पु.ल. देशपांडे यांच्या "गोळाबेरीज" पुस्तकात मुंबईतील खाणावळींमधील वातावरणावर लिहिलेला एक लेख आहे "एका दिवंगत गंधाचा मागोवा" (वांग्यांच्या देठांपासून भाजी बनवणारे खाणावळीतील स्वैपाकी!). या लेखापासून स्फुरलेला पुण्यातील खाणावळींतील १२ वर्षांच्या अनुभवांवर लिहिलेला लेख:
पुण्यामध्ये जेवढ्या कॉट बेसिसवाल्या खोल्या तुम्ही बदलता किंवा जितके रूम पार्टनर्स बदलतात तितक्या खाणावळी तुम्ही आजमावता. हॉस्टेलच्या पुढील मुक्कामात मी भरत नाट्य मंदिराजवळ एका नवीन होतकरू (!) हॉटेलवाल्याकडे एक वेळची मेस लावली, पण मधेच काही झाले आणि तो हॉटेल बंद करून गावी निघून गेला. त्याच्याकडे कानडी आचारी होता व तो ती रुचकर लिमिटेड थाळी वाढून समोर ठेवत असे. त्याचा निरागस, आज्ञाधारक चेहरा अजूनही आठवतो. माझे आगाऊ दिलेले पैसे त्या मालकाने महिन्याने आल्यावर परत केले आणि मी निःश्वास टाकला! त्या शेजारीच जुन्या सिलाईच्या लायनीत "सुगरन्स" नावाची खाणावळ होती. तेथे भरपूर पदार्थ (म्हणजे चटण्या, कोशिंबिरी, पापड इ. सह) असायचे पण एक दोनदा जेवल्यानंतर पुन्हा कायम खाण्यासारखी परिस्थिती नव्हती. त्याच्या मागच्याच गल्लीत "अनपट" नावाची एक बरी मेस होती. तेथेच नागपूर नॉनव्हेज नावाचे सावजी छाप एक हॉटेल होते, त्यात एकमेकांकडे पाठ करून भिंतीकडे तोंड करून जेवायला वाढत. बहुधा तिखटाने नाका-डोळ्यात येणारे पाणी लोकांना दिसू नये हा उद्देश असावा. म्हणून तिथे कधी पाऊल टाकले नाही. या सगळ्या पट्ट्यात पोळ्या तव्यावर कच्च्या भाजून त्याला तेल लावल्यावर जो वास येतो तो दरवळत असे. हा वास सर्व पेठांमधल्या तशाच "खाणावळ पट्टयांमध्ये" घमघमत असे व अजूनही घमघमतो. शिवाय भाज्यांचे, आमट्यांचे व कोशिंबिरींचे विविध गंध एकत्रित होऊन बाहेरून जाणाऱ्याला आकर्षित करीत असत. सदाशिव, नव्या पेठेपासून शनवार-कसब्यापर्यंत असे खमंग पट्टे खूप आहेत.
तुळशी बागेसमोरील भाऊ-महाराज बोळात एक "जहागिरदार" म्हणून मेस होती. वपुंचे शब्द उसने घ्यायचे तर "जहागिरदार अगदी जहागिरदारांसारखे दिसत होते". गोरे गोमटे स्मार्ट, भव्य कपाळ आणि कुरळे केस असलेले जहागिरदार काका आणि त्यांची तशीच स्मार्ट पत्नी एका सहायक मुलीला घेऊन मेस चालवत. एकच टेबल असल्याने एका वेळी ६-७ लोकच जेवू शकत. पण वाट बघणाऱ्यांचेही मनोरंजन व्हायची सोय होती. जुनी मराठी गाणी लावलेली असत आणि जहागिरदारांची दोन लहान खोडकर मुले - त्यांच्याशी खेळण्यात मेम्बरांचा वेळ जात असे. जहागिरदार खरंच कुलीन दिसत असल्याने यांना खाणावळ चालवायची का गरज पडली असा प्रश्न पडे. त्यांना पाहून मला कुलदीप पवारांची (नट) आठवण यायची. मी जोशीबुवा नावाच्या पार्टनर सोबत इथे फक्त गेस्ट म्हणून जायचो, माझ्या भावाला हि मेस दाखविली आणि तो कायम मेम्बर झाला! जहागीरदारांकडचे जेवण खूप चविष्ट असे. कुठलीही मंथली मेस न लावता कायम गेस्ट म्हणून इकडून तिकडे भटकणारे लुक्खे लोकही खूप असत. असे लोक नवीन मेसच्या वाटाही दाखवित. पुण्याच्या गल्ली-बोळात जेवढ्या संख्येने पुणेरी पाट्या तेवढ्याच खाणावळीही आढळतील.
गोपाळ गायन समाजाच्या गल्लीत राहत असताना - एक अनपेक्षित माणूस मला गद्रे काकांच्या मेस मध्ये - गीता धर्म मंडळाच्या वाड्यात घेऊन गेला. माझा केवळ ३-४ दिवसच रूममेट असलेला बीडचा हा "जाजू" एके रविवारी फीस्टच्या दिवशी मला काकांकडे घेऊन गेला. त्या दिवशी स्वीट डिश म्हणून आम्रखंड होते आणि बाकी जेवणही मला आवडले. जाजू दोन दिवसातच गावी परतला पण जाता जाता मला मंत्र देऊन गेला "कुठलीही मेस ६ महिन्याच्या वर धरून ठेवू नकोस". जाजूचा नियम मी पाळला नाही आणि ३ वर्षे गद्रे काकांकडे गेलो. कारण एक जुनी ओळखही निघाली. माझ्या चुलत आजोबांना त्यांनी पुण्यात जवळून पाहिले होते व त्यांच्याच नावाने (सदुभाऊ) ते मला हाक मारीत. नाना पाटेकरने नाट्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात या आमच्या आजोबांचा उल्लेख केलेला होता, ते छापील भाषण त्यांनी माझ्या हातात आणून ठेवले! काकांकडे रोज रात्री केळ्याची शिकरण असे आणि बाकी भाजी, पोळी, वरण, भात. त्या तीन वर्षात जेवढी शिकरण खाल्ली तेवढी चाळीस वर्षात खाल्ली नाही. पूर्वी पी.जोग क्लासच्या दहावीच्या व्हेकेशन बॅचेस जोरात चालायच्या त्या काळात चाळीस-पन्नास पानांच्या पंगती काकांनी वाड्यातील अंगणात काढलेल्या आहेत. आपली बँक ऑफ इंडियातील ऑफिसरची चांगली नोकरी सोडून काका इकडे वळले. काका म्हणाले नोकरी सोडताना मॅनेजरच्या केबिन बाहेर "डॅमेजर" असे लिहून निघालो! दुनियेला फाट्यावर मारण्याचा इगो काकांनी कायमच नाकावर बाळगला. काकांच्या मेसमध्ये वय वर्षे १५ पासून ६० पर्यंत सर्व वयोगटांतील लोक येत. पेठांत असणाऱ्या अनेक कॉमर्स क्लासेस मुळे मराठवाड्यातील सीए, सीएस, आय सी डब्ल्यू ए करणारी बरीच मुले या एरियात राहत असत. शिवाय बरेच नोकरदारही.
पुण्यात मेस लावताना "खाडे किती धरणार" हा एक कळीचा क्वालिफिकेशनचा प्रश्न असतो. साधारण मेसेस ५ ते १० खाडे धरत - १० म्हणजे डोक्यावरून पाणी! गद्रे काकांकडे मात्र अनलिमिटेड खाडे चालत! त्यांच्याकडे जेवणापेक्षा काकांवर असलेल्या प्रेमापोटी अनेक जुने लोक नोकरीनिमित्त बाहेर गावी गेले तरी परत पुण्यात आले कि इथेच जेवायला येत. सर्व मेसमध्ये एकसे एक वल्ली भेटतातच. त्यांच्याकडून सर्व श्लील-अश्लील शब्दांचे अर्थ पुढच्या पिढीत संक्रमित करण्याचे महत्कार्यही घडते. कॉलेजात राहिलेली कमी इथे भरून निघायची. नवीन सिनेमांवर व खेळांवर चर्चा व्हायच्या. इथे भेटलेल्या एका माणसाने नंतर लंडनला स्थायिक होऊन महाराष्ट्र मंडळाची धुरा सांभाळली, विम्बल्डनच्या वाऱ्या करून त्यावर एक पुस्तक लिहिले आणि ते मराठी पुस्तक त्याने विम्बल्डनच्या म्युझियम मध्ये ठेवले आहे! अश्या अनेक अवलियांमुळे मेस मधील लोकांच्या भेटी आणि गप्पा हा एक मोठा "स्ट्रेस बस्टर" असे! काही वेळा जास्त वेटिंग करताना सुरु झालेल्या गप्पा नंबर आल्यामुळे संपूच नये असे वाटे. शक्यतो मेसमध्ये बाहेर टीव्ही लावलेले नसत - नाहीतर लोकं क्रिकेट मॅच बघत तिथेच बसून गर्दी करतील. पण काही विशेष क्रिकेट मॅचेसना - वर्ल्ड कप वगैरे - याचा अपवाद केला जायचा. जेवणाआधीच्या वेटिंग टाईम मधल्या स्कोअर वरील चर्चा धमाल असत. बहुतेक लोकांना सचिन आऊट व्हायच्या आत जेवून रूमवर वा टीव्हीवाल्या मित्रांकडे जायचे असे. मेसमध्ये मॅच नसेल लावली तरी घरी यायच्या वाटेवर एखाद्या पानपट्टी वा छोट्या दुकानाबाहेर गर्दी करून मॅच बघण्याचा आनंद काही औरच असे! नशिबाने तो १२-१३ वर्षांचा काळ सचिनचाही सुवर्णकाळ होता. टेनिसमध्ये सॅम्प्रास, फेडरर, नदाल हे तारे होते. आय पी एल मुले क्रिकेटचे व इतर खेळांचेही बाजारीकरण व्हायच्या आधीचा तो काळ होता. वायटूकेचा / वेबचा बबल फुटला तरी उदारीकरणाचा आलेख चढताच होता. असो.
माझा एक शहा नावाचा रूममेट एकदा त्याच्या खास गुजराती मेसमध्ये घेऊन गेला होता. त्या काकूंच्या हातचे जेवणही अत्यंत रुचकर होते. पण अश्यावेळी जुन्या मेस सोडणे जीवावर यायचे, कारण ते नुसते जेवणापुरते नसे पण इतरही बंध तयार झालेले असत! रविवारी सकाळी फीस्ट झाली कि संध्याकाळी मेस बंद असल्याने कुठेतरी नवीन जागी जायचा योग येई. काही घाऊक प्रमाणात चालणाऱ्या व कायम सुरु असणाऱ्या हॉटेलवजा म्हणजे १००-२०० मेम्बर असणाऱया - कूपने घ्यायला लावणाऱ्या "सुवर्णरेखा" सारख्या खाणावळींचा अशा वेळी आधार असे. त्या प्रचंड धबडग्यात येणाऱ्या लोकांशी फारसा दोस्ताना राहत नसे- जो २-४ टेबलांच्या भांडवलांवर चालवल्या जाणाऱ्या मेस मध्ये जमे. अजून अश्या वेळी ऑप्शन होते ते म्हणजे - पूना बोर्डिंग, सात्विक थाळी, बादशाही, दगडूशेठच्या गोडसे यांचे गोडसे उपहारगृह, डेक्कनचे जनसेवा, लक्ष्मी रोडचे जनसेवा व बेलबागेजवळील सिनेमावाल्या सरपोतदारांचे पूना गेस्ट हाऊस, स्वीट होम, अप्पा बळवंत चौकाजवळील अश्वमेध नावाचे हॉटेल किंवा कधी नॉन-व्हेज खायचा मूड असेल तर टिळक रोडजवळील दुर्गा, गोपी आणि आशीर्वाद! हि विद्यार्थ्यांना परवडण्याजोगी ठिकाणे होती. याउप्पर सकाळी पोहे, उप्पीट, मटार उसळ, इडलीच्या वा चहावाल्यांच्या टपऱ्यांचा आधार असेच, पण तो एक स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे.
मेसमधील मुली हे प्रकरण - मेकॅनिकल वा सिव्हिल इंजिनियरिंग मधल्या मुलींइतकेच विरळ होते. बहुधा मुली या हॉस्टेल्सच्या मेसमध्येच वा डबा आणून / मागवून खात असाव्यात. एक-दोन मुली असतीलच तर नजर चोरून येत व एका कोपऱ्यातील टेबलवर बसून खाली मान घालून जेवून परत जात असत. न जाणो एखाद्या मुलाशी बोलावे लागले तर! अर्थात हे दृश्य लकडी पुलाच्या अलीकडील (पेठांमधील) मेसमधील असे, लकडी पुलाच्या पलीकडे असे वातावरण नसावे. तिकडचे जगच वेगळे होते आणि लकडी पूल हा दोन संस्कृत्या जोडणारा ब्रिज होता. फर्ग्युसनला गेल्यावर हि गोष्ट जास्त अधोरेखित झाली. यामुळे इथल्या मेसमध्ये घडलेली "प्रकरणे" इतर ठिकाणांपेक्षा कमी कानावर येत. (यावरून आठवले: आमच्या दातार क्लासमधला एक सहाध्याही एका स्मार्ट सिंधी मुलीचा पाठलाग करीत तिच्या बिबवेवाडीतील घरापर्यंत जाऊन आला होता पण कुणालाही न भेटता / न कळवता तसाच परत आला. आम्ही म्हंटले मग काय उपयोग रे, नुसते घर लांबून बघून आलास? त्यासुमारास इंग्रजीतील स्टॉकिंग या शब्दाचा अर्थ कळला. मग अस्मादिकांनी क्लासमधील एका मारवाडी मुलीवर हा प्रयोग करायचे ठरवले. पण ती टिळक रोडवरच रहात असल्याने इतक्या छोट्या अंतरात ते "थ्रिल" मिळणार नाही म्हणून प्लॅन बारगळला).
मेस बहुधा रात्रीचीच लावली जायची. फर्ग्युसनला असताना सकाळसाठी तिथल्या हॉस्टेलच्या व इतर जवळच्या मेसेस आजमावून बघितल्या पण कुठे सूत जुळले नाही, त्यामुळे पहिल्या वर्षी बहुधा कॅन्टीन मधल्या इडली, डोसा व बन-वड्यावर काम भागत असे. दुसऱ्या वर्षी मात्र आमचा मित्र धनंजयमुळे भाव्यांच्या मेस बद्दल कळले. फर्ग्युसनच्या आवारातच भाव्यांचे सुसंस्कृत कुटुंब राहत असे आणि काकूंच्या हातचे जेवण फार उत्तम होते. सणवाराप्रमाणे आम्हाला विविध पक्वान्नांचाही लाभ मिळत असे. इथे मी आणि माझा मित्र अनिश वर्षभर गेलो आणि अगदी घरच्यासारखे जेवलो. काका खूप गोष्टीवेल्हाळ होते त्यामुळे त्यांच्याकडून बरेच काही ऐकायला मिळे. शिवाय प्रत्येकाच्या वेळा वेगळ्या असल्याने फार गर्दीही नसे. काकांना हृदयविकाराचा त्रास होता व दुर्दैवाने त्यांचे लवकर निधन झाले. पण एकूणच कुटुंबाने केलेल्या कष्टांना तोड नाही. पुढंही काकू, दोन्ही मुलांनी सर्व परिस्थिती सावरून प्रगती केली. प्रत्येक मेसशी जोडलेल्या - हरेक कुटुंबाच्या अश्या संघर्षाच्या एकेक कहाण्या होत्या!
या सर्व मेसमध्ये जेवण उत्तमच होते, नाहीतर जास्त दिवस टाकताच आले नसते. शिवाय ऐनवेळी भाजी संपल्यावर तयार होणारे कांद्याची भाजी, फोडणीची पोळी (पोळीचा चिवडा) या पदार्थांनी अजून मजा येई. काही वेळा तुम्ही रात्री १० नंतर उशिरा जेवायला गेलात आणि एकटे-दुकटे असलात तर प्रेमाने आदल्या दिवशीची स्वीट डिश पण खायला मिळे. (या प्रेमापोटी काही मुले मुद्दाम शेवटी जेवायला बसत!). सर्वात शेवटी व नोकरी लागल्यानंतर मंडईजवळील पुसाळकर काकूंच्या मेस मध्ये जाण्याचा योग आला. माझे मावस व चुलत भाऊ इथे आधीपासूनच जात होते. मग माझा एक मित्रही जॉईन झाला. पुसाळकर काकूंकडेही उत्तम जेवण असल्याने बरीच गर्दी व वेटिंग असे. पण वर्थ द वेट म्हणावे असे! इथेही खेळीमेळीचे वातावरण व एकमेकांची चेष्टा मस्करी यात वेळ कसा जायचा कळत नसे. काकू खूप हसतमुख आणि सर्वांशीच मिळून मिसळून असत. काकूंची मुलगी व्हायोलिन शिकत असल्याने तिला परीक्षेआधी तबल्यावर प्रॅक्टिस म्हणून मी साथ करत असे. अशा रीतीने अजून एका मेस बरोबर आमचे सर्वांचेच ऋणानुबंध तयार झाले. जे अजूनही टिकून आहेत.
असे काही अपवाद वगळता ते जुने देशपांडे, जहागीरदार, तो कानडी आचारी वगैरे मंडळी आता काय करीत असतील हा प्रश्न सतावतो. पुण्यातील बाहेरच्या विद्यार्थी / नोकरदारांची आणि मेसची संख्या आता गेल्या पंचवीस वर्षांत (१९९५ पासून २००८ पर्यंत मेस-मय-जीवन होते!) दसपटीने वाढली. मध्ये एकदा बायको माहेरी गेली असताना आमच्याकडे दूध टाकणाऱ्या पिता-पुत्र फाटकांच्या मेसमध्ये गेलो होतो. तेथे त्यांनी माझे खूप स्वागत केले, फीस्टचा दिवस नसतानाही मला आम्रखंड वगैरे वाढले. सर्व काही छान होते. पण सर्व तरुणांच्या गदारोळात आता मी तिथे एक उपरा होतो! एकच जाणवलेली गोष्ट म्हणजे इथे मुलींची संख्याही मुलांएवढीच होती. पिढी बदलली होती.
कुठलीही मेस हि बहुधा कोणत्या ना कोणत्या आर्थिक विवंचनेच्या पायावर उभी असते. परंतु तो झगडा करीत असतानाच ती कुटुंबे अनेकांना जेवायला घालण्याचे पुण्यकर्मही करीत असतात. त्यामुळे किरकोळ खाड्यांचे वाद सोडून दिले जातात आणि खाणावळ वाल्यांबद्दल अजिबात कटुता रहात नाही हे विशेष!! शिवाय फक्त रविवारी रात्रीची सुट्टी ते घेत पण बाकी दिवस तो भटारखाना अव्याहत सुरूच असे. घरातील दोन-तीन लोकांच्या जीवावर हा गाडा ओढणे जिकिरीचेच असते. असे हे मेस-जीवन!
Life is in the mess! याचे दोन अर्थ! म्हणजे एकंदरीतच आयुष्य messed-up होण्याच्या काठावर आपण असतो तो काळ - शिक्षण, करियर, चुकलेले निर्णय, मैत्रितील ताटातूट, निराशा, प्रेमभंग, भविष्याची चिंता, आर्थिक तंगी वगैरे वगैरे. पण त्याचवेळी मेसमध्ये जेवणानुभवाबरोबर जीवनानुभवही मिळतो! म्हणून (रिअल) लाईफ इज इन द मेस!! मेसमधला घालवलेला वेळ हा धकाधकीच्या दिवसानंतर आलेला एक ठहराव असतो. मेसमधले क्षण तिथल्या जेवणाबरोबरच समाधीचे समाधान देतात. तिथल्या रुचकर, सुग्रास भोजनाचा आणि माणसांचा दरवळ मनातही कायम राहतो! त्या मेस संस्कृतीला सलाम !!
वा..फारच सुरेख. अनुभव अतिशय सुंदर पद्धतीने शब्दबद्ध केले आहेत. मुख्य म्हणजे सर्व सकारात्मक आनंदी गोष्टींचा उल्लेख चित्रमय झाला आहे.
ReplyDeleteधन्यवाद! वाचून आनंद वाटला!
DeleteLekh zakas!! shevatache 3 para ekdam class!!!. Mi lakdipul chya palikdcha. tikde barechase ruksh ani professional (business oriented) kasla jivhala nahi ki kahi nahi. Mukaat ya, coupon dya "rice plate" ghya jeva aani suta. konala konashi bolayla vel nahi. narayan ka shanwaratlya eka mess madhye jevayla gelelo astana, bhaji panat takli mhanun 2 ka 5 rupaye dand zala hota room mate la! tevha pasun petha band!! :)
ReplyDeleteधन्यवाद! पेठांतल्या पुणेरी मेसेस शक्यतो मी टाळल्याच! बादशाही हि त्या सर्वांची बादशहा होती :-)
DeleteToo Good Rohit,
ReplyDeleteI guess everyone goes thru that phase
But remembering it in that detail and then framing those memories in such a wonderful image through words is only possible for someone like you who is a keen observers and blessed with words
Eagerly waiting for next blogpost from you
Cheers
Thank you for the appreciation!! But I did not recognize you :-) Could you please disclose your name?
Delete