Wednesday, 12 May 2010

मेहेरबानी - एका पाकिस्तानी taxi ड्रायव्हरची आणि श्रीलंकन मुलाची!

इंग्लंडमधील सुरुवातीच्या दिवसातील हा प्रसंग. मी तेव्हा एका कलीगच्या घरी राहत होतो. घराची शोधाशोध चालू होती. एकदा ऑफिस मध्ये क्लायंटला सांगून लवकर पळालो. विंडसरहून स्टेन्सला जायला taxi पकडली. मर्सिडीजची taxi होती ती! ड्रायव्हर "ब्राऊन स्कीन" वाला होता. एशिअन असावा असा मी अंदाज बांधला. बोलता बोलता कळले कि तो पाकिस्तानी आहे. मुळचा पेशावरचा. २० वर्षांपूर्वी पाकिस्तान सोडून इंग्लंडला आला त्यावेळी तो पंचविशीत होता. रेडीओ वर आपले बॉलीवूडचे म्युझिक च्यानेल ऐकत होता. हिंदी गाणी त्याला आवडत असत. बोलता बोलता स्टेन्स च्या पुलावर गाडी कधी आली तेच कळले नाही! मी उतरलो. ११ पौंड बिल झाले होते, पण माझ्याकडे सुट्टे पैसे न्हवते. १० च्याच नोटा! तो म्हणाला वरचा १ पौंड देऊ नका, मी त्याला १० पौंड दिले. अशाप्रकारे टीप तर राहोच पण बिलाची पूर्ण रक्कमहि त्याने घेतली नाही! त्याच्या डोळ्यात आपला कोणीतरी गाववाला भेटल्याचा भाव होता हे मला अजूनही आठवते!

.....असेच एकदा संध्याकाळी स्टेन्स स्टेशनवरून घरी येताना पाउस पडू लागला. सुरुवातीला भुरूभुरू असणारा पाउस लगेचच वाढला! माझ्याकडे छत्री न्हवती म्हणून मी एक शेडखाली उभा राहिलो. तोच मागून एक श्रीलंकन मुलगा छत्री घेऊन येत होता. हा स्टेन्स स्टेशनवरील "सविताज" नावाच्या दुकानात काम करत असे. तिथे २/३ वेळा गेल्यामुळे तो मला ओळखता होता. त्याचे नाव जयसूर्या किंवा अट्टापट्टु किंवा असेच काहीसे असावे. स्वभावाने गरीब असा हा मुलगा माझ्यासाठी थांबला आणि मला आपल्या छत्रीतून घेऊन जाण्याचा आग्रह करू लागला. नको नको म्हणतच मी त्याच्याबरोबर चालू लागलो. त्याच्या बरोबर गप्पा मारल्या, त्याच्या श्रीलंकेतील घराविषयी चौकशी केली. फारसा संबंध नसतानाही तो मुलगा माझ्या घराजवळील वळणापर्यंत मला सोडायला आला. त्याला धन्यवाद देऊन मी घराकडे वळलो!

Thursday, 8 April 2010

“फार्मव्हील वरचे आम्ही शेतकरी...”

“माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं” च्या चालीवर...

कुणाच्या गोठ्यामंदी शंभर गाई चरती, सत्तर बकरेSS नांदती शेतावरती.
राहती डुक्करे गोडीSगुलाबीनेS, राखणीला उभा घोडाSS कुंपणा वरती!

रुजवे फुले कोणी, पेरणी भाताची. करती पैदासSS बक्कळ प्राण्यांची.
मिळती आम्हालाS भेटी या सर्वांच्याS, करतो मग आम्हीS जोशात कापणी.

उगवले रान माझे चिंता हि लागली! नेतील तोडूSन गुरे, नासाडी पिकांची.
कोवळे हात अमुचेS शेतात राबती, हायरे शत्रू कितीS बुरी नजर त्यांची.

विश्वाच्या जालावरतीS किती हो रमती, शेतात गुंतूनS संसार सोडती.
पहावे जिथे तिथेS अपडेट असती, किती हो लगबगS फेसबुकावरती.

करावी बचतS थोडी हो वेळेची, कशाला करावीSS? शेती हि फुकाची.
खूळ हे जालाचेS असते जालीम, जातो आहारी जो जो वाट हो लागे त्याची.

द्या कि सोडून रावजीS झाले हे आता अति, बघते वाट तुमचीS देशाची काळी माती.
शिकवा कि तुमच्या युक्त्या आपल्या किसाना, घाम गाळून तो जोमाने करेल शेती.

||  इति ||

Thursday, 14 January 2010

नाटक ....त्यांचे आणि आपले!

एके दिवशी ऑफिस वरून येताना विंडसरच्या स्टेशनवर ट्रेन पकडण्यासाठी उभा होतो. आजूबाजूला न्याहाळत असताना एक जाहिरात दिसली. "Pygmalion " या नाटकाची ती जाहिरात होती. विंडसरच्या रॉयल थियेटरमध्ये हे नाटक लागले होते. Pygmalion म्हणजे पुलंनी ज्याच्यापासून "ती फुलराणी" लिहिले ते मूळ नाटक. नाव वाचताच एकदम पाहायला जाण्याची इच्छा झाली. पण त्यावेळेला मी थोडा नवखा असल्याने थोडी वाट पाहण्याचे ठरवले. एक दोन महिने मी नुसत्या त्या स्टेशनवर नाटकाच्या जाहिराती पाहत होतो. त्या नंतर कुठलेहि माहितीतले नाटक लागले नाही. काही देसी कुटुंबांवर आधारलेली नाटकेही लागली! पुन्हा "pygmalion " ची जाहिरात मात्र काही दिसली नाही. मी सतत थियेटरच्या वेबसाईटवर जाऊन पाहत होतो : Theater Royal Windsor Website.
शेवटी एकदाचे मिळेल ते आणि लागेल ते नाटक पाहायचे ठरवले! नाटकाची वेळ रात्री ८:०० ते ११:०० ची असल्यामुळे ऑफिस झाल्यावर विंडसरमधेच थांबणे भाग होते. शिवाय रात्री शेवटची ट्रेन ११:२० ला सुटत असे तीही गाठायला हवी वेळेत! नाहीच मिळाली तर विंडसरहून स्टेन्स ला taxi करून जावे लागले असते. माझा रूम-मेट दिनेश चिन्नास्वामी हा तमिळ होता, त्याला विचारले येतोस का नाटकाला? त्याला नाटक बिटक हा प्रकार नवीन होता, तरीसुद्धा काय असते ते बघायला त्याने होकार दिला. मग मी लगेच तिकिटे काढली. २२ पौंडाचे एक तिकीट. तारीख ठरली होती ४ ऑक्टोबर २००७. नाटकाचे नाव होते "रोम्यांटिक कॉमेडी".


ठरल्या प्रमाणे त्यादिवशी ऑफिस मधून बाहेर पडल्यावर आम्ही विंडसर मधेच फिरत होतो. रॉयल विंडसर थियेटर हे "विंडसर कॅसल" च्या अगदी समोर आहे. पूर्वी इथे राणी / राजा सुद्धा नाटक पाहायला येत असत म्हणे. त्यांच्या साठी नाट्यगृहात वेगळे सज्जे केलेले आहेत. पाऊणे आठ वाजता आम्ही नाट्यगृहात प्रवेश केला. अगदी चौथ्या रांगेतले तिकीट असल्याने नाटक जवळून पाहता येणार होते. Tom Conti नावाचा एक मुख्य अभिनेता या नाटकात होता. त्याला कुठल्याश्या सिनेमा साठी ऑस्कर नोमिनेशनही मिळाले होते म्हणे.

आम्ही स्थानापन्न झालो आणि बरोब्बर ८:०५ ला पडदा वर गेला. आम्ही दोघे काळे सोडल्यास बाकी सगळेच लोक गोरे होते तिथे. आणि मुख्य म्हणजे सगळेच साठीच्या पुढचे वाटत होते. तरुण लोक जास्ती नाटकांना येत नसावेत. त्यांनाही आश्चर्य वाटत असेल कि हे दोन देसी तरुण इकडे काय करताहेत? नाटकाची गोष्ट साधारण अशी होती - एका प्रसिद्ध लेखकाच्या लग्नाच्या दिवशीच त्याला त्याची एक तरुण चाहती भेटते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. नंतर ती त्याची पीए म्हणून काम करते. आणि मग त्याच्या संसारातील गमती जमती, त्याचा "अरसिक" बायकोशी घटस्फोट, पीए बरोबर भांडण आणि पुन्हा लग्न अशा वळणाने हा प्रवास पुढे जातो. कथा साधीच असली तरी मुख्य दोन कलाकारांचा अभिनय उच्च होता. स्टेजवरचा सेट हा त्या लेखकाच्या घराचा लावला होता आणि तो खूपच ल्याव्हीश होता. त्यांचे कॉशच्यूम्सहि बरेच खर्चिक होते. एकंदरीत सर्व श्रीमंती होती. त्यांचे काही विशिष्ठ संवाद सोडल्यास पूर्ण नाटक समजायला काहीच अडचण आली नाही!

बाकी माहोल मात्र आपल्या बालगंधर्व सारखा होता. ९:१५ वाजता मध्यंतर झाला तेव्हा आम्ही बाहेर आलो. थियेटरमधेच एक बाई आईस क्रीम विकत होती. २ पौंडाला एक कप! आम्ही दोघांनी आईसक्रीम खाल्ले. इतर सर्व म्हाताऱ्या लोकांनी सुद्धा आपापल्या बायकांबरोबर त्याचा आस्वाद घेतला. मध्यंतरानंतर पुन्हा आत गेलो आणि त्याच उत्साहात उरलेले नाटक पाहिले.

तसेच नाट्यगृह, तसेच लोक, तसेच अभिनेते - सगळे तसेच - अगदी बालगंधर्व मध्ये नाटक पाहतोय असाच भास होत होता! ब्रिटनच्या राजघराण्यातील लोक जिथे बसून नाटक पाहत होते त्या नाट्यगृहात नाटक पाहिल्याचे एक समाधान घेऊन आणि एक प्रसन्न अनुभव घेऊन आम्ही बाहेर पडलो. पुन्हा नेहेमीप्रमाणे स्टेशन वर आलो. शेवटची ट्रेन लागलेलीच होती, ती पकडून स्टेन्स कडे जायची प्रतीक्षा करू लागलो.

Monday, 11 January 2010

आम्ही साले भिकारचोट!

रस्त्यावरून जाताना अवचित एक जुना मित्र भेटतो. तो अजूनही तसाच आहे, धडाडीचा - पण फारसे यश न मिळालेला. मी यशस्वी. माझ्या खिशात हजार रुपये खुळखुळत असतात, त्याच्या खिशात असते एकच दहाची नोट. गप्पा मारत आम्ही एका टपरीवर पोहोचतो. काय घ्यावे याचा दोनतीनदा विचार करून मी पाच रुपयाचा वडापाव घेतो, दहा रुपयांचा इडली सांबार सोडून. तो मात्र इडली सांबारच घेतो. दहाची नोट उडवून टाकतो. खाता खाता मला सांगतो कि, आता थोडा पगार वाढला तर तो नायकेचे बूट घेणार आहे आणि दोन वर्षात एखादी रेसिंग बाईक! त्याच्या खिशात आता शून्य रुपये आहेत आणि माझ्या खिशात नऊशे पंचाण्णव!

खरा दरिद्री कोण? खिशात शून्य रुपये असताना मोठ्ठ्या स्वप्नांचे इमले बांधणारा तो माझा मित्र कि हजार रुपये असताना पाच रुपये वाचविण्यासाठी विचारांची कुरतड करत वडापाव खाणारा मी? माझ्या वृत्तीवर चार शिव्या हासडून तो चालू लागतो, त्याच्या स्वप्नांचे कौतुक करावे कि काय या विचारात मी शब्द गिळतो.....

Tuesday, 22 December 2009

एक हिंदी कविता - जेब का मुसाफिर

गार्गी फुले यांच्या अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेसाठी लिहिलेली, काव्यवाचनातून शब्दफेक इ. शिकण्यासाठी लिहिलेली एक हिंदी कविता. "मुसाफिर" हा विषय दिला होता, त्यावर एका नोटेचा प्रवास कसा होतो याचे चितारलेले चित्र -

जेब का मुसाफिर

सुनलो भाई मेरी कहानी, मै तो हूँ एक सौ का नोट.
जेब-जेब में बीती जिंदगी, यादें कितनी आती है लौट.

पैदा होते बैंक में गया, मूल्य लगाथा बडाही थोक.
रखा मुझे बहुत शानसे, आखिर था मै एक सौ का नोट.

पड़ाव जो अगला आया वोह था, छगनलाल का काला कोट.
धन्य है वोह कंजूस जिसने रखा सहजकर मुझको रोज.

छोटासा था बेटा उसका, पर था उसमे बडाही खोट!
हार गया जब लगा दांवपे , मै बेचारा सौ का नोट.

लगा हाथ जब एक नेता के, देखे उसके अनेक मुखोट.
भ्रष्टाचार की बहती गंगा, उफ़ फस गया मै सौ का नोट.

मंदिर की पेटी में पाया एक दिन, पड़ा था मै खाके चोट.
उठाया पुजारीने खुशीसे, जब देखा उसने सौ का नोट.

जाने कैसे हाथ आया हिजड़ेके, हाय वोह उसके रंगे होठ.
नचाया उसने लोगों के सामने, मै "बेबस" एक सौ का नोट.

भिखारी देखे मुझे गिरा जहाँ, था वोह कोई एक गाँधी रोड.
मुझे उठाने की चाहत में, लगाये वोह एक अंतिम दौड़.

हाय हाय रे ट्रक ने उड़ाया, खायी उसने गहरी चोट.
ढेर हो गया वोह भिखारी, मिला न उसको सौ का नोट.

मै सोंचू उसका भाग्य सलोना, इधर कम्बक्त ना आती है मौत!
चाहकरभी ना मरू, अमर हो गया मै सौ का नोट.....

Friday, 18 December 2009

रेल्वेतले भांडण आणि डरपोक ब्रिटीश!


ऑक्टोबर २००७ मधील एका रविवारची संध्याकाळ. लंडनच्या ऑक्सफर्ड स्ट्रीटवर थोडी खरेदी करून ट्युबने मी वाटर्लू स्टेशनवर पोहोचलो. आठ वाजून गेले होते. माझे गाव "स्टेन्स" वरून जाणारी विंडसरची ट्रेन ८:३५ ला सुटणार होती. सैंडविच आणि कॉफी घेऊन मी वाट बघत बसलो. platform नंबर १४ वर ट्रेन लागली आणि वेळेत सुटलीही. डब्यात बऱ्यापैकी गर्दी होती. दिवसभर जीवाचे लंडन करणारे सगळे आपापल्या गावी परतत होते. मी अगदी पहिल्या डब्यातच चढलो होतो म्हणजे ड्रायव्हरच्या मागच्या. याचे कारण एकच, ते म्हणजे स्टेन्सला उतरल्यावर पहिल्या डब्यापासून आमचा दादर जवळ होता!

वाटर्लूनंतर लागणारी vaxhall (ओव्हलचे क्रिकेट स्टेडीयम इथेच आहे), नॉर्थ शीन, clapham junction इत्यादी स्टेशने मागे पडली. आता मला जरा ट्रेनच्या मागच्या बाजूला कोलाहल ऐकू येऊ लागला. वळून पाहिल्यावर कळले कि दोन दारुडे ग्रुप्स भांडत आहेत. दोन्ही ग्रुप बऱ्याच तावातावाने बोलत होते. बंद ट्रेन मध्ये बाकी काहीच आवाज नसल्यामुळे त्या शांततेचा भंग होऊ लागला. मागील बाजूस बसलेले, दिवसभर थकलेले गोरे लोक हळूहळू डब्याच्या पुढील भागात येऊ लागले. मीहि तिथेच बसून होतो. काय हि कटकट आहे यासुरात ते कुरकुर करू लागले.

आता थोड्या वेळाने त्या भांडणाऱ्या माणसांचा आवाज वाढला. हे लोक कधीही खिशातून चाकू काढून समोरच्याच्या पोटात खुपसतील असे विचार मनात डोकावू लागले. तिकडे असे प्रकार अंधारात सर्रास चालत होते. आणखी एवढे CCTV क्यामेरे लावूनही गुन्हेगार सापडत नसत!

गोऱ्या ब्रिटीशांच्या सहनशक्तीचा कडेलोट होऊ लागला. काही लोक हळूहळू मागील डब्यात सटकू लागले. काहींना काय करावे सुचत न्हवते म्हणून शिव्या घालत तिथेच बसून होते. तेवढ्यात मागील काही लोकांनी मध्यस्ती करायचा प्रयत्न केला (हे त्या ग्रुप मधलेच होते!). पण या प्रयत्नानंतर आगीत अजून तेल ओतले गेले आहे एवढेच माझ्या लक्षात आले. ते लोक इंग्लिश मध्ये बोलत असूनही एकही अक्षर मला समजत न्हवते. या वेळेपर्यंत आमचा निम्मा दाबा रिकामा झाला होता. मला गार्ड कसा अजून येत नाही याचे आश्चर्य वाटत होते.

शेवटी एक रिचमंड नावाचे स्टेशन आले. तिथे गाडी थांबल्यावर राहिलेल्या काही गोऱ्या लोकांनी मागील डब्यात पोबारा केला :-) काही लोक बाहेरून डब्यात चढत असताना त्यांच्या लक्षात आले कि इकडे काही काळेबेरे आहे. ते लगेच मागच्या डब्याकडे गेले. एक गोष्ट माझ्या लक्षात आली कि एवढ्या शिस्तीच्या ब्रिटीश लोकांपैकी एकही जण त्यांना शांत करायच्या फंदात पडला नाही अथवा त्यांना ओरड्लाही नाही! थोड्या वेळाने गार्ड डब्यात आला!

गार्डने प्रथम भांडण थांबवायचा प्रयत्न केला. पण ते अजूनच जोरात भांडू लागले. त्यांचा राग आपल्यावर कधी निघेल या भीतीने गार्डही जास्त बोलत नव्हता. शेवटी त्याने दुसऱ्या एका गार्डला मदतीला बोलावले. तेवढ्या वेळात मीही आता वैतागलो होतो. एव्हाना बाकीचे ब्रिटीश डब्यातून निघून गेले होते आणि राहिलेले बहुधा त्या दारूड्यांचेच दोस्त असावेत. त्यात काळा माणूस मी एकटाच होतो. मलाही आता भीतीपेक्षा कटकट जास्त होऊ लागली होती. आवाज टिपेला पोचला होता. मीहि मुकाट्याने डब्यातून उतरलो आणि चांगले ३/४ डबे मागे जाऊन बसलो.
वाटले आता तरी संपले. पण आपले नशीब फार थोर असते, त्या गार्डने त्यातील एका ग्रुपला माझ्याच डब्यात पाठवून दिले! ते थोडे शांत बसले पण माझ्याकडे कुत्सितपणे पाहत होते. "हा पप्पू पहिल्याच डब्यातून आलाय" हे त्यांना कळले असावे. माझ्या बरोबरचे गोरे मग पुन्हा जीव मुठीत धरून बसले. एक गोरा माणूस आपल्या बायकोचा हात धरून होता. नक्की कोण घाबरलेय तेच कळत नव्हते. जवळ जवळ २०/२५ मिनिटे लेट झाल्यानंतर मग गाडी निघाली. आता मात्र गाडी सुसाट निघाली. मधल्या एक दोन स्टेशनांवर आम्हाला वैताग देणारे हे महाभाग उतरून गेले आणि सर्वांनाच हायसे वाटले.

मी रात्री दहाला स्टेन्सला उतरलो आणि सुनसान रस्त्यावरून घराकडे चालू लागलो...

Tuesday, 15 December 2009

विलायतेतील केशकर्तन - सगळे न्हावी सारखेच!

अमेरिकेतल्या लोकांना कुठल्याही दुकानाची वा हॉटेलची चेन काढल्याशिवाय चैन पडत नाही असे म्हणतात! या लोकांनी अगदी न्हाव्याच्या धन्द्यालाही सोडलेले नाही. गोल्डनमध्ये एका अशाच चेन मधले केस कापायचे दुकान होते! चेनचे नाव छान होते - "कॉस्ट कटर्स". घराजवळ चालत जाण्यासारखे असल्यामुळे आम्ही इथेच कटिंगला जात असू. इथे केस कापायला सर्व मुलीच होत्या आणि त्यामुळे सुरुवातीला अगदी कसतरीच वाटायचं :-)


दुकानात गेल्यावर पहिल्यांदा नंबर लावावा लागे. गर्दी असेल तर शेजारील बाकावर अमेरिकेतील गुळगुळीत मासिके वाचत बसायचे. त्यानंतर एखादी बाई वा मुलगी बोलावत असे. त्यातल्या त्यात सुंदर दिसणारीकडे आपला नंबर लागावा असे आम्हाला वाटे. पण नशीब नेहेमीच थोर नसे. एकदा डोके त्यांच्या हातात दिले कि मग आपण विचार करणे सोडावे. मुली खूप गप्पिष्ट होत्या. कुठून आला, कुठे नोकरी करता इत्यादी प्रश्न तयार असायचे. मग आपणही काहीतरी विषय काढून त्यांना प्रश्न विचारायचे - असे हे रुटीन चालत असे. केस कापून झाले कि मग बेसिनमध्ये डोके धुवायचे. आपले न्हावी जसे "दाढीहि करू का?" विचारतात तसे एकदा एका बाईने मला "कोंडा खूप झाला आहे, शाम्पू करू का?" असे विचारले. मी म्हंटले बघूया करून. तिने माझे डोके बेसीन मध्ये घालून शाम्पू लावून धु धु धुतले. नंतर जाताना एक २०$ चा "टी-ट्री" नावाचा शाम्पूही गळ्यात मारला. तो पुढे ६ महिने चालला होता.

कॉस्ट कटर्स चा रेट जरा जास्ती होता १४$. आणखी वरती २$ टीप पण द्यावी लागे. शिवाय tax! गोल्डन मध्ये दुसरे एक "हेअरीटेज (Hairytage)" नावाचे दुकान होते तिथे १०$ मध्ये कटिंग करून देत म्हणे. लांब असल्याने आम्ही कधी गेलो नाही. कार घेऊन केस कापायला कोण जाणार? कॉस्ट कटर्स मध्ये मी एकदा मजेशीर दृश्य पाहिले होते. तिथली एक मुलगी प्रवेश द्वाराच्या पुढील व्हरांड्यात सिगारेट पीत आपल्या बॉयफ्रेंडशी गप्पा मारीत होती. मी गेलो तेव्हा जास्त लोक नसावेत. पण मी आत गेल्यावर हि बया लगेच सिगरेट टाकून आणि त्या बाप्याला टाटा करून आत आली! माझे केस कापायला. हि जरा उडानटप्पू असावी. नेहेमी एक कटिंग झाली कि सिगरेट ओढायला बाहेर पळत असे. असो.

एकंदरीत आपले न्हावी आणि अमेरिकेतल्या या न्हाविणी यांच्यात मला जास्त फरक वाटला नाही ....
इंग्लंड मध्ये असताना चार महिन्यांच्या वास्तव्यात केस कापायचा प्रसंग एकदाच आला! इथे ज्या दुकानात गेलो होतो तिथे एक मध्यपूर्वेतील माणूस (बहुदा अब्दुल) ते दुकान चालवत असे. बाहेरचा रेट १० पौंड असताना हा ५ पौंड घेत असे. हा सुरुवातीचा discount होता आणि नंतर त्यानेही रेट वाढवला. इथेही खूप गर्दी होती आणि जवळपास एका तासाच्या तपस्येनंतर मला नंबर मिळाला. अब्दुल ने कटिंग मात्र चांगली केली आणि तो त्याच्या तोडक्या मोडक्या इंग्रजीत गप्पाहि मारत होता. त्याला सलाम ठोकून विदेशातील ती शेवटची कटिंग करून मी बाहेर पडलो ...