Tuesday, 15 December 2009

विलायतेतील केशकर्तन - सगळे न्हावी सारखेच!

अमेरिकेतल्या लोकांना कुठल्याही दुकानाची वा हॉटेलची चेन काढल्याशिवाय चैन पडत नाही असे म्हणतात! या लोकांनी अगदी न्हाव्याच्या धन्द्यालाही सोडलेले नाही. गोल्डनमध्ये एका अशाच चेन मधले केस कापायचे दुकान होते! चेनचे नाव छान होते - "कॉस्ट कटर्स". घराजवळ चालत जाण्यासारखे असल्यामुळे आम्ही इथेच कटिंगला जात असू. इथे केस कापायला सर्व मुलीच होत्या आणि त्यामुळे सुरुवातीला अगदी कसतरीच वाटायचं :-)


दुकानात गेल्यावर पहिल्यांदा नंबर लावावा लागे. गर्दी असेल तर शेजारील बाकावर अमेरिकेतील गुळगुळीत मासिके वाचत बसायचे. त्यानंतर एखादी बाई वा मुलगी बोलावत असे. त्यातल्या त्यात सुंदर दिसणारीकडे आपला नंबर लागावा असे आम्हाला वाटे. पण नशीब नेहेमीच थोर नसे. एकदा डोके त्यांच्या हातात दिले कि मग आपण विचार करणे सोडावे. मुली खूप गप्पिष्ट होत्या. कुठून आला, कुठे नोकरी करता इत्यादी प्रश्न तयार असायचे. मग आपणही काहीतरी विषय काढून त्यांना प्रश्न विचारायचे - असे हे रुटीन चालत असे. केस कापून झाले कि मग बेसिनमध्ये डोके धुवायचे. आपले न्हावी जसे "दाढीहि करू का?" विचारतात तसे एकदा एका बाईने मला "कोंडा खूप झाला आहे, शाम्पू करू का?" असे विचारले. मी म्हंटले बघूया करून. तिने माझे डोके बेसीन मध्ये घालून शाम्पू लावून धु धु धुतले. नंतर जाताना एक २०$ चा "टी-ट्री" नावाचा शाम्पूही गळ्यात मारला. तो पुढे ६ महिने चालला होता.

कॉस्ट कटर्स चा रेट जरा जास्ती होता १४$. आणखी वरती २$ टीप पण द्यावी लागे. शिवाय tax! गोल्डन मध्ये दुसरे एक "हेअरीटेज (Hairytage)" नावाचे दुकान होते तिथे १०$ मध्ये कटिंग करून देत म्हणे. लांब असल्याने आम्ही कधी गेलो नाही. कार घेऊन केस कापायला कोण जाणार? कॉस्ट कटर्स मध्ये मी एकदा मजेशीर दृश्य पाहिले होते. तिथली एक मुलगी प्रवेश द्वाराच्या पुढील व्हरांड्यात सिगारेट पीत आपल्या बॉयफ्रेंडशी गप्पा मारीत होती. मी गेलो तेव्हा जास्त लोक नसावेत. पण मी आत गेल्यावर हि बया लगेच सिगरेट टाकून आणि त्या बाप्याला टाटा करून आत आली! माझे केस कापायला. हि जरा उडानटप्पू असावी. नेहेमी एक कटिंग झाली कि सिगरेट ओढायला बाहेर पळत असे. असो.

एकंदरीत आपले न्हावी आणि अमेरिकेतल्या या न्हाविणी यांच्यात मला जास्त फरक वाटला नाही ....
इंग्लंड मध्ये असताना चार महिन्यांच्या वास्तव्यात केस कापायचा प्रसंग एकदाच आला! इथे ज्या दुकानात गेलो होतो तिथे एक मध्यपूर्वेतील माणूस (बहुदा अब्दुल) ते दुकान चालवत असे. बाहेरचा रेट १० पौंड असताना हा ५ पौंड घेत असे. हा सुरुवातीचा discount होता आणि नंतर त्यानेही रेट वाढवला. इथेही खूप गर्दी होती आणि जवळपास एका तासाच्या तपस्येनंतर मला नंबर मिळाला. अब्दुल ने कटिंग मात्र चांगली केली आणि तो त्याच्या तोडक्या मोडक्या इंग्रजीत गप्पाहि मारत होता. त्याला सलाम ठोकून विदेशातील ती शेवटची कटिंग करून मी बाहेर पडलो ...

No comments:

Post a Comment