Saturday, 3 October 2020
"क्विं"टीसेंशीयली ब्रिटीश - राणीच्या भाषेत जबान संभालकें!
Saturday, 8 August 2020
पूना बोर्डिंग - एक विरासत!
पूना बोर्डिंग - एक विरासत!
पूना बोर्डिंग ...पुण्याच्या सदाशिव पेठेतील पेरुगेटाजवळचं एका जुनाट वाड्यासारख्याच बिल्डिंगमधले पूर्वापार चालत आलेले हॉटेल. अगदी पूर्वी हि एक मासिक खाणावळ होती आणि नंतर त्याचे भोजनालयात रूपांतर झाले. इथे अत्यंत रुचकर व सात्त्विक असे चौरस जेवण गेली ७० एक वर्षे अव्याहतपणे मिळत आहे. या पूना बोर्डिंगचे प्रेमी असलेले लोक कित्येक वर्षे इथल्या जेवणाचा आस्वाद घेत आहेत.
संध्याकाळी पावणे आठाला पहिलं गिऱ्हाईक आत शिरतं आणि कूपन घेऊन कोपऱ्यातल्या टेबलाच्या अति-कोपऱ्यातल्या एका "टेहेळणी बुरुज" छाप खुर्चीवर विराजमान होतं. या जागेवरुन पूर्ण हॉटेलकडे नजर ठेवता येते. नवीन आलेले कोण कुठे बसतायत, त्यांना कोणती चटणी वाढली जातेय, कोण स्वीट डिश घेतंय इत्यादी गोष्टींवर बारीक लक्ष देणे सोपे होते. वाढप्याकडून कूपन घेऊन समोर ताटात मलईचा पदर असलेलं दही आणि भाजका पापड ठेवले जातात. नेहेमीचं गिऱ्हाईक असेल तर दही परत करून ताक मागतं अथवा दह्यातच साखर. यानंतर डाव्या बाजूला काकडीच्या मोठ्या रानटी कापांची, कधी टोमॅटो घातलेली, भरपूर साखरपेरणी झालेली - दाणकुटाची कोशिंबीर आणि छोट्या वाटीत गोड-गूळमट पण चविष्ट आमटी येते. पोळीवाला मध्येच येऊन पोळ्या वाढून जातो. मग ते अधीर गिऱ्हाईक पहिला घास कोशिंबिरीचा घेतं - काकडीच्या कापांएवढ्याच रानटीपणे. आणि वरून आमटीचा घोट-भुरका. हा पहिला घास मुखामध्ये चर्वित झाल्यानंतर दिवसभराचा शिणवटा एकदम निघून जातो. एव्हाना बिरड्याची उसळ उजवीकडे आणि डाळमेथी वाटीमध्ये पडलेली असते. मध्येच एक वेटर समोरच्या ताटात मूठभर कांद्याच्या फोडी, लिंबं आणि दाण्याची तिखट चटणी भरून जातो. कांदा महाग असेल तर तो फारसा ठेवला जात नाही. पलीकडच्या टेबलवर एक-दोन जण "वाढ"लेले असतात. ते कूपन घेऊन येताना ह्याच्याकडे बघत बघत येतात त्यामुळे गिऱ्हाईकाला वाटतं, एवढी टेबलं पडलेली असताना इकडे कशाला येतायत (बसायला!). या भीतीतून कांद्याच्या चार फोडी व बचकभर चटणी आपल्या पानात सरकवली जाते. पुन्हा मिळेल न मिळेल!
हळूहळू एकेक टेबल भरू लागते. गिऱ्हाईक नेहेमीचं असेल तर सगळे वाढपी ओळखीचे असतात. हे तिथे सुमारे पाचशे वर्ष काम करीत आहेत. आणि ह्यांची ओळखच अडीचशे वर्षांपूर्वी - जेव्हा हे गिऱ्हाईक यायला सुरु झालं तेंव्हापासून आहे. पानिपतावरून सदाशिवराव भाऊंचा तोतया आणि हे गिऱ्हाईक एकाच वेळी पुण्यात आल्यामुळे त्या लढाईच्या वर्णनापासून ते आजच्या चीनच्या आगळिकीपर्यंत सर्व इत्थंभूत माहिती त्याच्याकडून मिळू शकते. इथल्या वाढप्यांच्या निष्ठा बोर्डिंगला पूर्णपणे वाहिलेल्या असतात. जशी हि वाढप्यांची परंपरा तशीच आचारी आणि त्यांच्या पदार्थांचीही! त्यातून पांढऱ्या शुभ्र वाफाळत्या भाताच्या ढीगाचे ताट घेऊन येणारे काका हे हिमालयात तपश्चर्या करणाऱ्या ऋषिंपेक्षा जास्त वर्षे तिथे आहेत - ऋषींना मोक्ष मिळतो - यांना मिळत नाही! हे गिऱ्हाईकाला मात्र मोक्ष मिळवून देतात. पूर्ण ताट वाढल्यावर पाचव्या मिनिटाला मैफल रंगलेली असते आणि गिऱ्हाईक समाधीच्या दिशेने वाटचाल करू लागते.
गर्दी वाढेल तशी - नायकेचे बूट घालून फिरणारे नायक - अर्थात मालक उडपीकर यांच्या आत-बाहेर येरझाऱ्याही वाढायला लागतात. काउंटरवर बसलेल्या मदतनिसाकडून (घरच्या व ओळखीच्याही) पार्सल ऑर्डर घेणे, प्रतीक्षा यादीत नावे लिहून लोकांना बाल्कनीमध्ये उभे करणे, कुणी कुठे बसावे हे ठरवणे यात ते गढून जातात. "चला पाटीSल ३ पाने - इथे बसून घ्या, गोडांबे - १ इथे उरलेल्या ताटावर बसा, बागुल तुमचे ५ लोक आहेत जरा १५ मिनिटे थांबावे लागेल - वगैरे". साधारण सव्वा नऊला बिरड्याची उसळ संपलेली असते! मग नवीन भाजी - बटाट्याच्या काचऱ्या - तयार होऊन येतात. काही वेळा आधी बटाटयाच्या काचऱ्या असतील तर पुढची भाजी बिरड्याची उसळ पण असू शकते. तेवढी त्यांची कपॅसिटी आहे! नेहेमीचे (अर्थात चाणाक्ष!) गिऱ्हाईक हे नऊ वाजता ताटावर बसायच्या बेताने येतात म्हणजे त्यांना दोन-दोन भाज्या मिळतात.
यानंतर लक्ष्मी रोड वरती लग्नाचा बस्ता खरेदी करून आणि ड्रायव्हरला गाडीत बसवून (अथवा गोपी नॉनव्हेजला पाठवून) ६-७ लोकांचे कुटुंब येते. यात किमान ५ बायका व २ पुरुष असतात. दिवसभर फक्त बिल देण्यापुरते अस्तित्व असलेल्या त्या पुरुषांना आता इथे क्षुधाशांती मिळणार असते! मालक उडपीकर त्यांना अरुंद अशा फॅमिली रूम मध्ये पाठवतात. पूना बोर्डिंगचे वैशिष्ठ्य असे कि इथे खरी प्रायव्हसी ही फॅमिली रूम पेक्षा बाहेरच्या विभागातच जास्त मिळते! आत बसलेल्या दोन फॅमिल्यांमुळे व जरा अधिकच फिरकणाऱ्या वाढप्यांमुळे प्रायव्हसीचा काही संबंध येत नाही! या घोळात एक-दोन कार्टी असलेली कुटुंबेही येतात आणि बाहेरच्या टेबलांवर सामावली जातात. वाट पाहत तिष्ठणाऱ्या लोकांबरोबरच पार्सल न्यायला आलेलेही बरेच लोक येतात आणि जाताना काउंटरवरच्या भाजक्या बडीशेपेवर हात मारून जातात.
फॉरेस्ट गम्प सिनेमात जसे टॉम हँक्सच्या बाजूला बस स्टॊपवर बसलेले लोक बदलत असतात पण त्याचे गोष्ट कथन सुरु असते - तसे त्या कोपऱ्यातल्या खुर्चीवरचे पहिले गिऱ्हाईक जाऊन किमान ४-५ जण अजून जेवून गेलेले असतात पण पूना बोर्डिंगच्या त्या टेहेळणी बुरुजवजा वास्तुपुरुषाला कहाणी सांगायचे काम तो अव्याहत राबता आणि गोतावळा करीत असतो! शेजारच्या खुर्चीवर समोरासमोर बसलेले दोघे गावाकडून कोर्टाच्या कामाला शिवाजीनगरला जाऊन आलेले - पुढच्या तारखेच्या चिंतेंत असतात, जेवण झाल्यावर इथून डायरेक्ट स्वारगेट गाठायचे पण त्याआधी पानांवर विचारांची देवाणघेवाण व प्लॅनिंग आवश्यक असते. समोरच्या खुर्चीवरचा बाब्या उद्याच्या इंजिनीअरिंग मॅथ्सच्या पेपरच्या चिंतेत गढून गेलेला असतो. पलीकडे एकजण कानाला हेडफोन लावूनच आलेला असतो आणि त्या धुंदीतच जेवत असतो. मैत्रिणींना घेऊन आलेले काही इतरांना हि आपली बहीण असल्याचे वाटावे यासाठी आटापिटा करीत असतात. इथे सिक्रेट बोलणे काही शक्य नसते त्यामुळे जनरल विषयांवरच चर्चा होते. पलीकडे आई गावाला गेल्याने आलेले बापलेक हितगुज करीत असतात. भटारखान्यातून अगणित खेपा मारणारे आमटी, कोशिंबीर, कोरडी भाजी, उसळ, पोळ्या घेऊन येत असतात. त्यांचे त्यांचे ताट व वाढायचे चविष्ट पदार्थ ठरलेले असतात. साडे नऊला सर्वोच्च गर्दी होऊन साधारण दहा नंतर ती ओसरू लागते. या मधल्या काळात उडपीकर आणि कर्मचाऱ्यांची कसोटी लागते. ते बेभान होऊन मुरारबाजी सारखे लढत असतात.
गुरुवारी रात्रीच्या कढी-खिचडी साठी खास गर्दी होते. विशेषतः पूर्वी गुरुवारच्या इंडस्ट्रियल सुट्टीमुळे रात्री जास्त गर्दी होत असावी. रविवारी सकाळीही फीस्ट - अर्थात मसाले भात, स्वीट डिशसह जेवण असल्याने वेगळा क्राउड असतो. त्या दिवशी संध्याकाळी पळून जाऊन लग्न करणारे जोडपेही सकाळी आपले लग्नाचे जेवण असल्यासारखे ते साजरे करून जातात. शुक्रवारी - आडवारी हॉटेल बंद असल्याने बरेचदा तेथे चुकून गेल्यावर दुर्मुख होऊन परत यावे लागते. यावेळी सगळे वाढपी आणि आचारी पलीकडच्या वाड्यात ठेवलेल्या गहू-तांदळाच्या पोत्यांवर विश्रांती घेत असावेत. दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरु होणाऱ्या धबडग्याची मानसिक तयारी!
सराईत लोकं आमटी टाळून शेवटी वरण मागतात. या लोकांसाठी वेगळे वरण काढूनठेवलेले असते. शेवटचा भात-वरण / आमटीचा वा खिचडी नंतरच्या कढीचा भुरका झाल्यानंतर जेवणारा दह्याकडे वळतो आणि वाटीतील घट्ट दही कधी नुसतेच तर कधी साखरेसह ढवळून फस्त करतो. आता इथे नाईलाजाने त्याला खुर्चीतून उठून भोजन-समाधी भंग करावी लागते. मग तो माणूस हात धुवून बाहेर बडीशोप खाईस्तोवर त्याचे टेबल साफ झालेले असते. एकटेच आलेले गोडांबे मालक उडपीकरांच्या आज्ञेने त्या माणसाच्या खुर्चीत स्थानापन्न झालेले असतात. मग वाढपी पापड व दही ठेवून जातो आणि पुढचा कोशिंबीर, आमटी इत्यादी. कोशिंबिरीत आधी ७० टक्के-३० टक्के असलेले अनुक्रमे काकडी व टोमॅटोचे प्रमाण आता या खेपेस मात्र ३० टक्के काकडी-७० टक्के टोमॅटो असे उलटे झालेले असते. सातारहून दुपारीच पुण्यास आलेले गोडांबे काका मुलीच्या शनवारातल्या सासरी चाललेली भांडणे-वादावाद्या कश्याबश्या मिटवल्यानंतर तडक इथे आलेले असतात. आज ते मुलीच्या सासरी जेवायला थांबत नाहीत. आपली सातारची परतीची एष्टी स्वारगेटला जाऊन गाठायच्या आधी इथे क्षुधा-शांति साठी येतात. रात्री सव्वा दहाला गोडांबे देवाचे नाव घेऊन कोशिंबिरीचा पहिला घास घेतात. आता थोडी सामसूमही झालेली असते. उडुपीकरही आता आपले ताट घेऊन पलीकडच्या टेबलावर जेवायला बसतात. गोडांबे काका नुकत्याच वाढलेल्या उकळत्या आमटीचा भुरका मारतात आणि एका अद्वितीय समाधीकडे मार्गस्थ होतात! ...
~रोहित गोडबोले,
सिंहगड रोड पुणे
मो: ९७६४२६६५४८
Sunday, 26 July 2020
माझे पौष्टिक जीवन ... Life is in the mess!
मेसमधील मुली हे प्रकरण - मेकॅनिकल वा सिव्हिल इंजिनियरिंग मधल्या मुलींइतकेच विरळ होते. बहुधा मुली या हॉस्टेल्सच्या मेसमध्येच वा डबा आणून / मागवून खात असाव्यात. एक-दोन मुली असतीलच तर नजर चोरून येत व एका कोपऱ्यातील टेबलवर बसून खाली मान घालून जेवून परत जात असत. न जाणो एखाद्या मुलाशी बोलावे लागले तर! अर्थात हे दृश्य लकडी पुलाच्या अलीकडील (पेठांमधील) मेसमधील असे, लकडी पुलाच्या पलीकडे असे वातावरण नसावे. तिकडचे जगच वेगळे होते आणि लकडी पूल हा दोन संस्कृत्या जोडणारा ब्रिज होता. फर्ग्युसनला गेल्यावर हि गोष्ट जास्त अधोरेखित झाली. यामुळे इथल्या मेसमध्ये घडलेली "प्रकरणे" इतर ठिकाणांपेक्षा कमी कानावर येत. (यावरून आठवले: आमच्या दातार क्लासमधला एक सहाध्याही एका स्मार्ट सिंधी मुलीचा पाठलाग करीत तिच्या बिबवेवाडीतील घरापर्यंत जाऊन आला होता पण कुणालाही न भेटता / न कळवता तसाच परत आला. आम्ही म्हंटले मग काय उपयोग रे, नुसते घर लांबून बघून आलास? त्यासुमारास इंग्रजीतील स्टॉकिंग या शब्दाचा अर्थ कळला. मग अस्मादिकांनी क्लासमधील एका मारवाडी मुलीवर हा प्रयोग करायचे ठरवले. पण ती टिळक रोडवरच रहात असल्याने इतक्या छोट्या अंतरात ते "थ्रिल" मिळणार नाही म्हणून प्लॅन बारगळला).
मेस बहुधा रात्रीचीच लावली जायची. फर्ग्युसनला असताना सकाळसाठी तिथल्या हॉस्टेलच्या व इतर जवळच्या मेसेस आजमावून बघितल्या पण कुठे सूत जुळले नाही, त्यामुळे पहिल्या वर्षी बहुधा कॅन्टीन मधल्या इडली, डोसा व बन-वड्यावर काम भागत असे. दुसऱ्या वर्षी मात्र आमचा मित्र धनंजयमुळे भाव्यांच्या मेस बद्दल कळले. फर्ग्युसनच्या आवारातच भाव्यांचे सुसंस्कृत कुटुंब राहत असे आणि काकूंच्या हातचे जेवण फार उत्तम होते. सणवाराप्रमाणे आम्हाला विविध पक्वान्नांचाही लाभ मिळत असे. इथे मी आणि माझा मित्र अनिश वर्षभर गेलो आणि अगदी घरच्यासारखे जेवलो. काका खूप गोष्टीवेल्हाळ होते त्यामुळे त्यांच्याकडून बरेच काही ऐकायला मिळे. शिवाय प्रत्येकाच्या वेळा वेगळ्या असल्याने फार गर्दीही नसे. काकांना हृदयविकाराचा त्रास होता व दुर्दैवाने त्यांचे लवकर निधन झाले. पण एकूणच कुटुंबाने केलेल्या कष्टांना तोड नाही. पुढंही काकू, दोन्ही मुलांनी सर्व परिस्थिती सावरून प्रगती केली. प्रत्येक मेसशी जोडलेल्या - हरेक कुटुंबाच्या अश्या संघर्षाच्या एकेक कहाण्या होत्या!
या सर्व मेसमध्ये जेवण उत्तमच होते, नाहीतर जास्त दिवस टाकताच आले नसते. शिवाय ऐनवेळी भाजी संपल्यावर तयार होणारे कांद्याची भाजी, फोडणीची पोळी (पोळीचा चिवडा) या पदार्थांनी अजून मजा येई. काही वेळा तुम्ही रात्री १० नंतर उशिरा जेवायला गेलात आणि एकटे-दुकटे असलात तर प्रेमाने आदल्या दिवशीची स्वीट डिश पण खायला मिळे. (या प्रेमापोटी काही मुले मुद्दाम शेवटी जेवायला बसत!). सर्वात शेवटी व नोकरी लागल्यानंतर मंडईजवळील पुसाळकर काकूंच्या मेस मध्ये जाण्याचा योग आला. माझे मावस व चुलत भाऊ इथे आधीपासूनच जात होते. मग माझा एक मित्रही जॉईन झाला. पुसाळकर काकूंकडेही उत्तम जेवण असल्याने बरीच गर्दी व वेटिंग असे. पण वर्थ द वेट म्हणावे असे! इथेही खेळीमेळीचे वातावरण व एकमेकांची चेष्टा मस्करी यात वेळ कसा जायचा कळत नसे. काकू खूप हसतमुख आणि सर्वांशीच मिळून मिसळून असत. काकूंची मुलगी व्हायोलिन शिकत असल्याने तिला परीक्षेआधी तबल्यावर प्रॅक्टिस म्हणून मी साथ करत असे. अशा रीतीने अजून एका मेस बरोबर आमचे सर्वांचेच ऋणानुबंध तयार झाले. जे अजूनही टिकून आहेत.
असे काही अपवाद वगळता ते जुने देशपांडे, जहागीरदार, तो कानडी आचारी वगैरे मंडळी आता काय करीत असतील हा प्रश्न सतावतो. पुण्यातील बाहेरच्या विद्यार्थी / नोकरदारांची आणि मेसची संख्या आता गेल्या पंचवीस वर्षांत (१९९५ पासून २००८ पर्यंत मेस-मय-जीवन होते!) दसपटीने वाढली. मध्ये एकदा बायको माहेरी गेली असताना आमच्याकडे दूध टाकणाऱ्या पिता-पुत्र फाटकांच्या मेसमध्ये गेलो होतो. तेथे त्यांनी माझे खूप स्वागत केले, फीस्टचा दिवस नसतानाही मला आम्रखंड वगैरे वाढले. सर्व काही छान होते. पण सर्व तरुणांच्या गदारोळात आता मी तिथे एक उपरा होतो! एकच जाणवलेली गोष्ट म्हणजे इथे मुलींची संख्याही मुलांएवढीच होती. पिढी बदलली होती.
कुठलीही मेस हि बहुधा कोणत्या ना कोणत्या आर्थिक विवंचनेच्या पायावर उभी असते. परंतु तो झगडा करीत असतानाच ती कुटुंबे अनेकांना जेवायला घालण्याचे पुण्यकर्मही करीत असतात. त्यामुळे किरकोळ खाड्यांचे वाद सोडून दिले जातात आणि खाणावळ वाल्यांबद्दल अजिबात कटुता रहात नाही हे विशेष!! शिवाय फक्त रविवारी रात्रीची सुट्टी ते घेत पण बाकी दिवस तो भटारखाना अव्याहत सुरूच असे. घरातील दोन-तीन लोकांच्या जीवावर हा गाडा ओढणे जिकिरीचेच असते. असे हे मेस-जीवन!
Life is in the mess! याचे दोन अर्थ! म्हणजे एकंदरीतच आयुष्य messed-up होण्याच्या काठावर आपण असतो तो काळ - शिक्षण, करियर, चुकलेले निर्णय, मैत्रितील ताटातूट, निराशा, प्रेमभंग, भविष्याची चिंता, आर्थिक तंगी वगैरे वगैरे. पण त्याचवेळी मेसमध्ये जेवणानुभवाबरोबर जीवनानुभवही मिळतो! म्हणून (रिअल) लाईफ इज इन द मेस!! मेसमधला घालवलेला वेळ हा धकाधकीच्या दिवसानंतर आलेला एक ठहराव असतो. मेसमधले क्षण तिथल्या जेवणाबरोबरच समाधीचे समाधान देतात. तिथल्या रुचकर, सुग्रास भोजनाचा आणि माणसांचा दरवळ मनातही कायम राहतो! त्या मेस संस्कृतीला सलाम !!
Monday, 11 May 2020
[लंडन ब्रीजवरून # 2] - A Midsummer Day's Dream - Acting at London's Drama Workshop!
Finally as we waited in that "art studio like" underground place, our coach Emily arrived on a bicycle. A short white smart funky lady. She parked her bike inside the studio room. One could easily make out she's an artist from her appearance and style!! She greeted all of us and took us further down in a lower basement hall! It was a bigger hall accommodating about 20 odd people (if I remember correctly there were 12 of us participating) . This was a basic acting workshop - Emily described the 5 different acting stages in which it would be conducted - namely 1) Saying Yes, 2) Accepting and Building, 3) Spontaneity, 4) Status, and 5) Intention. To summarize - it would start with a positive entry for the character on stage, accept the situation which is brewing up in-front of you before your stage entry, acknowledge it and start conversation, building spontaneity in reactions based on opposite actions and then finally establishing status of your character on stage along with its (real) intentions in the play to the audience. Well, one thing I liked about this was there was no mention of a typical protagonist / antagonist characters in the plots! The shades of all characters we played were always grey! 12 shades of grey for 12 participants.
The workshop started with a space walk - to cover the space as much as we can and gauge the stage! It was followed by typical warm-up instructions like Jump/Clap/Up/Down etc and then reversal of those instructions for alertness. This session included mostly corporate team building like games (In one of the games of - instructions and elimination rounds I came only second to the Welsh man!). It got truly kicked off when we had voice modulation exercises that too starting with an Om (ॐ)! Something to be proud of for us Indians 😊 We had to speak and scream in various strange voices from the bottom of our bellies or "diaphragms" to use the right technical term.
The last stage was about Intentions of the character in the act. Now that we have established the character's identity and status - it's imperative to allude to the character's real intentions in the play. We worked in pairs again. Each pair was given a sentence to kick-start which went something like this - "You are late! I am sorry, but you are here... Yes, I am!". We had to build a whole scene based on this. I had that shy Brit lady as my partner in this. I had done this in my childhood drama workshops too. We started with a typical scene of a drunk husband coming back home late and his wife confronting him. The lady and I managed this well and also improvised. Then we had reversal of intentions and positions too. I became the henpecked victimized husband and she would come home late. This exercise demanded all previous learnings especially establishing your status and maintaining it throughout, which was a big challenge. It proved tougher for me than the lady. We realised that intentions need to be practiced more and more as that was the crucial part of any play and often difficult to express.
Finally before the closure we had feedback discussion with Emily. She spoke about all the acts and what improvisations were possible. I told her that with my Indian experience it's often difficult to keep attention to hand movements while acting. I felt this might be easier for an Englishman as they are used to this. A few takeaways for me apart from the disciplined sessions were - we actually knew what we are going to achieve and also how the different exercises and activities put us on track for those in order. Language was not so much important as I thought it would be - barring a few skits. We could be quirky and imaginative in our acts and had the freedom within the confines of the rules of the act. There were many similarities of course in the way workshops are conducted back home too. At the end of the day it was about your learnings. There was no good/bad or comparisons with anyone but self! You have the feedback and improvement areas.
We thanked Emily for her simple and effective ways of coaching. The English professor wanted to read out Shakespearean passages to her later. I bid goodbye to other workshop colleagues and started back my journey to Waterloo terminus this time more content though after a dream come true day. It was quarter past six again in Big Ben on a Sunday evening!
Sunday, 19 April 2020
पुलीयोगरे! ....A Story of a Bachelor's American Dream!
मोरूला आता मिनिआपलिसला येऊन वर्ष होत आलं असेल. एव्हाना अजयचा लग्न करणाच्या निर्णय होऊन दोघांच्या घरातील पटवापटवी झालेली असेल. मोरूला वाटेल अजय आता कायमचा इथेच राहील - ग्रीन कार्ड करून घेईल. पण तो आणि गर्लफ्रेंड दोघेही पुन्हा भारतात जाण्याचा निर्णय घेतील. कर्ज फिटल्यावर परत जाणार म्हणणाऱ्या राजूच्या डोक्यात मात्र ग्रीन कार्डचे विचार घोळू लागतील. आणखी थोडे पैसे जमा करून कुटुंबास बोलवून घ्यावे म्हणून तो दुसऱ्या कंपनीत व दुसऱ्या राज्यात कॉन्ट्रॅक्टवर निघून जाईल. मोरू मग अजयची कार विकत घेईल. त्यांच्या हिल व्ह्यू अपार्टमेंट मध्ये भारतातून अजून नवीन सोबती राहायला येतील. ह्या नवीन सवंगड्यांशी जुळवून घेणे मोरूला जरा कठीणच होईल. त्याच्या कार मधून तो मॉल शॉपिंग, साईट सिईंग वगैरे करायला त्यांना घेऊन जाईल. त्या नवीन पार्ट"नरांना" गॅपचे टी-शर्ट, जीन्स आणि २५ मेगा पिक्सेलचा निकॉनचा कॅमेरा घ्यायचा असेल. कोणी म्हणेल मला हॅन्डीकॅम हवा सोनीचाच! मोरूचा १८ मेगा पिक्सेल कॅमेरा आता खूप जुनाट वाटेल. मोरूला उबग येईल. जीन्सच्या सेल मधून १०-१० डॉलरला जीन्स एकगठ्ठा उचलरणाऱ्या दोस्तांना बघून त्याला आपला भूतकाळ आठवेल. वस्तू वस्तू वस्तू - नुसत्या वस्तू! सगळे कसे ठरलेलेच असते इथे. तेच ते आणि तेच ते. ओकारीचा उमाळा दाबून मोरू मॉलच्या रेस्टरूम मध्ये जाईल, स्वच्छ तोंड धुवेल. आरशात बघून स्वतःलाच प्रश्न विचारेल "अजून किती दिवस या चक्रात अडकणारेस मोरू?" मोरूच्या अमेरिकन स्वप्नांना सुरुंग जणू लागलेला असेल. कल्पना आणि वास्तव यांच्यातला विरोधाभास!
राजू आणि अजय दोघेही सोडून गेल्यामुळे मोरूच आता ऑफिसमध्ये सर्वात सिनिअर असेल. गुरूराजची भिस्त त्याच्यावर वाढलेली दिसेल. तो त्याला अजून किमान वर्षभर राहायची गळ घालेल. गुरूराजही हल्ली खूपच चिडचिडा झाला असेल. मोरूला कळेल कि त्याची ग्रीन कार्ड घटिका जवळ आलेली आहे आणि मिळेल तो बिझनेस पदरात पाडून आपले स्वतःचे दिवस लांबविण्याचा त्याचा प्रयत्न असेल. नवीन आलेल्या लोकांचे (कुणाच्या खांद्यावर कुणाचे!) ओझे आणि शिवाय वरून हे प्रेशर अशी मोरूची दोन्ही बाजूंनी पंचाईत होईल. हि नवीन पिढी काही वेगळीच आहे - मोरू म्हणेल. सामान्यतः १० वर्षांनी पिढी बदलते असे म्हंटले जाते, पण आयटीतल्या पिढ्या तर ३-४ वर्षात बदलत आहेत. पुन्हा एक शुक्रवार येईल, पार्टनर्स स्ट्रीप क्लबला गेल्याने मोरू एकटाच स्कॉचची बाटली उघडून बसेल. आज बऱ्याच दिवसांनी नारायण पण संगतीला येईल. नारायण म्हणेल "मोऱ्या काय म्हणतंय तुमचं अमेरिकन ड्रीम? एका तरी अमेरिकनाने घरी जेवावयास बोलावले कारे तुला? जीव लावला कारे? ते असो, गुरुराज फार त्रास देतो म्हणे हल्ली. अरे गुरुराज-स्टीव्ह- त्याचा बॉस रॉस मग व्हर्जिनिया अशी व्हीपी पर्यंत हि साखळी आहे. Chain of Intimidation! बस्स अजून काही नाही. आणि तुही त्या साखळीतला एक मोहरा. असं बघ, तूही तुझ्या ऑफशोअर टीमला दाब देऊन कामे करवून घेतोसच कि !! मग कुणा-कुणाच्या नावानी बोटे मोडशील सख्या. त्यातल्या त्यात डॉलर कमावतोयस ह्यात समाधान!". नारायण अंतर्धान पावेल, मोरूला त्याने कटू सत्य सांगितले तरी पण हायसे वाटतेच वाटते.
असेच पुन्हा काही महिने निघून जातील - न्यू यॉर्कच्या हडसन नदीचे बरेच पाणी वॊशिंग्टन ब्रिजखालून निघून जाईल. एक दिवस मोरूच्या मातोश्रींचा फोन येईल "अरे मोरू पुढल्या महिन्यात अठ्ठाविसावें लागेल तुला. ४-५ पत्रिका आलेल्या आहेत. मी मुली बघायला सुरुवात करतेय तुझ्यासाठी". आधी नेहेमीच आढेवेढे घेणारा तो आता जास्त विरोध करणार नाही. त्याला साहिरचे (लुधियानवी) वाक्य आठवेल "अगर है तुझमे हिम्मत तो दुनियासे बगावत कर ले, नहीं तो मॉं जहाँ कहती है उस घरमे शादी कर ले। ". अमेरिकेत "मोजून मापून" बगावत करायला आलेला मध्यमवर्गीय मी आणि आता तर दुनियाच माझ्याशी बगावत करीत आहे! पडत्या फळाची आज्ञा मानून मोरू लग्नाला होकार देईल व पुन्हा भारतात परतायची तयारी करेल. गुरूराजला पटवायला त्याला फार वेळ लागणार नाही. नवीन आलेल्या मंडळींपैकी काही त्याची जागा घ्यायला एका पायावर तयार असतील. त्यांचेही अमेरिकन ड्रीम सुरु झालेले असेल. मोरू शेवटची खरेदी करेल, विमानाची तिकिटे बुक करेल.
आज अमेरिकेत येऊन दीड वर्ष होऊन गेले असेल. मोरू हिल व्ह्यू अपार्टमेंट मध्ये भाडेकरू म्हणून असलेले कॉन्ट्रॅक्ट, वीज व फोन कनेक्शन इतरांच्या नावावर करील. एकजण मोरूची कार विकत घेईल (अजय व त्याच्याहिआधीपासून पिढीजात चालत आलेली!). तो सर्व पार्टनरांचा निरोप घेईल. मिनिआपलिसच्या "सेंट पॉल" विमानतळावर तो पोहोचेल. चेकइन काउंटरवर मोरूला बॅगा जड झाल्यामुळे थोडासा मनस्ताप होईल. सिक्युरिटीमध्ये तो नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे रॅन्डमली पकडला जाईल! सिक्युरिटीवाले पण मोरूची गळाभेट घेणे सोडत नाहीत. आणि आता या शेवटच्या भेटीत तर नाहीच नाही!! मोरूला याची सवय तर असेलच, आणि तो आता हे एन्जॉयही करू लागलेला असेल. त्याची पहिली फ्लाईट न्यूयॉर्क पर्यंत असेल. न्यूयॉर्कच्या जॉन एफ केनेडी विमानतळावर मोरू मुंबईच्या फ्लाईट मध्ये जाऊन बसेल. अमेरिकेला टाटा करून ह्या स्वप्नभूमीतून तो आज पुन्हा मायभूकडे प्रयाण करेल. इथे आल्यावर काय कमावलं आणि काय गमावलं याचा हिशेब तो मनातल्या मनात करत असेल. जवळच्या कागद पेनाने एक कविता खरडेल, पण ती जमली नाही म्हणून कागदाचा चोळा मोळा करून खिडकीतून बाहेर टाकायला जाईल. पण विमानाची खिडकी बंद असेल. मग तो तिथेच समोर कोंबून ठेवेल. एअर इंडियाचे विमान आता उड्डाण करेल आणि मुंबईच्या दिशेने त्याचा प्रवास सुरु होईल. थोड्या वेळाने एअर होस्टेस येईल आणि मोरूला विचारेल "मे आय हेल्प यू विथ एनी ड्रिंक?" - "या, अ बिग ग्लास ऑफ रेड वाईन प्लीज!!" - मोरू म्हणेल आणि रेड वाईनचे घुटके घेता घेता डोळे मिटून घेईल...... !!!