Sunday, 25 July 2010

स्वीड्स, स्वीस आणि स्वदेसी!

स्वीडन आणि स्वित्झर्लंड या देशांच्या प्रवासात काही छोटे छोटे किस्से असे घडले कि त्यामुळे आपल्या देशाची आणि इथल्या गोष्टींची आठवण यावी. ते किस्से विसरून जायच्या आत लिहून ठेवणे आवश्यक आहे!


#१: स्वीडन मधील आमचा पहिला दिवस. स्टेन्सबॉर्गमध्ये सकाळी ब्रेकफास्ट करीत असताना योर्गेन बरोब्बर पावणे आठला आम्हाला न्यायला आला. आमच्या बाजूच्याच टेबलवर तो आमचा ब्रेकफास्ट होण्याची वाट बघत बसला. एवढ्यात हॉटेलची मालकीण अॅन-सोफी तिथे आली आणि तिने योर्गेन ला कॉफी घेण्यास सांगितले. पण तोही ब्रेकफास्ट करून आलेला असल्याने त्याने नम्रपणे नकार दिला!

#२: शेवटचा दिवस, उद्या पहाटे ५ ला आम्ही निघणार म्हणून अॅन-सोफीशी चेकआउट बद्दल बोलणी करून ठेवली होती. एवढ्यात ती सत्तरीची म्हातारी संध्याकाळी दुसऱ्या दिवशीचे ब्रेकफास्टचे साहित्य घेऊन हजर झाली. उद्या सकाळी तुम्हाला खायला मिळणार नाही म्हणून हे चीज-ब्रेड, केळी, ज्यूस बरोबर घेऊन जा म्हणाली! हे आदरातिथ्य पाहून आम्ही हरखून गेलो. उरलेल्या तेलात भरपूर बटाटा भजी तळून आम्ही ती तिला खाली ऑफिस मध्ये नेऊन दिली. ती नवरयाबरोबर बसली होती. आम्ही तिला सांगितले कि हि इंडिअन भजी खा, बीअर बरोबर चांगली लागेल. ते ऐकून तिने तडक फ्रीझमधून बीअरच्या दोन बाटल्या काढल्या – एक नवरोबांना दिली आणि दोघांनी ह्याहू ह्याहू करत भजीवर ताव मारला!
#३: लिसाच्या घरी तिच्या घटस्फोटीत नवरयाबरोबर गप्पा मारत बसलो होतो. ते दोघेही आजच्या पिढीबद्दल बोलत होते. आपल्याकडच्या मोठ्ठ्या माणसांप्रमाणे म्हणाले कि आजची मुले हि वेगाच्या फार मागे लागलेली आहेत. त्यांना सर्व काही झटपट हवे असते. आम्हाला मात्र हा वेग आवडत नाही, झेपत नाही. आम्हाला ते जुन्या काळाचे स्लो सिनेमे आवडतात. होलीवूड सारखे ढीश्यांव ढीश्यांववाले नाही! एवढेच नव्हे तर आज मोबाईल्स मध्ये झालेली क्रांती पण आम्हाला खपत नाही. आज काय म्हणे एका मोबाईल मधून दुसऱ्या मोबाईलमध्ये तुम्ही टच स्क्रीनवर फोटो फेकू शकता! (you can just throw images to another mobile using touch screen!), हा अक्षरशः खुळेपणा आहे.

#४. अॅन-सोफी स्टॉकहोममध्ये नर्सिंगचे काम करत असे. एकदा तिच्या तिकडच्या मैत्रिणी आल्या होत्या. काहींचे नवरेहि आले असावे. दोन दिवस हॉटेलवर राहून ब्रेकफास्ट हादडून सर्वांनी मजा मारली. म्हाताऱ्या आमच्याकडे मोठ्ठ्या कौतुकाने पाहत होत्या.

#५. “ब्रिट बायस्टेड” आमची एक म्यानेजर. आम्हाला तिच्या बिस्के नावाच्या गावाला स्वतः तिकीट काढून घेऊन गेली. तिथे तिच्या अनुक्रमे ८५ आणि ९० वर्षांच्या आई-वडिलांच्या घरी आम्हाला “दाखवायला” घेऊन गेली. हे दोघे म्हातारे एकटेच राहतात आणि स्वतः बाजारहाट करतात, घरासमोरचा बर्फ काढतात. यांनी “इंडिअन” प्राणी पहिला नसावा. आम्हाला घर दाखवण्यात त्यांना फार उत्साह होता. हा उत्साह आम्ही सर्वच घरी बघितला. त्यांना इंग्लिश येत नसूनही आमचा ब्रिटच्या माध्यमातून थोडा संवाद झाला!

#६. ब्रीटचा नवरा – शेल. अजून एक उत्साही माणूस. याने आपली पूर्ण वंशावळ बनवली आहे. हि फ्यामिली ट्री त्याने एक सोफ्टवेअर घेऊन त्यात स्टोअर् केली आहे. गम्मत म्हणजे त्याला ११ व्या शतकातला त्याचा पूर्वज जो पहिल्यांदा त्या भागात (फिनलंडच्या बाजूने) आला त्याचे नावही माहिती आहे आणि त्या मुळापासूनच हि ट्री चालू होते. हि सर्व माहिती चर्च मध्ये नोंदविलेली असते, बाळाच्या जन्माच्या सर्व नोंदी तिथे असतात. त्यावरून आपले वंशज जवळ जवळ हजार वर्षे स्वीडनच्या त्या नॉर्थ भागात राहत आहेत असे तो म्हणाला. आम्हाला शंभर वर्षांच्या मागचे फारसे काही माहित नसते आणि ह्या लोकांनी किती रेकॉर्ड्स ठेवली आहेत!

#७. एकदा मी ऑफिसला गेलो असताना अॅन-सोफी तिच्या नवऱ्याला घेऊन रूम वर आली. तिचा नवरा हॉटेलची मेंटेनन्सची कामे करतो. ती अमिताला म्हणाली कि फायर अलार्म चेक करायचा आहे रूमजवळचा, तू दोन्ही कान झाकून घे. अमिताने व तिने स्वतः तसे करताच, तिच्या नवरर्याने काहीतरी थोडी खुडबुड केली, छोटा शिट्टी सारखा आवाज झाला असावा. अमिताला तो ऐकू आला नाही, तिने कान झाकलेले ठेवले. अॅन-सोफी म्हणाली झाले काम. अरेच्च्या? एवढ्याश्या बारीक शिट्टीसाठी कान झाकायला लावले!! या लोकांना शांततेची किती सवय आहे!

#८: एकंदरीत ब्रिटीश आणि अमेरिकन लोकांची टर उडवण्यात सर्वच स्वीडिश लोकांना मजा वाटते.

#९: स्टॉकहोम एयरपोर्टच्या बाहेर आम्ही गावात जाण्याऱ्या बसची वाट बघत उभे होतो. स्टॉप बरोबर आहे कि नाही हे एका स्वीडिश म्हातारीला विचारले, तेव्हा तिने आमची बरीच विचारपूस केली. कुठून आलात, कुठे चाललात वगैरे. ती साठीची असावी पण हातात टचस्क्रीन वाला फोन होता. त्यावरून तिच्या फेसबुक अकौंट ला लॉगिन करून तिने लगेच “आपण इंडिअन लोकांशी कसे बोललो याचा वृत्तांत टाकला”!!!

#१०. स्वित्झर्लंडमध्ये ७०% लोक जर्मन बोलतात, बाकीचे फ्रेंच व थोडे इटालीअन. इथे आम्हाला पत्ते आणि ट्रेनचे टायमिंग विचारायला फार त्रास झाला. एकतर त्यांना इंग्लिश येत नसे, किवा ते येत नाही असा आव आणत किवा समोरचा माणूस परग्रहावरून आला आहे असा चेहरा करून चालू लागत. एवढ्या मोठ्ठ्या टुरिस्टप्लेस मधेही हि बोंब! आमच्या पार्क-इन हॉटेलच्या एयरपोर्ट शटलचा एक चालक तर आम्हा काळ्या-पामरांना पूर्ण इग्नोअर करत असे!

(अपूर्ण...)

2 comments:

  1. Nice way to cherish the memories......
    however these are very few incidents.
    अजून किती तरी आहे न लिहायला.... :)

    ReplyDelete
  2. changale aahe re. lihita raha

    adwait bhave

    ReplyDelete