Tuesday, 15 October 2013

मॅकबेथ - एक अनुभव!

त्या दिवशी ऑफिस मधून जरा लवकरच निघालो होतो. ट्रेनने वॉटर्लू ला पोहोचलो. पाताळात जाऊन ज्युबिली लाइनने लंडन ब्रिज स्टेशन गाठले. ग्लोब थिएटर शोधायला थोडा वेळच लागला. तरीही ७:१५ वाजता नाटकाचे तिकीट दाखवून मी आत प्रवेशता झालो होतो. आता स्थानापन्न असे म्हणत नाही कारण माझे तिकीट खुर्चीचे नसून यार्डाचे होते. यार्ड म्हणजे स्टेज समोरील मोकळी जागा. येथे लोक उभे राहून नाटके बघतात. बाजूला सर्कस सारख्या galleries आहेत. त्या मध्ये बाके ठेवलेली आहेत. प्रत्येक बाराकावरील व्ह्यूप्रमाणे तिकीट ठरलेले आहे! यार्डाचे तिकीट ५ पौंड तर तेथील २० ते २५ पर्यंत! बाहेर gallery मधील लोकांसाठी blankets आणि उशा (बसायला) भाड्याने मिळतात.

हे ग्लोब थिएटर शेक्सपिअरने १५९९ मध्ये बांधले, त्यानंतर १६१३ मधील आगी नंतर त्याचे १६१४ मध्ये पुनर्निर्माण केले. पण हेही थिएटर १६४४ मध्ये पडून टाकले. आत्ताचे थिएटर हे त्याचे मूळ स्वरूप कायम ठेऊन नवीन बांधण्यात आले आहे. पण अर्थात शेक्सपिअरच्या काळात नाटक बघण्याचा फील मात्र ते देते नक्कीच. यार्डमध्ये उत्साही नाटक वेड्यांची गर्दी झालेली होती. सर्वजण स्टेजजवळील मोक्याची जागा पकडण्याच्या मागे होते. बरेच लोक ग्रुपने आलेले होते. नाट्यशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थीही बरेच दिसले. काही ज्येष्ठ, वृद्ध लोक - कदाचित येथील लाइफ़ मेम्बर्सहि असतील असे सर्व खुर्च्यांवर बसले होते. येथेही तीन घंटा झाल्या. मात्र कोणतीही अनाउन्स्मेन्ट वगैरे झाली नाही. आणि अचानक नाटक सुरु झाले.

आता थोडे मॅकबेथविषयी. सवाई गंधर्व फेस्टिवलला रागांपेक्षा रागीणींना न्याहाळायला आलेल्या आणि थालीपीठ, बटाटे वडा खाऊन फॅशन म्हणून रात्र जागवणाऱ्या मंडळीपैकी मी एक. आपला कोणत्याही विषयाचा अभ्यास नसला तरी "याविषयी जरा तुमच्याशी चर्चा करायची आहे" - या वर्गातला मी!  मॅकबेथला जाणे म्हणजे बालवाडीतील मुलाने कॉलेजमध्ये जाऊन बसण्यासारखे. पण म्हंटले जाऊन बघू, तिकिट ज्ञान पाहून देत नाहीत ना… जमेल तेवढे ग्रहण करू.

तर मॅकबेथची गोष्ट - ज्यांनी शेक्सपिअर कोळून प्यायलेला आहे त्यांना मी काय सांगणार. पण माझ्यासारख्या अर्धज्ञानी पामरांसाठी थोडक्यात : मॅकबेथ हा एक स्कॉटिश सरदार असतो. तो काही युद्धे जिंकून स्कॉटलंडचा राजा डंकन याला खुश करतो. त्यामुळे राजा त्याला अजून जहागिऱ्या आणि सरदारक्या देतो. ज्या दिवशी तो एका दगाबाज सरदाराला हरवून राजाला भेटायला येतो, तेव्हा वाटेत जंगलात त्याला तीन चेटक्या भेटतात. त्याच्याबरोबर दुसरा साथीदार जनरल बँको हाही असतो. त्या चेटक्या एक भविष्य सांगतात -मॅकबेथ हा कॉडोर प्रांताचा सरदार होईल, तसेच स्कॉटलंडचा राजा होईल. हे ऐकून मॅकबेथ विश्वास ठेवत नाही . बँको स्वतःचेही भविष्य विचारतो. चेटकीणी त्याला सांगतात तू नाही तरी तुझे वंशज स्कॉटलंडवर राज्य करतील. ते दोघेही परत येत असताना एक दूत येउन सांगतो कि राजाने त्याला कॉडोर प्रांताची सरदारकी दिली आहे. चेटक्यांचे एक भविष्य खरे ठरते. ते खुशीने राजाकडे जातात. राजा त्याला मिठी मारतो आणि त्याच्या वाड्यावर एक रात्र काढायला येण्याचा प्रस्ताव ठेवतो. इकडे राजा आपल्या वाड्यावर येणार म्हणून सगळे आनंदून जातात. लेडी मॅकबेथला जेव्हा हि भविष्यवाणी कळते तेव्हा ती वेगळेच कुभांड रचू लागते. आता तुला राजा होण्यापासून कोणी अडवू शकत नाही असे म्हणून ती मॅकबेथला राजाचा खून करण्यास तयार करते. राजा रात्री झोपलेला असताना त्याच्या सेवकांना दारू पाजून - मॅकबेथ राजाला मारून टाकतो. आपल्या राजाला झोपेत मारून भ्याड कृत्य केल्याचा पश्चात्ताप त्याला होऊ लागतो. पण लेडी मॅकबेथ त्याला धीर देते आणि मन घट्ट करण्यास सांगते. सकाळी एक सरदार मॅकडफ राजाला भेटण्याकरता येतो. मॅकबेथ त्याला काहीच घडले नाहीये अशा अविर्भावात राजाच्या दालनात घेऊन जातो.

मॅकडफ पुढे जातो आणि राजाचा खून झाल्याचे पाहताच आरडा ओरडा करू लागतो. इकडे मॅकबेथ पळत पळत तिथे जातो आणि राजाचे अंगरक्षक तिथे पडलेले पाहून - यांनीच दारू पिउन नशेच्या भरात राजाला मारले असा देखावा करून त्यांना मारून टाकतो. यामुळे कोणताही पुरावा मागे रहात नाही. राजाच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याचे मुलगे माल्कम आणि डोनाल्बेन हे तिथून पळून इंग्लंडमध्ये जातात. राजाला कोणी व का मारले हे कोणालाच समाजात नाही. बँकोला हि बातमी समजते. चेटकिणीच्या भविष्यामुळे त्याला खरे / खोटे काय याचा अंदाज लावता येत नाही. नंतर राजपुत्र पळून गेल्याने सर्वजण मॅकबेथलाच राजा होण्याची गळ घालतात आणि मग त्याचा राज्याभिषेक होतो. यानंतर लेडी मॅकबेथ त्याला अजूनच भडकाविते आणि मग तो वाटेत येईल त्याचा नाश करीत सुटतो. बँकोला तो राजवाड्यावर बोलवितो. तो आणि त्याचा मुलगा घोडेस्वारीसाठी गेले असताना सैनिक पाठवून बँकोला मारून टाकतो, पण त्याचा मुलगा फ़्लिअन्स पळून जातो. इकडे राजा सर्व सरदारांना पार्टीला बोलवितो. या पार्टीत बँकोचे भूत येते आणि ते एका खुर्चीत बसते. ते फक्त मॅकबेथलाच दिसत असते. तो चीड-चीड करतो, घाबरतो. राणी त्याला सांभाळायचा प्रयत्न करते. सगळे सरदार घाबरून जायला बघतात. राणी त्यांना थांबवते. पण पुन्हा थोड्या वेळाने त्याला भूत दिसते आणि तो पुन्हा पिसाळतो! यावेळी मात्र त्याचा तमाशा बघून राणी सर्वांना जायला सांगते. अशा रीतीने मॅकबेथ आणि राणी दोघेही पश्चात्तापाच्या आगीत होरपळू लागतात. विषण्ण होऊन मॅकबेथ पुन्हा जंगलात जातो आणि चेटकीणिना भविष्य विचारतो. त्या त्याला एका शत्रूचा मुकुट दाखवतात, त्यावरून मॅकडफ कडे त्यांचा इशारा असतो. त्या पुढे असेही म्हणतात किं स्त्रीपासून जन्माला आलेल्या कोणापासूनही तुझा मृत्यू नाही. तसेच बर्न्हाम येथील जंगल जेव्हा स्कॉटलंड मध्ये येईल तेव्हा तुझ्या राज्याला धोका आहे. या दोन्ही गोष्टी अशक्य असल्याने तो निर्धास्त होतो.

इकडे परत आल्यावर त्याला कळते कि मॅकडफ पळून इंग्लंड मध्ये गेला आहे. हे ऐकून मॅकबेथ त्याच्या किल्ल्यावर हल्ला करून त्याच्या बायका मुलांना, नोकरांना मारून टाकतो. किल्ला ताब्यात घेतो. एक सरदार इकडे येउन इंग्लंड मध्ये मॅकडफला हे सांगतो. तो कोसळतो. मॅकडफ आता डंकन चा राजपुत्र माल्कमला जाउन मिळालेला असतो. माल्कम त्याला बदल घेण्यासाठी भडकावतो. त्याला १०,००० इंग्लिश सैन्य येउन मिळालेले असते. हे घेऊन सर्वजण स्कॉटलंडवर स्वारी करायला निघतात. वाटेत ते बर्न्हम वूड (जंगल) मध्ये थांबतात. माल्कम सुचवतो कि, कुणाला कळू नये म्हणून तिथल्या झाडाच्या फांद्या अंगावर घेऊन सैनिकांनी पुढे जावे. ते तसे करतात, इकडे मॅकबेथला कळते कि बर्न्हाम वूड मधून सैन्य असे येते आहे. एक भविष्यवाणी खरी ठरते. पण दुसरी अशक्य असते म्हणून तो काळजी करीत नाही. इकडे लेडी मॅकबेथला वेड लागलेले असते. पूर्ण पश्चात्तापाने ती आत्महत्या करते. मॅकबेथ कोसळतो. इंग्लिश सैन्य चाल करून येते, मॅकबेथ प्रतिकार करतो. शेवटी तो मॅकडफला समोर येतो. त्याला भविष्य वाणी सांगतो कि स्त्री-पासून जन्माला आलेला कोणीच त्याला मारू शकत नाही. मॅकडफ त्याला सांगतो कि तो प्रि-माच्युअर बेबी आहे - म्हणजे त्याचा जन्म आईचे पोट फाडून सिझेरिअन पद्द्थतीने झालेला आहे. त्यामुळे तो लौकिकार्थाने स्त्री-पासून झालेला नाही. हे ऐकून मॅकबेथ शास्त्र टाकून देतो. या शक्यतेचा कोणी विचारच केलेला नसतो. मॅकडफ त्याला मारून टाकतो आणि माल्कमला राज्याभिषेक करतो. अशा रीतीने मॅकबेथच्या खुनशी राजवटीचा दुर्दैवी अंत होतो.

आता थोडे नाटकाविषयी. बोजड शेक्सपिअरकालीन इंग्रजी भाषेमुळे आपल्याला नाटक कळणार नाही हि खूणगाठ बांधूनच मी तिथे यार्डात उभा होतो. बरीचशी तरुण मंडळी आजूबाजूला उभी होती. नाट्य शास्त्राचा अभ्यास करणारी काही असावीत. एक-दोन जण तर स्टेजवरती वही ठेऊन नोट्स काढीत होते. एकदा मला वाटले तो स्टेजच्या कडेला आलेला मॅकबेथ तलवारीने नव्हे पण याच्या वहीवर पाय पडून नक्की आडवा होईल. काही अगदीच शाळकरी मुले आलेली होती. या नाटकात (गंभीर असले तरी) काही विनोदाच्या जागा आहेत तेथे मंडळी योग्य ठिकाणी हसत होती. हि शाळकरी मुले मात्र ख्या-ख्या करून कुठेही हसत होती. यावरून यांचे आणि आपले इंग्रजी एकाच लेव्हलचे आहे हे माझ्या लक्षात आले. अर्थात मी कुठेच हसत नव्हतो, कारण खरे विनोद कळणे  पण दुरापास्तच होते. पण तरीही काही काही कळलेच. मी सर्व गोष्ट आणि काही संवाद आपल्या विकीपेडिया वरून वाचून गेलो होतो! त्यामुळे हे संवाद ऐकू आले कि मला लिंक लावता येत असे.

नाटकाला नेपथ्य अजिबात नव्हते. एक-दोन पडदे होते. मध्येच एकदा एक टेबल आणि काही खुर्च्या आणून ठेवल्या जातात तेवढेच नेपथ्य. स्टेजच्या मागे वरती सर्कस मध्ये असते तशी बँड पथकाला जागा होती! फरक एवढाच कि येथे स्कॉटिश वाद्ये (bagpiper/ड्रम) होती. पूर्ण थिएटरच्या रचनेचा सुरेख वापर करून घेतला होता. म्हणजे मुळात यार्डातील लोक स्टेजच्या एवढे जवळ उभे असतात कि ते नाटकाचाच भाग होऊन जातात. इथे विंग वगैरे प्रकार नव्हता. म्हणजे तो सर्कस सारखाच - प्राणी मागून येतात तसा मागेच असलेला पडदा - झाली विंग. त्यामुळे बऱ्याच पात्रांच्या एन्ट्रीज या प्रेक्षकांमधून होतात. स्टेजच्या जिन्याजवळ यासाठी जागा सोडावी लागत होती. एक-दोनदा तर एक जाड्या काळा नट मला धक्काच मारून गेला.  काही वेळेला हेच नट वरती बसलेल्या प्रेक्षकात जाऊन तिथूनही संवाद म्हणत होते. मॅकबेथचा राज्याभिषेक होताना तर यांनी तिथून कागदी फुलांच्या पाकळ्या टाकल्या. त्यामुळे यार्डातल्या सर्व प्रेक्षकांवर अभिषेक जाहला! या सर्व ट्रिक्स मुळे आपण नाटकातलेच एक पात्र / प्रजा होऊन गेलो आहोत असा भास निर्माण होत होता.

नाटक सुरु होताना सर्वजण स्टेज वर येउन ड्रम / bagpiper इत्यादी स्कॉटिश वाद्ये वाजवितात अगदी आपल्या नांदी सारखी. त्यानंतर तीन चेटक्यांच्या प्रवेशाने नाटक सुरु होते. मग मॅकबेथचा युद्ध जिंकल्याचा / राजाचा प्रसंग. भविष्यवाणी इत्यादी… सर्व प्रसंगांची मांडणी अगदी ओरिजिनल नाटकाप्रमाणेच होती. मला वाटते मूळ नाटकाचा गाभा, प्रसंग, संवाद, पात्रे आणि वस्त्रे कायम ठेऊन हा प्रयोग केला आहे. मॅकबेथ सर्व भाषांमध्ये गेल्या नंतर त्याची वेगवेगळी स्थानिक रूपे झाली म्हणून ते ओरिजिनल स्वरुपात पाहणे बहुतेक दुर्मिळ असावे!!!

आता थोडे अभिनयाविषयी. स्टेजवरच्या पूर्ण गोलाकार जागेचा यथेच्छ वापर प्रत्येक अभिनेत्याने/अभिनेत्रीने करून घेतला. यात खुद्द  मॅकबेथची भूमिका करणारा नट तर फारच माहीर होता. तो चौफेर फिरत होता. लेडी मॅकबेथपण तशीच. काही अभिनेत्यांनी अगदी संयत अभिनय केला - उदाहरणार्थ राजा डंकनची तसेच बँकोची भूमिका करणारे नट. यांनी कुठेही आक्रस्ताळेपण न करता उत्तम अभिनय केला. खुद्द मॅकबेथ झालेला नट उत्तम शब्दफेक असूनही थोडा अब्सेंट माइंडेड वाटला. तो पहिल्यापासूनच खुनशी असल्या सारखा वागत होता. माझ्यामते मॅकबेथ मध्ये घडलेला हळूहळू बदल तो दाखवू शकला नाही. सुरुवातीपासूनच तो खूप इम्पल्सिव्ह वाटला. लेडी मॅकबेथचेहि तसेच. आरडा-ओरड जर जास्त होती - मुळात हे नट/नटी उत्तम आहेत हे सांगायची गरज नाही.

बाकी सर्वच अभिनेत्यांनी आपापली कामे चोख केली - अगदी डंकन आणि बँकोचा मुलगा झालेल्या पोरसवदा अभिनेत्यानेही. त्याच्या चेहऱ्यावरचे सशाचे भाव त्याने उत्तम दाखविले. खुद्द मॅकबेथनी जरी निराशा केली तरी या सर्व पात्रांनी मात्र प्रयोग एका उंचीवर नेऊन ठेवला. संवाद कळत नसूनही अडीच तास कधीही कंटाळा आला नाही - आता हे कधी संपणार असे वाटले नाही हे विशेष. न म्हणायला शेवटी डंकनचा मुलगा माल्कम हा मॅकडफला भडकावून युद्धाला तयार करतो तेव्हाचा प्रसंग थोडा लांबलाच. या स्टेजवर खांब खूप आहेत, पण ते प्रेक्षकांच्या आड न येत त्यांचा वापर करून घेणे फारच कौशल्याचे आहे. ते फार चांगले साधले होते. मॅकबेथला बँकोचे भूत दिसते तो प्रसंग जरा जास्त विदुषकी झाला.

जेव्हा बर्न्हाम जंगलामधील फांद्या सैनिक डोक्यावर घेऊन येतात, तेव्हा अक्षरशः सर्व पात्रे प्रेक्षकामधून खऱ्या फांद्या घेऊन स्टेजवर जातात. तेव्हा नाटक पूर्ण climax ला पोहोचलेले असते. येथून पुढे मॅकबेथ हतबल होतो आणि शेवटचे रहस्य कळेपर्यंत मॅकडफ बरोबर द्वन्द्व खेळतो.  मॅकडफ त्याला रहस्य सांगतो आणि मग त्याला मारून टाकतो. येथे नाटक संपते आणि मग सर्व पात्रे शेवटचे स्कॉटिश नृत्य करतात. तेही लाजवाब.

या सर्वात खुपलेली मुख्य गोष्ट म्हणजे लेडी मॅकबेथ आणि स्वतः मॅकबेथचा आक्रस्ताळा अभिनय. मला वाटते या दोघांनी अजून  संयत अभिनय केला असता तर फार मजा आली असती. सर्व पात्रांची संवादफेक मात्र कमालीची होती आणि यासाठी त्यांना किती व्यायाम करावा लागत असेल याची कल्पनाच नाही. सर्वात जास्त एनर्जीतर मॅकबेथलाच लावावी लागत होती आणि ती त्याच्याकडे अफाट भरली होती. मला वाटते एवढी एनर्जी ठेऊन प्रत्येक प्रयोग करणे हि फार अवघड गोष्ट आहे. या एनर्जिसाठी मात्र सर्वांना दाद द्यावीच लागेल आणि मॅकबेथला स्पेशल!

असो. अशीही सुंदर अनुभूती घेऊन मी थेम्सच्या काठी आलो. समोर सेंट पॉल कॅथेड्रलचे सौंदर्य न्याहाळत लंडन ब्रिजच्या दिशेने चालू लागलो. आता लंडनच्या नाईट लाइफ़ची चाहूल लागली होती. रात्रीच्या लंडनची नशा तयार होऊ लागली होती. माझी पाऊले झपाझप स्टेशनच्या दिशेने पडू लागली.



Sunday, 13 October 2013

तमिळ तेरीयादी ...एन तमिळ रोंबा मोसम!

२५ मे २०१२ -
मद्र देशावरील वायुमार्ग स्वारीसाठी अस्मादिक पुणे विमानतळावर पोहोचले तेव्हा रात्रीचे साडेनऊ वाजले होते. चेक-इन करताना दारातच एका सुमारे दहा लोकांच्या लुंगी ग्यांगने माझे स्वागत केले, मध्ये पाच मोठे गजरे आणि तीन लहान वेण्याही होत्या. या लोकांच्या मागे मी जवळ जवळ दहा  मिनिटे अडकून पडलो. कारण कुणाचे तिकीट सापडत नव्हते तर कुणाच्या पोरासोरांचा हिशेब लागत नव्हता. सरतेशेवटी एका छोट्या फटीमधून मी आत घुसलो. सिक्युरिटीकडे चालत असता "गल्फमध्ये जाताना खस-खस नेऊ नये" अशी एक मराठीत पाटी आहे. ती पाहून माझ्या मनात जरा खस-खस पिकली एवढेच. गल्फला जात असतो तर कदाचित मेटल डिटेक्टरमध्ये पकडला गेलो असतो!

थोडी घुसाघुशी करून वेटिंग एरीआत स्थानापन्न होतोय तोवर पुन्हा त्या लुंग्या व गजरे, वेण्या इत्यादी हजर झाले. त्यांनी आपले डबे उघडून सांबर-डोश्यावर ताव मारावयास सुरुवात केली. यामुळे तिथे एक सामुदायिक मसालेदार सुगंध दरवळू लागला. यात एका शीटवर सांबर सांडल्यानंतर "ए पलीकडे जाऊन खा बघू तू " अशा अर्थाच्या सूचना मिळाल्या.  यानंतर बरेच लोक ते सामुदायिक भोजन होण्याची वाट बघत बसले. सरतेशेवटी विमानात बसण्याची सूचना झाली व आम्ही निघालो. मधली सीट मिळाल्याने हालचाल करणे अशक्य होते व झोप घेणेही. थोडा टाइमपास म्हणून मग मी एक चहा घेतला. अर्थात तो फुकट न्हवता. ३० रु. मध्ये मला फुल कप चहा मिळाला! दीड तासाच्या कंटाळवाण्या फ्लाईट नंतर आणि ब्याग येण्यात अर्धा तास गेल्यानंतर दीड वाजता मी बाहेर पडलो.

तोपर्यंत राज ट्रव्हलच्या राजकुमार नावाच्या एका राजबिंड्या चालकाने मला तीनदा फोन केला होता.
त्याचे इंग्लिश चांगले होते हे नशीब! कारण तो कुठल्या खांबापाशी उभा आहे हे त्याने फक्त तिसऱ्या  वेळेस मला सांगितले तेव्हा समजले. यानंतर शोलीन्गानाल्लूर असे लम्बेचवडे नाव असलेल्या भागातील लांकोर नावाच्या गेस्ट हाउस च्या पार्किंग मध्ये त्याने मला आणून सोडले. या प्रचंड सोसायटीमध्ये दोन तीनदा जिने चढल्यावर मी योग्य घरात पोहोचलो. गौतम नावाच्या नेपाळी कूकने मला माझी खोली दाखवली.

सकाळी उशीरा  उठलो. कमल नावाचा अजून एक नेपाली मुलगा इथे राहत होता, त्याने मला ब्रेंड बटर चहा असा नाश्ता आणून दिला. त्यावर ताव मारून, आवरा  आवर करून मी मेन रोड वर आलो. इथून मला सिरुसेरी नावाच्या ऑफिस मध्ये जायचे होते. नशिबाने एक हिंदी जाणणारा माणूस भेटला, त्याच्याबरोबर मी शेअर्ड ऑटो मध्ये बसून सिरुसेरी ला पोहोचलो. या ऑटो मध्ये ८ लोक बसतात. ४ मागे सीट वर आणि ४ त्यांच्या पायात. ४ कन्यांच्या पायाशी बसून, एक पाय बाहेर सोडून चेन्नई दर्शन करत शेवटी ऑफिस आले. रिक्षा वाल्याने काही तमिळ शब्द उद्गारले, मी ५० ची नोट हातात ठेवली. त्याने २० रु परत दिले, त्यावरून तो ३० द्या असे म्हणाला असावा. पुढचे तीन दिवस मात्र मी taxi लावली आणि काही शब्द त्या चालकांकडून शिकून घेतले. थोडेसे शब्द येऊ लागल्यानंतर मग ऑफिसची बसच लावली!! भाषा येत नसेल तर इथे कामे करून घेणे अवघड. वही, पेन घ्यायला मी ऑफिस स्टेशनरी स्टोर मध्ये गेलो, पण काही सेकंदातच बाहेर आलो. ते काय बोलत आहेत ते मला कळत न्हवते आणि त्यांना इंग्लिश येत न्हवते. "तमिळ तेरीयादी" - म्हणजे तमिळ येत  नाही एवढे शिकून घेऊन मात्र मला खूप उपयोग झाला.

चेन्नई मध्ये काही केलाम्बाक्कम, सेम्बक्कम, मीनाम्बाक्कम अशी काही "क्कम"कारान्त नावे फेकली कि राहणे / फिरणे अवघड नाही. बसचे नंबर पाठ करणे सोपे आहे. २१H, ८१B हे १४४ किवा २८१ लक्षात ठेवण्यापेक्षा सोपे आहे. शिवाय येत असणारे काही तमिळ आणि इंग्लिश शब्द मध्ये मध्ये पकडून वाक्यांचा अर्थ लावणेहि जमायला लागते. बस कंडक्टरशी बोलणे मला सर्वात अवघड गेले. तिकिटाचे पैसे मी तो योग्य ते परत करेल या आशेवरच देत असे. एका रिक्शावाल्याने मात्र भाषा येत नसल्याचा गैरफायदा घेऊन मला गंडा लावला होता.

चेन्नईत थोडे दिवस राहायला लागल्यावर आपल्याला ते शहर आवडायला लागते. इडली-डोसा तर आपला जीव कि प्राण असतोच. तिथली माणसे आणि त्यांचे स्वभाव एकदा समजले कि मग इकडे तिकडे फिरायचा उत्साह येतो. मी ज्या गेस्ट हाउस वर होतो तिथे अजय शर्मा नावाचा एक नेपाळी कूक आला. तो पोंडीचेरीला राहिला असल्याने उत्तम तमिळ बोलत असे. मी त्याच्याबरोबर पोंडीचेरी व मरिना बीचवर जाउन आलो. रोज  सकाळ संध्याकाळ भरपेट जेवण, नाश्ता, चहा इत्यादी सर्व मिळत होते.

अजय शर्मा  लाघवी माणूस होता. तो मला पोंडी दाखवायला घेऊन गेला. तिथे गेल्यावर अरविंद आश्रमात जायच्या आधी मला एका बीअर बार मध्ये त्याने ओढून नेले. तिथे दोन ग्लास मारल्यावर आम्ही डुलतच योगी ओरोबिन्दो आश्रमात पोहोचलो. आम्ही दारू घेऊन आलो आहोत असा कुणाला संशय आला नाही. आश्रम बंद व्हायची वेळ झाली होती म्हणून फक्त अरविंदांच्या समाधीचे दर्शन घेतले. तिथे रांगेत उभे असताना हा शाबजी बडबड करू लागला. मला वाटले आता दोघांना बाहेर काढतात वाटते! कसेबसे तिथे आवरते घेऊन आम्ही बीच वर आलो. पोंडी गाव सुंदर आहे, फ्रेंच प्रभाव अजूनही जाणवतो. घरांची बांधकामे फ्रेंच आर्किटेक्चरचे उत्तम नमुने आहेत.

आम्ही चेन्नईहून १ वाजता निघून ३:३० ला तिथे पोहोचलो होतो. ९ वाजता पुन्हा निघायचे असल्याने  ४-५ तासात जमेल तेवढे बघून घ्यायचे होते. बीच वरून जरा फेरफटका मारून जेवायला गेलो. तिथे पण साहेबांनी ३/४ बीअरच्या बाटल्या मागवल्या. तो मला पैसे देऊ देत नव्हता - पण मी त्याला रोखले. आता जायची वेळ झाली म्हणून आम्ही बस स्टेंडकडे जाऊ लागलो. तर पुन्हा याला बीअर मारायची हुक्की आली! सर जरा ठंडा पिके आता हू असे म्हणून हा पुन्हा जाऊ लागल्यावर मी त्याच्यावर रागावलो. मग घाबरून तो परत फिरला. इकडे गेस्ट हाउसवर इन्स्पेक्शन ला कोणी आले असते तर आम्हा दोघांना हाकलले असते!

ऑफिसमध्ये सर्वानन भवनची कॅण्टीन होती. प्रचंड महाग.  सकाळचा नाश्ता  रु.३० ला मिळते असे, हाच पुणे ऑफिस ला १-२ मध्ये. क्वालिटी चांगली असली तरी एवढे पैसे नाश्त्याला द्यायला लोक वैतागले होते. त्यामुळे तिथे एक चळवळ चालू झाली, अर्थात त्याला फारसे यश आले नाही.  दुसरा एक व्हेंडर स्वस्त देत असे म्हणून जर बरे!

अशा रीतीने महिना घालवल्यानंतर एक दिवस जायची वेळ झाली. माझे सोबती अजय शर्मा आणि कमल यांना टाटा करून टक्सी बोलाविली. तर पुन्हा  तोच  राजकुमार मला सोडावयास आला होता! अशा रीतीने आमची चेन्नई स्वारी पूर्ण होऊन पुन्हा आपल्या पुण्यास यावयास निघालो…




Saturday, 9 March 2013

ऑ पाले दे आन्द, ब्रसेल्स

ऑ  पाले दे आन्द ब्रसेल्स … या नावाच्या भारतीय (खाना असलेल्या) हॉटेलसमोर आम्ही २/३ मिनिटे उभे होतो. तो ब्रसेल्स मधला आमचा पहिलाच दिवस होता. इतर हॉटेलसारखे इथे बाहेर मेन्यु कार्ड लावले नव्हते. पण लंच बुफे चा रेट ३० युरो (आक्खे २१०० रुपये) असा होता. लंडन मध्ये याच्या निम्म्याहून कमी किमतीत बुफे मिळतो. आम्ही तोंड वाकडे करून पुढे चालू लागलो. दोन दिवस ब्रेड, सांडविच व केळयान्वर काढल्यावर तिसऱ्या दिवशी फक्त पार्सल आणण्यासाठी आम्ही पुन्हा "ऑ पाले दे आन्द" (म्हणजे भारतीय राजमहाल!) समोर जाऊन ठाकलो. ते हॉटेल दुपारी २ ते ६ बंद असते. तेव्हा ५ वाजले होते, म्हणून पुन्हा तासाभराने आत प्रवेशते झालो.

दरवाजा उघडून आत गेलो तेव्हा समोर एक शाही बैठक होती, बरीच पितळी तबके ठेवली होती. हा वेटिंग एरिया. आत झिरमिळ्याचे पडदे होते. राज कपूरच्या सिनेमाचे एक पोस्टर बाहेर लावले होते. भिंतीवर सतार,नगारा अशी वाद्ये लावली होती एकंदरीत सगळा थाट व सजावट हैद्राबादी निजामाच्या दरबारात असल्यासारखी. भोजनकक्षाबाहेर जय-विजय सारखे दोन पुतळे होते - निजामाचे गुलाम.  पडद्यांच्या आत बरीचशी  टेबले सजवून ठेवली होती. त्यावर उंची मद्ये पिण्यासाठी ग्लासेस. बराचसा अंधार होता. प्रकाशाची सारी जबाबदारी काही मेणबत्यान्वर!!
डाव्या हाताला कौंटरच्या मागे एक गोरी शिष्ट बेल्जिअन बाई बसली होती. तिला मी नम्रपणे "इंग्लिश येते का ?" असे विचारले. माझ्याकडे बघूनच बाईने हे लो-बजेटवाले आहेत हे ओळखले होते, त्यामुळे ती जमेल तेवढा तुच्छपणा दाखवीत होती. मी टेक -अवे (पार्सल)ची विचारणा करून मेन्यु कार्ड बघू लागलो.

तेवढ्यात एक साधारण साठीचा फ्रेंच म्हातारा कोट / मफलर घालून आत आला. हि बाई सारखी फोन वरच बोलत होती. बहुधा पार्सल ऑर्डर / बुकिंग घेत असावी. म्हाताऱ्याला बघून तिने फोन खाली ठेवला. त्याने तिच्या दोन्ही गालांवर चुंबन घेतले. हे मलापण आधी का सुचले नाही? पण मागे अमिता बसली होती. म्हातारा हॉटेलचा मालक असावा असे वाटले. मोठा टेचात होता. आपल्याला बेल्जिअन रीतीरिवाज माहित नसल्याने मीही आपले गाल पुढे केले. पण तो तसाच पुढे निघून गेला माझ्या अंगावरून. मागे अमिता बसली असल्याने त्या दिशेने गेला नाही ना याची मी खात्री करून घेतली.

म्हातारा जय-विजयच्या मधून भोजनकक्षाकडे निघून गेला. मी त्याकडे पाहत असतानाच बाईने ऑर्डरची विचारणा केली. तिथे "व्हेज बिर्याणी - १४ युरो" एव्हढा एकच पदार्थ आम्हाला घेण्यासारखा होता. मी तो ऑर्डर केला. दिवसभराच्या ब्रसेल्स भ्रमंतीमुळे आम्हा दोघांचे डोके दुखत होते. म्हणून चार दिवस न मिळालेल्या चहाची विचारणा करण्याचे धाडस केले. कारण मेन्यु कार्ड मध्ये काहीच नव्हते. पण चहा होता, ३ युरोला होता. मी एकाच ऑर्डर केला. आम्ही बाहेरच तबकांजवळ बसलो. टेबलवर बसण्याची विनंती झाली नाही. कुहु ग्लास फोडेल म्हणून मीही विचारले नाही. मला वाटले चहा पार्सल देतात कि काय.
कुहु तबकांवर ठाण ठाण हात मारीत होती. ते तबक कुठल्याशा निजामाचे हात लागून पावन झाले होते. ओरखडे आले असते तर - जयविजय पैकी एकाला रिटायर करून मला तिथे उभे केले असते. मी या विचारात असतानाच तो म्हातारा आतून आला. त्याच्या हातात ट्रे होता. त्याने त्यातील किटली व कप तबकात ठेवला. म्हणजे हा मालक नसून वेटर होता तर. वेटर असून चुंबन घेत होता म्हणजे मालक असता तर….

… हा विचार पूर्ण होण्याआधीच "चा …चा … " असा कुहुचा चहात्कार ऐकू आला. मी किटलीताला चहा कपात ओतला. अमिता, कुहूस थोडा दिला. त्यातील बिस्कीट कुहूस दिले. त्या किटलीमध्ये चहाचा आक्खा खडा मसाला घातला होता (दालचिनी, वेलदोडे इ.) चहा दुधट पण बरा होता. जवळ जवळ तीन कप निघाला त्या कीटलीमधून. म्हातारा चांगला माणूस निघाला. त्याने कुहूस लॉलीपॉप दिला. आम्ही चहा घेत असताना एक चीनी (दिसणारी) मुलगी व तिचा फ्रेंच (दिसणारा) बॉयफ्रेंड आते आले आणि भीत-भीतच आम्हाला "बोन्जूर" म्हणून आत गेले. म्हातारा बाकीच्या मेणबत्त्या लावण्यासाठी निघून गेला.

आम्ही चहा संपवला. ती बाई एप्रन घालून आमची बिर्याणी घेऊन आली. म्हणजे हीही वेट्रेस होती तर. म्हणजे म्हाताऱ्याचे आणि हिचे काही? … असा चावट विचार मनात आला तेव्हा जय-विजय दोघेही माझ्याकडे अधीरतेने बघत होते. त्या बाईच्या चेहऱ्यावर "आता निघा" असेच भाव होते. मी कुहूचे बूट घालेपर्यन्त देखील तिथे थांबलो नाही. बाहेर आलो. अमिता मला ओरडतच बाहेर पडली. ऑ पाले दे आन्द नावाच्या त्या हॉटेलपासून आम्ही दूर चालू लागलो ते पुन्हा कधीच न येण्यासाठी.…

…. जय-विजय मात्र आपली रिप्लेसमेंट कधी मिळतेय या विचारात आजूनही तिथे उभे असतील. प्रत्येक गिऱ्हाईकाकडे कुतूहलाने पाहत असतील. म्हातारा रोज नेमाने ब्रसेल्स मधील रस्त्यांवरून खडखडत जाणाऱ्या ट्राम मध्ये बसून ठीकसंध्याकाळी ६ वाजता तेथे येत असेल. बाईचे चुंबन घेत असेल. मेणबत्त्या लावीत असेल. बाई भारतीय सोडून सर्वांना "बोन्जूर" म्हणत असेल. एप्रन घालून म्हाताऱ्याबरोबर पदार्थ सर्व्ह करीत असेल. तिथल्या पोस्टरमधल्या राजकपूरचे डोळेही भारतीय माणूस दिसल्यावर विस्फारत असतील. तिथली तबके थरथरत असतील, वाद्ये झंकारत असतील. रात्र झाल्यावर, नशेतले बेल्जिअन पुन्हा घरी गेल्यावर ती बाई कोट घालून गल्ला मोजत असेल. पोस्टरमधील नर्गिसच्या डोळ्यात आलेल्या अश्रुंवर म्हातारा फडके मारीत असेल. आणि त्यानंतर यांत्रिकपणे त्या खडखंडात करणाऱ्या ट्राम मध्ये बसून ते दोघे आपापल्या घरी जात असतील…

अमिता, कुहु, जय-विजय आणि ऑ पाले दे आन्द

Wednesday, 27 April 2011

अवताराचा बाप आणि बापाचा अवतार!

त्यांच्या निधनानंतर बरोबर दोन दिवसांनी सत्यसाई बाबा माझ्या स्वप्नात आले. आपला पुढील अवतार हा कुठल्या आंडू-पांडू तेलगु गावात नसून चक्क पुण्यात जन्माला येणार आहे आणि तो माझ्यापोटी येणार आहे असे ते म्हणाले. मी सर्व बोटे तोंडात घालून (स्वप्नात) उभा होतो. ते पुढे असेही म्हणाले, की मुलाचे नाव “प्रेम साई” असे ठेव. मी म्हंटले पण मुलगी झाली तर काय करू? त्यावर त्यांचे उत्तर तयार होते. “तू मराठी आहेस तेव्हा नुसतेच ‘प्रेमा’ अथवा ‘सई’ एवढे एकच ठेव, चालेल!”. स्वप्नात ते मराठी कसे काय बोलले हे मला कळले नाही. परंतु ते सर्वज्ञानी असल्याने त्यांना मराठी शिकायची काय गरज? कदाचित त्यांना सारखेच आंडू-पांडू बोलायचा कंटाळा आला असावा. ते तर ९६व्या वर्षी “वारणार” होते मग इतक्या लौकर कसे काय गेले हे मी विचारताच काहीही न बोलता त्यांनी हवेत हात फिरवून माझ्या हातात राख दिली. तसेच डोक्यावरचा एक केसही उपटून माझ्या हातात ठेवला आणि मूकपणे ते अंतर्धान पावले. त्यावेळी नेमकी सोन्याची अंगठी हवेतून कशी काय निघाली नाही याचे मला वाईट वाटले, गेला बाजार चांदीची तरी. पण ती स्वप्नातील राख असल्याने मी जास्त दुःख करीत बसलो नाही.

खरे सांगायचे तर मी स्वतः साई बाबांचा अवतार आहे हे मला लहानपणीच वयाच्या १० व्या वर्षी लक्षात आले होते. हे मी जाहीर करणार इतक्यात मला साई बाबांचा एक अवतार आधीच या जगात अस्तित्वात असल्याचे कळले. मग मी तो बेत रद्द केला. माझे अवतारपण लोकांना कळले नाही तरी आता माझ्या पोटच्या गोळ्यामध्ये ते आपसूक येणार आहे हे कळून मला जो आनंद झाला तो मी वर्णन करू शकत नाही! स्वप्नातून जागे झाल्यावर मी माझ्या बायकोस खडबडून उठवले. एवढ्या पहाटे काय ही कटकट म्हणून ती चिडूनच उठली. ही गोष्ट मी बायकोस सांगितली आणि तिची झोपही पळाली. माझ्या हातातील राख आणि केस बघून मात्र तिची खात्री पटली. तिला खूप आनंद झाला. बाळाचे पाय आम्हाला पाळण्यात नव्हे स्वप्नातच दिसले होते. आता बाळाच्या जडण घडणीची, पुढील आयुष्याची काळजी मिटली. होना, एका अवताराची आपण काय काळजी करणार? ते बाळ स्वयंभू होते, शिवाय १०व्या वर्षी ते स्वतःच “आपण साई अवतार असल्याचे” डीक्लेअर करणार होते. यानंतर भक्तगण काय ते बघून घेणार होते. बरं, हे भक्तगण पुण्याचे असले म्हणजे जरा खवचट असतील तेव्हा आम्ही बाहेर जाऊन त्यास गुंटकल जवळील “पुठ्ठामारती” नावाच्या गावात वाढवावे असाही एक अनाहूत सल्ला मिळाला. आम्हीं आनंदाने बाळजन्माची वाट पाहू लागलो. ती राख आणि केस आम्ही देव्हाऱ्यात ठेवला.

...आणि एके दिवशी सुमुहूर्तावर आमच्या घरी त्या अवतारी रुपाने जन्म घेतला. आम्हाला मुलगी झाली होती. मुलगी “बाबा-अवतार” होऊ शकते का हा प्रश्न मी स्वप्नातच मिटवला होता. त्या मुलीला दोन नावे ठेवली. प्रेमा आणि सई! प्रेमा आता आमच्या घरात वाढू लागली. तिच्या अवतारी रुपाची प्रचीती ती आम्हाला तिच्या चीमखड्या बोलातून करून देऊ लागली. तिची आई तिला प्रेमा म्हणत असे आणि मी सई. मी पूजेला बसलो असता तिथे येऊन ती ध्यान करत बसे. आम्हाला तर तिच्यात साक्षात बाबा दिसत असत. गाड्या, बाहुल्या, भातुकली या खेळात तर तिला रसच न्हवता. त्या ऐवजी ती साईंचे चरित्र घेऊन बसत असे. वेळ मिळेल तेव्हा (आमचे ध्यान) ध्यान करीत बसलेली दिसे. वयाच्या तिसऱ्या वर्षीच तिला गीतेचे दोन अध्याय पाठ होते. शाळेतील सर्व पाठ्य-पुस्तके रद्द करून बाबा-चरित्र, सथ्य साई भाषणे, साई वंदना, प्रशांती निलायम (अरेरे..इत्यादी) ही पुस्तके लावावीत असे तिने शाळेत सुचविले. तिला शाळेतील शिक्षकांनी (आणि काही टारगट पोरांनी) मुर्खात काढले. योग्य वेळ येताच त्यांना त्यांची चूक कळेल म्हणून आम्ही गप्प बसलो. शेवटी या जगात थोर महात्म्यांना कष्टातच दिवस काढावे लागतात. त्याला आपण सामान्य माणसे काय करणार?
सई अवतारी स्त्री आहे हे गुपित आम्ही कुणाला सांगितले नव्हते. एक गोष्ट आमच्या लक्षात आली की, केसांच्या बाबतीत सई बापाच्या वळणावर जाऊ लागली. तिच्या डोक्यावर फारसे केसच उगवेनात. मग तिचे केस कुरळे करण्यासाठी आम्ही एका डॉक्टरला भेटलो. केस प्रत्यारोपणाची प्रक्रिया करून सईच्या डोक्यावर कुरळे केस येऊ लागले. आम्ही हरखून गेलो. ज्यांना तिच्या अवताराची कल्पना नव्हती ते लोक आमची चेष्टा करायला लागले. पण शेवटी ते सामान्य लोकच, त्यांना काय कळणार हिऱ्याची पारख. काही लोक तर “अवतार” हा शब्द तिच्या केसांकडे बोट दाखवून कुचेष्टेने वापरायला लागले. आम्हाला संताप येत असे. पण थोर लोकांचे बालपण असेच वाळीत टाकल्यासारखे असल्याने, त्यांच्या आई-बापांचाही इलाज नसतो.
 
सहाव्या वर्षानंतर आलेल्या मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही तिला जादूगार परमवीर यांचेकडे काही जादू शिकावयास पाठविले. त्यातही आम्ही हवेतून वस्तू काढून दाखवण्याच्या जादूवर जास्ती लक्ष घालायला सांगितले. प्रेमाचा ओढा पत्त्यांच्या जादुकडे जायला लागला तेव्हा आम्हाला पत्ते लपवून ठेवावे लागले. पत्त्यातून फुले काढणे, रुमालातून चेंडू ठेऊन कबुतर काढणे कींवा माणूस अर्धा कापून पुन्हा जोडणे असल्या जादूचा तिला उपयोग नव्हता. हवेतून वस्तू काढणे यातच मास्टरी मिळव असे आम्ही तिला परोपरीने विनवीत होतो. ती अजिबात ऐकेना, तेव्हा मी एकदा तिला रागाच्या भरात गालावर हलकेच चापटी मारली. प्रेमा ढसाढसा रडायला लागली. मी हळूच मारले होते, पण तिची आई माझ्यावर ओरडली. मला पश्चात्ताप झाला. स्वामी मी हे काय केले, भक्तावर दया कर म्हणून मी देवासमोर बसलो. देव्हाऱ्यातील बाबांच्या केसाला हात लावून प्रतिज्ञा केली की आता प्रेमाच्या केसालाही धक्का लावणार नाही! (तसेही तिचे केस कृत्रिम आहेत, काहीही करा असे आमचा एक शेजारी खवचटपणे म्हणाला तेव्हा त्याच्या केसांना वाचविण्यासाठी मला खूप संयम बाळगावा लागला!).

प्रेमा वा सई आता जादुमध्ये तरबेज झाली होती. कुचक्या पुणेरी लोकांपासून दूर ठेवावे म्हणून आणि सत्संग लाभावा म्हणून आम्ही तिला आंध्रमध्ये “पुठ्ठामारती” गावात घेऊन गेलो. तिथे तेलुगु मीडीअम असलेने शाळेत घालता आले नाही. तसेच तिथे तिच्यासारखेच केस असलेली आणि भगवे कपडे घातलेली बरीच शाळकरी पोरे दिसल्याने आम्ही तिला परत घेऊन आलो. शेवटी या जगात सगळा बहिरुप्यान्चाच भरणा! खरा अवतारी पुरुष (स्त्री) कुणाला समजणार? आमच्या राजहंसाला त्या बदकांच्यात ठेवणे अगदी जीवावर आले. आम्ही उलट पावली पुण्यात परतलो.

सई आठ वर्षांची झाली, तिला गीतेचे ४ अध्याय पाठ येऊ लागले. पण आता पुढील अध्याय पाठ करायला ती टाळाटाळ करू लागली. आम्ही तिला एका गुरुबाबांकडे घेऊन गेलो. तिथे बसून ती संस्कृत श्लोक, गीता, वेद सगळे जाणून घेईल म्हणून. सई तेही मुखोद्गत करू लागली. सर्व ज्ञानी, विद्वान लोकांप्रमाणे सईला भगवा रंग खूप आवडत असे. जन्मजात विरक्तच लोक हे! ही विरक्ती तिच्याही अंगात भरली होती असे आम्हास वाटे. तिला जास्तीत जास्त भगवे कपडेच आम्ही आणून देत असू. तिचा टूथब्रश, कंगवा झालच तर दप्तरही भगवे होते. पण एके दिवशी तिच्या मैत्रिणींचे पाहून ती जेव्हा भगवी जीन्स आणि स्कर्ट मागायला लागली तेव्हा मात्र कमालच झाली. आम्ही साफ नकार दिला. थोडीशी रडली, यावेळी आम्ही तिची कशीबशी समजूत काढली. इंग्रजीत “चाईल्ड इज दी फादर ऑफ द मॅन” अशी म्हण आहे, आता “फादर इज दी चाईल्ड ऑफ द (अवतारी) डॉटर” अशी एक नवीन म्हण पडेल.

प्रेमा आता दहा वर्षांची झाली, आपल्या खऱ्या स्वरूपाबद्दल तिने अजून एक अक्षरही काढले नव्हते. आम्हाला थोडी काळजी वाटली, पण योग्य वेळ येताच बाबा आपले रूप दाखवतील ही खात्री होती. प्रेमाला आम्ही जुने भक्तीरसपूर्ण संतांचे चित्रपटच दाखवीत असू. एकदा ती आम्हाला ना सांगता मैत्रिणींबरोबर “मेरा दील मैने फेका, क्या तुने समेटा
” अशा नावाचा सिनेमा बघून आली. हा काहीतरी नवीन अध्यात्माचा प्रकार असावा म्हणून आम्ही तिकडे दुर्लक्ष केले.

प्रेमासईला बारावे लागले तेव्हा मात्र आम्ही खूपच काळजीत पडलो. ती आपला अवतार जगासमोर कधी डिक्लेअर करेल हेच कळत नव्हते. आम्हीच मग तिला विश्वासात घेऊन तिच्या मागील जन्माबद्दल आणि कार्याबद्दल सांगितले. तिला आश्चर्य वाटले. ही काहीतरी बाबांचीच इच्छा असावी कींवा ती ढोंग करत असावी कींवा योग्य वेळ आली नसावी बहुधा. मग आम्हीच हिय्या करून एक कार्यालय बुक केले. तिथे सर्व नातेवाईक, शेजारी आणि मित्र-मंडळीस (व काही पत्रकारांस) बोलाविले. प्रेमासईला भगवे वस्त्र घालून, तिच्या कुरळ्या केशसम्भारासकट घेऊन गेलो. तिथे तिने गीतेचे ५ अध्याय आणि काही श्लोक म्हणून दाखवले. शिवाय परमवीरांनी शिकवलेल्या जादूने हवेतून राख व सोन्याच्या साखळ्या काढून दाखवल्या. ह्या साखळ्या मुलामा दिलेल्या सोन्याच्या आहेत हे काही (खवट) पुणेकरांनी ओळखलेच. तिच्या जादूचे मात्र कौतुक झाले. हे झाल्यावर आम्ही आमची सर्व कथा-कथन केली (अगदी स्वप्नातील साक्षात्कारापासून) आणि प्रेमासई हेच कसे बाबांचे रूप आहे हे वर्णन केले.

या गोष्टीची कुणकुण लागलेला एक पत्रकार २/३ दिवसांपूर्वीचा एक पेपर घेऊन आला होता. लोकांना दुसऱ्याचे सुख बघवत नाही हेच खरे, त्यातल्या त्यात पत्रकारांना जास्त! त्या पेपरात बातमी होती “पुठ्ठामारती येथे साई अवताराचा साक्षात्कार! १० वर्षांच्या मुलात दिसल्या साईंच्या खुणा”. हा कोण भोंदू मुलगा आज साईंचा पुनर्जन्म म्हणून मिरवत होता. सगळीकडे त्याचा उदो-उदो झालेला दिसत होता. नशिबाने पुन्हा फासे माझ्यावर उलटवले होते. शेवटी या जगात असली पेक्षा नकलीचीच चलती जास्त!

खोट्या सोन्याच्या साखळ्या घेऊन पुणेकर घरोघरी निघून गेले. आम्ही कार्यालयाचे भाडे देऊन खिन्न मनाने घरी आलो. बायको म्हणाली आता तरी तिला थोडे माणसा-सारखे जगू देऊ. तिने सईची भगवी वस्त्रे काढून तिला छानसा फ्रॉक घातला. मी देव्हाऱ्यातील राख आणि केस कचराकुंडीत टाकून दिले. सईच्या पाठीत एक धपाटा घालून तिला मिठी मारली....तिच्यासाठी दुसरे करीअर शोधण्याची मोठ्ठी जबाबदारी आता मला पार पडायची होती!

Friday, 4 February 2011

डायरी ऑफ – अण्णा फाटक!

१ डिसेंबर २०१०: तीएतो मधील नाट्य चळवळ जवळ जवळ संपुष्टात आलेली. स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे मागील दोन प्रयत्न हे हौशे, नवशे आणि गवशे घुसल्यामुळे पूर्णपणे अयशस्वी. काही मोजकी नाटकाची बांधिलकी असणारी मंडळी एक्स्प्रेशन्स वगैरे विसरून आपापल्या कामात गर्क! अशावेळी चार टाळक्यांची कम्युनिकेटरवर कुजबुज सुरु होते. बहुलोकसंख्येमुळे जास्त आशा असलेल्या "ईऑन" ऑफिसमध्ये फारसे काही होणार नाही हे लक्षात आल्यावर, विकफिल्ड्मध्येच सुरुवात करू असा ओम्कारचा इरादा. कम्युनिकेटरवरील संवादातून अंधुकशी आशा घेऊन कुणाल, स्वप्नील, रोहित आणि श्वेता त्याच्या ऑफिसमध्ये जमतात. एकस्प्रेशन्सची नाट्यस्पर्धा २२/२३ जानेवारीला आहे, अजून दीडपेक्षा जास्त महिना आहे. परंतु स्क्रिप्ट लिहिण्यात वेळ घालवण्यापेक्षा रेडीमेड घेतलेली बरी हे सगळे मान्य करतात. एबीसी मधून पुरुषोत्तम आणि फिरोदियाच्या स्क्रिप्ट आणायचे ठरते.

४ डिसेंबर: परेश एजन्सीमध्ये स्क्रिप्टचा खजिनाच असतो. सुमारे दीडशे स्क्रिप्टच्या नावांचा एक कॅटलॉग मिळतो. त्यातून शॉर्टलिस्ट केलेल्या आठ स्क्रिप्ट्स विकत आणल्या जातात.

६ डिसेंबर: प्रत्येक जण दोन दोन स्क्रिप्ट घरी घेऊन जातो. वाचन करतो. आपलीच स्क्रिप्ट कशी योग्य वा अयोग्य हे पटवण्याचे काम ज्याचे त्याचे असते. एक्स्प्रेशन्स चा फिरोदिया फॉरमॅट, अभिनेत्यांची कमी, संगीत, नृत्य इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन स्क्रिप्ट निवडायची असते. काही संहिता केवळ दोनच पात्रे असल्याने रिजेक्ट होतात, काही एकही स्त्री पात्र नसल्याने तर काही गंभीर स्वरूपाच्या आणि सशक्त अभिनय लागणाऱ्या असल्याने!

९ डिसेंबर: स्क्रिप्ट ठरवण्यात अजून टाळकी वाढवल्यास वादावादीची शक्यता. म्हणून पाचानीच ते ठरवून जाहीर करावे व ग्रुप जमवावा असे ठरते. या मीटिंगला गजाननही हजर असतो. ओम्कार ईऑनमधून फोनद्वारे सहभागी होतो. सौरभ पारखेंची “डायरी ऑफ अण्णा फाटक” ही संहिता फायनल होते. यात आनंद, दुःख, प्रेम, विनोद, नाच, गाणी सर्व काही भरभरून होते व घालता आले असते. अगदी वेगळी, नवीन नसली तरी सर्व मालमसाला भरण्याइतकी आणि नवोदितांसाठी चांगली अशी ही स्क्रिप्ट होती. सर्वजण स्क्रिप्ट पुन्हा डोळ्याखालून घालतात, गजाननने दिग्दर्शन करायचेही ठरते. आणि पुणे-ऑलला जाणाऱ्या मेलची तयारी होते. भेटायची तारीख असते “१३ डिसेंबर”!!

१३ डिसेंबर: मिटींगच्या दिवसापर्यंत पुन्हा कम्युनिकेटरवरची कुजबुज जुन्या/नव्या सवंगड्यांना जमवण्यासाठी सुरु होते. १३ ला संध्याकाळी आयरिस रूम भरायला सुरुवात होते. आणि गम्मत म्हणजे ईऑनमधून लोक मोठ्या संख्येने यायला लागतात. त्यांचा तो उत्साह पाहून “हे नाटक होणार” याची सर्वांना खात्री पटते. ओम्कार सर्वांना एक्स्प्रेशन्सचा इतिहास, नाटक कसे करायचे आणि लागणारी कमिटमेंट याची माहिती देतो. प्रत्येकाचे नाव, इंटरेस्ट याची नोंदणी स्वप्नीलच्या लॅपटॉपमध्ये होते. अभिनय, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, नृत्य, गायन, वादन, चित्रकला, बॅकस्टेज – कितीतरी गोष्टी करण्यासारख्या असतात. यानंतर स्क्रिप्टचे सामुहिक वाचन होते व त्यातून आपल्याला असणाऱ्या संधी लोकांना उलगडत जातात. सर्वांनी रोज ६:१५ ला आयरिसमध्ये भेटायचे ठरते.

१५ डिसेंबर: आज अजून काही लोक मीटिंगला येतात. डायरी ऑफ अण्णा फाटकचे सामुहिक वाचन सुरु होते. अभिनयासाठी आलेल्या सर्वांना वाचनाची संधी मिळते. स्क्रिप्ट अधिक समजते. याचवेळी डान्स आणि म्युझिक ग्रुपची जमवाजमव सुरु असते. श्रुती आणि अदिती मेल डान्सरसाठी ऑडीशन्स घेतात, पण फारसे काही हाती लागत नाही. नाटकात काय डान्स करायचा म्हणून इतर काही “नर्तकी” नाके मुरडतात. शेवटी नृत्याची पूर्ण जबाबदारी श्रुती आणि अदितीच सांभाळणार असे ठरते.

१६ डिसेंबर: पूर्वानुभवामुळे कोऑर्डीनेटरची जबाबदारी रोहितकडे येते. आता लोकांची यादी ४० पर्यंत पोहोचलेली असते. प्रश्न असतो तो कोण किती पाण्यात आहे याचा. एव्हाना एक्स्प्रेशन्सच्या एन्ट्री फीचा चेक “अननोन वॉटर्स” कडे गेलेला असतो. आमचा स्लॉट नक्की झालेला होतो. २३ जानेवारी सकाळी ११ ते १२! आता माघार नाही...अण्णा फाटकचा प्रोजेक्ट सुरु झालेला असतो.

१७ डिसेंबर: आज रोल्स ठरवण्याचा दिवस. आमचा हुकमी एक्का योगेश बिझी असल्याने गजानन अण्णा साकारणार असतो. पण त्याच दिवशी योगेश गजाननला आपण उपलब्ध असल्याचे कळवतो आणि अण्णाचा रोल फिक्स होऊन जातो. आपल्या खास शैलीत ओम्कार इतरही रोल्स नक्की करतो. अण्णा-योगेश, चिमी-श्वेता, पक्या-रोहन, अण्णाची आई-श्रुती देगलूरकर, वडील अप्पा – गजानन, नंदू-हर्षद, अण्णाची बायको मंजी – प्रमिला, माटे गुर्जी व अन्या ढिशक्यांव – कुणाल. या गडबडीत अजून एक होतकरू अभिनेता स्वप्नीलला रोलच मिळत नाही व कुणालकडे असतात दोन भूमिका. पुन्हा चर्चा होऊन अन्या ढिशक्यांव स्वप्नील करणार असे ठरते. पुढे तोच ही भूमिका तोडफोड करणार असतो.

२० डिसेंबर: म्युझिक सेक्शन मध्ये उत्तम टीम बनलेली असते. अमित डायरेक्टर आणि तबलजी, सोनी आणि जयेश हे गायक, डॅनियल ड्रम्सवर, हार्मोनिअमला गिरीश आणि श्रीधर गिटार व माऊथऑर्गन असा फक्कड बेत! आजपासून नियमित तालीम सुरु होते. सर्व नटमंडळी आपापली वाक्ये पाठ करायला लागतात. इकडे गाणी आणि डान्स सिक्वेन्स ठरायला लागतात.

२१ डिसेंबर: हर्षद हळूहळू स्टेज डिझायनिंगच्या मागे लागतो. मूळ पुरुषोत्तम मध्ये झालेले नाटक फक्त त्यानेच पाहिलेले असते. इतरही बॅकस्टेजचे लोक जमतात – प्राची, अमेय, मंदार, मनोज अशी टीम बनू लागते. प्रॉपर्टीची आणि कॉश्चुमची लिस्ट सुरु होते. ओम्कार सौरभ पारखेंना फोन करून स्क्रीप्टसाठी परवानगी घेतो. म्युझिक, डान्स, अभिनय, सेट डिझाईन, बॅकस्टेज असे वेगवेगळे ग्रुप्स व त्यांचे हेड्स ठरवले जातात. प्रत्येकजण आपले नेमलेले काम घेऊन जोमाने तयारीला लागतो.

२७ डिसेंबर: आता मोठा प्रॉब्लेम असतो तो बजेटचा. बजेटिंग व प्रपोजल आधीच केलेले असते. यादरम्यान मानसी टीममध्ये जॉईन होते आणि अॅडमिनिस्ट्रेशन मधीलही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेते. ती बजेटही अप्रूव्ह करून घेते. पण २४ तारखेलाच सिस्टीम क्लोज झाल्याने कबुल केलेला अॅडव्हान्सही नंतर मिळत नाही.

२९ डिसेंबर: ४० लोकांनी नावे दिली असली तरी एक्स्प्रेशन्ससाठी ऑनस्टेज २५ + ५ बॅकस्टेज एव्हढेच लोक चालतात. आम्ही २७ लोकांची एक कोअर टीम बनवतो. (२३ + ४). द्रव्यनिर्मितीसाठी या २७ कडून प्रत्येकी रु. १०००/- परत बोलीवर घ्यायचे ठरते व सर्वजण ते आनंदाने मान्य करतात. आमचे टेन्शन थोडे कमी होते. यानंतर रंगीत तालमीसाठी “भरत नाट्य मंदिर” घेण्याचे ठरते. बहुतेक तारखा बुक्ड असतात. मोठ्या मुश्किलीने १८ जानेवारीचा सकाळी ९ ते १२ चा स्लॉट मिळतो!

१/२ जानेवारी २०११: आता विकेंडची तालीम महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या हिराबागेतील हॉल मध्ये सुरु होते. सर्वजण जोषात आलेले असतात. एकमेकांना अभिनयात सुधारणा सुचविल्या जातात. नवरी आली व नमन नटवरा ही नांदी अशी दोन गाणी ठरलेली असतात. डायरिचा सेट बनायला लागतो. ड्रेपरी आणि प्रॉपर्टीची लिस्ट वाटून दिली जाते.

४ जानेवारी: सर्वांची कॉमन प्रॅक्टिस आता आयरिस मध्ये सुरु होते. सर्व वाद्ये ऑफिसमध्ये येतात. अण्णाची ट्रंक आणि इतर साहित्य जमते. नाटक वेग घेते! एव्हाना भरतची आणखी एक तारीख मिळालेली असते. शनिवारी ८ ला रात्री ९ ते १२!

५ जानेवारी: बेधुंद ग्रुपची स्थापना! आज नाटक ग्रुपला बेधुंद असे नाव दिले जाते. सारंगची एक कविता हा आमचा स्लोगन बनते. आणि त्यावरून टी-शर्ट करायचे ठरते.

७ जानेवारी: ए-विंग टेरेसवर “नवरी आली” या गाण्याची कोरिओग्राफी ओम्कार दिग्दर्शित करतो. सुरुवातीच्या आरडाओरडीनंतर लोक जोशात येतात. त्याच दिवशी सर्व फोर्मेशन्स बसून जातात आणि ८ ला काय करायचे ते ठरते.

८ जानेवारी: रात्री ८:३० सगळे भरतला जमतात. पहिले ४/५ वेळा फक्त सेट लावण्याची प्रॅक्टिस होते. सुमारे १.५ मिनिटात अख्खा सेट लावून होतो आणि १ मिनिटात काढून! अर्थात सर्व प्रॉपर्टी नसल्याने खरा वेळ हा त्यापेक्षा जास्त लागणार असतो! त्यानंतर ९:३० ला नवरी आलीची प्रॅक्टिस आणि एक एक सीन्स होतात. काही जण स्टेजवर प्रथमच पाउल ठेवत असतात! ही तालीम नंतर रंगीत तालमीसाठी खूप उपयोगी पडते.

१२ जानेवारी: आता सर्वांची तालीम व्यवस्थित सुरु असते आणि एवढ्यात योगेश आजारी पडतो. नंतर आजारपण वाढू नये म्हणून तो २/३ दिवस सुट्टी घेतो. त्याच्यावर महत्वाची जबाबदारी असल्याने त्याला जास्त त्रास न देणे इष्ट असते!

१५/१६ जानेवारी:...तरीही तो विकेंडच्या तालमीस हजर राहतो. १८ च्या रंगीत तालमी आधी हाच वेळ असतो. म्युझिक, डान्स, अक्टिंग सर्व एकत्र होते! प्रत्येकजण आपापल्या ड्रेपरीच्याही मागे असतो. कपडे भाड्याने / विकत आणले जातात. अण्णाची ट्रंक, आराम खुर्ची, तांब्या-भांडे, इत्यादी इत्यादी सर्व साहित्य एकत्र ठेवले जाते.

१८ जानेवारी: योगेशची तब्बेत पूर्ण बरी नसते. तरीही रंगीत तालमीसाठी तो आणि श्रुती पूर्ण कमिटमेंट ठेऊन सकाळी ८:३० ला हजर राहतात. ओम्कार मात्र येणार नसतो. सुरुवातीचा बराच वेळ पहिलाच सेट लावण्यात जातो! शेवटी सेट लावायचा सराव सोडून ९:४५ ला पूर्ण नाटकाची रंगीत तालीम सुरु होते. आमचा लाईट ऑपरेटर मयुरेश हजर असतो. अन्नोन वॉटर्सचीच साऊंड सिस्टीमही भाड्याने घेतलेली असते. हे सर्व घेऊन तारांबळ उडत असतानाच ओम्कारची स्टेजवर एन्ट्री होते. मग तो पुढचे दिग्दर्शन पार पाडतो! ११ वाजता अन्नोन वॉटर्सचीच मुग्धा आमच्या मागे “मेकिंग ऑफ अण्णा फाटक” शूट करण्याची भूण भूण लावते. आम्ही सर्व ग्रुप जमून तिला इंटरव्ह्यू देतो, नाटकाचे / गाण्यांचे / नाचाचे काही शॉट देतो. थोडीशी रुखरुख लावूनच ही तालीम संपते. व्हिडिओ बघत असतानाच आम्हाला आमच्या चुका समजायला लागतात! लाईट्स चे प्रॉब्लेम (अंधार!) कळतात. हर्षदने बनविलेली डायरी बाद ठरविली जाते आणि दुसरी डायरी सुताराकडून करून घ्यायचे ठरते. आधी आलेला जोष थोडासा गळून पडतो. अजून आपल्याला बरीच मजल मारायची आहे याची खात्री पटते.

१९ जानेवारी: आता फक्त ४ दिवस उरलेत! अशात योगेशला कांजिण्या झाल्याची खबर येते. पुढचे १० दिवस कंपल्सरी विश्रांती! त्यामुळे तो येणे आता अशक्य असते. अण्णाच्या भूमिकेचा आणि नाटकाचा आधारस्तंभच गळून पडतो. सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. चर्चा सुरु होते. आधीच रंगीत तालीम सोसो झालेली असते, त्यात ही नवी भर! संध्याकाळी ६ ला सर्वजण आयरिस मध्ये निमुटपणे जमतात. कुणाच्याच चेहऱ्यावर उत्साह नसतो. सगळेच सैरभैर आणि उदास. आता स्पर्धेतून माघार घेणे शक्य नसते. हताश मनाने सर्वजण एकमेकांच्या ऑडीशंस घेऊ लागतात. सुरु होतो नव्या अण्णाचा शोध!

श्रुती (अण्णाची आई!) पण योगेशची काळजी घ्यायला घरी असते. जवळपास प्रत्येक सीनमध्ये अण्णा असल्याने कुणाचीच तालीम होऊ शकत नाही. आता नवा अण्णा ठरवणे हेच पहिले काम असते. योगेश २३ ला सकाळी आला तर? अशी अंधुक आशा सर्वांनाच लागून राहते. हर्षद, सारंग, कुणाल, रोहित, गजानन सर्वजण ऑडिशन टेस्ट देतात! बऱ्याच चर्चेनंतर गजानन अण्णा करणार असे ठरते. आज धीर द्यायला ओम्कार पण नसतो. गजानन त्वरित दाताच्या डॉक्टरला फोन लावतो. योगेशने अण्णाचे “पुढे आलेले दात” करून घेतलेले असतात. ते आता पुन्हा बनवावे लागणार असतात! थोडीशी तालीम करून गजानन दात बनवायला जातो. त्याच्याबरोबरचे ट्युनिंग जुळवण्याच्या प्रयत्नातले इतर सहकलाकारही घरी जातात!

२० जानेवारी: तीएतो “पुणे ऑल” ला आधीच इमेल गेलेली असते. पासेस वाटलेले असतात आणि ऑफिसमध्ये तिकीट विक्रीही सुरु होते. आपले व्ही.आय.पी. म्हणून निलेश, पूर्णिमा आणि उद्धवने सहकुटुंब यायचे मान्य केलेले असते. परतीचे सर्व दोर आता कापलेले असतात!

२१ जानेवारी: आज ओम्कार येतो. आम्ही जरा लौकरच ४:३० ला भेटतो. रंगीत तालीम वाईट झाली तर प्रयोग चांगला होतो असा आशेचा सूर लावला जातो. ओम्कार – हर्षद ने अण्णा करावा असे सुचवतो. आणि पुन्हा नवीन सावळा गोंधळ सुरु होतो. हर्षद कडून संवादाची तालीम घ्यायला सुरुवात होते. त्याचेही दात आता बनवावे लागणार असतात. काय चाललेय हे कोणालाच कळत नसते. २ तासांच्या प्रयत्नानंतर हर्षद आपल्या “नंदूच्या” भूमिकेतून बाहेर येऊ शकणार नाही हे सर्वांना उमगते. आणि मग पुन्हा ही धुरा गजाननच्या खांद्यावर येते. पूर्वीच्या नाट्यानुभावामुळे त्याला आत्मविश्वास दांडगा असतो. गजाननचे अप्पाचे काम रोहितकडे येते. आता मध्ये फक्त एकच दिवस राहिलेला असतो. तेवढ्या दिवसात नवीन अण्णा उभा राहणार असतो. तो गजानन आणि आम्ही बाकी सर्व एक इतिहास घडवायला सिद्ध झालेलो असतो.

२२ जानेवारी: सकाळी १०:३० ते संध्याकाळी ७ पर्यंत अथक तालीम आज होणार असते. सगळा फोकस गजानन वर असतो. त्याचे सर्व सीन्स तीनतीनदा रिपीट केले जातात. सारंग त्याला या कामी खूप मदत करतो. पूर्ण नाटकाची तालीम होते. नवरी आली गाणे पुन्हा एकदा बसवले जाते. गजानन नवीन दात लावून बोलण्याचा सराव करीत असतो. रोहित आणि मंदार राहिलेले कॉश्च्युम्स आणायला पळतात. दुपारी ४ ला श्रुती येते! ती फक्त दोनच तास थांबणार असते. त्या कालावधीत तिच्या आणि अण्णा / अप्पांच्या सीन्सची तालीम होते. रात्र थोडी आणि सोंगे फार अशी परिस्थिती. गजाननची बरीच तयारी होते. संवाद विसरले कि इतरांनी कसे सांभाळून घ्यायचे हे पण ठरते. एम.सी.सी. चा हॉल एक वॉररूम बनून जाते. सर्वजण बाजीप्रभूसारखे खिंड लढवत असतात. इन्फोसिस, कॉग्निझंट, पर्सिस्टंट, झेन्सार, सायबेज असे मातब्बर योद्धे समोर असतात. फक्त उद्या सकाळी १२ पर्यंत टिकायचे असते! मग शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचल्याची तोफ ऐकू येणार असते! शेवटी ७ ते ८ पर्यंत बॅकस्टेज टीमची एक मीटिंग होते, त्यात डीटेल प्लान ठरवला जातो. मुख्य विषय सेटचे टायमिंग आणि वस्तू वेळच्या वेळी पुरवणे हा असतो. ८ नंतर सगळे घरी जातात. रात्री १० ला हर्षद आणि रोहित – नवीन डायरीचा सेट भरत समोरील वाड्यात आणून ठेवतात.

२३ जानेवारी: ज्यासाठी केला अट्टाहास तो दिस उगवलेला असतो! सकाळी ८:३० ला सर्व जण “बेधुंद” टी-शर्ट्स घालून भरतसमोर जमू लागतात. मानसी फुले देऊन सर्वांचे मन प्रसन्न ठेवण्याची जबाबदारी सांभाळते. भरतसमोर एक चहा मारल्यावर सर्वजण ताजे तावाने आणि रिलॅक्स होतात. कसलेच टेन्शन नसते. स्टेजवर जाऊन धिंगाणा घालायचाय एवढेच सर्वांना माहित असते. एवढ्यात नवीन अण्णा येतो. त्याचा हसतमुख चेहरा पाहून सगळे सुखावतात. ९ वाजता सेट आत नेला जातो, मेकअप रूम ताब्यात घेतली जाते. चेहऱ्यावर रंग चढू लागतात. वरती फुजीत्सूचा प्रयोग चालू होतो तेव्हा खालचे वातावरण तापू लागते. चलबिचल वगैरे काही न होता अजूनच जोष चढू लागतो. बरेच उशिरा त्यांचे नाटक संपते आणि आम्ही सगळे वर जातो!

आता बॅकस्टेजचे काम सुरु झालेले असते. सर्व सेट स्टेजच्या मध्ये आणून ठेवला जातो. अननोन वॉटरच्या माणसाचा तगादा चालू होतो. लाईट लावण्यात बराच वेळ चाललेला असतो. पण तो आमच्या टायमिंग मध्ये धरला जात नाही. शेवटी एकदाची शिट्टी होते आणि मग सेट लावण्यासाठी पळापळी सुरु होते. निम्मा सेट आधीच लावलेल्या स्थितीत असल्याने जास्त वेळ जात नाही. १ ते २ मिनिटात सगळे होते. आणि मग सर्व जण आपापल्या पोझिशन्स घेऊन उभे राहतात. बाहेर प्रेक्षकांसाठी “मेकिंग ऑफ अण्णा फाटक” चा व्हिडिओ चालू असतो. तो संपतो, अमेय “कर्टन कॉल” देतो आणि नांदी सुरु होते!! श्रुतीचे नृत्य आणि नांदी झोकात झाल्यावर – अनाउन्समेंट होते व हर्षद/कुणाल डायरी उघडून ठेवतात. पहिला सीन चिमी / अण्णा / पक्याचा सुरु होतो तेव्हा सगळे आपापल्या भूमिकेत शिरलेले असतात. बॅकस्टेजचा एक माणूस नवीन अण्णाच्या दिमतीला हजर असतो. अण्णा, दुधाची रांग,अन्या, नंदू, आई, माटे गुरुजी, अप्पा असे एकामागून एक सीन्स झाल्यावर “नवरी आली” गाणे सुरु होते आणि नाटकाचा कळस गाठला जातो. या प्रसंगात जवळ जवळ सर्व पात्रे रंगमंचावर येतात. वेगवेगळ्या कला दाखविल्या जातात. आणि टाळ्यांच्या गजरातच हे गाणे संपते. सर्वांना आता एक नशा चढलेली असते. पुढचे सीन्सही व्यवस्थित पार पडतात आणि नाटक शेवटाकडे येते. अण्णाचा शेवटचा मोनोलॉग, हर्षदचे कॉमन मॅनचे पेंटिंग आणि कविता होते. अमेय पुन्हा “कर्टन कॉल” देतो आणि सगळे जण हु:श करतात. फारशी ढोबळ चूक न होता नाटक निर्विघ्न पार पडलेले असते! पुन्हा एकदा सेट उचलण्याची पळापळ सुरु होते. स्टेज क्लीअर केले जाते आणि टायमिंग बघितले जाते तेव्हा ५८ मिनिटे झालेली असतात! एका तासाला दोन मिनिटे कमीच! बाहेर येऊन एकच जल्लोष होतो. सर्व जण कलीग्स आणि नातेवाईकांना भेटण्यात गुंगून जातात. आमचे व्ही.आय.पी. निलेश आणि पूर्णिमा टीमचे अभिनंदन करतात. तिकडे मेकअप रूम मध्ये पुन्हा आवरा-आवरी, सेटचे सामान हलवणे इ.इ. सुरु होते.

इतकी संकटे येऊनही आपण एक उत्तम सादरीकरण केले याचा सर्वांनाच आनंद होतो! आता नंबर येईल न येईल पुढचे पुढे...सहभोजन करून लोक घरी जातात. गेला दीड महिना न मिळालेली शांत झोप घेण्यासाठी!

२४ जानेवारी: रिझल्ट डिक्लेअर् होतो. आम्ही पहिल्या पाचात नसतो. पण ९ वैयक्तिक बक्षिसांसाठी आम्हाला नामांकने मिळालेली असतात. कंपनी मीटिंग मध्ये बेधुंद ग्रुपचे कौतुक केले जाते. पुन्हा एकदा सर्व जण हवेत तरंगू लागतात.

३० जानेवारी: आज् बक्षीस समारंभ. ओरिजिनल अण्णा योगेशही आज फिट होऊन येतो! पुरस्कार जाहीर होतात तशी उत्कंठा वाढत जाते. “आवाज कुणाचा ...” वगैरे घोषणांच्या गदारोळात आणि आम्ही चक्क ६ बक्षिसे घेऊन जातो! संगीत, गायन, नृत्य, सेट डिझाईन, अभिनय सर्वच क्षेत्रात! पुन्हा एकदा जल्लोष आणि पार्टी होते. आणि नाटकावर पडदा पडतो.

तृप्त मनाने अण्णाची डायरी बंद होते.... गेल्या दीड महिन्याने आणखी काही नाही तरी एक जबरदस्त आत्मविश्वास दिला, टीम स्पिरीट दिले, नवीन मित्र / मैत्रिणी, एक समृद्ध करणारा अनुभव दिला आणि दिल्या कधीही न विसरणाऱ्या आठवणी !!!

|| बुवा उवाच ||

Thursday, 2 December 2010

Because I Am A Man...

Because I'm a man, when I lock my keys in the car, I will fiddle with a wire clothes hanger and ignore your suggestions that we call a road service until long after hypothermia has set in.

Because I'm a man, when the car isn't running very well, I will pop the hood and stare at the engine as if I know what I'm looking at. If another man shows up, one of us will say to the other, "I used to be able to fix these things, but now with all these computers and everything, I wouldn't know where to start." We will then drink beer.


Because I'm a man, when I catch a cold, I need someone to bring me soup and take care of me while I lie in bed and moan. You never get as sick as I do, so for you this isn't a problem.


Because I'm a man, when one of our appliances stops working, I will insist on taking it apart, despite evidence that this will just cost me twice as much once the repair person gets here and has to put it back together.


Because I'm a man, I must hold the television remote control in my hand while I watch TV. If the thing has been misplaced, I may miss a whole show looking for it (though one time I was able to survive by holding a calculator).

Because I'm a man, I don't think we're all that lost, and no, I don't think we should stop and ask someone. Why would you listen to a complete stranger? I mean, how the blazes could he know where we're going anyway?


Because I'm a man, there is no need to ask me what I'm thinking about. The answer is always either sex or sports. I have to make up something else when you ask, so don't.


Because I'm a man, you don't have to ask me if I liked the movie. Chances are, if you cried at the end of it, I didn't.


Because I'm a man, I think what you're wearing is fine. I thought what you were wearing five minutes ago was fine, too. Either pair of shoes is fine. With the belt or without it looks fine. Your hair is fine. You look fine. Can we just go now?

Because I'm a man, and this is, after all, the new millennium, I will share equally in the housework. You just do the laundry, the cooking, the gardening, the cleaning, the vacuuming, the shopping and the dishes, and I'll do the rest.

[Courtesy: unknown author]

Monday, 15 November 2010

पहिला पांढरा हत्ती घेतला तेव्हाची गोष्ट...


रॉकी पर्वतावर गाडी!
 ....नुकताच मी राहिलेला शेवटचा पांढरा हत्ती विकत घेतला, अर्थात चारचाकी! पांढरा हत्ती म्हणजे ज्याला इंग्रजीत व्हाईट गुड्स म्हणतात वा ज्याच्या खरेदीपेक्षा त्याची पोसण्याची किंमत जास्त असते अशी वस्तू. यावरून अमेरिकेत कार घेताना घडलेल्या गमती आठवल्या. ड्रायव्हिंग लायसन्स हातात आल्यावर मी एक गाडी भाड्याने घेतली. ओल्ड्समोबिल नावाच्या कंपनीची अलेरो नावाची हि गाडी होती. हि दोन्ही नावे मी पूर्वी कधीही ऐकली न्हवती आणि त्यानंतरहि कधी ऐकली नाहीत. आता तर हे गाडीचे मॉडेलच बंद झाले आहे. त्या गाडीवर सराव करता करता मी स्वतःची गाडी घेण्यासाठी शोधकार्य सुरु केले. थोरांचा सल्ला घ्यावा म्हणून काही सिनिअर कलीग्सना विचारले असता खालील उद्बोधक माहिती मिळाली:
१. शक्यतो जपानी कारच घेणे. दुसरा नंबर जर्मन / कोरिअन कार्सला आणि सर्वात शेवटी अमेरिकन.
२. अमेरिकन कार जास्तीत जास्त १ लाख मैल पर्यंत पळू शकतात. त्यांची रिसेल किंमत फार कमी असते. जपानी कार्स मात्र २ लाखापर्यंत जोरात पळतात.
३. कुठलीही जुनी कार घेताना १ लाखापेक्षा कमी रनिंग झालेली घेणे. शक्यतो लीझने दिलेली गाडी घेऊन नये, रेंटल कंपनीच्या गाड्या घेऊन नयेत.
४. ५/६ वर्षांपेक्षा जुनी कार नकोच.
५. कारफॅक्स.कॉम नावाची एक वेबसाईट आहे. त्याच्यावर कारचा आयडी (व्हीन) टाकला कि तिची सगळी हिस्टरी मिळते. ३०$$ भरून महिनाभाराचे एक अकौंट घे आणि एक एक कार बघून आलास कि त्यावर शोध.
६. कार्स.कॉम नावाच्या साईटवर रीसेल्च्या सर्व कार्स लिस्ट केलेल्या असतात. तिथे कोलोराडो मधल्या जपानी कार्सवर (बजेटमधल्या) सर्च मारणे.
७. अमेरिकन पोलीस फोर्डच्या गाड्या वापरतात, काही वर्षांनी त्या लिलावात विकल्या जातात. त्या ऑक्शनला जाऊन ये, तिथे कदाचित चांगले डील मिळेल. काही लोक म्हणाले त्या गाड्या अज्जिबात घेऊ नकोस – पोलीस कुठेही आणि कसेही ठोकतात म्हणे!
८. केली ब्लू बुक नावाच्या अजून एका जुन्या कारच्या किमती ठरवणाऱ्या कंपनीच्या साईट वर जाऊन आवडलेल्या कारचे सर्व डीटेल्स टाकून मार्केट प्राईस बघणे. इत्यादी इत्यादी....

सर्व उपदेश ऐकून त्याप्रमाणे मी कार बघायला सुरुवात केली. कारफॅक्सचे एक अकौंट पण घेऊन टाकले. आता मला एक महिन्याच्या आत कार घेणे भाग होते, नाहीतर पुन्हा ३०$ भरा. वरील सर्व अटी लक्षात ठेऊन मी होंडा आणि टोयोटा या दोनच कंपन्यांच्या कार्स बघायला सुरुवात केली, बजेट होते $४००० ते $५०००. बऱ्याच कार्स ऑनलाईन पाहिल्यावर लक्षात आले कि एकतर कार खूप जुन्या होत्या, हिस्टरी खराब होती कींवा इतर काही त्रुटी असत. माझे बजेटही आता वाढवावे लागले. काही लोक कारचा आयडी देत नसत त्यामुळे त्या कार प्रत्यक्ष जाऊन बघणे आवश्यक होते. एव्हाना माझे लोन पास झाले होते आणि न्यूजर्सीच्या आमच्या ऑफीसने माझ्या अकौंटमध्ये ३०००$$ ट्रान्स्फर केले. गाडीच्या कर्जाची रक्कम तेवढीच असे. तेवढ्यात आमच्या फायनान्स ऑफीसरने काहीतरी घोळ करून अजून ३०००$$ माझ्या अकौंटला पाठवले! फुकटात बिनव्याजी जास्ती कर्ज मिळाले. सुवर्णसंधी! पण ते जास्तीचे ३००० मला उलट टपाली चेकने पाठवावे लागले. कंपनीला दिलेला तो माझा पहिला आणि शेवटचा चेक असावा! त्यामुळे आहेत त्या पैशात मी गाड्या शोधू लागलो...

एकदा “व्हॅलरी रे” नावाच्या एका बाईची कार मला नेटवरील माहिती पाहून ठीक वाटली. हि बाई डेन्व्हर ला राहत असे. होंडाचे सिव्हिक नावाचे मॉडेल तिच्याकडे होते. मी तिची अपोईंटमेंट घेऊन एके दिवशी सकाळी ९ ला जितेंद्र बरोबर तिच्याकडे पोहोचलो. तिच्या नवर्याने आम्हाला गाडी दाखवली. आम्ही त्याच्याबरोबरच एक टेस्ट ड्राईव्ह घेऊन आलो. काही गोष्टी नाही आवडल्या तरी कार बरी होती. मी वेहिकल आयडी नंबर (व्हीन) घेतला आणि परतलो. दुपारी रेकॉर्ड चेक करून सगळे ठीक आहे हे बघितले आणि तिला फोन केला. कारची किंमत तिने ५००० ठेवली होती. मी ४५०० ला मागितली. ती विचार करते म्हणाली. मला वाटले होईल तयार! रात्री तिला पुन्हा फोन केला तेव्हा मला म्हणाली कि कार विकली गेली. एक जण ४६०० द्यायला तयार आहे. मी म्हणालो मी तुम्हाला अजून १०० वाढवून देतो ४७००! कारण भाड्याच्या गाडीचेच महिन्याला १००० भाडे होते त्यामुळे घाई करणे आवश्यक होते. पण म्हणाली नाही मी आता त्याला कबुल करून टाकले आहे. मी निश्वास सोडला. पुन्हा शोध सुरु.

काही दिवसांनी दुसरी एक गाडी सापडली. हि होती टोयोटाची करोला. याचाही व्हीन नंबर दिला न्हवता. गाडीची किंमत ३६०० लावली होती. तशी जुनी असली तरी स्पेसिफिकेशन्स पाहून इतर गाड्यांच्या तुलनेत किंमत कमी वाटली. यावेळी मी साहिल आणि शीतलला घेऊन गेलो. त्याच्याकडे पण करोलाच होती. डेन्व्हरच्या अरोरा नावाच्या एका उपनगरात हि गाडी होती. गोल्डन पासून सुमारे ५० किमी चा रस्ता! एका रविवारी दुपारी आम्ही तिकडे गेलो. तो पत्ता एका बंगल्याचा होता. एका काळ्या कुळकुळीत निग्रो बाईने स्वागत केले. तिची तीन मुलेही बरोबर होती. त्यांच्या गॅरेजमध्ये गाडी लावलेली होती. तिने गाडीची किल्ली दिली आणि बघून घ्या म्हणून सांगितले. आम्ही तिघेही टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेलो. साहिलला गाडी छान वाटली. काही गोष्टी विचारून त्याने घ्यायला हरकत नाही असे प्रमाणपत्र दिले. किंमतही ठीक वाटली म्हणून जास्ती निगोशिएट करायची गरज नाही असेही म्हणाला. आम्ही ड्राईव्ह करून परत आलो तो पर्यंत त्या बाईचा नवरापण परत आला होता. त्याने आमची ओळख करून घेतली. हा माणूस चेन्नई ला शिकायला होता, त्याने आम्हाला शुक्रिया वगैरे म्हणून काही हिंदी वाक्ये तोंडावर फेकली. आम्ही इम्प्रेस झालो. तो आम्हाला म्हणाला कि हि गाडी त्याची नाहीये एका मित्राची आहे. त्यानेच विकायला त्याच्या ग्यारेज मध्ये ठेवली आहे. त्यामुळे तो मित्राला विचारूनच किमतीविषयी काय ते सांगेल. आम्ही ठीके म्हणून परत आलो. रात्री मी कारफॅक्सचे अकौंट उघडून गाडीचा व्हीन नंबर टाकला आणि पाहतो तो काय – त्या गाडीचे २ मोठ्ठे अॅक्सिडेंट झाले होते. ४ वर्षांपूर्वी ती गाडी पूर्ण बरबाद झाली होती. त्यानंतर पुन्हा रिपेअर करूनहि एकदा अॅक्सिडेंट झाला होता. ती गाडी घेणे म्हणजे मुर्खपणा होता! मी साहिलशी बोलून बेत रद्द केला. अजून एक गाडी गेल्यामुळे वाईट वाटले. त्या “गोडबोल्या” काळ्या माणसाने आम्हांला चांगलेच बनवले होते. त्याला वाटले असेल हे कारफॅक्स बघणार नाहीत. तेव्हापासून कानाला खडा लावला.

यानंतर कार्स.कॉम वर एक जाहिरात वाचली. टोयोटा कॅम्री. किंमत ६०००. सर्व फिचर्स चांगले वाटले. व्हीन टाकून सगळी हिस्टरी चेक केली तीही ठीक होती. त्या कारचे ३ ओनर झाले होते, म्हणजे मी चौथा असणार होतो. तसच ती ८/९ वर्षे जुनी होती, एकूण प्रवास १,१९,००० मैल झाला होता. आणि एकदा ती कार लीझिंग कंपनीला विकली गेली होती. तरीही एकदा जाऊन पाहायचे ठरले. बोल्डर नावाच्या एका निसर्गरम्य गावात ती गाडी होती. मालकाला सवड नव्हती म्हणून त्याने दुसऱ्या एका मित्राच्या ऑफीस मध्ये गाडी ठेवली होती. मी आणि माझी एक कलिग संगीता ती कार बघायला गेलो. बोल्डर मधल्या रस्त्यामधून आम्ही हरवून गेलो. पत्ता बरोबर असूनही एक्झिट लवकर मिळत न्हवता आणि आम्ही एकाच मॉलभोवती गोल गोल फिरत होतो. शेवटी एकदाचा तो छोटासा एक्झिट मिळाला आणि आम्ही मॉलमध्ये पोहोचलो. आम्हाला उशीर झाला म्हणून तो माणूस निघूनच चालला होता, पण थांबला! आम्ही गाडी बघितली आणि त्यातून चक्कर मारून आलो. गाडी आवडली. तो म्हणाला तुम्ही मालकाशी डायरेक्ट बोलून घ्या. रॉबर्ट ग्रीन नावाच्या माणसाची हि गाडी होती. आमचे दोघांचे इनिशिअल्स एकाच होते आर.जी.! मी त्याला फोन केला आणि ५५०० ला गाडी मागितली पण तो तयार होईना. माझे घराचे लोन आहे म्हणाला, ते कमी करण्यासाठी तो गाडी विकत होता. शेवटी त्याने फक्त १००$ कमी केले आणि ५९००$$ ला तयार झाला. टोयोटा कॅम्रीचे हे १९९६ चे मॉडेल होते. स्पेशल यूएस एडिशनमध्ये काढलेले. गाडीला सनरूफ पण होते. गाडी उत्तम स्थितीत होती, पाहताच मोहात पडावी अशीच.

रॉबर्टचे ऑफिस गोल्डनच्या जवळच होते १० मैलांवर. तिथे त्याने मला बोलावले. एप्रिल २६, २००५. जोरात पाऊस पडत होता. मी माझी ओल्ड्स्मोबील घेऊन निघालो, त्याला कॅश हवी होती म्हणून बँकेत जाऊन कॅश काढली आणि त्याच्या ऑफीसला पोहोचलो. भर पावसात त्याने पैसे नीट मोजून घेतले. कार मला नीट दाखवली, काही गोष्टी सांगितल्या. त्यानंतर एका सेल्स-डीलवर आम्ही स्वाक्षऱ्या केल्या. कारचे टायटल डॉक्युमेंटहि त्याने मला देणे अपेक्षित होते. पण त्याचे लोन फिटल्याशिवाय ते तो मला देऊ शकणार न्हवता. मी रिस्क घ्यायचे ठरवलेच होते. हातातोंडाशी परिस्थिती आल्यावर माणूस आंधळा होऊन काही गोष्टींकडे काणाडोळा करतोच! त्या एका कागदावर मला नंबर प्लेट मिळेल असे तो म्हणाला. त्यानंतर माझ्याकडे दोन कार झाल्या. एक भाड्याची आणि एक माझी. मी त्याला माझ्याबरोबर त्याची कार घेऊन रेंटल कंपनीत यायची विनंती केली. त्याला पुन्हा ऑफीसला सोडायच्या अटीवर त्याने ती मान्य केली! मी भाड्याची कार देऊन सर्व सोपस्कार पूर्ण केले आणि मग नव्या मालकाने जुन्या मालकाला त्याच्या गाडीतून ऑफीसला सोडले. पाऊस अजूनही पडतच होता. भर पावसात मी माझी पहिली गाडी घेऊन ऑफिसमध्ये निघालो...

जेफरसन कौंटीच्या ऑफिसमध्ये जाऊन टेम्पररी रजिस्ट्रेशन करावे लागे. त्या सेल-डील च्या कागदावर तेवढेच शक्य होते. काही दिवसांनी कबुल केल्याप्रमाणे रॉबर्टने टायटल घरी आणून दिले. मी कौंटीच्या ऑफिसमध्ये गेलो आणि जुने टायटल देऊन माझ्या नावावर नवीन टायटल करून घेतले. तसेच गाडीसाठी नंबर प्लेटही करून घेतली. आता मी निश्चिंतपणे माझी गाडी चालवू शकत होतो...!

कार्स.कॉम वरील टोयोटा कॅम्रीची हीच ती जाहिरात.