचारात मी शब्द गिळतो.....
Subscribe to:
Posts (Atom)