Friday 18 December 2009

रेल्वेतले भांडण आणि डरपोक ब्रिटीश!


ऑक्टोबर २००७ मधील एका रविवारची संध्याकाळ. लंडनच्या ऑक्सफर्ड स्ट्रीटवर थोडी खरेदी करून ट्युबने मी वाटर्लू स्टेशनवर पोहोचलो. आठ वाजून गेले होते. माझे गाव "स्टेन्स" वरून जाणारी विंडसरची ट्रेन ८:३५ ला सुटणार होती. सैंडविच आणि कॉफी घेऊन मी वाट बघत बसलो. platform नंबर १४ वर ट्रेन लागली आणि वेळेत सुटलीही. डब्यात बऱ्यापैकी गर्दी होती. दिवसभर जीवाचे लंडन करणारे सगळे आपापल्या गावी परतत होते. मी अगदी पहिल्या डब्यातच चढलो होतो म्हणजे ड्रायव्हरच्या मागच्या. याचे कारण एकच, ते म्हणजे स्टेन्सला उतरल्यावर पहिल्या डब्यापासून आमचा दादर जवळ होता!

वाटर्लूनंतर लागणारी vaxhall (ओव्हलचे क्रिकेट स्टेडीयम इथेच आहे), नॉर्थ शीन, clapham junction इत्यादी स्टेशने मागे पडली. आता मला जरा ट्रेनच्या मागच्या बाजूला कोलाहल ऐकू येऊ लागला. वळून पाहिल्यावर कळले कि दोन दारुडे ग्रुप्स भांडत आहेत. दोन्ही ग्रुप बऱ्याच तावातावाने बोलत होते. बंद ट्रेन मध्ये बाकी काहीच आवाज नसल्यामुळे त्या शांततेचा भंग होऊ लागला. मागील बाजूस बसलेले, दिवसभर थकलेले गोरे लोक हळूहळू डब्याच्या पुढील भागात येऊ लागले. मीहि तिथेच बसून होतो. काय हि कटकट आहे यासुरात ते कुरकुर करू लागले.

आता थोड्या वेळाने त्या भांडणाऱ्या माणसांचा आवाज वाढला. हे लोक कधीही खिशातून चाकू काढून समोरच्याच्या पोटात खुपसतील असे विचार मनात डोकावू लागले. तिकडे असे प्रकार अंधारात सर्रास चालत होते. आणखी एवढे CCTV क्यामेरे लावूनही गुन्हेगार सापडत नसत!

गोऱ्या ब्रिटीशांच्या सहनशक्तीचा कडेलोट होऊ लागला. काही लोक हळूहळू मागील डब्यात सटकू लागले. काहींना काय करावे सुचत न्हवते म्हणून शिव्या घालत तिथेच बसून होते. तेवढ्यात मागील काही लोकांनी मध्यस्ती करायचा प्रयत्न केला (हे त्या ग्रुप मधलेच होते!). पण या प्रयत्नानंतर आगीत अजून तेल ओतले गेले आहे एवढेच माझ्या लक्षात आले. ते लोक इंग्लिश मध्ये बोलत असूनही एकही अक्षर मला समजत न्हवते. या वेळेपर्यंत आमचा निम्मा दाबा रिकामा झाला होता. मला गार्ड कसा अजून येत नाही याचे आश्चर्य वाटत होते.

शेवटी एक रिचमंड नावाचे स्टेशन आले. तिथे गाडी थांबल्यावर राहिलेल्या काही गोऱ्या लोकांनी मागील डब्यात पोबारा केला :-) काही लोक बाहेरून डब्यात चढत असताना त्यांच्या लक्षात आले कि इकडे काही काळेबेरे आहे. ते लगेच मागच्या डब्याकडे गेले. एक गोष्ट माझ्या लक्षात आली कि एवढ्या शिस्तीच्या ब्रिटीश लोकांपैकी एकही जण त्यांना शांत करायच्या फंदात पडला नाही अथवा त्यांना ओरड्लाही नाही! थोड्या वेळाने गार्ड डब्यात आला!

गार्डने प्रथम भांडण थांबवायचा प्रयत्न केला. पण ते अजूनच जोरात भांडू लागले. त्यांचा राग आपल्यावर कधी निघेल या भीतीने गार्डही जास्त बोलत नव्हता. शेवटी त्याने दुसऱ्या एका गार्डला मदतीला बोलावले. तेवढ्या वेळात मीही आता वैतागलो होतो. एव्हाना बाकीचे ब्रिटीश डब्यातून निघून गेले होते आणि राहिलेले बहुधा त्या दारूड्यांचेच दोस्त असावेत. त्यात काळा माणूस मी एकटाच होतो. मलाही आता भीतीपेक्षा कटकट जास्त होऊ लागली होती. आवाज टिपेला पोचला होता. मीहि मुकाट्याने डब्यातून उतरलो आणि चांगले ३/४ डबे मागे जाऊन बसलो.
वाटले आता तरी संपले. पण आपले नशीब फार थोर असते, त्या गार्डने त्यातील एका ग्रुपला माझ्याच डब्यात पाठवून दिले! ते थोडे शांत बसले पण माझ्याकडे कुत्सितपणे पाहत होते. "हा पप्पू पहिल्याच डब्यातून आलाय" हे त्यांना कळले असावे. माझ्या बरोबरचे गोरे मग पुन्हा जीव मुठीत धरून बसले. एक गोरा माणूस आपल्या बायकोचा हात धरून होता. नक्की कोण घाबरलेय तेच कळत नव्हते. जवळ जवळ २०/२५ मिनिटे लेट झाल्यानंतर मग गाडी निघाली. आता मात्र गाडी सुसाट निघाली. मधल्या एक दोन स्टेशनांवर आम्हाला वैताग देणारे हे महाभाग उतरून गेले आणि सर्वांनाच हायसे वाटले.

मी रात्री दहाला स्टेन्सला उतरलो आणि सुनसान रस्त्यावरून घराकडे चालू लागलो...

No comments:

Post a Comment